हेमंत प्रकाश राजोपाध्ये
एखाद्या विशिष्ट भूभागाचा मानवी इतिहास-भूतकाळ त्या प्रदेशात राहणाऱ्या समूहांच्या व्यवहारांतून आकाराला येणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक वर्तुळातल्या गुंतागुंती, आर्थिक-राजकीय समीकरणे आणि तिथल्या स्थलांतरांचे पदर वगैरे अनेक घटकांतून साकार होतो. पर्यावरणीय किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे घडून आलेल्या स्थलांतरांची, युद्धा-आक्रमणाची आणि त्यादरम्यान झालेल्या सांस्कृतिक आदानप्रदानाची भक्कम जोड त्या प्रक्रियेला लाभलेली असते. एखाद्या विशिष्ट काळात घडलेल्या घटनांची स्मृती काही दशकांनी किंवा शतकांनी पुनरुज्जीवित होताना किंवा तिचे कथन होताना त्या पुनरुज्जीवनामागे किंवा कथनामागे तत्कालीन राजकीय-सांस्कृतिक वर्तुळातील सक्रिय असलेल्या महत्त्वाच्या भागधारकांची भूमिका महत्त्वाची असते. घडून गेलेल्या घटनांच्या स्मृती पिढय़ान् पिढय़ा जपल्या जाताना त्या स्मृतींवर आणि स्मृतींच्या उजळणी-कथन-लेखनाच्या प्रक्रियांवर समकालीन धारणांचा आणि राजकीय-सांस्कृतिक परिघातील वैचारिक घुसळणीचा प्रभाव पडत असतो. एखाद्या विशिष्ट समूहाची संस्कृती म्हणजे त्या समूहाने विकसित केलेले-अभिव्यक्त केलेले सांस्कृतिक आविष्कार असतात. त्या आविष्कारांमध्ये स्मरणरंजन, काल्पनिक सृष्टी, श्रद्धा, आपल्या समूहाविषयीच्या सांस्कृतिक-सामूहिक अस्मिता, विद्यमान अथवा भूतपूर्व समूहनेत्यांविषयीच्या श्रद्धा-आदरभावातून विकसित झालेल्या संवेदना आणि त्या नेत्यांनी घडविलेल्या अथवा त्याच्या जीवनाविषयीच्या आकलनातून बनविलेल्या सामूहिक अस्मिता यांसारखे घटक महत्त्वाचे असतात.
अशा अनेक गुंतागुंतीच्या धारणांच्या धाग्यांची उकल करताना आपल्याला आधुनिकता हा अतिमहत्त्वाचा घटक विचारात घ्यावा लागतो. गेल्या दीड-दोन शतकांत आलेल्या आधुनिकतेच्या लाटेत वसाहतवाद आणि वसाहतोत्तर काळातील जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरच्या साऱ्याच घडामोडी आणि संस्कृती-सामूहिकता-श्रद्धा यांसारखी तत्त्वे आमूलाग्र बदलून गेली. या आधुनिकतेनं प्रदान केलेल्या अनेकविध धारणांच्या चौकटींपैकी काही महत्त्वाच्या चौकटी आपल्या आजच्या धारणांच्या चौकटीत कमालीच्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील झाल्या आहेत. धारणांच्या उकलीच्या पुढील टप्प्यांत आपल्याला या चौकटींची मापे, लांबीरुंदी मोजून आपल्या आजच्या धारणांचे पट त्यावर कसे बसवले गेले याचा परामर्श घ्यायचा आहे.
गेल्या लेखांत आपण भारतीय उपखंडाच्या मध्ययुगीन इतिहासातील बदलते प्रवाह आणि नवीन सांस्कृतिक-राजकीय परिवर्तनांमागील घडामोडी पाहिल्या. उपखंडातून आणि मध्य-उत्तर आशियातून होणाऱ्या व्यापारी मार्गाच्या द्वारे उपखंडात व्यापारी हेतूने आलेले अरब आणि इथल्या अंतर्गत राजसत्तांचे संघर्ष आणि त्यातून स्थिरावलेले नवे सत्ताधीश यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेतली. गुप्तांच्या आणि वाकाटकांच्या अस्तानंतर निर्माण झालेल्या राजसत्ता आणि त्यांच्यातल्या अंतर्गत संघर्षांतून एकछत्री बलाढय़ सत्तेची स्थापना पुन्हा होऊ शकली नव्हती. अशा वेळी पश्चिम-दक्षिण किनाऱ्यावरील व्यापारी वर्तुळात अरबांची वाढलेली शक्ती आणि मध्य आशियातून आलेल्या तुर्की-अरब वंशाच्या समूहांनी उपखंडाच्या वायव्य आणि पश्चिम प्रांतात आपले राजकीय आणि सांस्कृतिक बस्तान बसवायला प्रारंभ केला होता. सुदूर वायव्येला काबूल नदीच्या खोऱ्यात राज्य करणाऱ्या तुर्की वंशीय राजघराण्याला नमवून तिथल्या हिंदू अधिकाऱ्याने ‘हिंदूशाही’ची स्थापना केली होती. त्या प्रदेशात मध्य आशियायी स्थानिक गूढवादी श्रद्धा (Shamanism), बौद्ध-झरतुष्ट्रीय धर्म-पौराणिक हिंदू श्रद्धा यांच्या मिश्र प्रभावातून बनलेल्या धारणांतून वैशिष्टय़पूर्ण धर्म-संस्कृतिविश्व नांदत असे. या नव्याने स्थापित हिंदूशाहीच्या राजांना पूर्वेकडे सिंधूच्या खोऱ्याच्या पलीकडे ढकलून देण्यात स्थानिक अफगाणी-तुर्की-मध्य आशियायी वंशाच्या सत्तांना यश आलं. तोवर मध्यपूर्व आशिया आणि उपखंडाच्या पश्चिम भागात इस्लाम धर्माचा प्रभाव वाढीस लागला होता. त्याआधी हिमालयीन प्रदेशात स्वतंत्र राजवंश म्हणून उदयाला आलेल्या नेपाळी वंशाने तिबेटचा प्रभाव झुगारून देऊन आपले स्वतंत्र अस्तित्व उभे केले होते. असे असले तरीही गंगेच्या खोऱ्यापासून नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत ज्याला आर्यावर्त असे म्हटले जात असे, त्या प्रदेशातला राजकीय सत्तासंघर्ष हा अंतर्गतच राहिला. अरबी व्यापाऱ्यांनी पश्चिम-दक्षिण किनाऱ्यावर व्यापारात जम बसवला असला तरीही, उत्तर आणि मध्य भारतामध्ये मध्य आशियायी समूहांचा राजकीय हस्तक्षेप बराच काळ नव्हता. त्याला धक्का लागला दक्षिणेकडील राजेंद्र चोळ या राजाने पूर्व किनाऱ्यावरून गंगेपर्यंत मारलेल्या मुसंडीद्वारे. तिकडे मध्य आशियात तुर्काचा प्रभाव रोखण्याच्या हेतूने पर्शिया-आजचे इराण अरबांनी काबीज केलं होतं. तोवर वंक्षु (ऑक्सस) नदीपर्यंत पसरलेल्या तुर्की समूहांनी बौद्ध धर्म आणि अन्य मध्य आशियायी श्रद्धांना आश्रय दिला होता. अरबांच्या पर्शियातील प्राबल्यादरम्यान तुर्की मंडळींनी इस्लाम धर्म स्वीकार केला होता. त्यांच्या इस्लाम-स्वीकारानंतर पश्चिम आशियायी रेशीम मार्गावरील समूहांतदेखील इस्लामचा प्रसार वाढीस लागला होता. पश्चिम आणि मध्य आशियातील पशुपालक समूहांनी उपखंडाच्या उत्तर-वायव्य आणि पश्चिमेकडील राजकारणात पुष्कळ महत्त्व प्राप्त केल्याचे दिसते. या समूहांचा नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक-संपन्न प्रदेशातील कृषक समाजाशी आणि व्यापारी समाजाशी असलेला संपर्क उपखंडाच्या इतिहासात मोलाचा मानला जातो. उत्तर-मध्य आशिया आणि उपखंडाच्या उत्तर भागातून जाणाऱ्या रेशीम आणि अन्य व्यापारी मार्गाच्या प्रदेशात या पशुपालक समाजाचे वर्चस्व आणि प्राबल्य असल्याने आपले प्राबल्य वाढवण्यासाठी हा समाज पुढे युद्धजीवी झाल्याचं दिसून येतं. नद्यांच्या खोऱ्यातील संपन्न कृषक वर्गाशी त्यांचा संबंध आला तो ताकदीच्या माध्यमातून अधिकाधिक भूप्रदेश आणि संपत्ती या संपन्न प्रदेशातून मिळवण्याच्या ध्येयापोटी. किंबहुना याचमुळे मध्य आशियायी भटक्या पशुपालक समूहाचे उपखंडाच्या उत्तर भागात कायमच राजकीय-सामरिक हस्तक्षेप हा सातत्यपूर्ण राहिला. तुर्कानी बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली मध्य आशियातून उपखंडात आपले अस्तित्व कायम जागते ठेवले असल्याने, त्यांच्या इस्लाममध्ये झालेल्या धर्मातरानंतरदेखील त्यांना इथल्या प्रदेशाशी आणि लोकव्यवहाराशी वेगळे नाते जोडावे लागले नाही. मध्य आशियाप्रमाणेच कर्कोटादि वंशाच्या काश्मिरातील हिंदू राजांनादेखील नद्यांच्या खोऱ्यातील संपन्न भूप्रदेशाचे आकर्षण होते. गेल्या लेखात पाहिल्याप्रमाणे, कनौज शहर जिंकण्यावरून चालुक्य-राष्ट्रकूट-पाल इत्यादी वंशांत झालेल्या संघर्षांच्या मालिकेत काश्मीरचा राजा ललितादित्य एक भागधारक झाला होता. कल्हणाच्या राजतरंगिणी या काश्मीरच्या इतिहासात म्हटल्याप्रमाणे हर्षदेव या काश्मिरी वंशाच्या राजाने तर मंदिर लुटून उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष अधिकारी नेमला होता आणि त्याचा उल्लेख कल्हण नमूद करतो त्यानुसार या अधिकाऱ्याला ‘तुरुष्क’ (तुर्क या शब्दासाठी वैकल्पिक शब्द असल्याचे अनेकांचे म्हणणे ) असे म्हटले जात असे. अर्थात प्रार्थनास्थळांवरील लुटींचा मक्ता केवळ मध्य आशियायी, काश्मीर आणि उपखंडाच्या वायव्येकडील राजवंशांपुरताच मर्यादित होता असे नव्हे. प्रतिहार-राष्ट्रकूट इत्यादी राजवंशांनीदेखील कनौज आणि अन्य शहरे काबीज करताना तिथल्या संपन्न भूप्रदेशातील उत्पन्नावर, संपन्न प्रार्थनास्थळांवर आणि राजकोष आणि मंदिरांतील धनकोषावर विशेष लक्ष ठेवून ते लुटल्याचे संदर्भ दिसतात. उदाहरणार्थ, राष्ट्रकूट राजा इंद्र ३रा याने प्रतिहारांचा पराभव करून झाल्यावर कल्पा येथील मंदिरातील धन आक्रमण करून लुटल्याचे दिसते. किंवा परमार राजा सुभटवर्माने चालुक्यांचा पराभव केल्यावर जैन मंदिरे आणि अरबांसाठी बांधलेल्या मशिदी पाडल्याचे संदर्भ मिळतात.
धारणांच्या धाग्यांनी बनलेले उपखंडाच्या इतिहासाचे हे पदर उलगडण्याची प्रक्रिया आपण वेदकाळापासून प्रारंभ केली. वैदिक समूहांच्या मूळ स्थानाविषयीच्या वादात अर्थात, आर्य आक्रमण-स्थलांतर वगैरे वादात न पडता आपण थोडं पुढे येऊन वायव्येकडील प्रांतात स्थिरावलेले ग्रीक-अशोकप्रणीत तत्त्वज्ञानपर शिलालेखांचे ग्रीकप्रभावित क्षेत्रातील लिप्यंतर-अनुवाद आणि त्यातून धर्म वगैरे शब्दांना मिळालेले आयाम आपण पाहिले. ग्रीक-क्षत्रप यांच्यामुळे उपखंडाच्या इतिहासाला एक वेगळे, महत्त्वपूर्ण वळण मिळाले. त्या काळात झालेल्या सामाजिक-सांस्कृतिक घुसळणीचे विस्तृत ज्ञान करवून देणारी साधने त्रोटक अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असली, तरी त्या काळात भारतवर्ष-भारतीय उपखंड एका मोठय़ा स्थित्यंतरातून गेल्याचे दिसून येते. ग्रीक पद्धतीची शिरस्त्राणे, शस्त्रे, धार्मिक कल्पना, ज्योतिष, मूर्तिरचना इत्यादींचा प्रभाव इथल्या रूढ व्यवस्थांवर पडला. या स्थित्यंतराच्या काळानंतर इसवीसनाच्या ७व्या शतकादरम्यान इथल्या अंतर्गत सत्तासंघर्षांमुळे आणि व्यापारी आणि राजकीय बस्तान बसवणाऱ्या अरब-तुर्की वंशांच्या समूहामुळे एक मोठे स्थित्यंतर उपखंडात घडून आले. अर्थात, मधल्या काळातदेखील व्यापारउदीम, राजकीय आक्रमणे आणि स्थलांतरे यांच्या माध्यमातून वेगवेगळी स्थित्यंतरे उपखंडात घडून येत होतीच. कोणताही समाज घडताना त्याला दिशा-काळाच्या प्रभावासोबतच नैसर्गिक कारणांस्तव अथवा राजकीय आर्थिक गरजांपोटी स्थान, जीवनमान, आचारविचारात येणाऱ्या परिवर्तनाला सामोरे जावेच लागते. ही परिवर्तने नेहमीच शांततापूर्ण अथवा सौहार्दयुक्त वातावरणात होत नसतात. मानवी उपजत ऊर्मीतून येणाऱ्या आकांक्षा, रागलोभईर्षांदि गुणांतून व्यक्तींचे आणि समूहांचे आपसात संघर्ष झडत राहतात.
उपखंडात तुर्की-अरबी वंशाच्या राजवंशांची सत्ता प्रस्थापित झाल्यावर सेमिटिक धर्मप्रणालीतील इस्लाम या स्थानिक धर्मप्रणालींहून अधिक साचेबद्ध आणि काटेकोरपणे नियमबद्ध केलेल्या धर्मप्रणालीला आचरणाऱ्या वंशांचे राज्य आले. हे वंशसमूह ज्या मध्य आशियातून आले, त्या व्यापारी मार्गानी युक्त असलेल्या प्रांतातील पशुपालक समाज त्यांच्या सामूहिक आर्थिक आकांक्षांपोटी लढवय्ये-युद्धखोर झाले. सप्तसिंधूंच्या संपन्न खोऱ्यात स्थिरावलेल्या पशुपालक समाजातील सुबत्तेच्या, संपन्नतेच्या मोहापायी आणि व्यापारी उद्देशापोटी त्यांनी उपखंडात प्रवेश केला आणि इथल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेत ते इथली राज्यकर्ती जमात बनले.
मानवी समाजात रुजलेल्या धारणांच्या गुंतागुंती उकलताना बहुतांश वेळा आपल्याला माहिती नसलेले, वाचनात न आलेले किंवा आपल्या वैचारिक-कौटुंबिक संस्कारांशी विसंगत असलेले, मात्र तर्काला, बुद्धीला पटणारे असे अनेक पदर आपसूक समोर येतात. वैचारिक-बौद्धिक निष्ठांच्या संदर्भात सजगता आणि विवेक जागृत ठेवणाऱ्या जिज्ञासू अभ्यासकाला हे अनवट असे आश्चर्यकारक व काहीसे अनपेक्षित (अनेकदा अप्रिय) असे वास्तवनिष्ठ पदर स्वीकारायला प्रारंभी अवघड जात असले तरी, ती वास्तवे स्वीकारून त्याद्वारे आपल्या आकलनाला आणि पर्यायाने वैश्विक-/वैचारिक दृष्टीला व्यापकता देण्याची ही प्रक्रियाच वैचारिक-प्रगल्भतेचे मापदंड ठरते. या मापदंडाच्या आधारेच बहुधा वैचारिक-अभ्यासकीय निष्ठादेखील जोखली जात असते.
पुढच्या लेखांतून समोर येणाऱ्या धाग्यांद्वारे आपल्याला आजच्या राजकीय-सांस्कृतिक आणि सामूहिक धारणा घडविणाऱ्या ऐतिहासिक घटनांच्या स्मृतींचा परामर्श घ्यायचा आहे. या धारणांच्या एकमेकांत गुंतलेल्या धाग्यांतून आजच्या भारताचा बहुरंगी नक्षीदार कशिदा आणि सोबतच त्या पटावरच्या बिघडत गेलेल्या नक्षींची वळणेदेखील तपासायची आहेत.
(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ, जर्मनी येथे पीएचडी संशोधक असून ‘ऑब्झव्र्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई’ येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)
rajopadhyehemant@gmail.com