‘‘केजरीवालांच्या ‘आम आदमी’ पार्टीला आमचा सक्त विरोध आहे!’’
हल्ली आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांच्या सुविद्य पत्नी व आमच्या चाळीतील वनिता मंडळाच्या अध्यक्षा सु. श्री. लेलेवहिनी आमच्या गृही येतात, त्या अशा घोषणा देतच. वस्तुत: हे काही लेलेवहिनींचे घोषणा वगरे देण्याचे वय नाही. बरे, त्यांच्या तब्येतीची प्रकृती अशी, की वाटावे, कोणत्याही क्षणी आपणांसच घोषणा द्याव्या लागतील, की ‘परत या, परत या, लेलेवहिनी परत या’! पण तरीही त्या घोषणा देतातच.
 ‘‘प्रसंगी कायदा हातात घेऊ, पण आम्ही इथं ‘आम आदमी’ पार्टी येऊ देणार नाही!’’
लेलेवहिनी भलत्याच त्वेषात होत्या. चक्क कायदा हातात घेण्याची भाषा करीत होत्या! ही एक गोष्ट आम्हांस कधी समजली नाही, की लोकांस ही अशी सतत कायदा हाताळण्याची घाई का लागलेली असते? तो काय मॉलमध्ये आलेला सिझनचा पहिला आंबा आहे?
लोकांचे जाऊ द्या, पण परवा चक्क आमचे माजी लाडके नेते रा. रा. िप्र. मनोहरपंत जोशीसर यांनीसुद्धा कायदा हाताळण्याची वार्ता केली होती. आता मनोहरपंत म्हणजे केवढे मोठे माजी नेते! माजी शिवसेना नेते ते माजी मुख्यमंत्री ते माजी लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा केवढा थोर प्रवास! (थोडक्यात हुकले, नाही तर ते माजी उपराष्ट्रपतीसुद्धा झाले असते! खुद्द बाळासाहेबांचीच तशी इच्छा होती. (असे िप्र. मनोहरपंतच सांगतात!).. उद्धवजी, ऐकताय ना? बाळासाहेबांची इच्छा होती! तुम्ही पूर्ण करणार ना ती? असो.) तर अशा थोर लोकशाहीवादी नेत्यानेसुद्धा परवा कायदा मोडण्याची भाषा केली.
अर्थात त्यात त्यांचे फार चुकले अशातला भाग नाही. ते तरी बिचारे काय करणार! त्या दिवशी त्यांचे भाषण असे ऐन रंगात आले होते आणि कोणीतरी अचानक येऊन त्यांच्या कानात (ऐकू येत असलेल्या!) सांगितले, की कोहिनूरमध्ये स्मारकाचे भूमिपूजन करणार आहेत! अशा वेळी माणसाला त्वेष येणारच की नाही? असो.
 ‘‘त्रस्त लेलेवहिनी, शांत व्हा! आम्हांस सांगा, हे ‘आम आदमी’ पार्टीचं नेमकं काय प्रकरण आहे? कशाला विरोध करताय त्यांना? चांगलं काम करताहेत की ते लोक!’’
लेलेवहिनी उसळून म्हणाल्या, ‘‘चांगलं काम करताहेत? चांगलं काम करताहेत?.. पत्रकार आहात की पत्रभाट?’’
या सवालाने आम्ही निमिषभर स्तिमितच झालो! लेलेवहिनींसारख्या सामान्य वाचकांच्या अशा रोखठोक प्रश्नाचा सामना आम्हांस कधी करावा लागेल, असे साताजन्मात वाटले नव्हते. लोक हुशार झालेत हेच खरे!
‘‘वहिनी, असं आडव्यात बोलू नका. सरळ सांगा, तुमची नेमकी काय समस्या आहे?’’
‘‘आमचा ‘आम आदमी’ पार्टीला विरोध आहे.’’
‘‘का बरं? तुम्हांला सदस्यत्व नाही का मिळालं त्याचं?’’
‘‘त्या पक्षात जायला मी काही अजून रिटायर झाले नाही सरकारी नोकरीतून!’’
लेलेवहिनींनी अगदी मर्मावरच बोट ठेवले. आता या पार्टीत ‘करून करून भागले..’ अशा शासकीय महाबाबूंची गर्दी आहे, हे खरे. पण म्हणून काही लेलेवहिनींनी एवढय़ा उपहासाने बोलण्याची गरज नव्हती.
‘‘वहिनी, त्या पक्षात जायला माणूस रिटायरच पाहिजे असं काही नाही. स्थानिक एनजीओच्या सहीशिक्क्याचं चारित्र्याचं प्रमाणपत्र आणि गांधी टोपीतले दोन पासपोर्ट साइज फोटो एवढय़ावर मिळतो तिथं सहज प्रवेश. फार फार तर भ्रष्टाचार न करण्याची प्रतिज्ञा करावी लागेल. पण त्याचं फार काही नसतं. आपल्या ‘भारत माझा देश आहे’ सारखीच असते ती प्रतिज्ञा.. फक्त पाठ करण्यापुरती!’’
 ‘‘त्याची काही गरज नाही. आमचा त्यांना विरोध आहे, कारण तो पक्ष निम्म्या देशाच्या विरोधी आहे!’’
लेलेवहिनींनी महाठसक्यात हे वाक्य उच्चारले आणि आम्ही चमकलोच. खिनभर आम्हांस उमजेनाच, की आमच्या पुढती लेलेवहिनी आहेत की अंबिकाजी सोनी?
कसे असते ना, काही काही गोष्टी काही काही व्यक्तींनाच शोभून दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ राजीनाम्याची मागणी करावी, तर बोवा, ती राम जेठमलानींनीच. आरोप करावेत, तर ते किरिटभाई सोमय्यांनीच. टीका करावी ती श्रीमान मरकडेय काटजूंनीच. कसे प्राकृतिक वाटते ते! लेलेवहिनींच्या तोंडी मात्र हे बकबकवाक्य अजिबात शोभत नव्हते.
 आम्ही अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हणालो, ‘‘हे पाहा वहिनी, एखादा पक्ष निम्म्या देशाच्या विरोधात कसा असेल?  हां, एक वेळ हा पक्ष कोकणाच्या विरोधात आहे, असं म्हटलं तर समजून घेता येईल..’’
आता चमकण्याची पाळी लेलेवहिनींची होती! केजरीवालांची पार्टी कोकणाच्या विरोधात कशी, हे त्यांना काही केल्या समजेना. अखेर आम्ही त्याची फोड केली.
‘‘त्याचं कसं आहे. ही आम आदमी पार्टी उद्या निवडणुकीला उभी राहणार. त्यासाठी त्यांना निवडणूक चिन्ह लागणार. ते असणार, अर्थातच आम. आता विचार करा, समजा ऐन आंब्याच्या सिझनमध्ये निवडणूक लागली, तर निवडणूक आयोग पहिल्यांदा काय करणार, तर आचारसंहितेचा भंग होतो म्हणून सगळ्या आंब्यांवर बंदी घालणार! म्हणजे आली का पंचाईत! यात कोकणातल्या सगळ्या आंबाउत्पादकांचं नुकसान होणार की नाही?’’
 हे ऐकले आणि लेलेवहिनी संतापल्याच. म्हणाल्या, ‘‘असे पीजे मारायला, हे काय तुमचं ‘धचामा’ आहे? इथं मी अगदी सिरियसली बोलत आहे. आणि तुम्ही ज्योक करताय?’’
‘‘राहिलं! तुम्ही सांगा, आम आदमी पार्टी निम्म्या देशाच्या विरोधात कशी आहे?’’
‘‘अप्पाभाऊ, साधी गोष्ट आहे.. ही पार्टी फक्त ‘आम आदमी’ची आहे!’’
आमच्या इन्टेल इन्साईडमध्ये लेलेवहिनींची ही साधी गोष्ट काही केल्या शिरत नव्हती.  
‘‘हो.. आम आदमीचीच पार्टी आहे ती.’’
‘‘तेच तर म्हणतेय मी.. आम आदमीच का? आम औरत का नाही?’’
लेलेवहिनींनी भ्रूकटी उंचावून आम्हांस हा प्रश्न केला अन् आम्ही गारच पडलो!
 मनी आले, अरिवदभाऊ केजरीवाल, तुम्ही स्वतला लाख ‘अ.के.-४७’ रायफल समजत असाल! पण तुमच्यासमोर केवढी डोंगराएवढी आम आव्हाने आहेत याची तुम्हांला खास काही कल्पना आहे का?