समस्त महाराष्ट्रात गतसप्ताही मोठय़ा उत्साहाने पत्रकारदिन साजरा झाला. (काही नतद्रष्ट यास ‘पोटावळ्यांचा पोळा’ असे विनोदाने म्हणतात. आता यात कसला आला आहे विनोद? असो!) ठिकठिकाणी पत्रकारू-नारूंनी आपापले सत्कार करून घेतले. एकमेकांस पुरस्कारीले. काही विचारवंत संपादकांनी हेही (किंवा हेच!) निमित्त साधले व भाषण दिले.(पत्रकारदिनाचीही पत्रकचेरीतील साप्ताहिक बठक केली! हरकत नाही! संपादकांची भाषणे आम्हांस नेहमीच प्रिय व शिरसावंद्य असतात! जातिवंत उपसंपादकाचे हेच तो सुलक्षण!)तर येणेप्रकारे अवघा कार्यक्रम झाला. सायंकाळी पान लावण्याचा साग्रसंगीत सोहळाही पार पडला व पत्रकारदिन सुफळ संपन्न झाला. (कृपया, या सायंसोहळ्याचे गोट कोण, ते बरीक विचारू नये! एरवी प्रत्येकाच्या कपाळी बारोमास बारकोड असला, तरी वर्षांतील या पवित्र दिनी मात्र पत्रकारू-नारू स्वखर्चाने पान लावतात!)
तर वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हो, नमनालाच एवढे कॉलम सेंटीमीटर फुकट घालविल्यानंतर आता मूळ मुद्दय़ाकडे वळतो. दरवर्षी पत्रकारदिन झाल्यानंतरचे चार-पाच दिवस तरी आम्ही आमची छाती (अक्षरी अठ्ठावीस इंच फक्त!) काढून हवेत तरंगत असतो. पत्रकारिता म्हणजे चौथा स्तंभ. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा.. दिशादर्शक.. प्रबोधक.. अशी कौतुकफुले पत्रकारदिनी दशदिशांनी उधळली जातात म्हटल्यावर कोणास ती खरी वाटणार नाहीत? मज भाबडय़ास ती खरी वाटतात! त्या भरात मग आम्ही स्वत:ला सीरियसली घेतो. येता जाता काही सुविचारप्रवर्तक लेख पाडतो. कोणत्याही घटनेवर सहकाऱ्यांस ‘बाइट’ देतो. (अद्याप आम्हास कोणत्याही च्यानेलाने पाचारण केलेले नाही; परंतु त्याचीही आम्ही तयारी ठेवतो. च्यानेल संपादक, ऐकताय ना?) झालेच तर देशकालस्थितीबद्दल काही असाधारण निरीक्षणे नोंदवितो.
तर सादर आहेत आमची काही स्वैर निरीक्षणे –
१. सन २०१४ या वर्षांची नोंद भारताच्या इतिहासात एक ऐतिहासिक वर्ष अशीच होईल. कारण हे वर्ष इतिहास या विषयासाठी अत्यंत वाईट असणार आहे!
 २. या वर्षांत भारतामध्ये नक्कीच सत्ताबदल होईल. चि. राहुल गांधी यांनी मनावरच घेतले असल्याने साहेबांसमोर अन्य पर्यायच नसेल. (आता आमचे साहेब एकच! नमोजी!!) त्यांच्या रूपाने देशास नवा पंतप्रधान मिळेल. मात्र, देश एका प्रतिभावंत इतिहासतज्ज्ञास गमावेल.
३. नमोसाहेब पंतप्रधान झाल्यास मराठय़ांच्या इतिहासाचे मात्र मोठेच नुकसान होणार आहे. अंहं. हे विधान आद्य साहेबांबाबत नाही! गरसमज नसावा! त्यांचे नुकसान दुसरे कोण कशाला करील? शिवाय एरवीही पवारसाहेबांचा इतिहासाशी फारसा संबंध नाही. त्यांचा लाडका विषय ‘भूगोल’ हा आहे! (महाराष्ट्राच्या इतिहासातच तशी नोंद आहे!)
४. महामहीम पंतप्रधान मनमोहन सिंग हे जगन्मान्य अर्थशास्त्री आहेत. परंतु अनेकांस हे अज्ञात आहे, की त्यांचे इतिहास या विषयावरही प्रेम आहे. (बी.ए.ला त्यांनी इतिहास घेतला असता तर आज भारताचा इतिहास काही वेगळा असता!) नुकतेच त्यांनी मौनव्रताचे पारणे घातले तेव्हा त्यांचे हे इतिहासप्रेम दिसून आले. इतिहासच आपली योग्य नोंद घेईल, असे ते म्हणाले. याचा अर्थ यापुढील काळात ते नक्कीच इतिहास लेखनाकडे वळतील! (आणि त्यामुळे तिकडे नमोजींचे इतिहास सुधारणेचे काम मात्र वाढेल! हे काँग्रेसवाले कोणास सुखाने राज्य करू देतील तर शप्पथ!)
५. या वर्षी चि. राहुल यांना इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. राजकीय परिभाषेत याला ‘आत्मपरीक्षण’ असेही म्हणतात! मात्र, हे करताना चि. राहुल यांना भलामोठा त्याग करावा लागेल. त्यांना त्यांच्या आवडत्या ओरिगामीकडे साफ दुर्लक्ष करावे लागेल! अखेर इतिहास लिहायचा तर कागद फाडून कसे चालेल?
६. तसा तर यंदा आम आदमीलाच इतिहास लिहायची संधी आहे. पण आम आदमीचे कसे असते? त्याला संसार असतो. छोटेसे घर असते. गाडीचा प्रश्न असतो. एकदा ते सगळे सुटले की मग इतिहासबितिहास!
आपण फक्त त्याची वाट पाहात इतिहासजमा व्हायचे! कसे?

Story img Loader