दिवाळी आली.. दिवाळी झाली! दिवाळी म्हणजे घर स्वच्छ करणे, दिवाळीचा फराळ, दिवे, कंदील.. दिवाळीआधी घराची साफसफाई करणे, जुन्या वस्तू घरातून काढून टाकणे. नवीन वस्तू-नवीन कपडे घेणे, ही आपली परंपरा आहे सर्वाना माहीत आहे. आज आपण कॉम्प्युटर, इंटरनेटच्या युगातसुद्धा या परंपरेचे पालन करतो.
मग ही दिवाळीनंतरची साफ-सफाई कुठली?
दिवाळी झाली व सहज आपण वजनाच्या काटय़ावर उभे राहिलो की आपल्याला काटा थोडा उजवीकडे सरकलेला दिसतो. मग आपल्याला खूप टेन्शन  येते.  मनात विचार येतात की फक्त २-३ दिवस फराळाचे, गोडधोड खाणे झाले व त्याचा परिणाम एवढय़ा लवकर झाला. पुष्कळ वेळा सणासुदीच्या दिवसात आपण व्यायामशाळेत जायला, फिरायला जायला कंटाळतो. या सर्वाचा परिणाम- थोडेसे वाढलेले वजन, ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यात blood sugar वाढलेली दिसते.
आजकाल या सर्व समस्यांवर Detox diets फार प्रचलित झाले आहे. या डाएटप्रमाणे अतिगोड व अतितेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात toxins  तयार होतात. हे toxin  शरीराबाहेर काढण्याकरिता-थोडे दिवस अन्न खाणे बंद करावे लागते. अशा डाएटमध्ये फक्त पाणी, फळभाज्यांचा रस इत्यादी घेण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने वजन कमी होते- पण अन्न खाऊ लागल्यावर ते कमी झालेले वजन लगेचच वाढते.
आपले शरीर रोजच्या रोज शरीरातील वाईट पदार्थ- Toxin बाहेर फेकत असते. शरीर एक कार्यक्षम मशीन आहे. साफसफाई करण्यासाठी ते दसरा-दिवाळीची वाट बघत नाही. असे जर शरीराने केले असते तर आपल्या बऱ्याच अवयवांना कायमस्वरूपी इजा झाली असती. त्यामुळे Detox हे आपण रोज नैसर्गिकरीत्या घेत असतो. त्यासाठी वेगळे डाएट करायची गरज नसते.
आता दिवाळीचे पाच दिवस संपले. त्यामुळे फराळ खाणे बंद करायला हवे. फराळाचे पदार्थ उरले असतात. ते वाया जाऊ नये म्हणून पोटस्वरूपी कचरा पेटीत टाकू नका आणि घरातील इतर व्यक्तींनाही देऊ नका. दिवाळी संपली की आपला आहार रोजच्या जेवणावर लगेचच आला पाहिजे. जर असे केले तर ते खऱ्या अर्थाने आपल्या शरीराला उपयोगी होईल. वजन, रक्तातील साखर लगेचच सुरळीत होण्यास मदत होईल.
असे काटेकोर डाएट करणे गैर आहे. विशेषत: ज्यांना मधुमेह, हृदयरोग इत्यादी त्रास आहे, त्यांनी असे अन्न न खाणे गैर आहे. असे केल्याने शरीराचे संतुलन बिघडते. दोन-तीन दिवसांपूर्वी शरीराला हवी, त्यापेक्षा जास्त ऊर्जा, जास्त साखर मिळत होती. त्यानंतर एकदम ऊर्जा व साखरेचा पुरवठा बंद होतो. असे केल्याने शरीराला इजा होते व शरीराचा BMR (ऊर्जेचा मापक) विस्कळीत होतो. त्यामुळे कितीही strict diet किंवा Fashionable diets च्या जाहिराती आल्या तरीही त्याच्या आहारी न जाता, संतुलित आहार व नियमित व्यायाम सोडू नये.
खरं तर Diet या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘आहार’ असा आहे. पण आजकाल न खाणे याला Diet म्हटले जाते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा वाढलेली साखर, चरबी कमी करण्यासाठी न खाणे हा उपाय नसून, योग्य खाणे हा उपाय आहे. जर खाल्ले नाही तर वजन कमी होईल याबद्दल वाद नाही. पण आपण किती दिवस अन्नाशिवाय राहू शकतो? ज्या दिवशी अन्न खाऊ लागू, त्या दिवशी वजन वाढू लागेल. त्यामुळे अन्न न खाण्यापेक्षा- कमी प्रमाणात व चांगले, सकस अन्न खाणे महत्त्वाचे आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मानसिकता बदलली पाहिजे. दिवाळीच्या दिवशी किंवा कधीही कोणी आपल्या घरी आले तर त्याचा पाहुणचार गोड, तळकट पदार्थानेच केला पाहिजे असे नाही. त्याचबरोबर सर्वाकडे दिवाळीचा फराळ म्हणजे चकल्या-लाडू पाठवायला पाहिजे असे नाही. आपण ज्यांना बोलावले, ज्यांच्या घरी आपण जातो किंवा फराळ पाठवतो त्यांना काही आजार असेल तर फराळाऐवजी फळ, तेलबिया किंवा इतर काही साध्या वस्तू दिल्या पाहिजे. सण म्हणजे प्रेमाचा वर्षांव- कॅलरीजचा नाही.
त्यामुळे या वेळेस दिवाळीनंतरची साफसफाई साधे, सकस अन्न, ज्यात भरपूर भाज्या व फळं आहेत त्यांनी करा. खऱ्या अर्थाने डाएट करा- उपाशी राहू नका!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा