मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांची ख्याती विचक्षण लेखक आणि वाचनमग्न समीक्षक म्हणून. या क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा असलेले रसाळ या आठवड्यात ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील त्यांची ख्यातकीर्त प्राध्यापकी अनुभवलेल्या साहित्यिक कवीने रेखाटलेले शब्दचित्र…

साल १९९०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभाग. एकापेक्षा एक व्यासंगी शिक्षकांची खाण. प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुळकर्णी यांनी १९५९ साली मुहूर्तमेढ रोवलेली. केबिनबाहेरच्या पाट्या वाचूनच जीव दडपायचा. आपापल्या विषयात दबदबा असणाऱ्या प्राध्यापकांची मोठी परंपराच होती. संत साहित्याचे चिंतक डॉ. यू. म. पठाण, दलित साहित्याचे भाष्यकार डॉ. गंगाधर पानतावणे, लोकसाहित्याचे विद्यापीठ असणारे डॉ. प्रभाकर मांडे, ग्रामीण साहित्याची नव्याने मांडणी करणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि समीक्षेच्या क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा असलेले डॉ. सुधीर रसाळ असे ख्यातकीर्त प्राध्यापक विभागाचा लौकिक वाढवायचे. यापैकी डॉ. पठाण, डॉ. पानतावणे व डॉ. मांडे हे पद्माश्री किताबाने सन्मानित झालेले. एकाच विभागात तीन प्राध्यापक पद्माश्रीप्राप्त असणारा हा एकमेव विभाग असेल.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!

आणखी वाचा-फडणीसांची ‘सुंदर ती दुसरी दुनिया’

शालेय जीवनातला मारकुटा मास्तर आपण विसरू शकत नाही, तद्वत अत्यंत तन्मयतेनं शिकवणारा शिक्षकही आपल्या कायम स्मरणात राहतो. खरं तर मन:पूर्वक काम करणारा कोणीही आपल्याला आकर्षित करतो. संबळ वाजवताना संबळ झालेला गोंधळी, उलटा लटकून पाडाचा आंबा खाणारा राघू, लाकडावर रंधा मारणारा कारागीर, बाभळीच्या खोडावर समोरचे दोन पाय रोवून पाला खाणारी शेळी, सुरांशी लीलया खेळणारा गायक, स्लॅपच्या बांधकामावर सिंमेटचे टोपले झेलणारे कामगार, रंगमंचाच्या अवकाशात शून्यात हरवून स्वगत म्हणणारा नट, कांदा कापताना गतीनं बतई चालवणारे हात, गवत खाणाऱ्या बैलाच्या गळ्यातील घंटीचा नाद, प्रार्थनेत आर्त झालेला देह… असं काय काय आपल्याला आकर्षून घेतं. कारण ती कृती करणारा त्या कृतीत बुडून गेलेला असतो. कृतीमधली पारंगतता सवयीनेही प्राप्त करता येते. पण कृतीत बुडता आलं तर ती एक अनुभूती ठरते. एक अदृश्य साकव तयार होतो. असं जोडलं जाणं हे ज्यांच्या अध्यापनाचं भागधेय आहे, ते शिक्षक म्हणजे गुरुवर्य डॉ. सुधीर रसाळ!

त्यावेळी कला शाखेकडे असलेला ओढा आणि विद्यापीठाशिवाय बाहेर महाविद्यालयात एक-दोन ठिकाणीच मराठीचे पदव्युत्तर वर्ग असल्यामुळे विभागात गर्दी असे. शंभर विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या वर्गात अध्यापनाचे प्रयोग रंगत असत. रसाळ सरांजवळ मात्र प्रयोग रंगवण्यासाठीची विशेष अभिव्यक्ती नव्हती. ‘रसाळ’ नावाला जागणारं बोलणं नव्हतं. बोलताना कुठेही आरोह-अवरोह नाही. एका लयीत ठरावीक अंतराने शब्दांचे उच्चार करीत सर बोलत. विनोद करण्याचा यत्किंचितही प्रयत्न नाही. बोलताना ललित साहित्यापासून दूर गेलेच तर जास्तीत जास्त ललितेतर साहित्यापर्यंत जाणार. विषयांतर, अघळपघळ बोलणं नाहीच. आपलं बोलणं आकर्षक करण्याचा ते अजिबात प्रयत्नही करीत नसत. पण त्यांच्या उच्चारातून ठामपणा मात्र जाणवत असे. व्यासंगातून आलेला आशय, संदर्भबहुलता आणि नेमकं विश्लेषण हेच सरांच्या अध्यापनाचे सामर्थ्य होते. मुळात एखाद्या विषयाला उलगडून दाखवण्याची अनलंकृत शैलीच खास होती. मला तर ती नेमकेपणाने विज्ञान शिकवल्यासारखी वाटायची. जैविकशास्त्रात एखादा विषय समजून सांगताना आधी सगुण भक्तीने फळ्यावर आकृती काढली जाते. मग तिचे दृश्यरूप, आकार, रंग, गंध असे करत तिच्या चारी दिशा, वर, खाली सांगून आडवा, उभा छेद घेतला जातो. अशी अंतर्बाह्य विश्लेषणाची रसाळ सरांची पद्धती आहे. या वर्णन/ विश्लेषण पद्धतीची कल्पना येण्यासाठी ‘लोभस’ मधील एक उदाहरण घेता येईल.

आणखी वाचा-हास्यचित्रकलेची अवघड रेषा

वडिलांवरच्या लेखात स्वत:च्या गावाचं केलेलं वर्णन बघूयात, ‘आमचं गाव गांधेली. औरंगाबादपासून केवळ तीन कोस अंतरावर. हे अगदी छोटंसं. हजार दीड हजार लोकवस्ती असावी. हे गाव एका मुस्लीम नवाबाची जहागीर होती. या गावात मुस्लीम समाजाची बरीच घरं होती, तशीच राजपुतांचीही. औरंगाबाद हे मुघलकालीन दक्षिणेची राजधानी असल्यामुळे त्या काळात राजपूत फौज आणि उत्तरेतील कायस्थ नोकरदार औरंगाबादेत वस्तीला असत. त्यामुळे काही राजपूत घराणी येथे कायमची वस्ती करून राहिली. गावातले राजपूत मराठीच बोलत. त्यांची नावं तेवढी राजपूत पद्धतीची असत. या गावाच्या तिन्ही बाजूला डोंगर. या डोंगराच्या पायथ्याशी एक तळं. पावसाळ्यात ते तुडुंब भरत असे आणि हिवाळ्यात आटत असे. या तळ्याच्या नजिक नामांकित आंब्यांची झाडं असलेली एक आमराई होती. तिचे आंबे निजामाला पाठवले जात असं गावात बोललं जाई. गावाची पोलीस-पाटीलकी आणि कुळकर्णीपण आमच्या घराण्याकडे होतं. या गावात आमचा प्रचंड मोठा चिरेबंदी वाडा होता- काही पिढ्यांपूर्वी पूर्वजांनी बांधलेला. त्याचा बराच भाग पडून गेलेला होता.’ अशी ही विषयाच्या अंतरंगात शिरणारी साधी शैली. चित्रपटाचा एखादा छायाचित्रकार ज्या पद्धतीने दूर दृश्यातून कॅमेरा हळूहळू समीप नेतो. एकेक भाग स्पष्ट करीत ( registered) तो दृश्यखंड काबीज करतो. तसे रसाळ सर समीक्षेतील एखादी संकल्पना स्पष्ट करताना चहूबाजूंनी दर्शन घडवतात. वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध मांडणी करतात. सगळ्या शक्यता पुढ्यात ठेवतात. कुठलाही मतप्रवाह सांगताना चढा सूर नाही. आविर्भाव नाही. शांतपणे संथ लयीत, पण ठामपणे बोलणं. त्यामुळे आपण एखाद्या ध्यान गृहात बसलेलो आहोत आणि प्रतिपाद्या विषय ध्यानबिंदू आहे असा सत्संग व्हायचा.

अध्यापन, भाषण किंवा लेखन असं काहीही असो, धोरणात बदल नव्हता आणि आजही नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ च्या ताज्या अंकात विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’ कादंबरीचे सरांनी केलेले पुनरावलोकन. ‘तसं पाहता भारतीय असणारा चक्रधर आणि ज्यू असणारी हॅर्टा यांची ही बहुचर्चित प्रेमकहाणी आहे. वंशवादाने पछाडलेली आणि त्यासाठी युद्धखोर झालेली राष्ट्रे, नुकतेच घडलेले संहारक असे पहिले महायुद्ध आणि त्यात झालेला हजारो सैनिकांचा मृत्यू, अनेक तरुण मुलींना पत्करावा लागलेला वेश्याव्यवसाय, नैतिकता गमावलेली व्यापारी वृत्ती… या सर्वांचे दर्शन ही छोटीशी कादंबरी घडवते.’ असं नेमकेपणाने कादंबरीचे सामर्थ्य सांगतात. पण एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतात- जो आजपर्यंत कुणाच्याच लक्षात आलेला नाही. या कादंबरीत बोटीवर दहा दिवसांच्या प्रवासात ही प्रेमकहाणी घडते. या प्रवासात चक्रधर आणि हॅर्टा नेमके कोणत्या भाषेत बोलत असतील? इंग्रजीत बोलण्याची शक्यता नाही. कारण हॅर्टासह ज्यूंना इंग्रजी येत नाही. चक्रधरला जर्मन भाषा येत नाही. इंग्रजी शिकण्याचा एकही प्रसंग कादंबरीत नाही. आणि दहा दिवसांत प्रेमसंवाद करण्याएवढी भाषा शिकता येत नाही. हा भाषेबद्दलचा कुणीही उपस्थित न केलेला प्रश्न रसाळ सर उजागर करतात. ‘वस्तुत: पात्रांच्या परस्परांशी होणाऱ्या संवादाच्या भाषेसंबंधीचा हा प्रश्न कादंबरी लिहिताना खुद्द लेखकालाच पडायला हवा होता. त्याला जर तो पडला असता तर ही कादंबरी लिहिणे शक्य झाले नसते.’ हे मूलभूत निरीक्षण आपण डोक्यावर घेतलेल्या कादंबरीबद्दल पुनर्विचार करायला लावतं.

जोडलं जाणं म्हणतात ते रसाळ सरांशी घडलं. त्याला प्रत्यक्ष विद्यार्थी असणं कारणीभूत आहेच, पण त्याशिवाय माझं कविता लिहिणंही कामी आलं. सरांशी बोलावं असं खूप वाटायचं, पण हिंमत होत नव्हती. खरं तर हे सारे गुरुजन साधे-प्रेमळ होते. पण आदरयुक्त भीती वेगळीच असते. शिवाय सर सारखे वाचन-लेखनात व्यग्र असत. काही वेळा कुणी अभ्यागत भेटायला आलेले असत. कधी सही घेण्यासाठी केबिनमध्ये गेलं तर टेबलावर मांडून ठेवलेले जाडजूड ग्रंथ दिसत. उभ्या-उभ्या सही घ्यायची. बाहेर पडायचं. तेवढ्या वेळात शक्य तेवढी केबिन, तिथल्या वस्तू, पुस्तकं बघून घ्यायचं. रसाळ सर मुळातच गंभीर वृत्तीचे. स्कूटरवरून उतरून थेट केबिनमध्ये. संध्याकाळी केबिनमधून नीट घरी. हातात एक ब्रिफकेस. जाता-येताना स्वत:च्या तंद्रीत. आम्ही चिडीचाप. ग्रंथालयात सगळ्यांची मागणी असणारा सरांचा ‘कविता आणि प्रतिमा’हा ग्रंथ. साहित्य वर्तुळात सरांबद्दल असणारा आदर, मराठवाडा साहित्य परिषदेत असणारा सरांचा सक्रिय सहभाग यामुळे तर अधिकच दडपण यायचं. सरांचे शेजारी प्रा. चंद्रकांत भालेराव, त्यांचा मुलगा आशुतोष माझा नाटकवाला मित्र. त्यांच्या घरी जायचो तेव्हा माझं सारखं लक्ष रसाळ सरांच्या घराकडे असे. पण भेटण्याची-बोलण्याची हिंमत नव्हती. पुढं एम. ए. झाल्यावर एकदा रसाळ सरांनी मौजेतल्या कवितेबद्दल उत्स्फूर्त अभिप्राय दिला. तो दिवस मी हवेत होतो. तिथून कोंडी फुटली. सरांशी मोकळं बोलणं सुरू झालं ते आजसुद्धा सानंद सुरू आहे.

आणखी वाचा-वैद्याक शोधकथांच्या ‘आतल्या गोष्टी…’

