तुम्हांस सांगतो, आमचे अख्खे आयुष्य म्हणजे एक उभेच्या उभे सवालिया निशान आहे.
किती ते प्रश्न!
गाळलेल्या जागा भरा. एका वाक्यात उत्तरे द्या. जोडय़ा लावा. संदर्भासह स्पष्टीकरण द्या. संपतच नाहीत.
आता पत्रकारितेत इतुकी वर्षे काढल्यानंतर खरे तर अवघे प्रश्न कसे जन्माचे सुटावयास हवे होते. मुख्यमंत्री कोटय़ातून एखाद् दोन सदनिका, दोन-तीन परदेशदौरे, चार-पाच पुरस्कार, पत्रकार संघाचे अध्यक्षपद, शासकीय समितीवर नियुक्ती.. झालेच तर हिला किमानपक्षी महसूलमध्ये नोकरी.. पत्रकारितेचे असे सार्थक झाले की आपण कसे च्यानेलवरील चर्चात नैतिक नैतिक मुद्दे मांडावयास मोकळे!
परंतु नाही. आमुच्या नशिबी प्रश्नच प्रश्न. बरे, ते जरा तरी बरे असावेत ना! म्हणजे काही लोकांस पाहा कसे प्रश्न पडतात, की यंदा पीएल घेऊन मलाया-पट्टाया करावे की युक्केला जावे? गुंतवणूक सुवर्णरोख्यांत करावी की म्युच्युअल फंडात?
आमचे तसे नाही. आम्हांस प्रश्न काय पडणार, तर झेरॉक्सच्या पाटीचा रंग पिवळाच का असतो? हातगाडीवर खरवस विकणारे तमाम भैय्ये लाल रंगाचेच फडके का वापरतात? पी. चिदंबरम्, व्यंकय्या नायडू आदी मंडळी कोणत्या कंपनीची वॉशिंग पावडर वापरतात? शरद पवार यांची सध्या कोणती गुप्त राजकारणे सुरू आहेत ती सोसायटीच्या वॉचमनलासुद्धा कशी बरे इत्थंभूत माहीत असतात?
बरे, हे काही आजचेच नाही. पत्रकारितेत आल्यानंतर पहिली काही वर्षे आम्हांस एका प्रश्नाने असेच छळ छळ छळले होते, की पत्रकारांची सूत्रे नेमकी कोणत्या पत्त्यावर राहतात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूत्र हे नाव आहे की आडनाव?
गत काही दिवसांपासून आमच्या काळजास असाच एक सवाल कुरतडत आहे, की आमचे थोर थोर परमप्रिय नेते गणरायासमोर भक्तिभावाने हात जोडून उभे असतात तेव्हा ते कोणती बरे प्रार्थना करीत असतात?
पंढरीच्या विठोबाबाबत आपणांस ठाऊक असते, की माऊलींकडे हवामान खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मुख्यमंत्री महापूजेनंतर एकच प्रार्थना करतो की, यंदा चांगला पाऊस पडू दे!
पण श्री गणरायाकडे ही मंडळी काय बरे मागत असतील?
उदा टिंब आमचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस. त्यांचे काय बरे मागणे असेल? त्यांचा तो हसरा, नाचरा कॉम्प्लान चेहरा पाहून कोणासही वाटेल, की ते उकडीचे मोदक मागत असतील! त्यांची नियमप्रियता पाहून आणखी कोणास वाटेल, की ते शासकीय अधिनियमानुसार देवाकडे यंदा चांगला पाऊस पडू दे, अशीच याचिका करीत असतील. परंतु आम्हांस शंका आहे. आम्हांस राहून राहून वाटते, की ते स्वत:साठी काहीच इच्छित नसतील. त्यांचे एकच मागणे असेल, की देवबाप्पा, अमित शहा, नाथाभाऊ, पंकूताई, विनोदजी यांना सुखात ठेव!!
आमचे सुशिक्षण मंत्री विनोदजी तावडे हे काय बरे मागत असतील? नववीतील सर्व मुले पास होऊ दे, परीक्षापद्धतीच बंद होऊ दे, पहिलीपासून सीईटी येऊ दे? छे! आम्हांस वाटते, त्यांचे एकच गाऱ्हाणे असेल, की बा देवा म्हाराजा, माज्या सगळ्या कोकणवासीयांका आरक्षण मिळूं दे! कोकण रेल्वेला किती गर्दी असते माहीत आहे ना?
आमच्या लाडक्या पंकूताईंकडे एरव्हीही बाबांचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम असल्याने त्यांना आणखी काही मागण्याची आवश्यकता नाही. त्या तशाही भावी मुख्यमंत्री आहेत. पण समजा, दरकराराने त्यांनी बाप्पाकडे काही मागितलेच, तर ते नक्कीच चिक्कीचे पाकीट नसेल. मग त्या काय बरे मागतील? देवबाप्पा, अमित शहांना सुखी ठेव, हीच त्यांचीही प्रार्थना असेल काय?
आणि आमचे तेजतर्रार नेते अजितदादा? तेही ‘यंदा चांगला पाऊस येऊ दे, म्हंजे मग धरणांत काही करायच्या संबंधाने काही निकाल घ्यायला नको,’ अशीच प्रार्थना करतील?
छे! किती हे प्रश्न! कुणा-कुणाबद्दलचे प्रश्न!
विचार करकरून आमच्या लहान व थोर अशा दोन्ही मेंदूंचा भुगा पडू लागला आहे.
अशा वेळी मनी येते, की आपणांस कशास बरे असे प्रश्न पडतात?
देवा गणराया, यंदा चांगला पाऊस पडू दे, राज्यातील सगळी जनता सुखात राहू दे, अशी प्रार्थना आपले हे सगळे भारतभाग्यविधाते करतात, ते खरे मानून चाललो तर देवबाप्पा काय आपला कान कापणार आहे?
अप्पा बळवंत balwantappa@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा