खरे तर आम्हांस या अशा गोष्टी मिरवणे आवडत नाही. ते आमच्या स्वभावात नाही. पण राहवत नाही म्हणून सांगतो- राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रनाना आणि आम्ही म्हणजे सख्खे बालमित्र. ते आणि lok03आम्ही एकाच वर्गात होतो. थोडे भौगोलिक अंतर होते. म्हणजे ते चंद्रपुरात, आम्ही पुण्यात. पण म्हणून काय झाले? दिवाळीची, उन्हाळ्याची सुट्टी असतेच ना! मैत्री काय, तेव्हाही होऊ  शकते! पुढे महाविद्यालयातसुद्धा एकाच बाकावर बसायचो आम्ही. (शरदराव आणि आम्ही एका बाकावर बसायचो, ते याच्या खूप आधी!)
आता हेही कोणास सांगू नका, पण एक जानामाना पत्रकार म्हणून आजही अनेक बाबतीत नाना आमचाच सल्ला घेतात. या निवडणुकीआधीची गोष्ट. असाच एकदा सक्काळ सकाळी नानांचा फोन आला. म्हटले, ‘नानू, ही काय वेळ झाली फोन करायची? नंतर कर.’ तर देवेंद्र म्हणतात कसे, ‘नाही, नाही.. महत्त्वाचं बोलायचं आहे. मोदींना होल्डवर ठेवलंय. त्यांना पटकन् ‘हो की नाही’ ते सांगायचंय.’ म्हटले, ‘कशाबद्दल?’ तर म्हणाले, ‘मुख्यमंत्रीपद घेणार का, म्हणून विचारताहेत. मला काहीच समजत नाहीये.’ त्यावर आम्ही डोळे मिटून म्हणालो, ‘हो म्हणून टाक. पुढचं मी बघतो.’
आणि आज तुम्ही पाहताच आहात, की आमचा नाना मुख्यमंत्री झाला आहे. एक हुशार आणि निष्कलंक असा नेता मुख्यमंत्री झाला आहे. नानाचा हा गुणसुद्धा लहानपणापासूनचा बरे का! अंगावर एक डाग पडलेला त्याला आवडत नाही. आज तो मुख्यमंत्री झाल्यामुळे त्याला चिकटू पाहणाऱ्या पत्रकारांची संख्या भलतीच वाढलीय. त्यातले कोणी काहीही सांगतात. परवा एक बूमबहाद्दर सांगत होता, की नानांना किशोरदाची गाणी आवडतात. पण तुम्हांस सांगतो, नाना आणि आम्ही लहानपणापासून एकच गाणे गुणगुणत आहोत- ‘निरमा! निरमा! वॉशिंग पावडर निरमा! दुधसी सफेदी निरमा से आये, रंगीन कपडा भी खिल खिल जाये! सबकी पसंद निरमा.. निरमा!’
आज ‘दाग अच्छे हैं’ म्हणणाऱ्या पिढीला यातील मर्म समजणार नाही. पण निष्कलंकपणाची निशाणीच आहे ही.
आम्हांस अजूनही आठवतेय- तो तेव्हा तिसरी-चौथीत असावा. तेव्हाही असाच गोरागोमटा दिसायचा तो! रोज अंघोळ करायचा. एकदा असेच अंघोळीनंतर त्याच्या मातोश्रींनी त्याच्या केसाचा छान कोंबडा पाडला. मग मोठय़ा आवडीने त्याच्या डोळ्यांत काजळ घातले आणि गोबऱ्या गोबऱ्या चब्बी गालावर त्याच काजळाची इवलीशी तीट लावली. झाले! तो डाग पाहून नाना जो सात्त्विक संतापला म्हणताय! डोळ्यांतून हे घळाघळा अश्रू वाहू लागले त्याच्या! तेव्हाच आम्ही त्याच्या मातोश्रींना म्हणालो होतो, ‘देवेंद्रची आई, देवेंद्रला जपा हो. खूप मोठा होणार आहे तो.’