सरांची कुणाकडून काही अपेक्षा नसते. आपण भेटलो तर आत्मीयतेने बोलतात. नाही भेटलात तर उश्रमा नाही. मागे सरांच्या गुढघ्याची शस्त्रक्रिया झाली म्हणून भेटायला गेलो तर गुडघा ‘ट्रान्सप्लांट’ याबद्दल सर विस्ताराने बोलत होते. सरांकडे जाण्याची संधी मी सोडत नाही. प्रत्येकवेळी सुमती काकूंचा पाहुणचार घेऊन मैफल रंगते. खरं म्हणजे मीच सरांना काहीतरी विचारतो. मग सर तपशीलाने त्या विषयाची उकल करतात. मी मोकळेपणाने शंका विचारतो. इस्रायल, रशिया, भैरप्पा, हिंदू कादंबरी, राजकारण, निजामशाही, जुनं औरंगाबाद, मराठी खानपान, सलमान रश्दी, चालीरीती, मराठवाडी शब्द, अभ्यासक्रम, नाटक, चित्रपट, जुने वाडे… अशा कुठल्याही विषयावर सर तपशीलाने बोलतात. मधे एकदा ३७० कलमाबद्दल विचारलं. सरांनी अनेक अंगांनी तो प्रश्न उलगडून सांगितला. बोलताना शेवटी सर एक वाक्य बोलले, ‘मुळात बहुसंख्य हिंदूंना इथल्या अल्पसंख्याक मुस्लिमांना समजूनच घ्यावे लागेल. त्यातूनच प्रश्न सुटतील.’ एखाद्या विषयाचं सत्त्वच नेमकेपणाने पुढ्यात ठेवण्याचं वकुब थक्कं करणारं आणि तृप्त करणारंही आहे. कुठलाही विषय सरांना वर्ज्य नाही. समीक्षक, अध्यापक कसा बहुश्रुत असावा याचं उदाहरण म्हणजे रसाळ सर. ‘चिटणीस सरांना पोएट्रीपासून ते पोल्ट्रीपर्यंत अनेक विषयांत गती आहे.’ असं त्यांचे गुरुवर्य म. भि. चिटणीस यांच्याबद्दल रसाळ सरांनी लिहिलंय. हेच विधान रसाळ सरांना तंतोतंत लागू होतं. सरांना ऐकताना, सरांशी चर्चा करताना आपण समृद्ध होतो. सरांना ऐकताना आजही नकळत मी विद्यार्थी होऊन जातो. सार्वजनिक कार्यक्रमात सर बोलतात तेव्हा त्यांचा काटेकोरपणा बघण्यासारखा असतो. बोलण्यासाठी नियोजित वेळ किती आहे याची आधी माहिती घेतात. दिलेल्या वेळातच, दिलेल्या विषयावरचं बोलतील. विनोद नाही. फापटपसारा नाही. समीकरण मांडल्यासारखं मुद्देसूद बोलणं. बोलताना समोर मुद्दे लिहिलेला कागद. बोलताना घड्याळाकडे लक्ष. कुणाचीही अवास्तव स्तुती नाही. गुणवत्ता मात्र उलगडून सांगणार. उणिवा बिनदिक्कत, पण संयतपणे मांडणार. आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ असणारे वाङ्मय अभ्यासक म्हणून सरांची सुदूर ख्याती आहे.

मराठीला स्वत:ची समीक्षापद्धतीच नाही. मराठीत चांगले समीक्षक नाहीत. कविता छापणारे प्रकाशक नाहीत. लेखक-कवीने कुठल्या इझमसाठी लेखन करू नये. मराठी कवितेत करुणा दुर्मीळ आहे, कीवच जास्त आहे, अशी ठामपणे केलेली रसाळ सरांची विधानं सर्वमान्य असतात असं नव्हे. पण सर अव्यभिचारी निष्ठेनं मांडणी करीत असतात. एक बृहत् ग्रंथ प्रस्तावनेसाठी सरांकडे आला. सरांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना तर लिहिलीच, पण मुद्रितशोधनाबरोबर नव्याने संपादनही केले. वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी सर संगणकावर अक्षरजुळणी करायला शिकले. त्यानंतर अनेक बृहत् ग्रंथांची निर्दोष संहिता स्वत:च तयार केली. आज नव्वदीच्या टप्प्यावरही सरांचं वाचन-लेखन सुरू आहे. एखाद्या धार्मिक माणसानं ईशचिंतन करताना जपमाळ ओढावी त्याच आस्थेनं रसाळ सर वाङ्मय चिंतन करीत असतात. त्यांना त्यांचा ‘राम’ वाङ्मयातच भेटलाय. खरं तर त्यांच्या कार्याची नोंद एव्हाना राष्ट्रीय पातळीवर व्हायला पाहिजे होती. पण त्याची सरांना खंत नाही, खेद नाही. कुणाबद्दलही मनात कटुता नाही. स्वत:चा संप्रदाय तयार करण्याची इच्छा नाही. पद, पुरस्कार यांचा हव्यास, असूया, द्वेष, मत्सर, दुटप्पीपणा, सत्ताकारण यांपासून रसाळ सर दूर राहू शकले याचं कारण त्यांनी खऱ्या अर्थानं स्वत:वर करून घेतलेला तर्कशुद्ध ज्ञानात्मक संस्कार हे असावं. ज्ञानात्मक अधिष्ठान हे त्यांचे सामर्थ्य आणि सिद्धी आहे. शरीर थकतंय, पण सर शिणले नाहीत. कारण ते तृप्त आहेत. आपल्या कामात समाधानी आहेत.
dasoovaidya@gmail.com