झाडू!
खराटा, शिरांटा, कुंचा, केरसुणी, मार्जनी, सम्मार्जनी, भुतेरा, लक्ष्मी!
शब्द कोणताही वापरा- अर्थ एकच!
सफाई करण्याची, केरकचरा काढण्याची व काम झाले की कोपऱ्यात, दृष्टीआड ढकलण्याची वस्तू! नावपरत्वे आकार व परिणाम भिन्न. मात्र, कार्य एकच. (या वस्तूत आणि नवरा नामक किंचितप्राण्यात अनेकांस साम्य आढळते. परंतु त्याचा आम्हांस अनुभव नाही. घरकाम झाल्यावर आम्ही कोपऱ्यात बसत नाही! मस्तपकी खाटेवर बसतो!!)
तर अशी ही य:कश्चित वस्तू. तिला देशाच्या राजकारणात एवढे महत्त्व येईल असे कोणास तरी वाटले होते का? स्पष्टपणे कबूल करतो, की आम्हांस मुळीच वाटले नव्हते. परंतु परवा आमचे लाडके नेते व भाजपभाग्यविधाते महामहीम साहेब नरेंद्रजी मोदीजी भेटले आणि आमचा अवघा भ्रमनिरास झाला (मोदींबद्दल नव्हे, झाडूबद्दल! फेसबुकातून स्वत:स बुकलून घ्यायचे आहे काय?).
तर त्याचे असे झाले : नमोजी अजूनही गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आहेत की रा. रा. राजसाहेब ठाकरे यांचा प्रेमसल्ला त्यांनी मनावर घेतला आहे ते पाहावे, असे मनी योजून आम्ही सक्काळ सक्काळी गांधीनगरी गेलो. मनोमन विचार केला, की नमोजी म्हणजे एकला जीव. अशा घरी पाहुणचाराची खात्री नसे. तेव्हा आधी दोन प्लेटी जिलबी, वर गिलासभर दूध रिचविले व तृप्त होवोनि मोदीनिवासी पोचलो.
‘‘कोन जोईए छे?’’
दारातच एकाने हातातल्या झाडूचा बांबू आडवा धरत पुसले. आवाज ओळखीचा वाटला. सूर तोच होता. महागर्जनेचा.
‘‘मोदीजींना भेटायला आलोय. महाराष्ट्रातून. मराठी मानूस आहे.’’
‘‘अरे, मराठी माणस एटले आमारा मोटा भाई! पधारो पधारो..’’
गृहस्थाने झाडूचा बांबू बाजूस ठेवला. तोंडावर गुंडाळलेली मफलर काढली. पाहतो तो आत मोदी! आम्हांस फेफरे येणेच बाकी होते!
‘‘हे काय? चक्क तुमच्या हातात झाडू?’’
‘‘तेला काय झाला? गांधीजीए पन हातमा सावरणी.. म्हंज्ये तुमच्या तो झाडू लिधू हतू..’’ मोदी शांतपणे म्हणाले.  
‘‘हो. तिकडं दिल्लीत राहुलच्या हातात झाडू दिसतोय खरा!’’ आम्ही बोललो आणि पटकन् जीभच चावली. पण नमोजींचे तिकडे लक्ष नव्हते. ते कानावर मफलर बांधीत होते.  
‘‘तेमणे सफाई खूब गमती हती. मनेपण गमे छे.’’
ही गंमतच आहे! मोदींची गांधीगिरी हल्ली भल्तीच वाढत चाललीय. मागे शौचालयाचे बोलले. आता हे सावरणीचे. अशाने अडवाणी होण्याचे चान्सेस वाढतात, हे त्यांच्या कसे लक्षात येत नाही? आमच्या मनी ही खवचट शंका आल्याशिवाय राहिली नाही.
त्यांनी आता झाडूचा दांडा असा भाल्यासारखा धरला होता.
‘‘हूं पन देशाची सफाई करवानूं छू. एटला माटे हातमां सावरणी घेटली छे. आमचे भागवतजी पहचानते ना? तेनीपण झाडू सीरियसली लेवा कह्यूं छे..’’
‘‘पण त्याला हा एक झाडू कसा पुरणार? आणखी बरेच झाडू लागतील!’’ आम्ही हळूच एक राजकीय खडा टाकला.
‘‘ते काय बाजारमां मळशेज. तेनी चिंता नथी. पन आ काम आपणां सीरियसली करवूं जरुरी छे. आ आजादीनु बिजी लडाई छे!’’
‘‘छे छे. त्रण. दुसरी अण्णांनी केली.’’
नमोजींच्या इतिहासाची जरा समस्याच असते!
‘‘इतिहास महत्त्वनु नथी. विकास महत्त्वनु. पन तुमच्यापन बराबर हाय. तुमाला फकस्त इतिहास हाय. आमाला विकासपन हाय!’’ झाडूचा दांडा आमच्या छातीवर रोखून ते म्हणाले.
‘‘पण हे सफाईचे काम तर आधीच केजरीवालांनी हातात घेतले आहे.’’
‘‘पण तेला ते फावशे नही. साफसफाई करवी सोपी नथी. येणेमाटे मजबूत लागते ते.. काय म्हंतात तेला तुमच्या मराटीत ते.. फुसफुस!’’
मोदींचा श्वास भरून  आला होता.
‘‘कुजबुज?’’
‘‘नाय वो. ते पेटमधी राहते ना ते..’’
‘‘गॅस? तुम्हांस सांगतो रात्री चूर्ण नाही ना घेतले, तर दिवसभर त्रास होतो त्याचा.’’
‘‘ते नाय वो. फुसफुस.. फुसफुस.. ते नाय का हवा घेते त्याने!..’’
‘‘हां. म्हणजे फुप्फुस!!’’
‘‘अरे हां. तेच ते.. फेफसा. ते मजबूत जोईए!’’  
‘‘म्हंजे? साफसफाईसाठी मजबूत फुप्फुसाची गरज काय? ती काय तोंडाने हवा फुंकून करायची असते?’’ आमचा निरागस सवाल.
‘‘साफसफाई करती वखत घणु कचरो निकळे. बराबर?’’ मोदी सफाईशास्त्रात शिरले.
‘‘बराबर.’’
‘‘घणु धूळ उडे. बराबर?’’
‘‘बराबर.’’
‘‘ती नाकमां आने मोढामां जाए. जे नाथी खांसी थाय. माणस त्रासी जाय.’’
‘‘बराबर.’’
‘‘केजरीवालनु पन एज थयूं छे!’’
हे बाकी शंभर टक्के बराबर! काय खोकतात ते! काही घेत का नाहीत?
‘‘मग मोदीजी, तुमचेही तसे नाही का होणार देशाची साफसफाई करताना?’’
‘‘नाय होनार. आमे कचरो, धूळ उडवाच देता नथी. दाबून ठेवतो. आता आमारी पासे आटला येडीयुरप्पा आव्या. पन धूळ उडी? उडाली का धूळ? आँ?’’