चित्र क्र. १ मध्ये दिसणारा डिजिटल कॅमेरा फिल्म कॅमेऱ्याप्रमाणेच काम करतो. पण मूलभूत फरक त्याच्या प्रतिमा टिपण्याच्या पद्धतीमध्ये आहे. फिल्म कॅमेऱ्यामध्ये भिंगातून आलेले प्रकाशकिरण रासायनिक थर असलेल्या फिल्मवर पकडले जात, तर इथे ते काम पूर्वी CCD प्रकारचा प्रतिमा संवेदक ((Image Sensor) करायचा, आता Complementary Metal Oxide Semiconductor- CMOS करतो. हा प्रतिमा संवेदक भिंगातून आलेले प्रकाशकिरण पकडतो आणि त्यांचे विद्युत संकेतात रूपांतर करतो.
चित्र क्र. २ मध्ये CCD चकतीचे प्रकाशचित्र दिसते. त्यातील मधला हिरवा चौकोनी भाग प्रकाश संवेदकाचे काम करतो, तर बाजूला असलेल्या सोनेरी तारा कॅमेऱ्यातील विद्युत परिपथाला जोडलेल्या असतात. चित्र क्र. ३ मध्ये कॅमेऱ्यामध्ये जोडलेला संवेदक दिसतो.
दूरदर्शन किंवा संगणक सुरू होत असताना त्याच्या पडद्यावर आपल्याला बारीक बारीक असंख्य रंगीत ठिपके दिसतात. किंवा एखादे चित्र आपण त्या पडद्यावर मोठे करून पाहत असताना ते चित्रही अशा असंख्य ठिपक्यांनी बनलेले दिसते. या ठिपक्यांना ‘पिक्सल’ म्हणतात. भिंगातून आता येणारे चित्र/ दृश्य CCD वर आले की ते कोटय़वधी ठिपक्यांमध्ये (पिक्सलमध्ये) विखुरले जाते. CCD आणि त्याच्या बरोबर असलेला रंग वाचणारा बायर्स फिल्टर ते चित्र/ दृश्याच्या पिक्सलचे रंग आणि प्रकाशमानतेची (Brightness) तीव्रता मोजतो. ते मोजमाप ० आणि १ अशा आकडय़ांच्या संचात नोंदवतो आणि ही नोंद कॅमेऱ्यामधील सुरक्षित सांख्यिकी चकतीकडे (Secure Digital card- SD card) पाठवतो. ही असते आपण बघितलेल्या दृश्याची सांख्यिकी छबी (डिजिटल फोटो); ज्यात सर्व सूक्ष्मातिसूक्ष्म तपशील असंख्य आकडय़ांच्या स्वरूपात नोंदवलेले असतात. साध्या डिजिटल कॅमेऱ्यामध्ये हे तपशील Joint Photography Experts Group standard (JPEG) या फाइलच्या पद्धतीत साठवलेले असतात, तर अधिक उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यामध्ये या प्रतिमा Raw Image Format (RIF) पद्धतीमध्येही साठवता येतात. RIF पद्धतीने साठवलेल्या प्रतिमांमध्ये मूळ प्रतिमेला बाधा न पोहोचवता हवे ते बदल करण्याची लवचिकता असते.
चित्र क्र. ५ मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचे उघडलेले स्वरूप दाखवले आहे.
१. विद्युतघट कप्पा : इथे आवश्यक तेवढय़ा क्षमतेचे विद्युतघट ठेवतात.
२. क्षणदीप्ती संधारित्र (Flash capacitor) : कमी प्रकाशात प्रकाशचित्र घेत असताना आवश्यक तेवढा उजेड देणारा दिवा चालू करण्यासाठी लागणारी विद्युत ऊर्जा इथे साठवलेली असते. विद्युतघटातून याला वारंवार पुनर्भारित केले जाते.
३. क्षणदीप्ती दिवा (Flash lamp) : कमी प्रकाशात प्रकाशचित्र घेताना हा दिवा क्षणभराकरता लागतो आणि आवश्यक तेवढा उजेड देतो.
४. एल. इ. डी. ( Light Emitting Diode) : याला जोडलेला छोटा लाल दिवा जेव्हा डिजिटल कॅमेऱ्यामधून आपण ठरावीक वेळ पूर्वनियोजित करून प्रकाशचित्र घेतो, तेव्हा तो वेळ संपेपर्यंत लुकलुकत राहतो.
५. भिंग : बाहेरील दृश्यावरून येणारे प्रकाशकिरण CCD/ CMOS पर्यंत पोहोचवते.
६. नाभीयान यंत्रणा (Focusing mechanism) : या यंत्रणेद्वारे भिंग पुढे-मागे करून दृश्याची प्रतिमा स्पष्ट करता येते.
७. CCD : भिंगातून आत आलेले प्रकाशकिरण विद्युत संकेतात रूपांतरित करणारे उपकरण.
८. USB सांधक (CONNECTER) : सांख्यिकी स्वरूपात साठवलेली माहिती संगणकासारख्या इतर उपकरणांकडे पाठवण्याकरता उपयोगी असणारा सांधक.
९. SD कार्ड खाच (secure digital) card slot : या खाचेमध्ये SD चकती टाकून त्यात प्रकाशचित्र सांख्यिकी स्वरूपात साठवता येतात.
१०. प्रक्रियक चकती (Processor Chip)- ही चकती म्हणजे कॅमेऱ्याचा मेंदू. कॅमेऱ्याचे सर्व नियंत्रण या चकतीमार्फत केले जाते.
११. पट्टा : कॅमेरा हाताळताना पडू नये म्हणून हा पट्टा नेहमी मनगटावर बांधून ठेवावा.
१२. बाह्य आवरण : भिंगाशिवाय इतर कुठूनही प्रकाश आत न येऊ देणारे आवरण. यात न दाखवलेला एक महत्त्वाचा भाग म्हणजे मागील बाजूवरील LCD पडदा- ज्यावर आपण प्रकाशचित्र कसे येणार आहे किंवा आले आहे, ते बघू शकतो.
तंत्रज्ञानाने जन्माला घातलेली प्रकाशचित्रणाची कला अधिक लोकाभिमुख करणारा हा डिजिटल कॅमेरा नुसताच स्थिरचित्रण करून थांबत नाही, तर चलचित्रणसुद्धा तितक्याच सहजपणे करू शकतो. त्यामुळे आज १०-१२ वर्षांचे मूलसुद्धा चित्रपट बनवताना दिसते.
दीपक देवधर- dpdeodhar@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा