काल सभागृहात काय झालं ते झालं. पन ते मनाला लई लागलं! ते ऐकून काल रातभर आजेबात झोप लागली नाही. नुसता ह्य़ा कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होतो. पयल्यांदा वाटलं का, एॅशिडिटीमुळं तसं झालं असंल (तसं म्हणजे परिषदेत झालं ते नाय! तर आम्हांला झोप नाय आली ते! हल्ली हा एॅशिडिटीचा त्रास लई वाढला आहे. गार दूध प्या, जिलोशिल घ्या, उपेगच होत नाही. पन ते असो.) तर मेन मुद्दा असा की, झोप लागली नाही ती सभागृहातली चर्चा ऐकल्यामुळं.
आता आपन काय पह्य़लारू आमदार नाय, का चर्चा ऐकून झोप येत नाही! ही आपली चांगली दुसरी टर्म आहे. पण आजून आपल्याला चर्चा ऐकताना जुन्याजानत्या सदश्यांसारखं मधूनच तास-अर्धा तास विचारमग्न होनं जमत नाही! पन, खोटं कशाला लिहा, दुपारच्या शेशनला कधी कधी आपल्यापन पापन्या मिटतात! नाही असं नाही! तरीपन शक्यतो आपण सदनात डोळे उघडे ठेवूनच बसतो. त्येच्यातून चार महत्त्वाच्या गोष्टी कळतात. कोन कुनाला चिम्टं काढतो, कोन कुनाची पाटराखन करतो, कोन कुनाला गपचूप चिट्टय़ा पाठवतो, कोन कुणाची प्यांट ओढतो, राज्यातलं आख्खं पॉलिटिक्स बसल्याजागी कळतं. तं त्येच्यातूनच काल परिषदेतली चर्चा ऐकली. पण ऐकली नसती तर बरं झालं असतं, आसं वाटलं. ते काय बोलनं झालं?
त्या चच्रेचं असं झालं, का आमचे राष्ट्रवादीचे यवतमाळचे सन्माणनीय सदश्य आहेत संदीप बाजोरियासायेब. ते सभागृहात परवा भावनेच्या भरात कुनाला तरी काय तरी अरे-तुरे बोलून गेले. विदर्भाचे; आमदार ते. ते काय आनुशेष ठेवून बोलनार? बोलले जरा आघळपघळ! (आपन साले नेमके त्या टायमाला सदनात नव्हतो. त्येच्यामुळं ते काय बोलले ते काय नीट समजलं नाही. पन त्येच्यामुळं सभागृहात एवढी गंभीर चर्चा झाली म्हणजे ते नक्कीच इंट्रेस्टिंग असनार! माहिती काढली पायजे संदर्भासाठी!) तर बाजोरियासायबांच्या बोलन्यावरून आमचे शेकापचे जेयंत पाटील जाम फिस्कटले. हिथं पहिल्यांदाच क्लिअर करतो, का आपन जेयंतरावांना मनापासून मानतो. ते ज्येष्ठ व आदरनीय नेते आहेत. (आता त्यांनी आपल्याला काय कधी जवला खिलवला नाही अलिबागला बोलवून! पण ती बाब अलाहिदा!) पण काल सभागृहात त्यांनी जो काय हारकतीचा मुद्दा मांडला, तो काय आपल्याला आजेबात पटला नाय.
ते म्हणाले, सभागृहात सदश्यांनी शब्द वापरताना पथ्य पाल्लं पायजे. (ते ऐकून फिस्सकन हासूच आलं! पथ्यं पाळायला आमदारे म्हणजे काय पेशन्टं आहेत? नेमकं त्या टायमाला तोंडात पान होतं. सगला मुखरस झब्ब्यावर उराला! .. आपलं, उडाला! परवाच कांजी करून आणला होता. आता हे पानाचे डाग काय जातील? ते थोडीच आच्छे डाग आहेत.. कोळश्याचे! असो.) हेमंतराव टकलेसायेबसुद्धा (नाटय़परिषदवाले. पण ते नाटकात नसतात! राष्ट्रवादीत फूल बॅकस्टेजला असतात!) बोलले. म्हनाले, का सदश्यांनी विनाकारन दुसऱ्या सदश्यांच्या नावाचा उल्लेख करू नये, हे पथ्यंसुद्धा पाळलं पायजे. सभागृहाच्या कामकाजाचा दर्जा टिकला पायजे. आमदारभौ, कामकाजाच्या दर्जाचं ठीक आहे वो, पन परंपरेचं काय?
मानणीय जांबूवंतराव धोटेसायेब यांच्यापासून ते मानणीय गोपीनाथ मुंडेसायेब आणि मानणीय पद्मिशव्ह पाटीलसायेब ते थेट मानणीय (कै.) रमेश वांजळेसायेब अशी केवढी थोर परंपरा आहे आपली! त्यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या काही फुटपट्टय़ा आखून दिलेल्या आहेत. त्या काय आपन करंटय़ांनी अशाच मोडायच्या? मुंडेसायेब व पद्मिशव्हसायेब यांच्या शब्दसामर्थ्यांने कधीकाळी विधानसभा किती झनझनीत पावणपवित्र झाली होती! ते काय आख्खं पुसून टाकायचं? छ्छा!
शेवटी आपल्याला सभागृह चालवायचं की संघशाखेवरचं बौद्धिक यांच्या संबंधानंपन आपन कुठंतरी विचार करायला नको का? हिथं राज्यातले जन्तेचे जीवणमरनाचे प्रश्न चच्रेला असतात. तेच्यावरून सभागृहाच्या भावणा तीव्र असतात. आणि हे म्हणतात, पथ्य पाळा! कोनी असा विचार केलाय का, की समजा उद्या खरंच पथ्य पाळायचं ठरवलं, तर काय होईल? सभागृहाची सगळी चर्चा गुळचाट गुळमाट होईल! तिची टिळक स्मारकातली वसंत व्याख्याणमाला होईल! बरं ह्य़ांच्यामुळं सदश्यांनासुद्धा किती प्रॅक्टिकल डिफिकल्टी येईल! मानणीय अजितदादासायेबांना सभागृहात डोळे झाकूनच बसावं लागेल. त्यांना विरोधकांकडं ‘बघून घेताच’ येणार नाही! मानणीय आराराबांना पाय बांधूनच बसावं लागेल. त्यांना रस्त्यावर उतरता येणार नाही! आणि ह्य़ा महाराष्ट्रात साक्षात गृहमंत्र्याला जर रस्त्यावर उतरायची भाषा करता येनार नसेल, तर मग त्या स्वातंत्र्याला तरी लोकहो काय आर्थ आहे?
आपल्याला तर या सगळ्या प्रकरनात भिन्नच वास येऊन राह्य़ला आहे. विधिमंडळाच्या कामकाजापासून जनतेचं लक्ष दुसरीकडं वळवन्याचा हा एक असंसदीय डाव आहे. कसं असतं, जनता अधिवेशणाच्या बातम्या का वाचते, तर तिथं बुवा इंट्रेस्टिंग घडतं! आमदारे चित्रविचित्र कापडं घालतात, गोंधळ घालतात, झालंच तर हौद्यात उतरून शिरा ताणत्यात (तिकडं लोकसभेचंपन असंच असतं. आम्हांला तर मानणीय मीराकुमार यांचं ते सुमधुर ‘बठ जाईये.. बठ जाईये’ इतकं आवडतं की, वाटतं लोकसभा कधी संस्थगित होऊच नये. खासदारांनी आपला नुसताच दंगा करत राहावा! सध्या करतात तसा! असो.) तर सभागृहात असं काही जनरंजनाचं कामकाज झाल्याशिवाय काय जनता बातम्या वाचत नाही. तेव्हा मग करायचं काय, तर सगळ्यांनाच पथ्यपुचाट पाळायला लावायचं! म्हणजे मग जनता बातम्या वाचणारच नाही. आणि बातम्या वाचल्याच नाहीत, म्हणजे मग तिला श्व्ोतपत्रिका आली काय न् गेली काय, काही कळनारच नाही.
तेव्हा लोकांना माहितीपासून वंचित ठेवण्याचं हे फार मोठं कारस्थान आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपन त्याचा निषेध करायलाच पायजे. पण कसा करावा निषेध? भाषण करावं का खुच्र्या फेकाव्यात? खुच्र्या नको! त्या जड असतात! पाठीत उसण भरली तर पंचाईत व्हायची! त्यापेक्षा ते तसलं भाषणच करावं. त्यातनं संसदीय परंपरापन टिकंल, जनरंजनपन होईल अन् बातम्यांतपन नाव येईल! म्हंजे कसं – बाय टू अन् गेट वन आजेबात फ्री!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा