आमचे परमप्रिय नेते व गुजरातगौरव नरेंद्रभाई मोदी आणि आमच्या परमप्रिय नेत्या ममतादीदी बॅनर्जी यांस कोणाची (त्यांची-त्यांचीसुद्धा) तुळणा नाही, हे का आम्हांस माहीत नाही?
नरेंद्रभाई मोदी म्हणजे तंतोतंत विकासपुरुष. आज ते गुजरातचा विकास करीत आहेत. उद्या भारताचा करतील.आणि आमची पूर्ण श्रद्धा आहे, की परवा ते जगाचासुद्धा विकास करतील!
(हसताय काय हॅहॅहॅ करून? केशुभाई कुठचे! आम्ही काय ज्योक नाय मारला! साधे लॉजिक आहे! नरेंद्रभाई म्हणजे विकासपुरुष! ते भारताचे पंतप्रधान झाले, की गुजरातप्रमाणेच भारतपण एका झटक्यात महासत्ता बनणार! मग अमेरिकेचे विपु (पक्षी : विध्वंसपुरुष) जॉर्जभाई बुश आणि विपु (पक्षी : विकासपुरुष) बराकभाई ओबामा यांनी जगाचे जे केले, तसेच नरेंद्रभाईही करणार! गुजरातमध्ये स्मॉलस्केलवर हे करण्याचा अनुभव त्यांना इतपर आहेच! असो.)
तर नरेंद्रभाई गुजरातचे सिंह असतील, तर आमच्या ममतादीदी म्हणजे खादीसाडीधारी बंगाली वाघीण आहेत. साक्षात् तृणमूलधारिणी माकपसंहारिणी माँ कंठाळी आहेत! पण एवढेच! ताई मुख्यमंत्री आहेत, एवढी किरकोळ बाब वगळली, तर अन्य कोणत्याही बाबतीत त्यांची भाईंशी तुळणा होऊ शकत नाही.
त्याची तीन कारणे आहेत. एक तर दीदींची स्मरणशक्ती खूपच कमजोर आहे. त्यामुळे त्यांच्या हे लक्षातच राहात नाही, की त्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत! (खरेखोटे कालीमाता जाणे, पण असे म्हणतात की, रोज सकाळी त्या रायटर्स बििल्डगकडे जाण्यास निघाल्या, की त्यांचा सचिव त्यांना आठवण करून देतो, की आपण रायटर्स बििल्डगच्या मध्ये चाललो आहोत. बििल्डगवर मोर्चा घेऊन नाही!) दुसरी गोष्ट म्हणजे त्या अजून जॉर्ज बुश-मोडवरच आहेत. बराक-मोडवर येणे बाकी आहे. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाई हे पुरुषजातीचे आहेत आणि दीदी महिला आहेत! जरी आज त्या तृणमूलमधल्या एकमेव पुरुष वाटत असल्या, तरी त्या महिलाच आहेत! (सर्वसुश्री सोनियाजी, मायावतीजी, जयललिताम्मा यासुद्धा महिलाच आहेत. सुषमाताईसुद्धा महिलाच आहेत. पण भाजपमध्ये अजून गडकरी, अडवाणी, मोदी अशी मंडळी आहेत! असो. सारखेसारखे विषयांतर नको.)
पण आम्हांला असा दाट संशय आहे, नव्हे नव्हे आमची खात्रीच आहे, की नरेंद्रभाई आणि ममतादीदी यांच्यात दाट सख्य आहे! म्हणजे ते दोघे काही अगदी रोज भेटून- ‘तुज कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला?’ – असे म्हणत नसतील किंवा उठता बसता ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती’ असे चिरकत ममतादीदी ‘ओवाळीते भाईराया’ असेही करीत नसतील. पण त्यांच्यात काही तरी रक्षाबंधन निश्चितच आहे! एरवी आजच्या काळात कोण कोणाला उगाचच का सिंगूर वगरे लावून टाटा नॅनो भेट देतो?
आणि तुम्ही एक गोष्ट मार्क केलीय का? भाईंच्या पंतप्रधान होण्यास पक्षातच अनेकांचा विरोध आहे. दीदींचा, पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असो त्याला कायमच विरोध आहे. ही एक गोष्ट अपवाद म्हणून सोडली, तर भाई आणि दीदींमध्ये अनेक बाबतीत कमालीचे साम्य आहे. उदाहरणार्थ भाईंची राहणी साधी आहे. दीदींची राहणीपण साधी आहे. भाईंना लाल रंग आवडत नाही. दीदी त्याचा तिरस्कार करतात. दोघेही तंत्रप्रेमी आहेत. भाई ट्विटरवर आहेत. दीदी फेसबुक वापरतात. अर्थात सर्वानाच हे ठावूक आहे. पण अनेकांना ही गोष्ट अजूनही माहीत नसेल, की भाई आणि दीदी या दोघांनाही वैद्यकशास्त्रात कमालीची रुची आहे, गती आहे. किंबहुना, हे दोघेही राजकारणात आले नसते, तर आज कोलकात्याच्या एखाद्या झोपडपट्टीत डॉ. ममतादीदी डाएटिंगची मोफत शिबिरे घेताना दिसल्या असत्या आणि अहमदाबादेतल्या एखाद्या चौकात वैद्य नरेंद्रभाई मोदी, कुपोषणतज्ज्ञ अशी पाटी दिसली असती! नरेंद्रभाईंनी वॉल स्ट्रीट जर्नलला मुलाखत दिली नसती, तर आम्हांला त्यांच्या अंगातील ही वैद्यककळा कदापि समजली नसती.
गुजरात हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. विकसित आहे. त्यामुळे तेथे कुपोषणाची, गरिबीची फार काही समस्या नाही. तेथील लोकांना २४ तास वीज उपलब्ध आहे. फक्त तेथील ग्रामीण आणि शहरी भागातले प्रतिदिन कॅलरीसेवनाचे प्रमाण तेवढे खूपच घटले आहे. पण या रोगाची कारणे वैद्य नरेंद्रभाईंनी बरोब्बर शोधली. त्याचे काय आहे, गुजराती बायकांमध्ये सौंदर्याबाबत खूपच जाणीवजागृती असते. दूधप्राशन केले की माणूस जाड होतो. करीना कपूर असेल तर तिची आरारा दक्षाबेन होते! तेव्हा मुली दूधच पीत नाहीत. अन् मग मारो गाम कथॅ पाडे. जहां दूध की नदियां बाहे’ हे अमूलचे मंथनगीत वायाच जाते अन् मुलेबाळे कुपोषित होतात. वैद्य नरेंद्रभाईंनी हे ताडलं, की कुपोषणाला ही सौंदर्य जाणीवजागृतीच कारणीभूत आहे. तेव्हा हे फॅड दूर केलं पाहिजे. रोगाचं कारण समजलं आहे. आता त्यावर उपाय करता येतील. त्याची सुरुवात ‘मोटीसुंदरी’ यांसारख्या स्पर्धा गावोगावी घेऊन करता येईल. पण हा तपशिलाचा भाग झाला. भाई त्याची नामी व्यवस्था करतीलच.
ममतादीदींनी या बाबतीत मात्र भाईंवर कडीच केली आहे. परवा पत्रकार परिषदेत त्यांनी ‘डेंग्यू – कारणे आणि उपाय’ असा प्रबंधच वाचला. त्या म्हणाल्या, एक तर डॉक्टरलोक मूर्ख. हृदयरोगाने मेलेले रुग्णही डेंग्यूने मेले, असे सांगतात. (माँ कंठाळी शप्पथ आम्ही सांगतो, हे डॉक्टर नक्कीच नक्षलवादी असणार!) दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली तरुण-तरुणी खूपच डाएटिंग करतात. (कोलकात्यात एवढे संदेश अन् रोशोगुल्ले मिळत असताना लोक ते खात नाहीत, म्हटल्यावर माँ कंठाळी शप्पथ, ते नक्कीच नक्षलवादी असणार बघा!) या डाएटिंगमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मग डेंग्यू होतो अन् लोक मरतात. ती अस्वच्छता, वैद्यकीय असुविधा वगरे दुय्यम कारणं! महत्त्वाचं काय, तर डाएटिंग! खरं तर अशा नक्षलवाद्यांना आता तुरुंगात टाकून मरमर खायला लावलं पाहिजे! दीदी काय ते लवकरच करतील, अशी आमची श्रद्धा आहे.
येथे सांगण्याचा मुद्दा एवढाच, की दीदी आणि भाईंमध्ये असेही एक अजबगजब साम्य आहे.
आता आमचे प्रात:स्मरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत लाख म्हणतात, की काही विषय तज्ज्ञांचे असतात. त्यावर तज्ज्ञांनीच बोलावे. पण ते सर्वसामान्यांच्या आणि संघसेवकांच्या बाबतीत झाले. दीदी आणि भाई तर राजकारणी आहेत, आणि राजकारणी हे पत्रकारांप्रमाणेच सगळ्या विषयातले तज्ज्ञ असतात. तेव्हा त्याबद्दल आपण काय बोलावे? आपण फक्तच पाहावे! कसें?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा