हेमंत प्रकाश राजोपाध्ये
भारतीय उपखंडातील सांस्कृतिक सरमिसळी आणि हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिस्ती सामायिक श्रद्धाविश्वांविषयी मुख्य अकादमिक विश्वात पुष्कळ लिहिले गेले आहे. या मिश्र श्रद्धा आणि सौहार्दाच्या गाथा परंपरेच्या विशाल व्यापक प्रवाहातून अधिक जिवंतपणे भरभरून वाहताना दिसून येतात..
‘धारणा’ या शब्दातून व्यक्त होणाऱ्या तत्त्वाची व्याप्ती सबंध मानवी संस्कृतीला व्यापून दशांगुळे उरलेली आहे. ‘धारणा’ या शब्दाचा अर्थ ‘विशिष्ट राजकीय- सांस्कृतिक- धार्मिक- आध्यात्मिक- तात्त्विक अथवा अकादमिक क्षेत्रातील संकल्पनांचे किंवा त्या संकल्पनांविषयीच्या तत्त्वांचे वैयक्तिक वा सामूहिक मनांवरील पगडा’ असा होतो. एखाद्या विशिष्ट वैचारिक किंवा सांस्कृतिक अवकाशांतील तत्त्वे वा घटनांविषयीच्या आपल्या समजुती आणि आकलन हे वैयक्तिक आणि सामूहिक आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटना, संबंधित क्षेत्रांतील पुढारी-चिंतक-अभ्यासक यांच्या मतांतून बनलेले असते. यातून त्या ऐतिहासिक वा समकालीन घटनेविषयी धारणा बनतात आणि त्या वर्तमान समाजकारणाला – संस्कृतीकारणाला गती देतात. भारतीय उपखंड आणि भारतासारख्या अत्यंत गुंतागुंती आणि विरोधाभासांनी युक्त असलेल्या समाजात या धारणांच्या वेगवेगळ्या प्रणाली निर्माण होतात. त्यातून निर्माण होणारे ‘धारणांचे धागे’ समाजाच्या आणि देशाच्या सांस्कृतिक, राजकीय पटांना वेगवेगळ्या रंगाढंगांनी बहुआयामी स्वरूप प्राप्त करून देतात. या धारणांचे अतिरेकी आग्रह, त्यावरून होणारी राजकारणे आणि त्यातून वाढणाऱ्या असहिष्णुताकेंद्री गटबाजीतून समाजात आक्रस्ताळा गदारोळ आणि संघर्ष माजतो. हा गटातटांच्या संघर्षांचा गोंधळ समाजाच्या अथवा सामूहिक- राजकीय- सांस्कृतिक व्यवस्थांच्या अतिरेकी असंतुलनास, पर्यायाने अराजकास कारणीभूत ठरतो.
इ. स. आठव्या शतकात आलेल्या, केरळातल्या व उत्तर कर्नाटकच्या किनारी प्रदेशांत स्थिरावलेल्या अरब व्यापारी समूहांद्वारे आणि ११ व्या शतकात इथल्या राजकीय व्यवस्थांच्या संचालकांनी राजकीय व्यवस्थांत सहभागी करून घेतल्यानंतर अरबी-तुर्की सत्ताधीशांच्या माध्यमातून उपखंडात इस्लामी संस्कृती-श्रद्धाप्रणालीचा प्रवेश झाल्याचे आपण पाहिले. १७-१८ व्या शतकांपर्यंत इस्लामी श्रद्धाप्रणालीचे अनुसरण करणाऱ्या राजकुलांनी उपखंडावर आपली अधिसत्ता गाजवली. यातील बऱ्याचशा वंशांचे मूळ मध्य आशियात स्थिरावलेल्या तुर्की वंशाच्या आणि तुर्की प्रभाव असलेल्या समूहांमध्ये दिसून येते, तर अहमदनगरच्या निजामशहासारखी राजकुळे इथल्या स्थानिक धर्मप्रणालीचे पालन-नेतृत्व करणाऱ्या ब्राह्मणादी जातींतून धर्मपरिवर्तन झालेल्या समूहांतून उदयाला आली. उपखंडाच्या इतिहासात ग्रीक-कुशाण, शक, पहलव, अरबी-तुर्की, मध्य आशियायी समूह या प्रदेशात आले. त्यांच्याद्वारे इथल्या स्थानिक श्रद्धाविश्वाचा, सांस्कृतिक संचिताचा अवकाश अधिक व्यापक झाला आणि हे समूह या भारतवर्षांच्या ‘डीएनए’चा अविभाज्य घटक बनले. या प्रक्रियांचा दाखला म्हणून, इराणातील ‘मिथ्र’ या सूर्यदेवतेच्या परिवारातून आलेल्या संज्ञा आणि ‘राणूबाई’ (आदित्य राणूबाई) या देवतेच्या उपासनेच्या भारतातील उन्नयनाचा ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी घेतलेला चिकित्सक आढावा जिज्ञासू वाचकांना वाचनीय ठरेल. उपखंडातील सांस्कृतिक सरमिसळी आणि हिंदू-मुसलमान, हिंदू-ख्रिस्ती सामायिक श्रद्धाविश्वांविषयी मुख्य अकादमिक विश्वात पुष्कळ लिहिले गेले आहे. या मिश्र श्रद्धा आणि सौहार्दाच्या गाथा परंपरेच्या विशाल व्यापक प्रवाहातून अधिक जिवंतपणे भरभरून वाहताना दिसून येतात.
गेल्या लेखात आपण ‘तुलुक्क नाचियार’ आणि ‘कान्हदडे’ मिश्र श्रद्धाविश्वाचा आढावा घेतला. या कथांमध्ये मानवी समूहांतील देवताविषयक आस्थाप्रवाहांचा संगम आपण अनुभवला. दोन श्रद्धाविश्वांच्या या संगमाला उपनिषदांचे पर्शियन भाषेत अनुवाद करून घेणाऱ्या मुघल शहजादा असलेल्या दारा शुकोह याने दोन महासागरांच्या संगमाची उपमा दिली आहे. महासागरांच्या पाण्याच्या या संगमातून साकारणारे वेगवेगळे रंग आणि त्यातून आविष्कृत होणारे घटक वेगवेगळ्या रूपांत प्रतीत होताना दिसतात. कधी कधी तर विशिष्ट धर्मातील देवतादेखील इतर धर्मीय ईश्वरी शक्तींच्या, संत-विभूतींच्या रूपात आविष्कृत होऊन भक्तांना दर्शन देते; तर एखाद्या निर्गुण उपासनेचा आणि एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या धर्माचा प्रेषित अनेकेश्वरवादी धर्मातील देवतेच्या रूपात आविष्कृत होतो! याचेच उदाहरण म्हणून मुजम्मिल (चादर पांघरणारे) प्रेषित मुहम्मद भारतातील इस्लामधर्मीय भक्ताला भगवान श्रीकृष्णासारखे काळे कांबळे (पाहा : राही मासूम रजा यांची ‘ओस की बूँद’ ही कादंबरी) पांघरतात; तर तुर्कस्थानातून आलेले हजरत दादा हयात कलंदर हे सुफी संत गुरू दत्तात्रेयांच्या रूपात हिंदू साधकांना दर्शन देतात.
या मिश्र सांप्रदायिकतेला अधिक रोचक करणारी अशीच एक महत्त्वाची कथा आपल्या मराठी भक्तिविश्वाच्या अवकाशातही दिसून येते. वारकरी व भक्ती संप्रदायाचे प्रमुख आधारस्तंभ आणि मराठी संतमालिकेतील तेजस्वी पुरुष संत एकनाथ महाराजांच्या चरित्रातली ही कथा आणि त्याविषयीच्या धारणा मध्ययुगीन श्रद्धाविश्वातील मोकळीक आणि उदात्त वृत्ती निर्देशित करते. संत एकनाथ आपल्या गुरूंच्या- जनार्दनस्वामींच्या गृही अध्ययनास राहत होते. त्या वेळी जनार्दनस्वामी हे देवगिरी/दौलताबाद किल्ल्यावर सुलतानाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. एके दिवशी किल्ल्याच्या परिसरातील शूलिभंजन परिसरात जनार्दनस्वामी एकनाथांस घेऊन गेले असता उभय गुरू-शिष्यांना श्री दत्तात्रेयांनी मुस्लीम फकिराच्या मलंगाच्या वेशात दर्शन दिले, अशी रम्य कथा एकनाथांच्या चरित्रात येते. नाथांच्या चरित्राच्या अभ्यासकांनी आणि इतिहासकारांनी या कथेची ऐतिहासिक मीमांसा करताना हे मलंग वेशातील दत्तात्रेय म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या परिसरात वास करून असलेले चांद बोधले हे सुफी संतच होत, असे सिद्ध केले आहे. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मांडणीनुसार चांद बोधले हे सुफी परंपरेत दीक्षित झालेले ‘चंद्रभट’ नावाचे हिंदू व्यक्ती होते. चांद बोधले-जनार्दनस्वामी आणि संत एकनाथ यांचा अनुबंध एकनाथ महाराजांच्या परंपरेतील नाथांचे चरित्रकार कृष्णदास जगदानंद यांच्या ‘प्रतिष्ठान-चरित्र’ या नाथचरित्रात –
‘एकनाथासी करिता। तंव आला चांदबोध।
चंद्रशेखर महासाधू। अवतार प्रसिद्ध दत्तात्रेयाचा।।’
अशा शब्दांत प्रकट केला आहे. नाथांचे समकालीन असलेले त्यांच्या गुरूंचे गुरुबंधू आणि श्रीगोंद्याचे थोर कृष्णभक्त संत शेख महंमद या संतवर्यानी त्यांच्या ‘योगसंग्राम’ या गौरवान्वित ग्रंथात या मताला पुष्टी दिलेली दिसते, ती अशी-
‘ॐ नमोजी चांदबोधले। ज्यांनी जानोपंता अंगीकारले।
जानोबाने एका उपदेशिले। दास्यत्वगुणे।।’
जानोपंतांच्या (एकनाथांचे गुरू जनार्दन ) गुरुबंधुत्वाचा अभिमानाने उल्लेख करणारे शेख महंमद बाबा हे थोर कृष्णभक्त आणि सिद्धयोगी होते. बहुधा त्यामुळेच संत परंपरेत त्यांना ‘शेख महंमद। कबीराचा।’ असे गौरविण्यात आले असावे. इराणातील सुफी परंपरेतील ‘कादरी’ या शाखेतील महंमद गौस यांचे शिष्य असलेल्या राजे महंमद यांचा पुत्र आणि शिष्य असलेले शेख महंमद यांचे शिष्यत्व शिवछत्रपतींचे पितामह मालोजीराजे आणि त्यांचे दिवाण बालाजी कोन्हेर यांनी पत्करल्याचा व त्यांना जमिनी इनाम दिल्याचा उल्लेख ज्येष्ठ अभ्यासक वा. सी. बेंद्रे यांनी केला आहे. शिवपूर्वकाळातील दख्खनच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या मालोजीराजांचा सुफी सिद्धांच्या प्रति असलेला हा पूज्यभाव म्हणजे ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती। तेथ कर माझे जुळती।’ या कवी बा. भ. बोरकरांच्या आधुनिक काव्यातील धारणेचे मध्ययुगीन आविष्करण मानावे लागते.
‘शेख महंमद अविंध। त्याचे हृदयी गोविंद।’ अशी आपल्या उदारमनस्कतेची आणि विश्वात्मक भक्तिभावाची साक्ष देणारे शेख महंमद बाबा, सुफी परंपरेच्या उपासनेचा अंगीकार केलेले चांद बोधले, जन्माने उच्चवर्णीय हिंदू मात्र उपासना पद्धतीत सुफी आणि हिंदू मार्गाचा मिलाफ घडवून आणणारे जनार्दनस्वामी आणि संत एकनाथ मध्ययुगीन उपासना व श्रद्धाविश्वाची लवचीकता आणि उदारमनस्कतेचे प्रतिनिधी ठरतात. अर्थात, परधर्मीय उपासना पद्धतीशी जुळवून घेतल्याने किंवा तथाकथित निम्नजातीय समुदायाशी सौहार्दपूर्ण व्यवहार केल्याने ‘भावना दुखावून घेणाऱ्या ज्ञातीबांधवां’चा त्रास या स्नेहाद्र्र, करुणायुक्त हृदयाच्या संतमंडळींना झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रांत आणि त्यांच्या स्वत:च्या लिखाणात दिसून येतोच. शेख महंमद बावांनी हिंदू देवांना भ्रष्ट करतो म्हणून हिंदू समाजाने ‘देवतानिखंदक’ म्हटल्याचा आणि हिंदू उपासना पद्धतीशी जुळवून घेतल्याने मुस्लीम समुदायाने ‘काफर’ म्हणून बहिष्कृत केल्याचा उल्लेख स्वत:च केला आहे.
‘धारणांच्या धाग्यां’च्या उकलीच्या आपल्या वर्षभराच्या चर्चाप्रवाहात आपण भारतीय उपखंड-भारतवर्ष इत्यादी संकल्पना ते आजची आपली राष्ट्रीय ओळख इथपासून आपला-परका, सुष्ट-दुष्ट, देव-असुर वगैरे द्वैतकेंद्री धारणांचा ऐतिहासिक चिकित्सेच्या अंगाने मागोवा घेतला. प्राचीन आणि मध्ययुगीन ऐतिहासिक तथ्यांचा चिकित्सक मागोवा घेताना वेगवेगळ्या काळांतील सामाजिक अवकाशांचा आणि धारणांच्या बहुस्तरीय रचना, त्यांच्या गुंतागुंती तपासत आपण आता लेखमालेच्या चरम टप्प्यात येऊन ठेपतो आहोत.
लेखमालिकेच्या उर्वरित भागांतून प्राचीन आणि मध्ययुगीन काळात उपखंडातील इतिहासाच्या आकलनामागील आधुनिक प्रेरणांची चिकित्सा आपल्याला करायची आहे. उपखंडाच्या इतिहासातील आधुनिक काळाचा प्रारंभ मानला जाणारा इंग्रजांच्या आणि फ्रेंच-पोर्तुगीजांच्या राजकीय वर्चस्व प्रस्थापनेचा काळ उपखंडातील सांस्कृतिक-धार्मिक धारणांच्या अवकाशाला वेगळे आयाम देणारा ठरतो. इंग्रजांनी भारतात आणलेल्या पाश्चात्त्य शिक्षण व्यवस्थेचा फायदा करून घेणारा वर्ग हा प्रामुख्याने एतद्देशीय समाजाच्या वरच्या वर्गातील आणि वर्णातील होता. इंग्रजी शिक्षण व्यवस्थेतील अभ्यासासोबतच पाश्चात्त्य जगातील ज्ञानपरंपरांची, संस्कृतीची, त्यांच्या परिशीलनाच्या पद्धतींची ओळख या समाजाला झाली. शिक्षणामुळे झालेली सामाजिक जागृती, जातिप्रथेसारख्या नृशंस प्रथांविरोधातील संघर्ष आणि या साऱ्या सामूहिक अस्मिता व अभिमानाचे गाठोडे घेऊन आजच्या वर्तमानात येऊन ठेपलेल्या समाजातील रूढ धारणांचे परिशीलन करत आपल्याला ‘धारणांच्या धाग्यां’चा हा लघुपट पूर्णत्वाला न्यावयाचा आहे.
(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ, जर्मनी येथे पीएच.डी. संशोधक असून ‘ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई’ येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)
rajopadhyehemant@gmail.com