हेमंत प्रकाश राजोपाध्ये
माणूस हा समाजशील प्राणी आहे, हे वाक्य आपण शालेय पाठय़पुस्तकातून नेहमीच वाचत असतो. ‘समाजशील’ या शब्दाचा समास-विग्रह केला असता समाजात मिसळणे, सामूहिक व्यवहारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होणे असे अर्थ आपल्याला सापडतात. माणूस म्हणून जन्माला आल्यावर कोणत्याही माणसाला स्वेच्छेने किंवा अनिच्छेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या समाजात मिसळावे लागते. तो त्या समाजाचा आणि मानवी व्यवस्थेचा एक भाग बनतो. भारतीय उपखंडात राहणाऱ्या, बाहेरून आलेल्या, स्थिरावलेल्या वेगवेगळ्या वंश-धर्म-वर्णाच्या मानवसमूहांनी वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या आकाराला आणलेल्या, रुजवलेल्या बहुविध धारणांचा आणि त्या धारणांतून संचलित झालेल्या गतिमानतेचा संक्षेपात आढावा घेत आपण ‘धारणांच्या धाग्यां’नी विणल्या गेलेल्या इतिहासपटाच्या वेगवेगळ्या घडय़ा उलगडायचे प्रयत्न करत आलो आहोत. मानवी ऊर्मीच्या आणि आकांक्षा-धारणांच्या वैयक्तिक किंवा सामूहिक अभिव्यक्तीतून मानवी समूहांच्या इतिहासाच्या या वेगवेगळ्या घडय़ा-पदर साकार होतात. या विभिन्न प्रकारच्या धारणांचे सामूहिक अनुबंध विशिष्ट धार्मिक-सांप्रदायिक-तात्त्विक-राजकीय किंवा आध्यात्मिक प्रणालीला जन्म देतात किंवा अस्तित्वात असलेल्या प्रणाली स्वीकारून त्यांना नव्या स्वरूपात समाजात पुन्हा प्रसवतात. या साऱ्या प्रक्रियेला तत्कालीन राजकीय घडामोडी आणि राजकीय-सांस्कृतिक समूहांच्या सहसंबंधांची आणि व्यापारी-अर्थकारणाची जोड असतेच. त्यातून संस्कृती व श्रद्धाव्यवस्थांची गणिते बदलत जातात. आर्थिक गरजा आणि गणिते, व्यापारस्पर्धा इत्यादींच्या माध्यमातून होणारी स्थलांतरे आणि राजकीय समीकरणे इतिहासाला नेहमीच नव्या दिशा आणि मार्ग दाखवत आली आहेत.
गेल्या भागात आपण उत्तरभारतातील गुप्त-वाकाटकादी राजकुळानंतर कृष्णा-गोदावरी-कावेरी वगैरे दक्षिणेकडील नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेल्या राज्यव्यवस्था आणि त्यांच्यातले अंत:संघर्ष यांचा आढावा घेतला. वन्य जातींतून उदयाला आलेले कालाभ्रांसारखे राजकुल, कदंब वंशाचे स्वामित्व झुगारून मोठे झालेले चालुक्य, चालुक्य राजांनी तत्कालीन हर्षवर्धन-गुर्जर-कदंब वगैरे मोठय़ा राजसत्तांचा केलेला पराभव आणि ब्राह्मणादी उच्चभ्रू जातींना दिलेल्या अग्रहार गावांचा त्यांनी केलेला विध्वंस इत्यादीचा आढावा घेतला. सातवाहन काळापासून पश्चिम आणि दक्षिण भारताच्या किनाऱ्यावरून चालणाऱ्या रोमन साम्राज्याशी मोती-वेगवेगळ्या वनस्पती-मसाले-सुगंधी द्रव्यादिकांचा व्यापाराविषयीचे संदर्भ आणि पुसट चिन्हे तत्कालीन नाणी, किनाऱ्यावर आढळणारे अवशेष इत्यादींतून आणि स्ट्राबो वगैरे ग्रीक भूगोलकार-तत्त्वज्ञांच्या लिखाणातून मिळतात. हूण टोळ्यांच्या आक्रमणादरम्यान गुप्तांचा रोमन साम्राज्याशी असलेला बलाढय़ व्यापार कोलमडून पडला होता. चालुक्य-पल्लव-चोळ-पांडय़ासारख्या राजवटींनी दक्षिणेत आपापले सत्तासंघर्ष सुरू ठेवले होते.
