तलचा आजार म्हणजे अजीर्णाची पुढची पायरी. तिचे ढिगभर रिपोर्ट्स घेऊन ती आणि तिची आई माझ्याकडे आल्या. ‘‘आमच्या शीतलला ना, डॉक्टरांनी irritable bowel syndrom सांगितलाय. तुमच्या (???!!!) आयुर्वेदात याला काही औषध आहे का? गॅरेंटीनं बरं व्हायला पाहिजे हं..’’ पहिल्याच वाक्यात शीतलच्या आईनं मला ‘चॅलेंज’ दिलं. (शिवाय आयुर्वेद हे भारतातील वैद्यांचं शास्त्र आणि सामान्यजनांचं वैद्यकशास्त्र वेगळं- असं वर्गीकरणही करून टाकलं. भारतात खरं तर आयुर्वेदाची ओळख ‘आपला आयुर्वेद’ अशी असायला हवी, नाही का?)
‘‘अहो, मुळात आयुर्वेदशास्त्राचे सर्व उपलब्ध संहिता-ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे अगदी याच नावाचा आजार त्या ग्रंथांत कसा सापडणार? पण शीतलची लक्षणं, तिची दिनचर्या, तिच्या सवयी यांतून आपल्याला आजाराची कारणं शोधून काढता येतील. त्यावरून शरीरात कुठे आणि काय बिघडलं आहे ते ठरवता येईल आणि उपाययोजना करता येईल की!’’ मी म्हणाले, ‘‘हे रिपोर्ट्स राहू देत बाजूला. ते आपण नंतर बघू. आधी तिला काय होतंय, ते सांगा.’’
‘‘हिला ना, वरचेवर पोटात दुखतं. पोट साफ होत नाही. कधी जुलाब होतात, तर कधी constipation  होतं. भूकही कमी झाली आहे तिची. आणि अहो, इतक्या सगळ्या तपासण्या केल्या तरी हिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. आम्हाला तर आता कळेनासंच झालंय, काय करावं ते!’’ अर्धा तास ही प्रश्नोत्तरं चालली होती. त्यात जे सत्य मला कळलं, ते धक्कादायक होतं.
शीतल माहेरी श्रीमंतीत आणि लाडाकोडात वाढलेली. त्यांचं एकत्र कुटुंब. सगळ्या स्त्रिया ‘गृहिणी’च. तरी घरी तीन आचारी. त्यामुळं माहेरी तिचा आणि स्वयंपाकघराचा काहीएक संबंध नव्हता. लग्न झाल्यावर राजा-राणी दोघांचाच संसार. त्यात शीतल नोकरी करत होती. मग स्वयंपाकाचं काय करायचं? रोज बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं जेवण चांगलं- म्हणून आटापिटा करून घरी स्वयंपाकासाठी मावशी लावल्या. या मावशींना सकाळी वेळ नसायचा म्हणून वेळेचीही तडजोड केली. दुपारी चार वाजता मावशी स्वयंपाकाला यायच्या. शेजारच्या घरातून किल्ली घ्यायच्या. वरण/आमटी, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, चटणी सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करायच्या. मग हे ताजं अन्न त्या निगुतीनं फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या. शीतल आणि तिचा नवरा रात्री नऊ-साडेनऊला यायचे. मग फ्रीजमधले हवे तेवढे पदार्थ काढून गरम करून ते जेवायचे. सकाळी न्याहारीच्या वेळीही फ्रीजमधले पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये टाकून मग खायचे. त्याच पदार्थाचे दोघांसाठी डबे भरले जायचे. आपापल्या ऑफिसमध्ये गेल्यावर दोघेही जण तिथल्या फ्रीजमध्ये डबे ठेवायचे. जेवायच्या वेळेला पुन्हा मायक्रोवेव्हला नेवैद्य दाखवून प्रसाद ग्रहण करायचे. म्हणजे आदल्या दिवशी चार वाजता बनवलेलं जेवण दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता खाल्लं जायचं. वर्षभर त्यांचं हे व्रत चालू होतं.
मी अगदी अभावितपणे म्हणाले, ‘‘हेच कारण आहे तुझ्या आजाराचं. आता या व्रताचं उद्यापन करावं लागेल.’’
