विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल अलीकडेच लागला. त्याच्या निकालाचे विवेचन करण्यात अनेक पाने खर्ची पडली आहेत. तसेच राजकारणावर भाष्य करायला, तो माझा प्रांत नव्हे! परंतु लोकसभा व विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशातून काही धडे घेऊन गुंतवणुकीच्या विश्वात त्याचा उपयोग करून घेता आला तर
भाजपच्या विजयामागे मोदी लाट होती की नव्हती, मोदींचे विरोधक नालायक होते की केवळ मोदींचे नशीब बलवत्तर, यापेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे मतदारांनी पुराणमतवादी, अस्मितावादी मंडळींना झिडकारून आर्थिक विकासाच्या गणिताला दिलेले प्राधान्य. १९९१ नंतर जन्म झालेल्या मंडळींचा टक्का एकूण मतदारांमध्ये जसजसा वाढत जाईल, तसतसा आर्थिक विकासाला प्राधान्यक्रमात वरचे स्थान मिळत राहील. भाषावाद, प्रांतवाद, मंदिर-मशीद हे सर्व प्रश्न एका दिवसात निकाली निघत नाहीत. पण मतदारांच्या मनातील या प्रश्नांची तीव्रता कमी होऊ लागते.
राजकारण अर्थकारणावर चालते, हे वैश्विक सत्य आहे. जो हे मान्य करेल तो दीर्घकाळ सत्ता उपभोगेल व सध्या मोदींनी हे निखळ सत्य मान्य केले आहे. ‘सबका साथ.. सबका विकास’ या घोषणेचे दूरगामी परिणाम फार महत्त्वाचे आहेत. तरुण पिढीला स्मार्ट फोन हवे आहेत, वेगवान इंटरनेट हवे आहे, अखंडीत वीज, ई-कॉमर्स, मॉल हे सगळे हवे आहे. त्यांच्या दृष्टीने हाच विकास आहे. हा विकास आहे की ऱ्हास, यावर विचारवंतांनी जरूर चर्चा करावी. पण हा तरुणांचा वाढता टक्का हिरिरीने मतदान करताना त्यांच्या संख्याबळाच्या जोरावर राजकारणावर निश्चित परिणाम करणार. आधीच्या सत्ताधीशांना बसलेली चपराक व विरोधकांमधून मोदींच्या भाजपची निवड करून मतदारांनी भविष्यकाळाची एक चुणूक दाखवली आहे. पुढील साडेचार वर्षांत सध्याच्या केंद्र सरकारला आíथक विकास घडवून आणावा लागेल व या विकासाची काही फळे तळागाळापर्यंत जातील, याची खबरदारी घ्यावी लागेल. नाहीतर त्यांची अवस्था यूपीए-दोनच्या सरकारप्रमाणेच होईल. किंबहुना मतदार तशीच अवस्था भाजप सरकारचीदेखील करेल. आता या सगळ्यातून गुंतवणूकदारांनी काय बोध घ्यावा तेही बघू!
आपल्या देशात तरुणांचे प्रमाण वाढते आहे. जोवर कुशल व अकुशल कामगारांची अर्थार्जनाची गरज शासनाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या भागवली जात आहे, तोपर्यंत उपरोल्लेखित मागण्या वाढत राहणार आणि विकास होत राहणार. वीजनिर्मिती, रस्ते, वाहने, उपभोग्य वस्तू या व अशा इतर क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना चांगले दिवस येणार. या कंपन्यांची नफा कमविण्याची क्षमता वाढणार.
सध्या शेअर बाजाराने घेतलेली उसळी म्हणजे केवळ एक तत्कालीन ‘सूज’ आहे. अर्थव्यवस्थेत व कंपन्यांच्या नफ्यात फारसा फरक पडलेला नाही. कंपन्यांकडून नवीन भांडवली गुंतवणुका मोठय़ा प्रमाणात होताना दिसत नाहीत. मागणीप्रधान बाजारपेठ अजूनही सुदृढावस्थेत दिसत नाही. जेव्हा कधी ग्राहकांची वेगवेगळ्या वस्तूंची व सेवांची मागणी वाढू लागेल, तेव्हा या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होऊ लागेल व शेअर बाजार बाळसे धरू लागेल. त्यावेळी खऱ्या अर्थाने दीर्घ मुदतीत चक्रवाढ गतीने नफा कमविण्याच्या संधी निर्माण होतील. शेअर बाजारातील चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तसेच म्युच्युअल फंडांमध्ये पसे गुंतवणाऱ्या मंडळींना नफा मिळण्याची शक्यता आहे.
याचा अर्थ केवळ शेअर बाजारातच नफा असेल असे नाही. अनेक कंपन्या पुढील वर्षभरात बाजारात कर्जरोख्यांच्या माध्यमातून पसे उभे करतील. या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणे किंवा या रोख्यांमध्ये पसे गुंतवणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत पसे गुंतवणे, हा एक चांगला पर्याय ठरेल.
अर्थात, गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीचे भान ठेवणे अपेक्षित आहे. एका रात्रीत कोणताही बदल घडून येत नाही. भारताने ३० वर्षांनंतर केंद्रात एका पक्षाच्या हातात निर्वविाद सत्ता बघितली आहे. हा बदल १६ मेला एका दिवसात झालेला नाही. मोदींनी गुजरात दंगलीनंतर १२ वर्षांनंतर पंतप्रधानपद मिळवले. गुंतवणुकीच्या जगात एका रात्रीत धनप्राप्ती होत नाही. रातोरात श्रीमंत करणाऱ्या सर्व तथाकथित योजनांपासून दूर राहणे, यातच गुंतवणूकदारांचे हित आहे.
एक महत्त्वाचा धडा आपल्याला अमेरिकेकडूनदेखील शिकायला हवा. गुजरात दंगलीनंतर अमेरिकेसाठी मोदी खलनायक ठरले होते. परंतु २०१४ साली १२५ कोटी लोकसंख्येच्या या बाजापेठेने मोदींना निवडून देताच अस्पृश्य मोदींना स्पृश्य ठरवत अमेरिकी धुरिणांनी मोदींबरोबर पंक्तीप्रपंच केलाच. २००८ साली लेहमन ब्रदर्सची वाताहत झाल्यावर झालेल्या पडझडीच्या वेळी गुंतवणुकीच्या जगाला उच्चरवाने नावे ठेवत ‘गडय़ा आपुल्या एफडी बऱ्या’ म्हणाला असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही टोपी फिरवू शकता. दीर्घकालीन गुंतवणुका करणे शक्य असेल तर टप्प्याटप्प्याने भांडवली बाजारात या. पुढील पाच-दहा वर्षांत विकासाचा वेग वाढला तर परकीय गुंतवणूकदार निश्चित
फायदा कमवून घरी जातील. पण आपण भांडवल बाजारापासून दूर राहिलो, तर या वाहत्या गंगेच्या किनारी कोरडे राहू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा