हाय! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुला सुखाची, शांततेची आणि समृद्धीची जावो, हीच प्रार्थना! (हसरी स्मायली.. वर अंगठा!)
– अशा काय जाहिरातदारांसारख्या शुभेच्छा देतोस? (तोंड वाकडे) आणि आमचे सगळेच दिवस सुखाचे, शांततेचे आणि समृद्धीचेच असतात! (तीन प्रश्नचिन्हे)
– ही दिवाळी सुखाची, शांततेची जावो म्हणजे बाकीचे दिवस सुखाचे नाहीत असं म्हणायचं आहे का तुला?
– छे छे! तुमचं काय बाबा, तुमचे नेहमीच अच्छे दिन! (डोळा मारलेली स्मायली)
– हेच ते! म्हणजे तुमच्यासाठी ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत असंच म्हणायचं आहे ना तुला?
– हे पाहा. (वर केलेले एक बोट)
– हे काय आहे?
– नेटप्याक संपला काय? डाऊनलोड करून पाहा. तूरडाळ आहे. निदान इथं तरी बघून घे! तूरडाळीचा भाव कुठं चाललाय माहिताय ना? म्हणे अच्छे दिन! हे म्हणजे जान्हवीच्या बाळासारखं झालंय. येणार येणार म्हणतात, पण येतच नाही.. (दोन टिपे ढाळणाऱ्या स्मायली)
– का? हे भाव वाढल्याने शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी अच्छे दिन आले नाहीत? ते आपल्या देशाचे नागरिक नाहीत? जे या देशाच्या नागरिकांचे शत्रू ते या देशाचे शत्रू! त्यांनी सरळ पाकिस्तानात चालतं व्हावं.
– पाकिस्तानात हल्ली तूरडाळीचा भाव काय आहे गं? (डोळा मारलेली स्मायली)
– शाहरुखचे फॅन ना तुम्ही! तुम्ही असेच बोलणार. (विचकलेले दात)
– त्याचा इथं काय संबंध?
– तू त्याच्यासारखाच बोलतोयस.
– क्कक्क काय बोललो मी त्याच्यासारखा? अं अं अं? (तीन हसऱ्या स्मायली)
– ‘दिवाळी सुखाची जावो..’ या वाक्याचा अर्थ काय आहे? बाकीचे दिवस सुखाचे नाहीत असंच तुला म्हणायचं आहे. देशाला अशा शुभेच्छा देऊन तुम्ही वातावरण खराब करीत आहात. ते पहिल्यांदा थांबवा!
– अगं, ती नेहमीची पद्धत आहे शुभेच्छांची. गेली कित्येक र्वष आपण अशाच शुभेच्छा देतो. आणि देशाला शुभेच्छा म्हणजे काय? तू म्हणजे काय देश आहेस की मोदी? हां, आता दिसतेस थोडीशी भारताच्या नकाशासारखी.. (डोळा मारलेल्या दोन स्मायली)
– होय. मी या देशाची नागरिक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे! जय हिंद, जय महाराष्ट्र!! (दंड फुगवलेला हात)
– मग मी काय टिम्बक्टूचा नागरिक आहे?
– आय डोन्ट नो- तू टिम्बक्टूचा आहेस की पाकिस्तानचा? (लालंलाल स्मायली)
– ए, रागावलीस? रागावलीस ना की तू अगदी वैभवी मांगले दिसतेस! (गुलाबाची ओळभर फुले आणि एक तडकलेला बदाम)
– तू जा पाहू पाकिस्तानात. मला तुझ्याशी बोलायचं नाही. (नमस्काराचा हात)
– असं काय करतेस? मी काय वाईट बोललो तुला? किती चिडकी झालीयेस तू.. इनटॉलरन्ट..
– मी इनटॉलरन्ट? मग आता काय करणार? सगळ्या गिफ्ट परत करणार? म्हणे दिवाळी सुखात जावो! इथं सुख आणि समृद्धी नसती ना तर तुला हे व्हाट्स्याप तरी वापरायला मिळालं असतं का?
– हे बघ. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी काही तुझ्यावर आरोप करीत नाहीये. पद्धत आहे तसं म्हणायची..
– हो. ग्रुपवर पण सगळे असंच बोलताहेत. एकाने म्हटलं- जीएम की लागलेच सगळे जीएम करायला. एकाने म्हटलं- दिवाळी सुखात जावो, की लागलेच सगळे तसं म्हणायला. सगळी फर्जी शुभेच्छा गँग!
– अगं, सगळं जग शुभेच्छा देतंय.. तुला नको आहेत का शुभेच्छा? राहिलं. चल, परत दे आमच्या शुभेच्छा.. (डोळा मारलेली स्मायली)
– घे. गुडबाय!
– ए.. बोल ना.. ए.. हॅलो. डिअर?.. ओके.. गुडबाय! (पंधरा नमस्काराचे हात!)
(टीप- हा एक साधा, किरकोळ आणि अत्यंत निरस संवाद असून, त्याचा कोणत्याही जिवंत वा मृत घटनेशी वा प्रसंगाशी संबंध नाही. कोणीही तसा तो लावून आम्हांस पाकिस्तानात जायला सांगू नये. आम्ही पारपत्र काढलेले नाही.)
इनटॉलरन्स!
हाय! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुला सुखाची, शांततेची आणि समृद्धीची जावो, हीच प्रार्थना!
Written by मंदार गुरव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-11-2015 at 00:43 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on diwali inflection