स्मृती आणि इतिहास
भारतीय बौद्धिक-सांस्कृतिक विश्वामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या धर्मपरंपरांविषयीच्या अस्मितांना आणि त्यांच्याविषयीच्या स्मरणरंजनात्मक धारणांतून आकाराला आलेल्या राजकारणाला अधिक गती मिळाल्याचे दिसून येते. मात्र, या अस्मिताजनित उन्मादाची किंवा आक्रमक अत्याग्रहाची चिकित्सा केली असता काय दिसते?
गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक, वैज्ञानिक आणि ज्ञानशास्त्रीय विकासाच्या, निर्मितिक्षमतेच्या गतीच्या तुलनेत सांस्कृतिक प्रगल्भतेचा अवकाश आणि गती संकुचित होत असल्याची तक्रार, ओरड जागतिक पातळीवरील विचारवंत आणि समाजशास्त्राचे अभ्यासक करताना दिसतात. त्यांच्या तक्रारीचा आणि काळजीचा सूर हा सांस्कृतिक चौकटींच्या राजकीयीकरणाविषयी, इतिहास-संस्कृती व तत्त्वज्ञानाच्या अवस्तुनिष्ठ मांडणीविषयी आणि वाढत्या सरंजामी वृत्तीकडे निर्देश करणारा असतो. अर्थात, मानवी समूहाच्या सांस्कृतिक अवकाशाची जडणघडण ही कधीही एकरेषीय आणि साचेबद्ध पद्धतीने होत नसते. मानवी संस्कृती आणि समाजाच्या इतिहासाविषयीच्या वेगवेगळ्या समूहांच्या धारणा आणि त्यातून आकाराला येणारं संस्कृतिकारण व समाजकारण पाहताना त्या घटनांकडे केवळ ऐतिहासिक घडामोडी, सनावळ्या किंवा तपशिलाविषयीच्या उपलब्ध चौकटी यांच्या मर्यादेत पाहून चालत नाही. भूत अथवा वर्तमानकाळातील घटनांच्या परिशीलनासाठी अभ्यासशास्त्रीय शिस्त आणि ज्ञानप्रणालीचा अंगीकार करावा लागतो. लेखमालेतून या जडणघडणीचा इतिहास विविध उदाहरणांद्वारे आणि त्याविषयीच्या धारणांच्या उकलीद्वारे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करत आहोत. धारणांच्या धाग्यांच्या गुंतागुंती तपासण्याच्या या आपल्या प्रवासात केवळ ऐतिहासिक तपशिलांचे उत्खनन हा हेतू न ठेवता, ऐतिहासिक घडामोडींविषयीच्या स्मृती आणि त्यांविषयीच्या धारणांची निर्मिती कशी होते किंवा त्या धारणा कशा रुजतात, हे पाहायचा प्रयत्न आपण केला.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय बौद्धिक-सांस्कृतिक विश्वामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या धर्मपरंपरांविषयीच्या अस्मितांना आणि त्यांच्याविषयीच्या स्मरणरंजनात्मक धारणांतून आकाराला आलेल्या राजकारणाला अधिक गती मिळाल्याचे दिसून येते. अशा प्रकारचे राजकारण भारतीय उपखंडाला नवीन नाही. या अस्मितांच्या संघर्षांना श्रद्धाविश्वाच्या चौकटीत बसवण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसतात. त्यावर विविध माध्यमांतून चर्चादेखील होत राहते. मात्र, या अस्मिताजनित उन्मादाची वा आक्रमक अत्याग्रहाची चिकित्सा केली असता काय दिसते? तर, त्याच्या मुळाशी संबंधित सांस्कृतिक-धार्मिक वर्तुळातील संघटित भागधारक समूहांना त्यांच्या अस्मितांचे पोषण करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या राजपुरुषांची राजसत्ता आणि त्यांच्या दमनशक्तीपर प्रेरणांचेच आकर्षण असल्याचे दिसते.
या लेखमालेतील ‘मुद्रा भद्राय राजते।’ या लेखात (१ जून) पाहिल्यानुसार, भारतीय संस्कृतीविषयीच्या आधुनिक धारणांची प्रकृतीही शांतताप्रवण असल्याचं नेहमीच सांगितलं जातं. आधुनिक काळातल्या वसाहतवादी जोखडाला झुगारून स्वतंत्र झालेल्या भारतदेशाच्या तत्कालीन दार्शनिकांनी आणि नेत्यांनी प्रस्थापित केलेल्या भारताच्या अिहसाप्रवण शांतिप्रियतेची ऐतिहासिक मीमांसादेखील आपण त्या अनुषंगाने केली. वैदिक यज्ञप्रवण व्यवस्थेला पर्याय म्हणून उभे राहिलेल्या बौद्ध-जैन परंपरेतून ‘अिहसा’ हे मूल्य आलेलं असलं, तरी पुढे बौद्ध धर्म भारतामध्ये नामशेष झाला. बौद्ध धर्माच्या इतिहासातील साक्षात बुद्ध किंवा अशोक यांच्या युद्धविषयक विचारांसंबंधी विरोधाभास त्यांच्याच चरित्रांमध्ये दिसून येतो. त्यामुळे अिहसा हे तत्त्व प्रत्यक्ष सामूहिक अगर वैयक्तिक आचरणामध्ये येण्याऐवजी केवळ एक शास्त्रचर्चा आणि आदर्शवादापुरते मूल्य म्हणून प्रस्थापित झाल्याचे दिसते. कलिंग युद्धाच्या आधीच बौद्ध झालेल्या सम्राट अशोकाने कलिंग विजयानंतर मात्र अिहसा या मूल्याचा राजकीय पातळीवरून प्रसार केल्याचं दिसतं. दुसरीकडे, गेल्या काही वर्षांत भारताच्या राष्ट्रीय – राष्ट्रवादी अस्मितांचे विकसन होताना स्वातंत्र्योत्तर काळात घडविण्यात आलेल्या भारताच्या शांतताप्रिय प्रतिमेऐवजी देशांतर्गत प्रादेशिक – सामूहिक अस्मितांच्या विकसनप्रक्रियांनी वेगळा मार्ग पत्करल्याचे दिसते. या अस्मितांच्या विकसनप्रक्रियांना आणि त्यांच्या जातकुळीला-प्रकृतीला चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्त विक्रमादित्य, पुष्यमित्र राजेंद्र – राजराज चोळ, महेंद्र वर्मा पल्लव किंवा राजपुतादी जातींच्या व राजांच्या पौरुष पराक्रमांच्या गाथा अधिक जवळच्या व संवादी वाटतात.
१९४७ साली नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताची शांतिप्रवण प्रतिमा निर्मिण्यामागे त्या प्रतिमेच्या शिल्पकारांना स्वातंत्र्यासोबत मिळालेल्या फाळणी आणि फाळणीसंदर्भातील धर्माधिष्ठित राजकारण व हिंसेचं भान होतं. मात्र, शांती आणि सौहार्द यांसारख्या मूल्यांचे संस्कार आणि फाळणीच्या दरम्यान व त्यानंतर झालेल्या युद्धजनित हिंसेचे आणि धर्मद्वेषाचे भूत उपखंडाच्या परिघात घोंघावत राहिल्याचे दिसून येते. वर म्हटल्याप्रमाणे, सद्य:कालीन भवतालात ठळक दिसू लागलेल्या धर्मविषयक अस्मितांच्या राजकारणावर आणि संबंधित घटनांवर फाळणीच्या द्वेषजनक व हिंसक राजकारणाचा प्रभाव दिसतो. फाळणीला कारणीभूत ठरलेल्या द्विराष्ट्रवादाचा गाभा धार्मिक अस्मिता आणि त्याद्वारे रुजवलेल्या खोटय़ा असुरक्षिततेने बनलेला असल्यामुळे फाळणीपश्चात निर्माण झालेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांत धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा उदय आणि प्रसार झाल्याचं दिसतं. फाळणीपूर्वी एका विस्तृत सांस्कृतिक व भाषिक अवकाशाचे घटक असलेले समूह कृतक, कृत्रिम अशा धार्मिक अस्मिता आणि असुरक्षिततांपोटी एकमेकांचे कट्टर वैरी बनले खरे; मात्र त्या वैरामध्ये त्यांनी आपापल्या भूभागातील आणि समाजांच्या सामायिक इतिहासाला आणि अस्मितेला खोटी झूल पांघरल्याचे दिसते.
या अस्मितांच्या केंद्रस्थानी वसलेली विसंगती आणि खोटेपण दाखवणारी काही मोजकी उदाहरणे आपण संक्षेपात पाहू या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धप्रवण संबंधांतून वाढलेल्या युद्धखोरीतून पाकिस्तानच्या संरक्षणव्यवस्थेने आपल्या शस्त्रास्त्र -क्षेपणास्त्रांना मध्ययुगात भारतीय उपखंडावर आक्रमण करणाऱ्या मध्य आशियाई सुलतानांची- ‘घौरी’ आणि ‘अब्दाली’ अशी नावे दिली. अशी नावे देण्यामागे फाळणीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या हिंदू -मुस्लीम अस्मिता आणि युद्धखोरीला उत्तेजना देणाऱ्या समजांची पृष्ठभूमी आहे. उपखंडावरील मध्य आशियाई आक्रमणांचा इतिहास शक-हूण-पहलवादि वंशांच्या काळापर्यंत मागे नेता येतो. मात्र, फाळणीच्या काळात प्रसृत झालेल्या हिंदू – मुस्लीम द्वेषातून उदयाला आलेल्या पाकिस्तानी राष्ट्रवादाचा गाभा हाच मुळी मुस्लीम अस्मिता आणि त्या अस्मितेतून कल्पिलेल्या खोटय़ा मुस्लीम वर्चस्ववादावर बेतलेला आहे. त्यामुळेच भारतावर हल्ला करणारे तमूर आणि अब्दाली हे पाकिस्तानी राजसत्तेने, लष्करी सत्तेने पाकिस्तानी मुस्लिमांचे पूर्वज म्हणून कल्पित केले आणि तशा प्रतिमा जनमानसात रुजवल्या. गमतीचा भाग असा की, बाबा वारीस शाह (१७२२-१७९८) नावाच्या पश्चिम पंजाबमधील (सध्याचा पाकिस्तानी पंजाब) सुफी संताने मात्र या अब्दालीविषयी ‘खादा पिता लाहेदा, बाकी अहमद शाहेदा’ अर्थात ‘जे काही तत्काळ खाण्यापिण्यासाठी हाताशी लागेल तेवढेच आपले, बाकी अहमदशाह अब्दाली येऊन कधी लुटून नेईल सांगता येत नाही’ असे उद्गार काढले आहेत. ‘तमूर’ क्षेपणास्त्र ज्याच्या नावे बनवण्यात आले, त्या तमूराने लाहोर प्रांतात लुटमार करताना स्थानिक लोकांच्या मस्तकाचे ढीग उभे केल्याचे संदर्भ ऐतिहासिक साधनात दिसून येतात. शिवाय या मुस्लीमधर्मीय सुलतानांच्या शासनकाळात सामान्य, निम्नवर्गीय मुसलमानांची आर्थिक, सामाजिक स्थिती कायम हलाखीची राहिलीच; परंतु मुस्लिमांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी निर्माण झालेल्या आजच्या पाकिस्तानातही सामान्य निम्न-मध्यमवर्गीय बहुसंख्याक मुस्लीम प्राथमिक गरजांपासून वंचित असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे, भारतामध्येही गझनीचा मुहम्मद आणि अन्य मुसलमान सुलतान-बादशाहांनी केलेला प्रार्थनास्थळांचा विध्वंस आधुनिक राष्ट्रवादी संभाषितांमध्ये नेहमीच डोकावत राहतो. काश्मीर प्रांताचा इतिहास लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध कल्हण या कवीच्या ‘राजतरंगिणी’ ग्रंथात ११ व्या शतकातील काश्मीरचा राजा हर्ष याने मंदिरांतील संपत्ती लुटण्यासाठी देवोत्पाटननायक नामक अधिकारीपदाची निर्मिती केल्याचे संदर्भ मिळतात. अर्थात, मध्ययुगीन समाजामध्ये आधुनिक काळात विकसित झालेली परधर्मसहिष्णुता वा धर्मनिरपेक्षतावादासारखी तत्त्वे अस्तित्वात होती असे मानायचे काही कारण नाही. मात्र, ऐतिहासिक घडामोडींमागील गुंतागुंतींचे संदर्भ आणि त्या काळातल्या समाजातील सामाजिक-सांस्कृतिक धारणांची गतिमानता लक्षात घेतल्याशिवाय त्या तपशिलांचा वापर राष्ट्रवादाच्या नावाखाली जमातवादी राजकारणासाठी करण्याची वृत्ती उपखंडातील सांस्कृतिक-राजकीय वातावरणाला घातक ठरत आल्याचे आपण गत ७० वर्षांत वारंवार पाहिले.
या लेखमालेच्या प्रारंभी आपण ‘अयं निज: परो वेति..’ (११ फेब्रुवारी) आणि ‘देव कोण? असुर कोण?’ (२४ फेब्रुवारी) या लेखांतून स्वकीय-परकीयत्वाविषयीच्या धारणा आणि देव-असुर या प्रतिमांच्या निर्मितीची ऐतिहासिक प्रक्रिया पाहिली. अस्मिता आणि सामूहिक ओळखी ठरवून त्यानुसार सामूहिक निष्ठा घडवणाऱ्या सामाजिक प्रक्रियांचा प्रभाव उपखंडातील समाजाच्या मानसिकतेत सखोल रुजल्याचे शेकडो दाखले आपल्याला देता येतात. त्या मानसिकतेला आकार देणाऱ्या सामूहिक स्मृती या नेहमीच विशिष्ट प्रकारच्या गृहीतकांवर आणि जाणीवपूर्वक किंवा नकळत घडवण्यात आलेल्या सामूहिक स्मृतींवर बेतलेल्या असतात.
विख्यात फ्रेंच इतिहासकार पिएर नोरा यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सामूहिक स्मृती’ आणि ‘इतिहास’ हे विरुद्धार्थी शब्दच आहेत. कारण त्यांच्यात स्वाभाविकत:च मूलभूत विरोध असतो. विशिष्ट सामाजिक-सामूहिक स्मृती संबंधित समूहांचं आभासी जीवन बनत जातात. त्या आपल्या मूळ स्वरूपाविषयी आणि त्यातील गुंतागुंतीविषयी अनभिज्ञता बाळगतात (आणि ती अनभिज्ञता समाजात रुजवतात). या स्मृतींचे भागधारक किंवा हितसंबंधी घटक त्या स्मृतींना सोयीनुसार पुनरुज्जीवित करीत असतात. या स्मृतींची प्रकृती जादूई-कल्पनारम्य असते आणि तीच प्रकृती संबंधित स्मृतींना पावित्र्य किंवा अस्मितांची कोंदणं बहाल करते. या स्मृतींतून धुंडाळला जाणारा वस्तुनिष्ठ इतिहास मात्र या कल्पनारम्यतेच्या कक्षेबाहेरील वास्तवे दाखवून देत असल्याने काहीसा नीरस ठरू शकतो.
धारणांच्या धाग्यांच्या उकलीचा वर्षभराचा प्रवास अशा साऱ्या स्मृती-धारणांच्या केंद्राशी जाऊन जादूई किंवा उत्तेजक कल्पित स्मृतींच्या पटावरची पुटे काढण्याच्या प्रक्रियेचा छोटा टप्पा आहे. समाजाने आपल्या सोयीनुसार, क्षमतेनुसार हव्या तितक्या/तेवढय़ाच स्वीकारलेल्या या धारणा आणि स्मृती अभ्यासकाच्या-चिकित्सक विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून आपण कायमच उलगडत्या ठेवणं आणि त्यातून समोर आलेल्या वास्तवांना स्वीकारणं हे मानवी समाजाच्या भविष्यासाठी हितावह ठरणार आहे.
(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ, जर्मनी येथे पीएच.डी. संशोधक असून ‘ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई’ येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)
rajopadhyehemant@gmail.com