मामा उठले. मंडपात अजून शांतता होती. आराशीच्या माळा मंद लुकलुकत होत्या. पाच-दहा कार्यकर्ते बाजूला झोपलेले होते. दोन्ही हात ताणून मामांनी एक झडझडीत आळस दिला. दिवसभर दोन्ही पायांवर बसून दोन हातांनी मोदक धरायचा.. अंग कसं आंबून जातं. कंबर अजून दुखतेय. रात्री समईतलंच तेल घेऊन चोळली तरी काही उपयोग झाला नाही. कानाची तर कधीच वाट लागलीय. रात्री झोपलो तरी कानात गढुळाचं पाणी कोणीतरी ढवळतंय असं वाटत राहतं.
काय तरी गाणं? म्हणे- ‘पाणी कोणी ढवळलं?’ याचिका करा कोर्टात म्हणावं!
ही माणसं कशी हू की चू न करता हे असलं ऐकत असतील? माणसांच्या या अमीट भक्तीची आणि अगाध सहनशीलतेची मामांना नेहमीच कमालच वाटत आलीय! ही असली गाणी आणि ते तसले नवस!
आता आपण काय ‘कानाने बहिरे, मुके परि नाही’ असे आहोत? तरी सरळ आपल्या कानात येऊन कुर्र्र करून जातात! जे काय सांगायचं ते थेट राजाजींना सांगा ना! पण नाही. हे आमच्याच कानाचा जनता दरबार करणार!
परवा ते कोण अमितभाई आले होते. केवढा स्वच्छ माणूस! धरणभर पाण्यात शाही स्नान करून आलेला. मनोभावे पूजा केली त्यांनी. पण काय नवस बोलला, ते नीट ऐकूच आलं नाही. बाप्पांनी विचारलं तेव्हा सरळ सांगून टाकलं, की बिहारमधी लाडूनी गाडो म्हणाले! तिकडं बाप्पापण हैराण! लाडूला गाडायचं म्हणजे काय करायचं? म्हणाले, अरे, तुझ्यापेक्षा त्या रविशंकर प्रसादना ठेवलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी सगळं कसं विसंकेत करून सांगितलं असतं. कोण हे रविशंकर कोण जाणे? बहुधा नमोजींचे मामा असावेत.
मामांना वाटलं, अजून दोन दिवस थांबावं आणि एखाद्या डॉक्टरला कान दाखवावा. पण नकोच! खंडीभर टेस्ट करायला सांगतील आणि मग म्हणतील, आणखी टेस्ट करायला हव्यात. त्यापेक्षा बाप्पालाच सांगितलेलं बरं!
मामांनी वर मान करून पाहिलं. बाप्पा अजून गाढ साखरझोपेत होते.
थकतात बिचारे ते! पण चला, आता संपेल हे सगळं!
या विचारांनी मामांच्या पोटात अचानक गोळा आला. आज विसर्जन. बाप रे! म्हणजे पुन्हा मिरवणूक! पुन्हा ते ढोलताशे! पुन्हा ते ऐकणं! तासन् तास ताटकळणं!
पुण्यातली काही हुशार मंडळी या दिवशी गावाबाहेर जातात म्हणे! बाप्पाला म्हणालो होतो, आपणही तसं करायचं का? ते राडे, तो गोंधळ, तो कोलाहल यांच्यापासून सुटका तरी मिळेल काही काळ! तर बाप्पा म्हणाले, आपण काय पुणेकर आहोत की नमोजी? झालं!
एक वेळ हे सारं सहन करता येईल; पण नंतरचं ते काळ्याशार पाण्यातलं बुडणं! विसर्जन म्हणे!
माणसं बाहेरगावहून घरी जाताना काय काय घेऊन जातात! आणि आपण? चोंदलेले नाक आणि खरूजखाज सुटलेले अंग!
नुसत्या त्या आठवणींनी मामांच्या अंगावर शहारा आला. अंग झाडून ते उठले. त्यांना वाटलं, आता सगळं आवरायला हवं. बॅगा भरायला हव्यात. आणखी काही तास.. की मग गर्दी जमेल. दु:खाच्या आनंदाने आरास उतरवतील. राजाची मिरवणूक काढतील. बेंजो-बाजा अन् ढोल-ताशा लावतील. नाचतील. बागडतील. गणपती बाप्पा मोरया.. उंदीरमामा की जय म्हणत पुढच्या वर्षांचं आमंत्रण देतील. रात्री उशिरा कधीतरी परततील. आपापल्या बिळांत जातील! नशीब- या मिरवणुकीत तरी ते ‘परत या.. परत या..’ म्हणून अरविंद सावंती घोष करीत नाहीत.
मामांच्या मनात त्या घोषणा देणाऱ्या, नाचणाऱ्या, झालंच तर दर्शनरांगा लावणाऱ्या, मंडळांची धक्काबुक्की सहन करणाऱ्या, वर्गणी देणाऱ्या.. सगळ्या सगळ्यांविषयी अपार बंधुभाव दाटून आला.
क्षणभर त्याला वाटले, असेच उठावे. लाऊड स्पीकर घ्यावा आणि परतफेड म्हणून एक सणसणीत घोषणा द्यावी-
‘माणूस-मामा की जय!’
पण त्याने स्वत:ला आवरलं.
उगाच या घोषणेने मंडपात सतरंजीवर झोपलेल्या त्या कार्यकर्त्यांची झोपमोड व्हायला नको!
माणसं झोपेत असली की बरी असतात!!
balwantappa@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा