महामहीम सोनियाजी गांधी यांस काही बोलावयाचे नसेल, तर त्यांनी बोलू नये. (राष्ट्रभाषेत तर नकोच! त्या हिंदी वाचून बोलायला लागल्या की वाटते, यांच्यापेक्षा आमचे आराराबा बरे!.. आता आराराबांचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. अलीकडे आम्हांस सारखे वाटत आहे, की हिंदी तर हिंदी, पण आबांनी बोलावे! हवे तर अगदी गव्हामधील सोंडकिडय़ांचा प्रादुर्भाव यांसारख्या विषयांवर बोलावे. पण बोलावे! त्याचे काय आहे, हल्ली राष्ट्रवादीत असे काही झाले आहे, की आबा बोलले की वाटते बोलतात. बाकीचे बोलले की वाटते आरोप फेटाळतात! असो.)
 ..तर महामहीम सोनियाजी गांधी यांस काही बोलावयाचे नसेल, तर त्यांनी बोलू नये. सु. श्री. प्रियांका गांधींना काही सांगायचे नसले, तर त्यांनी सांगू नये. पण त्यांना किमान एका गोष्टीचा खुलासा करायला काय हरकत आहे?  खरे तर त्यांनी एकदाचे हा जो गोंधळ निर्माण झाला आहे त्याचे निराकरण करायलाच पाहिजे. त्यांना व्यक्तिश: सांगायचे नसेल, तर काँग्रेस प्रवक्त्यांना सांगण्यास सांगावे किंवा रा. रा. राजदीप सरदेसाई यांना सांगण्यास सांगावे. (हं.. गरसंबंध लावू नका! काँग्रेस प्रवक्ते आणि सरदेसाई या दोन वेगळ्या एन्टीटी आहेत.) पण आज संपूर्ण देश परमपूज्य गांधी घराण्याकडून हे स्पष्टीकरण मागतो आहे, की – जावईबापूंचं आडनाव नेमकं आहे तरी काय? वढेरा, वडेरा की वड्रा?
 बाकीचे सोडा, पण माणसाने किमान नावाच्या बाबतीत तरी चोख असावे की नाही? आपण आपल्याकडून त्याची काळजी घ्यायला नको काय? वेळीच ती घेतली असती, तर आज हे दिवस दिसले असते काय? गेले आठ दिवस आम्ही संभ्रमात आहोत, की हा एकच इसम आहे की तीन भिन्न व्यक्ती आहेत? तेव्हा परमपूज्य गांधी घराण्याने राबर्ट साहेबांच्या आडनावाचा नेमका उच्चार काय आहे, हे तरी जाहीर करावे. ते म्हणाले त्याचा उच्चार भुजबळ असा आहे, तर आम्ही तसा करू! पण उच्चारात काही तरी समानता आली पाहिजे! असो.
 तर नमनालाच एवढे क्रूड ऑइल जाळल्यानंतर आता आपण आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे वळूयात. खरे तर या वेळीही आम्ही सिंचन घोटाळ्यावरच आमची अभ्यासपूर्ण श्वेतपत्रिका मांडण्याचा विचार केला होता, पण हल्ली सिंचन हा शब्द वाचताक्षणी लोक सर्दीने शिंकू लागतात असा वृत्तपत्र विक्रेत्यांचा अनुभव आहे! तेव्हा आज आपण नवाकोरा आणि कोरडा विषय चच्रेस घेतला आहे. तुम्हांस आश्चर्याचा धक्का बसेल, पण हा विषय आहे- थोर विनोदी लेखक राबर्ट वढेरा.
 वाचक हो, राबर्ट वढेरा (पक्षी : दिल्लीचे भुजबळ!) हे सोनियाजींचे जावई असून, ते एक जानेमाने आंग्लभाषी विनोदी लेखकही आहेत. तसे पाहता विनोदी लेखन करणे ही तशी फार अवघड बाब नाही. ते कोणीही करते. (आमचे समग्र वाङ्मय वाचून हे आपल्या लक्षात आले असेलच!) मात्र विनोदी लेखन करून वाचकांस हसविणे हे अत्यंत कठीण काम आहे. ते कोणालाही जमत नाही. (आमचे लेख वाचून हेही आपल्या लक्षात आले असेल!) मात्र हे शिवधनुष्य राबर्टजींनी लीलया पेललेले आहे. त्यांच्या विनोदी लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे ते अत्यंत साधेसोपे व अल्पाक्षरी असते. एवढेच नव्हे, तर ते खास देशीवादीही असते. त्याचे हे लेखन फारसे कोठे प्रसिद्ध झालेले नाही. मात्र परवा त्यांच्या फेसबुक भिंतीवरील एका वाक्यातून त्यांच्या विनोदाची ताकद सर्व जगास (विशेषत:  सोनिया गांधीजींना) समजली.
 आम्ही आमच्या लहानपणी आमच्या वर्गातील एका थोर देशीवादी विनोदमूर्तीकडून एक विनोदी वाक्य ऐकले होते- ‘फॉक्सफ्लडची मँगोलेडी यू मी ब्रेड!’ यातील विनोद आम्हांस तेव्हा समजला नव्हता. पुढे वय वाढल्यावर समजले, की ‘कोल्हापूरची अंबाबाई तू मला पाव’ याचा तो अनुवाद होता. (आमचा हा थोर मित्र आता इंग्रजी कादंबऱ्या मराठीत घाऊक अनुवादित करतो.) तर मधल्या काळात लोप पावलेली विनोदाची हीच जातकुळी राबर्टजींच्या त्या वाक्यातून दिसली. ते वाक्य असे होते- मँगो पीपल इन बनाना रिपब्लिक!
 देशकालस्थितीचे किती नेमके वर्णन! किती साधासोपा, निर्मळ विनोद! आपला देश फळफळावळांनी समृद्ध आहे, हे किती विनोदी पद्धतीने मांडले आहे त्यांनी! आम आदमी म्हणजे मँगो पीपल. ज्याचा रस फक्त इतरांनीच चाखायचा असतो. ही जी मांडणी त्यांनी केलेली आहे त्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. आपल्या देशास बनाना रिपब्लिक म्हणून त्यांनी येथील केळीउत्पादक शेतकऱ्यांचाही मोठा सन्मान केलेला आहे. संसदेने यासाठी राबर्टजींचा स्टॅम्प काढून खास गौरव केला पाहिजे.
 पण आपल्या लोकांना विनोदबुद्धीच कमी! आधीच ते अरिवद केजरीवाल (पक्षी : माजी अण्णाजींचे हनुमान!) कसले कसले कागद दाखवून राबर्टजींवर आरोप करीत आहेत. म्हणून लोक त्यांना आता दिल्लीचे सोमय्या असे म्हणू लागले आहेत. (जाता जाता : आपल्या या किरीट सोमय्यांची तर आम्हांस आता भीतीच वाटू लागली आहे. एखाद्या दिवशी भावनेच्या भरात त्यांनी स्वत:वरच आरोप केले नाहीत, म्हणजे मिळवली!) तर आधीच केजरीवालांचे आरोप आणि त्यात या एवढय़ा थोर विनोदावर लोकांनी घेतलेले आक्षेप अन् केलेली. राबर्टजींच्या मनास किती लागले ते! गरव्यवहाराच्या आरोपांनी ते जेवढे दु:खी झाले नव्हते, तेवढे या टीकेने व्यथित झाले आणि त्यांनी सरळ आपली फेसबुक भिंत काढून टाकली.
 वाचक हो, त्यांचे काहीच नुकसान झाले नाही. त्यांना काय डीएलएफ नवी फेसबुक भिंत तयार करून देईल! पण हानी झाली ती भारतीय विनोदाची. श्रीप्रकाश जयस्वाल, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, झालेच तर ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव यांच्या परंपरेचा पाईक होऊ पाहणारा एक विनोदी लेखक मँगो लोकांच्या विनोदशून्यतेमुळे आपण गमावला आहे. या घोर गुन्ह्याबद्दल देशाचा इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही! राबर्टजी, तुम्ही तरी या मँगो लोकांना माफ करा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा