हेमंत प्रकाश राजोपाध्ये rajopadhyehemant@gmail.com
‘‘भारताकडे त्रयस्थपणे आणि चिकित्सकतेने पाहणाऱ्या कुणाही तटस्थ निरीक्षक-अभ्यासकाला इथल्या दोन लक्षणीय, मात्र परस्परविरोधी अशा गोष्टी एकाच वेळी स्तिमित करतील. त्या म्हणजे- एकता आणि विविधता! या दोन्ही वैशिष्टय़ांच्या न संपणाऱ्या अभिव्यक्ती विरूप- परस्परभिन्न अशाच आहेत. आफ्रिका किंवा चीनच्या युन्नान वगैरे प्रांतांत असे परस्परविरोधी वैविध्य दिसून येतं खरं; परंतु भारतात हे वैविध्य सलग तीन सहस्र वर्ष किंवा त्याहून अधिक काळ दिसून येतं. भारतातल्या या संस्कृतीची सलगता किंवा सातत्य हेच भारताचे मुख्य वैशिष्टय़ आहे.’’
– हे उद्गार आहेत भारतीय इतिहासाचे भीष्माचार्य किंवा जनक म्हणून ओळखले जाणारे दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे! कोसंबींचं हे चिंतन व त्यांना अभिप्रेत असलेली सातत्याची कल्पना पाहता- उपखंडातील प्राचीन, आदिम मृगया-शिकारप्रवण समूहांपासून आधुनिक, तंत्रज्ञानदृष्टय़ा प्रगत असलेल्या समूहांपर्यंत विस्तारलेला एक मोठा सामाजिक पटच निर्माण होतो. या पटावर असलेले सारेच समूह एकाच वेळी प्राचीन परंपरा, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञानप्रवण विश्वातील जीवनपद्धती यांचा मेळ घालत आज जगत आहेत, हे आपल्याला दिसून येतं. थोडक्यात, कोसंबींच्या म्हणण्याचा अर्थ असा की, वेगवेगळ्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांनी युक्त आणि अत्यंत जटिल अशा सामाजिक व्यवस्थांच्या धबडग्याला खांद्यावर वाहणारे इथले समूह वेगवेगळ्या काळातील सांस्कृतिक-सामाजिक धारणांना पुनरुज्जीवित करत असतात आणि त्यांच्या कल्पनेनुसार त्याचे पालन करू पाहत असतात. कोसंबींना अभिप्रेत असलेले हे सातत्य आणि वेगवेगळ्या भूतकाळांतील धारणांना पुनरुज्जीवित करण्याची ऊर्मी आपल्या आधुनिक काळातील सांस्कृतिक धारणांतून आणि वेगवेगळ्या स्तरांतून प्रसृत होणाऱ्या राजकीय-सांस्कृतिक-साहित्यिक मांडणीतून अभिव्यक्त होताना दिसते.
या जटिल धारणा आणि त्यांची बहुस्तरीय घडण चाचपण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न आपण ‘धारणांचे धागें’च्या माध्यमातून करतो आहोत. वेगवेगळ्या काळांत घडणाऱ्या राजकीय-सांस्कृतिक घडामोडींविषयीच्या स्मृतींची नोंद करणाऱ्यांनी साहित्यिक अभिव्यक्तीच्या चौकटीत प्राचीन सामाजिक-सांस्कृतिक वर्तुळात आकाराला आलेल्या देव-असुर, आपला-परका या कल्पनांचा अध्यारोप तत्कालीन समूह, समूहप्रमुख आणि घडामोडींच्या बाबतीत सातत्याने केलेला दिसतो. या साहित्यिक कृती मौखिक आणि लिखित माध्यमांतून हस्तांतरित होत उपखंडातील समाजात सखोल रुजल्या. त्यांचा परिणाम सामाजिक मानसिकतेवर इतका सखोल झाला, की विशिष्ट स्थानिक पातळीवरील किंवा वैयक्तिक पातळीवरील घडामोडी वा घटनांनादेखील त्या पौराणिक-सांस्कृतिक चौकटींतून पाहण्याची पद्धतच समाजात रूढ झाली! त्यातूनच ‘आपला-परका’ अशा द्वैतातून जन्माला आलेले संघर्ष किंवा उत्तरकालीन स्मृतीदेखील देव-दैत्यादिक प्रतिमांतूनच अभिव्यक्त होऊ लागले. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे, आधुनिक काळात उपखंडाचे धर्माच्या आधारावर राष्ट्र-राज्यांच्या (नेशन-स्टेट) चौकटीत राजकीय विभाजन होऊन निर्माण झालेल्या ‘राष्ट्रीय अस्मिता’ आणि त्यातून घडवल्या गेलेल्या ‘सांस्कृतिक धारणा’ एका व्यापक अशा ‘आयडेंटिटी क्रायसिस’ला कारण ठरल्या. फाळणीच्या कटू, रक्तरंजित स्मृतींतून आकाराला आलेल्या अस्मिता आणि वैराच्या कल्पना ‘भारत’ व ‘पाकिस्तान’ या दोन राष्ट्रांच्या निर्मितीमागील तत्त्वज्ञानांशी तादात्म्य पावल्या आणि उपखंडात राष्ट्रवादाच्या एतद्देशीय घडणीच्या कल्पना आकाराला आल्या.
या जटिल चौकटींचे पृथक्करण केले असता समोर येणारी महत्त्वाची वैशिष्टय़े लक्षात घ्यायला हवीत :
१) एखाद्या विशिष्ट राज्यकर्त्यांच्या वा राजघराण्याच्या किंवा वर्गाच्या राजकीय कारकीर्दीला भारताचा इतिहास मानण्याची पद्धत इथल्या इतिहासलेखकांच्या लिखाणातून रुजलेली दिसते. त्या-त्या राजघराण्याच्या वा समाजात प्रबळ झालेल्या श्रद्धाविश्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘धर्म’ (रिलिजन) या चौकटीला संबंधित काळाचे विशेषण म्हणून वापरायची पद्धतही याचेच द्योतक आहे. उदा. ‘मौर्यकालीन/ शुंगकालीन भारत’ किंवा ‘वैदिक/ वेदकालीन भारत’, ‘बौद्धकाळ’, ‘मुस्लीम भारत’ आदी.
२) विशिष्ट धर्म, रिलिजन, जातसमूह, संस्कृतीविश्व यांच्याविषयीच्या ऐतिहासिक धारणांना एकसाची स्वरूपात मांडण्याची आणि त्यानुसार तत्कालीन समाज वा भूभागाविषयीच्या धारणांना रंगवण्याची पद्धत इतिहासकारांच्या सर्वच प्रवाहांतून दिसून येते.
इतिहासाची मांडणी करताना वर निर्देश केलेली विशेषणे सल पद्धतीने वापरणे काहीसे एकसुरी आणि अवस्तुनिष्ठ ठरते. मात्र, संबंधित इतिहासविषयांचा आढावा घेताना देश-काळांची, आर्थिक- सामाजिक अनुबंधांच्या जटिलतेची पृष्ठभूमी लक्षात घेतली, की त्यांना एकसुरी किंवा अवस्तुनिष्ठ म्हणण्यामागचे कारण सहज समोर येते. यापैकी ‘हिंदू’ शब्दाची व्युत्पत्ती आणि त्यातील जटिलता आपण याआधी संक्षेपात पाहिल्यामुळे मासल्यादाखल आपण भारतीय इतिहासाची काही विशेषणे आणि त्यातील जटिलता लक्षात घेऊ.
मौर्य राजकुलाचा विचार केला असता चंद्रगुप्त हा त्या कुळातील पहिला शासक! चंद्रगुप्त याच्याविषयीच्या पारंपरिक धारणांनुसार तो चाणक्य-विष्णुगुप्त या तक्षशिलेतील ब्राह्मण आचार्याचा पशुपालक अथवा तथाकथित निम्न जातिवर्गात जन्मलेला शिष्य. जवळजवळ पूर्ण उपखंडावर राजकीय प्रभाव प्रस्थापित करणाऱ्या चंद्रगुप्ताने उत्तरायुष्यात जैन धर्माचा स्वीकार केला. त्याच्या मुलाने- बिंदुसारने वैदिकेतर श्रमण परंपरांचा, विशेषत: ‘आजीविक’ या श्रमणसंप्रदायाचा अनुनय केल्याचे दिसते. बौद्ध परंपरांतील ग्रंथांत त्याच्या मुलाने- सम्राट अशोकाने (पूर्वायुष्यात) आजीविक संप्रदायातील १८ हजार साधकांचे शिरकाण केल्याच्या नोंदी आढळतात. पुढे शांततेचा पाईक झालेल्या अशोकाने बौद्ध आणि ब्राह्मणांसोबत आजीविकांना अभयपूर्वक साहाय्य केल्याचे संदर्भही मिळतात. अशोकाच्या काळात त्याने धर्मदूत पाठवून संचलित केलेल्या धर्मप्रसाराच्या मोहिमा आणि स्तूपांचा विस्तीर्ण भौगोलिक अवकाशाच्या पृष्ठभूमीवर, भारताला ‘बुद्धिस्ट इंडिया’ असे विशेषण ऱ्हीस डेव्हिडसारख्या नामवंत अभ्यासकांनी दिले आहे.
मध्ययुगीन काळात इस्लामचा उपखंडातील प्रवेश आणि इस्लामधर्मीय राजवटींच्या स्थापनेचा इतिहास याविषयी याआधी संक्षेपात मीमांसा आपण पाहिली. मात्र, इस्लाम वा इस्लामी राजवटी यांच्या इतिहासाविषयीच्या उपखंडात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजांतील सर्वसाधारण धारणा फारशा वेगळ्या नाहीत. ‘अरबस्तानातून उपखंडात आलेला इस्लाम हा अपरिवर्तित अशा एकसाची चौकटीत कायम राहिला’- या गृहीतकाने उपखंडातील इस्लाम-धर्मप्रणालीत वारंवार झालेले बदल आणि स्थानिक परंपरांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या वैविध्यपूर्ण परंपरा व बहुपेडित्वाला झाकोळून टाकल्याचं जाणवतं. अरबस्तानातून केरळमाग्रे, मध्य आशियामाग्रे किंवा इराणमाग्रे अशा तीन मार्गानी प्रवास करून आलेला इस्लाम अरबस्तानातील इस्लामपेक्षा त्या मार्गातील सांस्कृतिक संचिताचे प्रभाव घेऊन भारतात प्रवेशता झाला. या वेगवेगळ्या मार्गात असलेल्या प्रथा-परंपरांचा मोठा प्रभाव अरब प्रदेशातून प्रसृत झालेल्या इस्लामवर पडत गेलाच; शिवाय ते सारं सांस्कृतिक संचित घेऊन उपखंडामध्ये प्रवेशल्यावर इथल्या प्रथा-परंपरांनी त्या साऱ्या संचितालाही पूर्णत: देशी स्वरूप प्राप्त करवून दिले. त्यामुळेच मुहम्मद बिन कासीमला अभिप्रेत असलेला इस्लाम हा अला-उद्-दिन खिलजीला अभिप्रेत असलेल्या इस्लामहून पूर्णत: विभिन्न होता. तर खिलजीचा इस्लाम हा घौरीच्या किंवा सम्राट अकबराच्या वा औरंगजेबाच्या इस्लामहून पूर्णत: विभिन्न होता. १८५७ सालच्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या मुघलांच्या वारसाला अभिप्रेत असलेल्या, तो आचरत असलेल्या इस्लामी जीवनशैलीची प्रकृती ही आधुनिकपूर्व काळातील उपखंडातल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक- आर्थिक- राजकीय घडामोडींच्या प्रभावातून साकारली होती.
आपण वर पाहिलं त्यानुसार, भारतीय इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांना त्या काळातील राजकुळे आणि त्यांचे धर्म यांची विशेषणे लावून संबोधले जाते. त्यांच्याविषयीच्या साहित्यिक कृतींतून वर्णित अशा संस्कृतीला ‘अभिजनत्व’ बहाल केले जाऊन संबंधित अस्मितांचे भागधारक त्या जीवनशैलीला प्रमाणित करतात. मात्र राजकुलांचा इतिहास आणि सामान्य माणसांची जीवनशैली कायमच विसंगत आणि टोकाची भिन्न राहिलेली आपल्याला आजही दिसून येते. तत्कालीन राजकुलाच्या भाटांनी आणि चरित्रकारांनी प्रदान केलेल्या अभिजनत्वाशी सामान्य जीवनशैलीचा फारसा संबंधदेखील नसतो. मात्र, एम. एन. श्रीनिवास यांच्या ‘संस्कृतायझेशन’ या सिद्धांताची व्याप्ती वाढवली असता हे लक्षात येईल, की बहुतांश राजकुलांची जीवनशैली आणि त्यांचा गौरवांकित इतिहास त्या कुळांच्या श्रद्धासमूहाचे पालन करणारे सामान्यजन स्वत:च्या जीवनप्रणालीशी जोडू पाहत असतात.
अशा गौरवातिरेकी स्वरूपाच्या स्मृती संबंधित ऐतिहासिक काळाला आणि तत्कालीन भूभागाला विवक्षित कुळाच्या वा श्रद्धाप्रणालीच्या बाहुल्याचे वाहक बनवतात. त्यामुळे संबंधित काळातील प्रत्येक घटना आणि त्या घटनेविषयीची उत्तरकालीन (किंवा आधुनिक) स्मृती ही संबंधित कुळाच्या वा श्रद्धाप्रणालीविषयीच्या अतिशयोक्त गौरवाच्या अथवा द्वेषाच्या अजेंडय़ाचे प्रतिनिधित्व करते.
वासाहतिक काळात सर सय्यद अहमद खान यांच्या कार्यातून साकारलेल्या कथित ‘मुस्लीम प्रबोधना’च्या काळात हिंदू आणि मुस्लीम हे दोन वेगळे समाज असल्याचे गृहीतक प्रसृत झाले. इस्लामी श्रद्धेचे पालन करणारे नवाब आणि राजकीय अधिकारी कुळे यांच्या इतिहासाचे प्रमाणीकरण होऊन सबंध भारतीय उपखंडातील इस्लामी राजवटींचा इतिहास हाच सर्वसामान्य मुस्लिमांचा इतिहास असल्याची धारणा मोठय़ा प्रमाणात जागवण्यात आली. त्यातून ‘दो कौमी नजरिया’ या विचारसरणीचा प्रसार मुस्लीम समाजात करण्यात आला. त्यामुळे वेगवेगळ्या जातसमूहांत आणि आर्थिक प्रवर्गात विभागलेला एतद्देशीय मुस्लीम समाज एकजीव- मोनोलिथिक असल्याची धारणा मोठय़ा प्रमाणात रूढ झाली.
त्याला प्रत्त्युतर म्हणूनच ‘हिंदूं’च्या गौरवशाली इतिहासातील ‘सोनेरी पाने’ उलगडली जाऊन उपखंडातील वेगवेगळ्या भूभागानुरूप जीवनशैलीचे आणि स्थानिक सांस्कृतिक व्यूहाचे पालन करणाऱ्या हिंदू समाजाचे ‘संघटन’ आणि ‘एकजीवीकरण’ करण्याच्या उद्देशाने नव्या सभा-संघटना अस्तित्वात आल्या. स्वातंत्र्यलढय़ाचा संघर्ष ऐन भरात असतानाच त्या-त्या धर्मसमूहांना आपल्या गौरवशाली, पराक्रमी पूर्वजांनी भारतावर कशी अधिसत्ता गाजवली, याचे वर्णन करणाऱ्या अनेक पुस्तिकांची मालिका त्या काळात आपल्याला दिसून येते. संबंधित धर्माच्या अस्मितांच्या कडवेपणामुळे उपखंडामधील कबीर, शेख महंमद, एकनाथ, बाबा बुल्लेशाह, बाबा वारीस शाह यांच्या उदात्त विचारधारांच्या वारशाकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या कडवेपणाच्या आणि आपापल्या धर्माधिष्ठित अजेंडय़ांच्या पूर्ततेसाठी हिंदू आणि मुस्लीम समाजातील वैविध्य दूर सारून त्या धर्मप्रणालीचे एकजीवीकरण करू पाहणाऱ्या ‘लीग’ आणि ‘सभां’नी स्वातंत्र्याच्या उष:कालसमयी एकमेकांशी युती करून निवडणुका लढवल्याचा इतिहासदेखील फारसा जुना नाही. या चळवळीतून निर्माण झालेल्या अस्मिता, प्रतीके यांच्या गदारोळातून, हिंसक फाळणीतून निर्माण झालेले प्रश्न उपखंडातील दोन्ही राष्ट्रांना अद्याप सोडवता आलेले नाहीत.
उपखंडामधील सांस्कृतिक- सामाजिक धारणांच्या बहुपदरी पडद्यांनी सजलेल्या इतिहासाच्या या चौकटी अतिशय नाजूक, काहीशा भडक रंगांनी युक्त असलेल्या, तर कधी एकमेकांत मिसळून गेलेल्या सौम्य, नेत्रसुखद अशा धाग्यांच्या गाठींनी बनलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात वृत्तपत्रीय अवकाशाच्या मर्यादेत जमतील तितके प्रमुख व प्राथमिक विषय निवडून या धाग्यांची उकल करण्याचे प्रयत्न आपण केले. उपखंडाचा अतिशय गुंतागुंतीचा आणि रोचक असा महाकाय इतिहासपट शेकडो महत्त्वाच्या विषयांनी आणि उपविषयांच्या धाग्यांनी विणला गेला आहे. आपल्या लेखमालेच्या या समारोपपूर्व लेखात जातिव्यवस्थेसारखी नृशंस परंपरा, त्याच्या निवारणार्थ झालेल्या चळवळी, त्या चळवळीचे नेतृत्व करणारे थोर नेते, त्यांच्या मांडणीतून निर्माण झालेली वैचारिक घुसळण आणि गुंतागुंत असे अतिमहत्त्वाचे विषय हाताळता न आल्याची खंत जाणवते आहे. लेखमालेच्या अंतिम वळणावरील पुढील भागात ‘धारणांच्या धाग्यां’च्या उकलीच्या प्रवासाचे समालोचन करताना आपल्याला संक्षेपात त्याकडे पाहावे लागणार आहे.
(लेखक ग्योटिंगेन विद्यापीठ, जर्मनी येथे पीएच.डी. संशोधक असून ‘ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई’ येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)