हेमंत प्रकाश राजोपाध्ये

मानवी इतिहासाचा अभ्यास करताना देश, काळ, राजवट, भाषिक अधिसत्ता, सांस्कृतिक चौकटी असे वेगवेगळे निकष आणि मापदंड लावून ऐतिहासिक काळाची विभागणी केली जाते. या वेगवेगळ्या काळात आकाराला येणाऱ्या संकल्पना, धारणा आणि त्या धारणांविषयीच्या धारणांमध्ये होत जाणारे परिवर्तन आणि त्यातून निर्माण होणारी वेगवेगळी सांस्कृतिक विश्व, ज्ञानशाखा त्या शाखांचे वेगवेगळ्या काळात होणारे उपयोजन आणि आकलन, इत्यादीविषयी आपण चर्चा करत इथवर आलो आहोत. ही धारणांच्या विकसनाची प्रक्रिया एकरेषीय नसून बहुरेषीय, बहुस्तरीय गुंतागुंतींनी युक्त असल्याचे आपण वेगवेगळी उदाहरणे लक्षात घेत पाहिलं. आदिम समाजात निर्माण झालेले सामाजिक नीतिनियम, मूल्यप्रणाली आणि पारलौकिक शक्ती, ईश्वरविषयक संकल्पना यांचा मेळ साधून समाजधारणा करणारे ‘धर्म’ आपण थोडक्यात विचारात घेतले. समाजधारणेच्या प्रक्रियेतून आकाराला आलेल्या राजव्यवस्था व राजनीतिशास्त्रातील धारणा पाहताना आपण हिंसा-अिहसादी मूल्ये, त्यांविषयीचा राजकीय विवेक आपण वेगवेगळे ऐतिहासिक संदर्भ आणि उदाहरणांच्या आधारे जोखला. बुद्धासारखे तत्त्वज्ञ, अशोकासारखे आदर्श राजे, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये आणि यांतून आकाराला येणाऱ्या सामाजिक प्रणालींविषयीच्या चच्रेतून पुढे जात आपण प्राचीन काळातून मध्ययुगाकडे वळणार आहोत.

कौटिल्य-कामंदाकादि राजनीतिशास्त्रज्ञांनी प्रतिपादित केलेल्या राजनीतिशास्त्राचा विचार करताना काही ठळक मुद्दे समोर येतात. ते असे की, राजनीती हे शास्त्र/व्यवस्था समाजव्यवस्थेच्या नियमनासाठी बनले असले तरी त्या व्यवस्थेचे नियमन करण्याची-पर्यायाने-त्या व्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याची इच्छा प्रत्येक मनुष्याला असते. आणि म्हणून पृथ्वीच्या (राज्य) लाभासाठी, प्रजेच्या-समूहांच्या पालनाचे हक्क मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी सारे प्रयत्न करणे, प्रसंगी दंडनीती, कपट, इत्यादी मूल्ये आचरणे राजनीतिज्ञ चूक मानत नाहीत. याच अनुषंगाने राजनीतीच्या पालनासोबतच अनेक राजपुत्र, मंत्री-सेनापती, राजपत्नी इत्यादी मंडळींनी राजासोबत केलेल्या कपट-कारस्थानांची उदाहरणे देत राजनीतिकारांनी राजनीतीचा इतिहास सांगत राजपदावरील व्यक्तीला जागरूक राहाण्याविषयी सूचना केलेल्या आपण पाहिले. मौर्य-गुप्त-शुंग वगैरे महत्त्वाच्या प्रबळ राजकुळांनी उपखंडाच्या प्राचीन इतिहासावर अधिराज्य केलेलं दिसतं. वेगवेगळे शिलालेख, अलाहाबाद प्रशस्तीसारख्या राजप्रशस्ती, नाणी आणि अन्य भौतिक अवशेष या काळाची साक्ष देतात.

या प्रबळ राजकीय सत्तांच्या आणि त्यांच्या उत्तराधिकारी राजकुळांच्या शासनकालानंतर उपखंडाच्या राजकीय भूगोलाची व्याप्ती दक्षिण दिशेच्या दिशेने, नर्मदेच्या खाली दख्खनचे पठार आणि तुंगभद्रा-कावेरीसारख्या नद्यांच्या खोऱ्यापर्यंत (आणि त्याच्याही पुढे आग्नेय आशियापर्यंत) वाढत गेलेली दिसते. या राजकीय घडामोडी तिथल्या स्थानिक सांस्कृतिक अनुबंधांच्या पटावर उत्तरेकडील शासन व्यवस्था, तिथून वेगवेगळ्या काळात झालेली स्थलांतरे व भाषिक-सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या जटिल प्रक्रियांच्या धर्तीवर लक्षणीय ठरतात. तमिळसारखी अतिप्राचीन भाषा आणि दक्षिणी संस्कृती उत्तरेकडील वैदिक-जैन-बौद्ध विचारप्रणाली आणि संस्कृतिव्यवस्था यांच्या मिलाफातून दख्खन आणि कावेरी, तुंगभद्रा, कृष्णा-गोदावरीच्या खोऱ्यांतून हा इतिहास आकाराला आला. त्यातून उपखंडाच्या इतिहासाला आणखी नवे आयाम मिळाले. ‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करत काहीशा संवेदनशील अशा पुढच्या टप्प्यात झेपावताना, मध्ययुगात प्रवेश करण्यासाठी हा कालखंड भक्कम पायरीसारखा किंवा सेतूसारखा उपयुक्त ठरणार आहे.

गुप्त घराण्याच्या राजवटीच्या काळात वाकाटकांचे प्रबळ राज्य विदर्भ- मध्य भारताच्या प्रदेशात सक्षमरीत्या पाय रोवून उभे होते. गुप्त राजकुलातील चंद्रगुप्त (दुसरा) या महापराक्रमी राजाची पुत्री प्रभावतीगुप्ता या वाकाटक कुळातील रुद्रसेन (द्वितीय) याची पत्नी होती. यावरून वाकाटक राज्याचे राजकीय वजन आणि महत्त्व आपल्याला लक्षात येते. या प्रभावतीगुप्ताच्या विवाहानंतर गुप्तांच्या दरबारी असलेला महाकवी कालिदास दक्षिणेत वाकाटकांच्या दरबारी आला. त्याच्या ‘अभिज्ञान शाकुंतला’च्या सुप्रसिद्ध चौथ्या अंकातील शकुंतलेला पतिगृही पाठवण्याच्या हृद्य प्रसंगाचा संबंध या विवाहाशी जोडायचा प्रयत्न अनेकांनी केलेला दिसतो. बहुधा विदर्भात वाकाटकांकडे आल्यावरच (नागपूर येथील रामटेकच्या टेकडीवर) त्याने ‘मेघदूत’ हे महाकाव्य  लिहिले असावे.

वाकाटकांच्या राजवटीच्या अंतिम चरणादरम्यान कधीतरी दक्षिणेकडच्या बदामीकडील चालुक्यांसारख्या कुळांचे राजकीय सामर्थ्य वाढीस लागले. चालुक्यांप्रमाणेच कदंब, गंग इत्यादी राजाकुलांनी या कालात आपल्या राज्यांची स्थापना/ विस्तार केला. आणखी दक्षिणेकडे चेर, चोळ, पांड्य आणि कलभ्र ही राजकुले आकाराला आली. पकी कलभ्र कुल हे पर्वतीय भागातील वन्यसमाजातून उदयाला आले आणि त्यांनी बौद्ध-जैनादी धर्मप्रणालीला विशेष उत्तेजन दिले. दख्खनच्या पठारावरील राज्यांपैकी काही कुळे ब्राह्म-क्षात्र कुळे (ब्राह्मणकुलीन असून क्षात्रधर्म आचरणारे/ मिश्रधर्मी) होती. कोकणावर अधिराज्य गाजवणाऱ्या कदंब कुळाचे मांडलिक असलेले चालुक्य नंतर प्रबळ होऊन त्यांनी आपला प्रभाव वाढवला. ऐहोळे येथील चालुक्यराज द्वितीय पुलकेशी याच्या शिलालेखात चालुक्यांनी उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील छोटय़ा-मोठय़ा सत्ताधीशांची राज्ये आक्रमक पराजित केल्याचे संदर्भ दिसतात. कदंब राजवंशाला चिरडल्याचे, हर्षवर्धनासारख्या प्रबळ, शक्तिशाली राजाला धडकी भरवत नेस्तनाबूत केल्याचे, लाट-मालव-गुर्जरादिकांना चिरडत धूळ चारल्याचे, वैदिक ब्राह्मणांना अग्रहार म्हणून दिले गेलेल्या पिष्टपूर शहराचे (आजचे दत्त संप्रदायाचे महत्त्वाचे केंद्र असलेले पीठापूर) जात्यात धान्य चिरडावे तसे पिष्ट केल्याचे, पल्लवांना पराभूत केल्याचे उल्लेख अतिशय अभिमानाने चालुक्य राजांच्या पदरीचे कवी करतात. अर्थात राजकीय संघर्षांना प्रतिशोधाची झालरदेखील दिसून येते. पल्लव कुळाच्या पराजयाचे उट्टे काढण्यासाठी पल्लव राज नरसिंह वर्मा याने वातापी (बदामी) शहर जिंकून वातापीकोंड (वातापीभंजक) असे बिरूद मिरवले.

या संघर्षमय काळातच केरळामध्ये पेरियार नदीच्या लगतच्या प्रदेशात वैदिक ब्राह्मण समूहांचे लक्षणीय अस्तित्व वाढीला लागल्याचे दिसू लागते. तिथल्या स्थानिक अधिकार- पदावरील उच्चभ्रू जातसमूहांशी या वैदिक समूहांचे आलेले संबंध, जमिनीच्या वहिवाटीचे हक्क, त्यातून आकाराला आलेले संस्कृतीकरणाचे प्रवाह आणि संस्कृतीकृत झालेल्या नायर वगैरे जाती इत्यादी घडामोडी दक्षिणेकडील समाजकारणाला आकार देऊ लागल्या. तिथल्या अर्थकारणाचा गाभा हा प्रकर्षांने सागरी व्यापारावर आणि त्यानिमित्ताने ये-जा करणाऱ्या वेगवेगळ्या समूहांशी आलेल्या संबंधांतून स्वाभाविकत: घडत गेला. याच काळात रोमन व्यापाऱ्यांचे या वाणिज्य व्यवहारांतील अनेक शतकांचे महत्त्व या काळात काहीसे कमी होऊन अरब व्यापाऱ्यांनी आपले पाय या पश्चिम किनाऱ्यावरील व्यापारात दृढ रोवले. या काळातच अरबस्तानात इस्लामचा प्रचार-प्रसार झाला असल्याने इस्लामी धर्ममत भारतात प्रथमत: याच माध्यमातून प्रवेशिते झाले. याकाळात पश्चिम किनाऱ्याच्या विस्तृत भूभागावर स्थिरावलेल्या, स्थायिक झालेल्या या अरबी समूहांच्या सांस्कृतिक जीवनात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक सांस्कृतिक-धार्मिक परंपरा-भाषांचा शिरकाव झाला. दक्षिण आणि पश्चिम भारतात व्यापारानिमित्ताने येऊन राहणाऱ्या-स्थिरावणाऱ्या किंवा ये-जा करणाऱ्या अरब समूहांचा मुख्य उद्देश व्यापार हाच असल्याने त्यांनी या प्रदेशात राजकीय सत्तास्थापनेच्या उद्योगांत फारसा रस दाखवला नाही. उलट कर्मठ-सनातनी इस्लामी मतप्रवाहाला अमान्य ठरतील अशा अनेकानेक स्थानिक लोकरीती या समूहांच्या लोकजीवनात शिरकाव करत्या झाल्या. मोपले, बोहरा, नवायत यांसारख्या पश्चिम-दक्षिण किनाऱ्यावरील मुस्लीम जनसमूहांच्या लोकजीवनात-सांस्कृतिक विश्वात उपखंडातील (विशेषत: दक्षिण-पश्चिम भारतातील लोकरीतींद्वारे शिरलेली) विविधता ठळकपणे दिसून येते.

गेल्या भागांत चर्चा केल्याप्रमाणे कौटिलीय आणि कामंदकीय राजनीतीशास्त्रांसारख्या प्रणालींना अनुरूप अशी शासनव्यवस्था आर्यावर्तात- उपखंडाच्या उत्तरेत आकाराला आली. वेगवेगळ्या राजकुलांनी कौटिल्यादि आचार्यानी आखून दिलेल्या चौकटींत राहत, काळ/आवश्यकतेनुसार त्यातील कूटनीतीचा बिनदिक्कत वापर करत युद्धे-कपटनीतिद्वारे आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. प्रसंगी विविध राजकुलांशी विवाहादि संबंधांद्वारे राजकीय-कौटुंबिक संबंध जोडले. अनेक महाकुलांचा, महानगरांचा विध्वंस केला. धर्म-श्रद्धा इत्यादी व्यूहांच्या सीमा राखत, कधी ओलांडत कौटिल्याने सांगितल्यानुसार त्या श्रद्धांचा वापर करत राजनीतिधर्माचे पालन केले. दक्षिणेकडच्या महाबलीपूर वगैरे ठिकाणच्या लेण्या-मंदिरांतून शैव-वैष्णव आचार्याच्या हिंसक संघर्षांचे चित्रण करणारी शिल्पे या धार्मिक-राजकीय संघर्षांची निदर्शक आहेत. एखाद्या शहराचे पीठ करणे, एखाद्या शहराला चिरडून टाकत भयकेंद्री प्रभावातून राज्यविस्तार-स्थापना करणे अशा अनेक सरंजामी वृत्तींचे दर्शन जागतिक इतिहासात सर्वत्र दिसून येते. प्राचीन-मध्ययुगीन इतिहासातील सरंजामी व्यवस्था आणि त्यांचे प्रभाव त्याकाळाप्रमाणे आपल्या आजच्या वर्तमानावरदेखील प्रभाव टिकवून आहेत.

‘धारणांच्या धाग्यां’चे हे पदर आदर्शवादी इतिहासरंजनासोबतच वास्तववादी मानवी उर्मी-वृत्तींचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवण्यास साहाय्यभूत होतात. या भूतकाळातील वास्तवांना समजून घेत, त्यांचा मानव्याच्या पातळीवर स्वीकार करण्यातूनच मानवी समाजाच्या व्यापक, समावेशक उत्कर्षांच्या आणि वर्तमान व भविष्यकालीन प्रवासाच्या दिशा आपल्याला मिळत असतात. इतिहासातील वास्तवांना नाकारत त्यांचे अतिरेकी अवमूल्यन किंवा गौरव केल्याने वर्तमान आणि भविष्यकालीन वाटचालीवर यथायोग्य वस्तुनिष्ठ परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत. हे भान ठेवत, भूतकाळाचे विवेकनिष्ठ, वस्तुनिष्ठ आकलन करून घेत उपखंडातील इतिहासाचे वेगवेगळे पदर उलगडत आपल्याला धारणांचे आणखी धागे उकलायचे, हाताळायचे आहेत.

(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ जर्मनी येथे पीएचडी संशोधक असून ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहे.)

rajopadhyehemant@gmail.com