डॉ. सविता पानट 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील ज्ञानदान आणि रुग्णसेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या डॉ. आर. बी. भागवत यांच्यावरील स्मृतिलेखांनी सिद्ध झालेल्या ‘ध्यासपंथी धन्वंतरी’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन अभंग प्रकाशनातर्फेआज (१२ फेब्रुवारी) औरंगाबाद येथे होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील लेख.

वैद्यकीय महाविद्यालयातील पहिली दोन महाकठीण वाटणारी वर्ष संपली आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. परीक्षेचा निकाल लागला, त्यात मी पासही झाले. आता आमचं कॉलेज नवीन इमारतीत सुरू झालं होतं. मेडिसिन पोस्टिंगचा पहिला दिवस. ओपीडीत जायचं होतं. सव्वानऊ- साडेनऊपर्यंत आम्ही ओपीडीत पोहोचलो, तर प्रो. आर. बी. भागवत सर केव्हाचेच येऊन रुग्णतपासणी करत होते. आमची तर भीतीने गाळणच उडाली. मनात म्हटलं, ‘आता काही खैर नाही. उशीर झालाय आपल्याला,’ आणि झालंही तसंच. सरांनी आमच्या पूर्ण बॅचला ‘९ वाजून १० मिनिटांपर्यंत हजर पाहिजे’, ही तंबी देऊन परत पाठवलं. त्यानंतर मात्र उशिरा जाण्याची आमची कधीच हिंमत झाली नाही.

विद्यार्थ्यांसाठी भागवत सर, औरंगाबादकरांसाठी ‘आर. बी.’ आणि रुग्णांसाठी ‘डॉक्टर साहेब’ किंवा ‘भागवत साहेब.’ औरंगाबाद मेडिकल कॉलेजचे भूषण आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपगृह. जवळजवळ सहा फूट उंची, अगदी शिडशिडीत बांधा, ताठ मानेनं आणि ताठ कण्यानं चालणारे करारी मुद्रेचे, भीती वाटावी असा स्थितप्रज्ञ चेहरा (क्वचित दिसणारी स्मितरेषा), वक्तशीर, शिस्तप्रिय, अतिशय सिन्सिअर असे आमचे भागवत सर. त्यांची प्रचंड भीती वाटायची. खरं तर ते कधी रागावून बोलायचे नाहीत. अपमान करायचे नाहीत. पण त्यांच्या न बोलण्याचीच जास्त भीती वाटे. अतिशय हळू आवाजात, संथपणे, तुटक तुटक वाक्यात बोलून ते शिकवत. पण अगदी नेमकं आणि नेमक्या त्या शब्दांत. त्यांच्या लेक्चरमध्ये एक अक्षरही अतिरिक्त नसे. कधी विनोद नाही. (केला तरी तो मुलांना समजत नसे.) विषयांतर नाही. आवाजाची वरची पट्टी नाही, त्यामुळे त्यांचं लेक्चर जिवाचा कान करून ऐकावं लागे.

डॉ. भागवत सरांनी शिकवलेलं कायम लक्षात राही. याचं कारण विषयातील नेमकेपणा अतिशय योग्य पद्धतीनं ते समजावून सांगत. एखाद्या रोगाचं, आजाराचं मूळ ते प्राधान्यक्रमाने व ठळकपणे सांगत. त्यात फापटपसाऱ्याला स्थान नसे. रुग्ण तपासतानाही त्यांची तीच पद्धत होती. रुग्णाच्या आजाराचा इतिहास सविस्तरपणे विचारण्यावर त्यांचा खूप भर असे आणि आम्ही विद्यार्थी नेमकं याच गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असू. त्यांच्या या शिकवणुकीचा पुढे आम्हाला रोगनिदान करून रुग्णसेवा करण्यासाठी खूप उपयोग झाला. मराठवाडय़ातील बहुतेक रुग्ण अशिक्षित, अडाणी आणि गोष्टीवेल्हाळ असत. नेमकं आजाराविषयी सोडून इतर खूप बोलत. सर मात्र त्यांना स्पष्टपणे थांबवत. त्यांच्याकडून हवं ते फक्त काढून घेत. काही ओळखीचे रुग्ण म्हणत, ‘डॉ. भागवतांकडे जायची आम्हाला भीती वाटते. त्यांच्याकडे जाण्याआधी आम्ही त्यांना काय काय सांगायचं याचा नाटकातील संवादाप्रमाणे सराव करत असतो.’

मेडिकल कॉलेजच्या शैक्षणिक क्षेत्रात तर ते अग्रणी होतेच, विद्यार्थिप्रियही होते; पण कॉलेजच्या सांस्कृतिक व इतर क्षेत्रांतही त्यांचा खूप दबदबा होता. कॉलेजमध्ये कुठलीही समस्या आली- मग तो मुलांचा संप असो, गॅदिरगमधील धांगडिधगा, हुल्लडबाजी असो वा राजकारण असो, हे सारे प्रश्न व गुंतागुंत मिटवण्यात ते नेहमीच तत्परतेनं मदत करीत. शारीरिक तंदुरुस्ती व आहाराच्या बाबतीत सर फारच काटेकोर होते. त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून कधी काळी ते कुस्ती खेळले होते, एवढेच नाही तर त्यात एकदम तरबेज होते आणि प्रत्यक्ष ऑलिम्पिक पदक विजेत्या खाशाबा जाधवबरोबर कुस्ती खेळले होते ही निव्वळ दंतकथा वाटे. पण मी जेव्हा पुण्याला बी. जे. मेडिकल कॉलेजला दहा वर्ष होते तेव्हा त्यांचे अनेक सहकारी, विद्यार्थी त्यांच्या कुस्तीच्या कौशल्याविषयी व आवडीविषयी भरभरून सांगत असत. संपूर्णपणे अ‍ॅकॅडमिक असलेले एक शिक्षक, एक उत्तम डॉक्टर व कुस्ती हे कॉम्बिनेशन जरा विचित्र वाटलं तरी ते सत्य होतं.

सरांचा धाक व दरारा इतका होता की, एक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. इंटर्नशिपमध्ये माझं लग्न ठरलं आणि मी सरांना पत्रिका देण्यासाठी ओपीडीत गेले. रुग्णांसारखं नंबर लावून रांगेत उभी होते. माझा नंबर आला. सरांनी वर न पाहता रुग्ण समजून मला प्रश्न विचारला. मी म्हटलं, ‘सर, माझं लग्न ठरलंय आणि पत्रिका द्यायला आले आहे.’ तेव्हा सरांनी वर पाहिलं. पत्रिका पाहिली. ती बाजूला ठेवून दिली आणि ‘हूं’ करून म्हटलं, ‘लग्न ठरलं,  o what?’ मी घाबरून काढता पाय घेतला.  So what  सरांचा लाडका शब्द होता. पुढे मी माझ्या आयुष्याचं तत्त्वज्ञान म्हणून  So what हा शब्द लक्षात ठेवला. कुठलीही चांगली किंवा वाईट गोष्ट झाली की, मी सरांचे शब्द आठवून स्वत:लाच विचारी ‘So what’ ज्यामुळे मला मानसिक बळही मिळे व पायही जमिनीवर राहत.

सर्वच विद्यार्थ्यांना सरांची प्रचंड भीती वाटत असे. सरांच्या राऊंडच्या आधी सर्व रुग्णांची कुंडली म्हणजे रुग्णाचा इतिहास, तपासण्या व उपचारांची सविस्तर माहिती सरांना अगदी तयार लागे. एकदा राऊंडमध्ये एका विद्यार्थ्यांला सरांनी विचारले, ‘या रुग्णाचा  Stool Report कुठे आहे?’ तो रिपोर्ट रुग्णाच्या केस पेपरला जोडलेला नव्हता. जेव्हा सरांनी तो रिपोर्ट आणायला सांगितला, तेव्हा त्या विद्यार्थ्यांची इतकी भंबेरी उडाली की, घाबरून तो एक लाकडी स्टूल घेऊन आला. आता हा विनोद खूपच पी. जे. किंवा अशक्य कोटीतला वाटेल, पण हे खरंच घडलेलं आहे.

इतकी कडक शिस्तीची भोक्ती, तत्त्ववादी माणसं साधारणपणे रुक्ष व कोरडी असतात, पण सर खऱ्या अर्थानं रसिक होते. उत्तम वाचन होतं त्यांचं. ते नाटय़प्रेमी व संगीतप्रेमीही होते. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘सुंदर मी होणार’ अशी किती तरी नाटकं त्यांनी बसवली. नाटकांचं अभिवाचन केलं. सुप्रसिद्ध गायकांचे कार्यक्रम यशस्वी केले आणि औरंगाबादच्या रसिक लोकांसाठी ‘रसिक’ ही संस्था काढून उत्तम प्रकारे चालवली. त्याद्वारे अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी औरंगाबादकरांना मिळाली. औरंगाबादच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं खूप योगदान होतं.

सरांचं रुग्णाला तपासणं, रोगाचं निदान करणं, रुग्णाला वास्तव सांगून धीर देणं आणि योग्य उपचार करणं हे अतिशय परिपूर्ण होतं. ते कधीही घाईघाईनं रुग्णाला तपासत नसत. He was a man of perfection. राजकारण, समाजकारण, प्रशासन, साहित्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांतील सुप्रसिद्ध व्यक्ती सरांकडेच फायनल ओपिनियनसाठी येत असत. अगदी सर ८० वर्षांचे होईपर्यंत.

आमच्या सामाजिक कार्यक्रमांना, भाषणांना सर अगदी न चुकता दरवर्षी हजर राहत आणि  कार्यक्रम आवडला असं दुसऱ्या दिवशी फोन करून मला कळवीत असत. ‘डॉक्टर’ हा त्यांचा व्यवसाय असला तरी शिकवणं हा त्यांचा ध्यास व श्वास होता आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या व्यवसायाचा धंदा होऊ दिला नाही. सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ते ‘फक्त वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर कधीच नव्हते, तर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक’ हीच त्यांची ओळख होती. म्हणूनच त्यांना आदर्श शिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. आचार्य विनोबा भावे म्हणत, ‘जो फक्त पुस्तकातील शिकवतो तो शिक्षक. जो पुस्तकाबाहेरील ज्ञान देतो तो गुरू आणि जो विद्यार्थ्यांला जगायचं कसं हे शिकवतो, त्यासाठी लायक बनवतो, तो आचार्य.’ भागवत सर नक्कीच या आचार्य पदापर्यंत पोहोचले होते. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा त्यांनी घडवल्या. हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केलं. एका विशिष्ट तत्त्वानं अतिशय समृद्ध जीवन ते जगले.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhyaspanthi dhanvantari book on dr r b bhagwat zws
Show comments