हुणांच्या आक्रमण काळात भारतातील बौद्ध धर्माच्या अस्तित्वाला मोठा हादरा बसल्याचे दिसते. उत्तरकालीन गुप्त राजांनी बौद्ध धर्माला आणि मठा-विद्यापीठांना आधार दिला असल्याचे पुरावे मिळत असले तरी दक्षिणेकडे पसरलेल्या बौद्ध-जैन धर्माच्या प्रभावाला याकालात ओहोटी लागल्याचे दिसते. पूर्वभारतात बुद्धांना विष्णूस्वरूप मानण्याची प्रथा बळावल्याचे पुरावेदेखील या कालात मिळतात. तामिळनाडूमध्ये कालाभ्र सत्तेने स्वीकारलेल्या जैन धर्माला दक्षिणेत ओहोटी लागून त्याचे अस्तित्व कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यंतील समूहांपुरतेच उरले होते. कर्नाटकामध्ये जैनांना पुरेसा राजकीय आधार मिळाल्याने तिथे जैन मठांना बरीचशी जमीन आणि आर्थिक शक्ती आणि राजकीय आधार मिळाल्याचे दिसते. ‘यापनीय’ या जैन संप्रदायाचे ठळक अस्तित्व कर्नाटकात दिसते. तिथल्या शैव संप्रदायांशी या जैन संघांच्या संघर्षांचे पुरावेदेखील तत्कालीन ग्रंथांतून दृष्टोत्पत्तीस पडतात. अळवार आणि नाय्नार या वैष्णव आणि शैव भक्तिसंप्रदायांच्या वाढत्या प्रभावाने बौद्ध-जैनांच्या धार्मिक प्राबल्यावर मोठा परिणाम या कालात दिसून येतो. अग्न्युपासनाप्रवण वैदिक धर्माला अभिप्रेत असलेल्या कर्मकांडकेंद्री उपासनापद्धतीहून वेगळ्या अशा शिव-विष्णूंसारख्या पौराणिक देवतास्वरूपांच्या उपासनेला या कालात अधिक महत्त्व आल्याचे दिसते. कापालिक, कालमुख, पाशुपत वगैरे शैव संप्रदाय, शाक्त-तांत्रिक उपासनासमूहांचे अस्तित्व या कालात ठळकपणे दिसून येते. अळवार-नाय्नार या समूहांच्या साहित्यात दक्षिणेतल्या बौद्ध-जैन संप्रदायांनी उठवलेल्या सामाजिक समस्यांविरोधातील मतांचे प्रतििबब दिसून येते.
इस्लामच्या स्थापनेनंतर काही वर्षांतच केरळमध्ये इस्लाम धर्माचा प्रवेश झाल्याचे आपण गेल्या भागात पाहिले. रोमन साम्राज्याशी होणाऱ्या व्यापारात अरब प्रदेशातील व्यापाऱ्यांची भूमिका इस्लामपूर्वकाळापासून महत्त्वपूर्ण होती. इस्लामचे भारताच्या भूमीवरील पहिले पाऊल हे अरब व्यापाऱ्यांच्या दक्षिणेतील प्रभावी व्यापारी अस्तित्वाच्या आधारे पडले हे आपण पाहिले. इसवीसनाच्या ८ व्या शतकाच्या आधीच पश्चिम भारतात अरब आक्रमकांचा प्रभाव वाढत असलेला दिसून येतो. रोमनांच्या अस्तानंतर प्रबळ झालेल्या अरबांनी आफ्रिका आणि युरोपात आपले राजकीय अस्तित्व बसवत असतानाच उपखंडाच्या पश्चिम सीमावर्ती भागापर्यंत त्यांची राजकीय आणि आर्थिक सत्ता येऊन ठेपली होती. पश्चिम आणि दक्षिण किनाऱ्यावरील व्यापारी मार्ग काबीज करून दक्षिण आशियायी व्यापारावर अधिसत्ता निर्माण करणे हा या अरबी आक्रमणांचा मुख्य हेतू होता हे स्पष्ट दिसून येतं. राष्ट्रकुट राजांनी अरबांच्या सागरी व्यापारी कौशल्यांना आणि सागरी मार्गावरील प्रभुत्वाला लक्षात घेत गुजरातेच्या किनारी प्रदेशात मोठय़ा अधिकारपदांवर अरबी अधिकारी नेमले होते. चालुक्यांना सागरी सत्ता आणि व्यापारातील अरबांच्या प्राबल्याचे भान असल्याने व्यापारी फायदे लक्षात घेत अरबांच्या व्यापाराला मोठय़ा प्रमाणावर उत्तेजन दिले. या कालात राष्ट्रकुट सत्तेला दख्खनेकडची राज्ये आणि आणि उत्तरेकडील कनौज वगैरे राजसत्तांकडून मिळत असलेली राजकीय आव्हाने आणि आक्रमणाचे भय होते. मध्य आशिया-आफ्रिका आणि युरोपात अरबांच्या वाढत्या साम्राज्यविस्ताराची राष्ट्रकुट-चालुक्यांना पुसट माहिती होती हे गृहीत धरले तरीही पश्चिम भारतातले प्रतिहार, पूर्वेकडे असलेले पाल निकटवर्तीय पारंपरिक शत्रूसत्तांकडून येणाऱ्या राजकीय आव्हानांकडे अधिक लक्ष देणे ही या राजकुलांची अपरिहार्यता असावी, असे म्हणावे लागते. पूर्वेकडच्या पाल राजसत्तेलादेखील कनौजशी सत्तासंघर्ष करावा लागल्याचे दिसते. आसामातून ब्रह्मदेशाकडे (म्यानमार) जाणारे व्यापारी मार्ग पालांनी काबीज केले होते. प्रतिहारांचा अंकित असलेल्या कनौजच्या राजाला धूळ चारून राष्ट्रकुट-प्रतिहारांसमोर पालांचे मोठे आव्हान धर्मपाल या राजाने उभे केले होते. पाल राजकुलाच्या वाढत्या प्रभावाला स्थानिक कैवर्तक समूहांनी आव्हान दिले होते. कनौजवर सत्ता मिळवण्यासाठी पाल-राष्ट्रकुट आणि प्रतिहार या राजकुलांच्या संघर्षांदरम्यान दोन्ही कुलातील युद्धखोरीचे वर्णन अरब प्रवासी मसूद याने करून ठेवले आहे. या तीन प्रबळ राजकुलांचा हा सत्तासंघर्ष तिन्ही कुळांसाठी आत्मघातकी ठरला. पालांनी गुर्जर-प्रतिहारांचे राज्य खिळखिळे करून सोडल्यावर चंदेल, तोमर, कलचुरी ही मांडलिक घराणी स्वतंत्र झाली, आणि पुढे गझनीचा सुलतान महमूद याने प्रतिहार राजा राजपाल याचा प्रभाव करून त्याला पळवून लावले. चंदेल घराण्याचा राजा विद्याधर याने राजपाल या राजाची हत्या करवली. चोल-पांडय़ या दाक्षिणात्य सत्तांनी पाल राज्यावर आक्रमणे करून संघर्ष आरंभला होता. पुढे सेन घराण्याने पाल साम्राज्याचा अंत करून आपले राज्य प्रस्थापित केले व अवघ्या शतकभरात सेन घराण्याचा खिलजी सुलतानांनी अस्त घडवून पूर्वेकडील राज्यात बंगालात आपले बस्तान बसवले.
६ व्या शतकापासून १०-११ व्या शतकातल्या या साऱ्या नाटय़मय राजकीय घडामोडी पाहाता हा काळ उपखंडाच्या इतिहासातील एका मोठय़ा स्थित्यंतराचा काळ असल्याचं दिसून येतं. हुणांच्या आक्रमणामुळे खिळखिळे झालेले गुप्त साम्राज्य, त्यातून बाहेर पडून स्वातंत्र्य घोषित करणाऱ्या राजसत्ता, त्यांचे आपसातले सत्तासंघर्ष आणि व्यापारी मार्ग-केंद्रांवर सत्ता मिळवण्यासाठीच्या आकांक्षा अशा साऱ्या प्रक्रियांतून गुप्त किंवा वाकाटकांसारखा केंद्रीय एकछत्री अंमल उपखंडावर कुणी राजा अगर राजकुल बसवू शकले नाही. हुणांच्या आक्रमणातून वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक स्थित्यंतरे उपखंडात घडून आली. इथे स्थिरावलेल्या हूण समूहांतूनच पुढे राजपूत वंशाच्या रूपात महत्त्वाचा राजकीय-सामाजिक जात-घटक म्हणून आकाराला आला. दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर अरबी व्यापारी समूहाचे आर्थिक प्राबल्य वाढत गेले. याच काळात तुर्की-अरबी वंशांनी वायव्येकडील प्रांतात आणि मध्य आशियात राजकीय आणि सांस्कृतिक बस्तान बसवायला सुरुवात केली होती. अरबस्तान आणि तुर्कस्तानात सुरू असलेल्या राजकीय-सांस्कृतिक-ज्ञानशाखीय प्रगतीमुळे अरबी-तुर्की राजसत्तांना जगातील घडामोडींचे भान अधिक होते. उपखंडातल्या बलशाली राजसमूहांच्या आंतरिक संघर्षांचा वायव्य आणि मध्य आशियातून संपत्तीच्या आकांक्षेपायी आक्रमण करणाऱ्या समूहांना फायदाच झाला. वायव्येकडून होणाऱ्या राजकीय आक्रमणाच्या इतिहासाची मीमांसा आणि त्याचे दूरगामी परिणाम उपखंडाच्या आणि पर्यायाने विद्यमान भारताच्या सांस्कृतिक-राजकीय संभाषितांवर घडून आल्याचे आपण आज अनुभवतो आहोत. वासाहतिक काळात युरोपीय सत्तांच्या काळात इतिहासलेखनाच्या नव्या पद्धती त्यांनी उपखंडात रुजवल्या. इतिहासलेखन अथवा भूतकालातील घटनांच्या नोंदींचे संकलन ही एक राजकीय कृती असते. त्या त्या काळाच्या संदर्भातील विवक्षित परिस्थिती-राजकीय गरजा आणि संबंधित लेखकाच्या/लेखकाच्या आश्रयदात्याच्या इतर संकीर्ण सांस्कृतिक-राजकीय-तात्त्विक प्रेरणांच्या अनुषंगाने ते संकलन किंवा इतिहासलेखन केले जाते. पाश्चात्त्य वसाहतवादी समूहांतील अभ्यासकांनी-अधिकाऱ्यांनी युरोपीय ज्ञानव्यवस्थेनुसार एतद्देशीय समाजात रुजवलेल्या शैक्षणिकव्यवस्था आणि संशोधनपद्धतींतून ससंदर्भ-काटेकोर इतिहास-समाजशास्त्रादी विषयांच्या अभ्यासचौकटी प्रमाणित झाल्या. युरोपात उदय पावलेल्या राष्ट्रराज्य या राजकीय प्रणालीचा आणि रिलिजन या तुलनेने अधिक एकसाची आणि संघटित श्रद्धाव्यवस्थेचा संसर्ग झाल्यावर निर्माण झालेल्या ज्ञानव्यवस्था, राजकीय तत्त्वज्ञानप्रणाली आणि सांस्कृतिक अभिसरणाच्या प्रक्रिया यांच्या गतिमानतेतून आपल्या आजच्या राजकीय-सांस्कृतिक-सामाजिक धारणा आणि व्यवस्था आकाराला आल्या आहेत. त्या गतिमान प्रक्रियांच्या आकलनासाठी मध्ययुगीन इतिहासातील या स्थित्यंतरांचा इतिहास आणि त्यामागचे अर्थकारण-संस्कृतीकारण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पुढील भागांतून आपण या मध्ययुगीन राजकीय घडामोडी, त्यांचे एतद्देशीय धार्मिक व्यवस्था-धारणांवर झालेले परिणाम आणि या साऱ्या समूहाचे संघर्ष आणि साहचर्य याविषयी चर्चा करणार आहोत. अतिशय गुंतागुंतीचे आणि बहुरंगी असे ‘धारणांच्या धाग्यां’चे हे पदर जटिल असले तरी त्यांच्या उकलीतून मानवी समूहांच्या इतिहासाची वळणे लक्षात येतात. वेगवेगळ्या समूहांच्या परस्पर संपर्काच्या आणि साहचर्याच्या प्रक्रियांचे हे गतिमान आकृतिबंध मानव्याचे सारे भलेबुरे कंगोरे आपल्या समोर ठेवतात. त्यातूनच आपल्या सामूहिक अस्तित्वाला आणि समाजमनाला उदारमनस्कता आणि सहिष्णुता यांसारख्या मूल्यांचे महत्त्व लक्षात येते.
(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ जर्मनी येथे पीएचडी संशोधक असून ऑब्झव्र्हर रीसर्च फाउंडेशन येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)
rajopadhyehemant@gmail.com