सांप्रती हा महाराष्ट्र देश बर्फाच्या गोळ्यासारखा थंड का पडला आहे? कोणाच्याच धमन्यांतील लाल रक्तपेशी उकळत कशा नाहीत? कोणाच्याच हातमुठी सळसळत कशा नाहीत? कोणाच्याच लेखण्यांची टोपणे उघडत कशी नाहीत?
काय झाले आहे येथील प्रबुद्ध कविवर्याना? प्रतिभावंत साहित्यशार्दूलांना? गेलाबाजार, आमुच्या थोर वार्ताहर आणि हरिणींना ? थिजली, संपली का आहे त्यांच्या दौतीची दौलत? अरे मग चंडोलांनो, कोणीच काही लिहीत कसे नाही?
मान्य, की साहित्यिक हल्ली फारच थकलेभागले आहेत ! परंतु आमुच्या पत्रकारू-नारूंचे काय? ते तर प्रत्यही साहित्य इन हरी प्रसवतात! मग याबाबतीतच त्यांच्या लेखनकळा का बरे बंद झाल्या आहेत? या बाबतीतही आपण त्या परप्रांतीयांच्या मागेच राहावयाचे का? ..
वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्यहो,
आता तुम्ही पुसाल, की अप्पाजी, ही सु. श्री. ममतादीदी बनर्जी फेम किरकिर आपण कोणत्या मिषाने करीत आहात?
तर हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे ! (किती बरे फालतू हे वाक्य! ‘हॅलो सखी’तल्या मुलाखती पाहण्याचा हा दुष्परिणाम! दुसरे काय! असो.) आम्ही आता ही प्रश्नपत्रिका सोडवतो. किंतु तत्पूर्वी तुम्हांस परवाची एक फुटकळ बातमी (म्हणजे सांप्रतची ब्रेकिंग न्यूज! समजलेंत काय?) सांगणे अत्यावश्यक आहे. आमुचे लाडके वृद्ध तडफदार नेताजी रा. रा. मुलायमसिंह यादव म्हणजे साक्षात् ज्ञानगुनसागर, जय नेताजी तिहुँ लोक उजागर ऐसी हस्ती! तर अशा या थोर नेताजींनी केलेल्या महान कार्याप्रती कृतज्ञता म्हणून कामताप्रसाद केशरी नामे कोणा होमिओपथी वैद्याने ‘मुलायम चालिसा’ नामक महाकाव्य लिहिले आहे. आपणास हे स्मरतच असेल, की यापूर्वी आमुचे लाडके वृद्ध तडफदार नेते रा. रा. लालूप्रसाद यादव यांच्यावरही असेच महाकाव्य लिहिण्यात आलेले आहे.
तर आमुची वेदना नेमकी हीच आहे, की अशी चालिसा महाराष्ट्रप्रांती अद्याप का बरे अवतरली नाही? या आनंदवनभुवनी ऐसे महापराक्रमी पुरुषपुंगव नाहीत का? तर आहेत. त्रिवार आहेत! मग आपणच करंटे भाटिवकीत कमी पडतो का? आता यावर काही मनुष्य म्हणतील, की ही आपुली परंपरा नाही. ती उप्र-बिहारी संस्कृती आहे. ते ठीकच आहे. परंतु हल्ली तिकडील काही मंडळी येथे येऊन तो निरुपमेय कृपाशंकरी खेळ खेळतच आहेत की! (या विषयातील तज्ज्ञ तर ही परंपरा थेट शिवकालातील कवी भूषण यांच्यापर्यंत नेतील. परंतु ते उदाहरण येथे अतिच अप्रस्तुत आहे. कुठे शिवरायांचा भूषण अन् कुठे या श्यामभट्टांच्या तट्टाण्या! असो.) तर यावर आमुचे पुसणे इतुकेच, की परप्रांतीयांना येथे येऊन जे जमते, ते आम्हां भूमिपुत्रांस का बरें जमू नये ?
वस्तुत: आम्हांस ही कला ज्ञातच नाही, असे अजिबात नाही. उलट आम्हीही त्यात महामाहीर आहोत. तसे नसते, तर वाचकहो, आमुच्या येथे श्रीकृपेने ‘जीवेत् शरद : शतम्’च्या चारपानी रंगीत जाह्यरात पुरस्कृत पुरवण्या कशा निघाल्या असत्या? त्यांस लालम् लाल लेखरतीब घालणारे पत्रकारू-नारू कसे गावले असते? एकुणात काय, तर आमुच्या राजकीय पत्रबिटामध्ये अशी गगनभेदी प्रतापी भूषण मंडळी महामूर आहेत! राजकीय क्षेत्रातही असा उल्हासी मधुर-भाव कमी नाही. किंतु समस्या इतुकीच, की ती सर्व मंडळी पडते गद्य! वार्तातून, वार्तापत्रांतून, स्तंभांतून चालूचालिसा लिहिणारी! त्याचा उपेग आमुच्या सर्वसामान्य कार्यकर्तागण व गणंगांस कसा व्हावा? लेखांचे पाठांतर करून ते म्हणावयाचे म्हणजे अवघडच! (आधीच तसे लेख वाचणे हे महाकठीण! वाचताना, आपुल्या चर्मचक्षूंच्या आधीच खाचा का झाल्या नाहीत, असे दुर्वचिार हमखास मनीं येणार! त्यात आणि ते पाठांतर करावयाचे म्हणजे काळ्या पाण्याचीच शिक्षा! ) तेव्हा नेताजींच्या चालिसा कशा सुरमयी पद्यातच हव्यात.
बरें, तसे लिहिणे काही फार कर्मकठीण आहे असे नव्हे. राज्यसभेची उमेदवारी, पक्षातील पद, झालेच तर एखादी सदनिका अशी इन्सेन्टिव्हे नजरेसमोर ठेवल्यास कोणासही ते सहजी जमून जाईल. पण लक्षात कोण घेतो ?
तेव्हा अखेर आम्हीच हे काम आमुच्या शिरी (जनहितार्थ!) घेतले आणि काय सांगू वाचकहो, आपणांस कळविण्यास आम्हांस अत्यंत आनंद होत आहे, की आम्हांस ते मस्तच जमले! (मंत्रालयातील अनुभव असा वाया नाही जाणार म्हटले!) त्या भावचालिसेतील हा एक छान छान पाठ उदाहरणार्थ पाहा –
देवा तूचि पॉवरू। कास्तकारांसी उद्धारू।
दलालांसी आधारू। तूच असे॥
तुझे चांदणे शारदीय। पक्षरिपूंस गारदीय।
चाणक्यता नारदीय। तूच असे॥
तूच काकांचाही काका। तूच मित्र तूच धोका।
तुजपुढे सर्व वाकावाका। नृत्य करिती॥
किंवा हा सुश्लोक पाहा –
ओम नमस्ते पृथ्वीराजये। त्वमेव प्रत्यक्षं स्वच्छमसि।
त्वमेव श्व्ोतपत्रिका कर्तासि। त्वमेव अजितन् हर्तासि।
त्वमेव फाइलम् धर्तासि।..
खालील आरती तर सायंसमयी नित्य पठनातच पाहिजे –
आरती बाहूबळा। ओबीसीवेल्हाळा। मफलर शोभे गळा॥
महाराष्ट्रभवनासी। तूवा लाविला लळा।
फुलविला हा मळा। करोनिया तू शाळा॥
हाती घेवोनि फुले । मंत्रिपद आरक्षिले।
आता आरक्षी आम्हां। घालोनि काही घोळा॥
आणि हे स्तुतिगान खास अपरान्तकरांकरिता –
ओम तत्सत् श्रीनारायण तू सिंधुदुर्गवीर तू
प्रहार-वार तू धुमशानबाज तू सदाच ‘भावी’ तू
तूच अपरान्त तूच प्रशान्त उधाणदर्या तू
बंडकरी तू थंड जरी तू संधीइच्छुक तू
पाहिलेत ना आमुच्या उत्तुंग प्रतिभेचे हे मस्त मासले? येथे सत्तास्थानी असलेल्या महान नेत्यांचाच स्तुतिपाठ आम्ही सिद्ध केला आहे. त्या प्रत्येकाची स्वतंत्र रंगीत पुस्तिका लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. इच्छुकांनी कृपया आगाऊ मागणी नोंदवावी. निवडणुकांचा काळ जवळ जवळ येत चाललेला आहे. तेव्हा त्वरा केलेली बरी! काय आहे, हल्लीचा काळ या चालिसासंस्कृतीचाच आहे! सेनेचे मुखपत्र पाहताय ना तुम्ही?
चालिसा संस्कृती
सांप्रती हा महाराष्ट्र देश बर्फाच्या गोळ्यासारखा थंड का पडला आहे? कोणाच्याच धमन्यांतील लाल रक्तपेशी उकळत कशा नाहीत? कोणाच्याच हातमुठी सळसळत कशा नाहीत? कोणाच्याच लेखण्यांची टोपणे उघडत कशी नाहीत?
First published on: 09-12-2012 at 12:04 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dha cha ma culture