आणि आज आमचे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत!
(आम्हांस हे पक्के माहीत आहे, की यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. [यावर म्हणजे आमच्या मैत्रीवर. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले यावर नव्हे! त्यावर केवळ आमचे परमनेते नाथाभाऊ  खडसे आणि उद्धवजी ठाकरे यांचाच विश्वास बसत नाही अजून, असे म्हणतात म्हणे!] कोणी म्हणेल, आता जो उठेल तो अशा मैत्रीच्या बाता मारेल. अनेकजण तर यापुढे आम्हांलाही ‘फेकू’ असे म्हणतील. परंतु वस्तुस्थिती आहे ही अशी आहे, त्याला कोण बरे काय करणार!)
आम्हांस मात्र गेल्या चार दिसांपासून नुसता ‘मोद (आणि मोदीसुद्धा!) दाटला चोहीकडे’ असेच झाले आहे. पण कितीही आनंद झाला तरी आमुच्यासारखे हाडाचे पत्रकार कर्तव्यापासून च्युत होत नसतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मायमराठीतील पहिली मुलाखत घ्यायची ती आपणच- या व्यावसायिक ईष्र्येने आम्ही थेट मंत्रालय गाठले.
‘या या या, पत्रकार!’.. देवेंद्रजींनी आमचे हसून स्वागत केले. (घ्या! आमच्या मैत्रीचा ठोस पुरावा!)
‘खूप कामात असाल. पण तुमची एक छोटीशी मुलाखत हवी आहे.’ आम्ही थेट कामालाच हात घातला. मैत्रीचा दुरुपयोग करू नये माणसाने!
‘तुमच्यापुढे कसली कामे अप्पा! तुम्ही विचारा काय हवे ते..’ (हा दुसरा पुरावा!)
आम्ही विचारले, ‘आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही काय करणार?’
‘अभ्यास!’
व्वा! राज्याचा मुख्यमंत्री कसा अभ्यासूच पाहिजे. आम्ही मान डोलावली. तसे देवेंद्रजी डोळे मिटून प्रसन्न हसले.
‘शिवाय पहिल्यांदा आम्ही गुड गव्हर्नन्ससाठी सतरा कलमी योजना आखणार आहोत. त्यानंतर पाचच दिवसांत तीन घोषणा होतील आणि पुढच्या महिनाभरात दहा कलमी योजना सुरू करण्यात येईल.’
आम्ही चटाचट लिहून घेत म्हणालो, ‘व्वा व्वा! याला म्हणतात गतिमान प्रशासन. अगदी केंद्राप्रमाणे!’
‘काही खाती अगदीच बिनकामाची आहेत. ती बंद करून नवी चालू करणार आहोत. उदाहरणार्थ, स्वच्छता मंत्री. हे राज्य स्वच्छ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.’
(वाचकहो, ‘स्वच्छ’ या शब्दातील श्लेष समजला ना? कित्ती हुश्शार आहेत नाही मुख्यमंत्री!)
‘त्याची सुरुवात आम्ही मंत्रालयापासून करणार आहोत.’
(वाटलेच! आता दादांचे काही खरे नाही!)
‘हे काम कधीपासून सुरू होईल म्हणता..?’ आम्ही आत्यंतिक उत्सुकतेने विचारले.
‘त्याचे काय आहे- प्रत्येक कामाची एक ठरावीक वेळ असते. ती वेळ आली की काम सुरू होते..’ मोहकसे हसत देवेंद्रजी म्हणाले.
‘हो. पण ती वेळ कधी येणार?’
‘तेच तर सांगतोय. राज्यकारभाराची घडी एकदा नीट बसली की लगेच!’
मुलाखत संपली तरी एक प्रश्न काही आमच्या मनातून जाईना.
राहून राहून मनात येत होते, की देवेंद्रनाना ‘घडी’ म्हणाले ती मराठीतील ‘घडी’ की हिंदीतील?