‘‘म्हणजे??!! तुमच्याकडे सांगितलाय असा आजार? काय म्हणतात याला?’’ शीतलनं उत्सुकतेनं विचारलं. आपल्या आजाराला काहीतरी नाव मिळावं आणि त्याचं निश्चित कारण समजावं, ही खरं तर सगळ्याच रुग्णांची तीव्र इच्छा असते.
‘‘ग्रहणी म्हणतो आम्ही या आजाराला.’’ माझ्याकडून आजाराचं निश्चित निदान झाल्यामुळे माय-लेकी केवढय़ाोरी खूश झाल्या.
गरम आणि ताजा आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आज शहरात कित्येक घरांमध्ये असा आहार घेणं दुर्मीळ झालंय. गरम अन्न तर फक्त हॉटेलमध्येच मिळतं. (मात्र, ते ताजं असतं की नाही, माहीत नाही.) दुर्दैवानं कित्येक वेळा घरचं जेवणसुद्धा ताजंही नसतं आणि गरमही नसतं.
गरम अन्नाच्या सेवनानं अन्न पचवणारा जाठराग्नी तीव्र होतो. म्हणजेच गरम अन्न जाठराग्नीला मदत करतं. अन्नाची चवही उत्तम लागते. आपल्याला काही त्रास न होता कमी वेळात ते पचतं. अन्न गरम असेल तर शरीरात कफाची फाजील वाढ होत नाही. शरीररूपी यंत्राचा कारभार चालवणाऱ्या वातदोषाची दिशा योग्य राखली जाते. (उदा. पोटातील वायूला वरून खालीही दिशा मिळते.) हे सगळे फायदे मिळावेत म्हणून जेवण गरमच असायला हवं.
पण आमच्या ‘डबा संस्कृती’त हे सुख कुठलं मिळायला? आजच्या कुमार आणि किशोरवयीन मुला-मुलींची तर मला फारच दया येते. दिवसातले १०-१२ तास ही मुलं शाळा आणि क्लास यांत अडकलेली असतात. त्यातल्या क्लासची वेळ तर रोज बदलत असते. मग त्या तालावर बिचाऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळाही बदलत असतात. वातानुकूलित क्लासरूम्स असतील तर डब्यातल्या अन्नाच्या गारगोटय़ा झालेल्या असतात. तेही खायला वेळ नसतो. दोन-पाच मिनिटांत, कधी कधी रिक्षाच्या प्रवासात ही मुलं अन्न अक्षरश: पोटात कोंबत असतात. कसं पचणार हे अन्न? यातून पोषण तरी काय मिळणार मुलांना? तब्येतीची काहीच तक्रार नसलेला दहावी-बारावीचा विद्यार्थी आज दुर्मीळ झालाय, तो यामुळेच! शाळा, शिक्षक, पालक हे सगळे प्रवाहपतित आणि हतबल झाल्यासारखे वागतात. कशासाठी जगायचं, आणि उत्तम जगण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं, हा विचारच हरवत चाललाय.
माझी आई दिवसातून तीन वेळेला ताजं आणि वेगवेगळं अन्न शिजवायची. आज तिन्ही वेळचं अन्न एकदम शिजवून ठेवलं जातं. रेफ्रिजरेटरमध्ये ते ‘सुरक्षित’ राहतं म्हणून कधी कधी आठवडाभरही ठेवलं जातं. घरोघरीचे रेफ्रिजरेटर्स उघडले तर त्यात ‘ब्रह्मांडदर्शन’ होईल अशी अवस्था असते. मुळात पूर्वी कृषितंत्र अवगत नसलेल्या पाश्चात्त्य देशांमध्ये शिकार केलेलं मांस आणि लांबवरून तोडून आणलेली फळं टिकवण्यासाठी रेफ्रिजरेटर्सचा शोध लागला आणि त्याचा वापर सुरू झाला. आपला देश अजूनही  कृषिप्रधान आहे. इथे अन्नधान्य आणि दूधदुभतं ताजं उपलब्ध होऊ शकतं. (आदिवासी आणि वनवासी क्षेत्राचा अपवाद वगळता!) आपल्याकडचे मांसाहारी लोकही तिन्हीत्रिकाळ मांसाहार करत नाहीत. त्यामुळे मांस टिकवण्याची गरज आपल्याकडे तशी कमीच. तरी आपण आपल्या घरात या रेफ्रिजरेटररूपी उंटाला प्रवेश दिलाय. ‘फ्रिजमध्ये सगळं टिकतं’ हा आपला भ्रम आहे. अन्नाची चव, रंग, वास, स्पर्श बदलणं ही प्रक्रिया फ्रिजमध्येही काही काळाने सुरू होतेच. ज्ञानेंद्रियग्राह्य़ असे हे अन्नाचे गुण बदलले की अन्न खराब झालं, त्यातली पोषक मूल्यं कमी झाली असं समजावं. पण काही वेळा असं काही न घडताही अन्न शरीराला घातक बनू शकतं. कालाच्या परिणामानं हे अन्न फ्रिजमध्ये असूनही मनुष्याला त्रासदायक ठरतं, त्याला विषारी स्वरूप प्राप्त होऊ शकतं. (३७्रू होतं म्हटलं तर जास्त खरं वाटेल आपल्याला.) ज्या विषाणू आणि जिवाणूंची आपल्याला दहशत आहे, ते फ्रिजमधेही वाढू शकतात. फक्त वाढायला वेळ लागतो, इतकंच. याउलट, पचनाला आवश्यक असे अन्नातील काही बॅक्टेरिया फ्रिजमध्ये मरू शकतात. (उदा. ताकातले बॅक्टेरिया) तेव्हा ‘फ्रिजमध्ये ठेवलं म्हणजे अन्न ताजं राहील’ हा गैरसमज आपण दूर करूया. आयुर्वेदशास्त्राच्या मते तर शिजवल्यानंतर तीन तासांनी अन्न शिळं होतं. (म्हणजे तीन तासांच्या आत ते फ्रिजमध्ये ठेवायला हवं!!??) शिळं अन्न हे थंड, पचायला जड, अग्नी मंद करणारं, कफ आणि वात या दोषांना दुष्ट करणारं असतं. शिळ्या अन्नामुळे उत्साह, स्मरणशक्ती, मनाची शांती यावरही विपरीत परिणाम होतो. म्हणून शिळं अन्न खाऊ नये.
अन्न पुन्हा पुन्हा शिजवूनही खाऊ नये. पुन्हा शिजवल्यामुळं अन्नातले जलीय घटक आणि स्निग्धत्व कमी होऊन अन्नाचा मृदू गुण नष्ट होतो. मृदू अन्न पचायला सोपं आणि रुचकर असतं. तर मृदुत्व कमी झालेलं,‘खर’अन्न पचायला त्रासदायक असतं. मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणं हे अन्नाचे दोष वाढायला कारण ठरतं. मायक्रोवेव्हमध्ये अन्नातील पाण्याचे अंश तर शोषले जातातच, पण काही ंल्ल३्र७्रिंल्ल३२, ५्र३ं्रेल्ल२, पोषकतत्त्वंही कमी होतात. यातील मायक्रोवेव्ह रेडिएशन्सही थेट कॅन्सर निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतात. या अन्नाच्या सेवनानं चिडचीड वाढते. तहान वाढते. वारंवार मूत्रप्रवृत्ती होऊ शकते. झोपेचं प्रमाण कमी होतं. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दृष्टिदोष निर्माण होतात. अन्न पुन्हा गरम करावे लागलेच तर ते वाफेवर, गरम पाण्यात किंवा कुकरमध्ये गरम करून घ्यावे.
ताज्या आणि गरम अन्नाचे हे सगळे फायदे समजावून मी शीतलला औषध दिलं. पथ्यही सांगितलं. महिन्याभरानं ती आली तेव्हा तशी खुशीत होती. भूक लागायला लागली होती ना तिला! ‘‘बरंच बरं वाटतंय..’’ ती उत्साहानं सांगत होती.
‘‘आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रोज दुपारी ताक प्यायला लागले हं..’’ शीतल म्हणाली.
‘‘अरे वा! विरजण लावायला शिकलीस वाटतं?,’’ मी कौतुकानं विचारलं.
‘‘छे, छे! पंधरा दिवसांपूर्वी दादरला गेले होते. तिथे आमच्या जवळच्या डेअरीत २०० मि. ली.च्या ताकाच्या पिशव्या मिळतात. मी एक महिन्याच्या पिशव्या आणून फ्रिजमध्ये ठेवून दिल्यात.’’
मी हातातलं पेन नकळतपणे बाजूला ठेवलं आणि दोन्ही हात (टेबलावर) तिच्यापुढे टेकून नुसती बघतच राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा