स्वानंद किरकिरे

सीरियस नाटक आणि सीरियस नाटकाचा सीरियस दिग्दर्शक म्हणजे बाबा गोरे मला हीरोसारखाच वाटायचा. तो शौकीन होता. पण तो काळ एखाद्याच्या ‘शौकीन’ असण्याला व्यसन समजण्याचाही होता. बाबाला खरं व्यसन होतं नाटकाचं. नाटक व्हावं यासाठी तो काहीही करायला तयार असायचा.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
amar upadhayay mihir virani
पांढऱ्या साड्या नेसून आलेल्या महिलांनी घराबाहेर घातला होता गोंधळ; अभिनेता खुलासा करीत म्हणाला, “माझ्या आईला…”
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Emotional Video of father went viral on social media shows dads hardwork
एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!

इन्दौरच्या नाटय़सृष्टीत बरीच मातब्बर मंडळी होऊन गेली, पण त्या सगळय़ांमध्ये आमचा ‘बॉस’- इं२ एकच होता. आमचा बाबा गोरे. रामबाग गणेश कॉलनीच्या माझ्या घरात मी दिवसभराचे उपद्व्याप आटपून जेमतेम कसाबसा अभ्यासाला बसतोच, की खाली एक भल्या मोठय़ा ट्रकचा हॉर्न वाजलेला असायचा; आणि आई ओरडायची. ‘‘जा.. आले तुमचे गुरू.’’

लगेच खाली आलो की दारात बाबा गोरे आपल्या केशरी रंगाच्या लुनावर घराखाली दिसायचा. साधारण साडेपाच फूट उंच, सडपातळ देहयष्टी, अगदी मांजरासारखे घारे डोळे, गोरा रंग, कमी वयातच टक्कल पडलं असलं तरी अत्यंत लोभस असा रुबाब. गळय़ात विविध फॅशन्सच्या मण्या-मोत्यांच्या, स्फटिकाच्या माळा. उंची अत्तर लावलेलं, हातात सोन्याचं किंवा चांदीचं ब्रेसलेट आणि मुठीत चारमिनार विदाऊट फिल्टर सिगारेट..

‘‘क्या बास?’’

बाबा ‘बॉस’ शब्दाचा उच्चार ‘बास’ असा करी. कधी ‘पिस्तूल’, कधी ‘कंगवा’ तर कधी ‘पत्त्याचा डेक’ अशा चित्रविचित्र आकाराचे लायटर्स तो बाळगत असे. सिगरेट पेटवत आणि आपलं नवं लायटर मिरवत तो म्हणायचा, ‘‘नवं नाटक बसवतोय बास. उद्यापासून संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्र साहित्य सभेत आना है बास. सात म्हणजे सात. शार्प.’’ आणि तो आपली लुना घेऊन निघून गेलेला असायचा.

बाबा खरंच शार्प होता. बुद्धीनं आणि कर्तृत्वानंही शौकीन होता. आपल्या लुनाला विविध आयुधांनी सजवायचा. गाडी इवलीशी असली तरी हॉर्न मोठमोठय़ा गाडय़ांचे लावायचा. हौशी असलं तरी नाटक राजेशाही थाटात करायचा.

माझी आणि बाबाची पहिली भेट मी खूप लहान असताना झाली. बाबानं इन्दौरला रत्नाकर मतकरींचं ‘लोककथा ७८’ नाटक बसवलं होतं अन् त्यात जगन्याची भूमिका माझा काका जितेन्द्र किरकिरे यानं केली होती. माझा काका मला सायकलवर पुढे बसवून नाटकांच्या तालमींना घेऊन जात असे. मी तिथे ‘स्क्रीप्ट फॉलो’ कर.. थोडं कुणी वाक्य विसरलं तर प्रॉम्टिंग कर.. अशा कामांमध्ये हातभार लावायचो. सीरियस नाटक आणि सीरियस नाटकाचा सीरियस दिग्दर्शक म्हणजे बाबा गोरे मला हीरोसारखाच वाटायचा. तो नटांना रागवायचा, ते त्याचं ऐकायचेदेखील. जेव्हा गावात जगनचे हात-पाय तोडून त्याला आगीत टाकलं जातं ते त्या नाटकामधील दृश्य बाबानं बसवलं, तेव्हा मी दोन दिवस झोपू शकलो नव्हतो. काका करायचाही छान. पहिली रंगीत तालीम झाली अन् मी सुन्न!

तालमीनंतर नाटकातली सगळी मंडळी जेलरोडच्या सरदार दूधवाल्याकडे दूध प्यायला जात. इन्दौरमध्ये रात्री दुकानाबाहेर मोठय़ा-मोठय़ा कढया अजूनही लागतात अन् लोकं ग्लास-दरग्लास गरम दूध पिऊन जगतात. दुधावर ताजी साय घालून दूध पिण्याची मजा निराळीच असते.
त्या रात्री बाबानं म्हटलं, ‘‘सुनो, बच्चे के दूधमे सौ ग्राम रबडी डालो. आज हेवी डोस हुवा है उसे.. बढिया प्रॉम्प्टिंग किया तूने’’ असं म्हणून मला शाबासकीदेखील दिली.

मी मनात बहुतेक त्याच काळात ठरवलं होतं, की मला नाटकच करायचं आहे.. पुढे बाबाशी संबंध तुटला. कारण काका आणि त्याचं काहीतरी बिनसलं आणि काकानं वेगळा ग्रुप सुरू केला. माझ्या काकाला इन्दौरात व्यावसायिक नाटक सुरू करायची खूप इच्छा होती. त्याला बाबासारखं वर्षोनुवर्षे राज्यनाटय़ स्पर्धा आणि दिल्लीतील बृहन्महाराष्ट्र स्पर्धासाठी नाटक करायचं नव्हतं. माझ्या काकाला थोडंफार यश आलंही, पण पुढे तो व्यावसायिक नाटक करायला मुंबईला निघून गेला. मलासुद्धा बोर्डाच्या परीक्षांमुळे नाटकापासून दूर जावं लागलं, पण नाटक करण्याची तलफ काही पिछा सोडत नव्हती.

बाबा तसा पक्का ईगोवाला होता. – दोस्तो का दोस्त आणि दुश्मनो का कट्टर दुश्मन- त्याचा ग्रुप सोडलेल्या लोकांबरोबर तो काम करीत नसे. मी ग्रॅज्युएशन संपवून जेव्हा पुन्हा नाटकात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाबा माझ्याशी बोलत नसे. मला आणि माझा मित्र संतोष रेगे याला ग्रुपमध्ये एण्ट्रीसाठी जवळ-जवळ एका अग्निपरीक्षेतूनच जावं लागलं होतं आणि ती परीक्षा अशी की, बाबाला त्याच्या नव्या मेगास्टार नाटकाच्या सेटसाठी एक झाड हवं होतं. नेपथ्य आणि नाटकाचा सेट हा बाबाचा विकपॉइंट, हे आम्हाला माहीत होतं. मी आणि संतोष कुठूनतरी एक कापलेलं झाड खांद्यावर घेऊन आलो आणि.. बाबा आम्हाला पाहून लहान मुलासारखा हसला होता. शाबासकी-बिबासकी मिळाली नाही, पण त्यानं संतोषला लगेचच म्हटलं, ‘हथौडी ले’ मला म्हणाला, ‘घोडी खींच’ ( शिडी) अन् तत्क्षणी सेट लावण्यात तो गुंग झाला. आम्ही खूश यासाठी की आम्हाला बाबानं ग्रुपमध्ये प्रवेश दिला होता. त्या नाटकात गर्दीमध्ये आम्हाला स्थानदेखील मिळालं होतं.

बाबाचं सेट लावणं हा एक उत्सवच असायचा. नाटकांचं नेपथ्य करणारा विजुकाका घोडगावकर आमच्या एकुलत्या एक नाटय़गृहाचा मॅनेजरही होता. तो प्रयोगाच्या एक दिवस आधी रात्री आम्हाला नाटय़गृह उघडून देई. मग रात्रभर सेट ठोकणं हा कार्यक्रम चाले. टेकस (छोटे खिळे) तोंडात दाबून हातोडय़ानं फ्लॅट्स ठोकत बाबाची सेट लावण्याची कवायत होत असे. बाबाला सगळी मेजरमेण्ट्स आपसूकच कळायची. कुठलाही कागद, ड्रॉइंग वगैरे काहीच नाही. रात्री हसत-खिदळत हे काम चालायचं. मग कुणीतरी जाऊन राजवाडय़ाहून पोहे आणेल, कचोऱ्या आणेल. नुसता धिंगाणा. बाबा आपल्या सेटची प्रॉपर्टी ‘बेग, बॉरो, स्टील’ काहीही करून आणे, पण सेट उत्तम लागला पाहिजे, हे त्याचं तत्त्व असे.

‘‘बास, वकील साहबके घर पे एक लेदरका सोफा है.. वो लगायेंगे सेटपर..’’

‘‘पण बाबा हे कसं होईल?’’ यावर बाबाचं उत्तर, ‘‘करू ना बास.’’ काय करायचा कोण जाणे, पण स्वत: वकील साहेब तो सोफा उचलून आणत अन् तो सेटवर ठेवत असत. आणि बाबा मिश्कील हसत आमच्याकडे पाहत डोळा मारीत म्हणायचा ‘‘डायरेक्ट जज साहेब से फोन लगवाया ना बास!!’’
सगळय़ांवर हवं तेवढं हसून घेणारा बाबा प्रयोगाच्या तासभर आधी एकदम वेगळा व्हायचा. ’‘सहा वाजता शार्प मेकअप करून रेडी होऊन सेटवर पाहिजे बास सगळे.’’ अन् मग बाबा नटराजाची पूजा करीत असे. कुठलेही मंत्रोच्चार नाहीत. आवाज नाही. फक्त उदबत्ती आणि धूप यांचा दरवळ. बाबा ती उदबत्ती घेऊन सेटच्या कानाकोपऱ्यात जाई. मग सगळे एकमेकांना ‘ऑल द बेस्ट’ म्हणून बाबाच्या पाया पडून आपापल्या ‘एण्ट्री’वर जात. बिलकूल आवाज नाही. साउण्डवाला साउंडवर अन् बाबा स्वत: लाइटवर. पूजा इतकी मेडिटेटिव असायची की प्रत्येक जण आपापल्या रोलसाठी एकदम ‘तैयार’ व्हायचा.

एकदा दिल्लीत मी कथकलीच्या नटांना असेच मेकअपसाठी तासन् तास बसून तयार होताना पाहिलं होतं. अन् तेव्हा बाबाच्या पूजेची आठवण झाली. त्यानंतर मी बरीच वर्षे बऱ्याच ठिकाणी नाटक केलं, पण तशी पूजा कधीच अनुभवली नाही. धार्मिक नाही. फक्त रंगदेवतेच्या प्रेमाखातर केलेली ती एक आदरांजली.

इन्दौरला नाटकात लाइटच्या नावाखाली जेमतेम दोन डीमर्स आणि मोजकेच स्पॉट असत. पण बाबा त्या डीमसर्वंर राजासारखा बसायचा. अन् लाइट ऑपरेट करायचा. नटाच्या पॉजबरोबर त्याला स्पॉटमध्ये आणायचा किंवा संगीताच्या तालावर फेडआउट करायचा. बाबाच्या फेडआउटलाही टाळी पडायची. बाबा शौकीन होता. पण तो काळ एखाद्याच्या ‘शौकीन’ असण्याला व्यसन समजण्याचाही होता. बाबाला खरं व्यसन होतं नाटकाचं. नाटक व्हावं यासाठी तो काहीही करायला तयार असायचा.

एकदा आम्ही नागपूरला कुठल्याशा नाटकासाठी जायला निघालो होतो. तेव्हा बाबा आला आणि मला म्हणाला, ‘‘बास. तू मुंबईला जा. दहिसरला आपल्या नाटकाचे अमुक एक लेखक राहतात. त्यांनी नाटकाच्या परवानगीचं पत्र दिलं नाही. ते नाही मिळालं तर नाटक होणार नाही. त्यानं एका ट्रॅव्हल बसमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या बोनटवर माझी बसायची व्यवस्था केली. (त्या जागेला ‘बाल्कनी सीट’ म्हणत) आणि तो बाकीच्या ग्रुपला घेऊन नागपूरला निघून गेला. मी रात्रभर न झोपता सायनला उतरून ट्रेन घेऊन दहिसरला पत्ता विचारत-विचारत त्यांच्या घरी पोहोचलो तर दारावर टाळं. शेजारी-पाजारी विचारलं तरं त्यांचे कुणी नातेवाईक गंभीर आजारी असल्यामुळे ते हुबळीला निघून गेले होते. मोबाइल-फोन याचा तो काळ नव्हता. मी बाबा ज्या हॉटेलात उतरणार होता त्या हॉटेलात फोन करून त्याला हे सांगितलं. त्यानं लेखकाचा हुबळी येथील नंबर मिळवून त्यांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘मी कागद सही करून घरात ठेवला आहे, पण तातडीनं निघाव लागलं.’’ घराची किल्ली ते तुळशीच्या कुंडीत ठेवून निघाले होते. बाबानं मला फोन करून हे सांगितलं. पण शेजारचे लोक मला दार उघडू देईनात. पुन्हा लेखकाला फोन केला तर ते फोन उचलेना.. मग बाबानं पोलिसांत कुणाला तरी फोन केला. लोकल पोलीस इन्स्पेक्टर आले आणि त्यांच्या देखत मी दार उघडून आत गेलो. टेबलावरचा तो सही केलेला कागद उचलला आणि तातडीनं नागपूरला निघालो. प्रयोगाच्या दोन तासआधी कसाबसा पोहोचलो. बाबानं पत्र घेतलं आणि पुढे शासनाला पाठवलं. मला वाटलं, शाबासकी मिळेल. पण बाबा म्हणाला, ‘‘तेरेको म्युझिक आपरेट करना है बास. वो म्युझिक आपरेटवाला बिमार है.’’

मला असं वाटतं, आज मी जो काय घडलो आहे ते बाबासारख्या लोकांनी विश्वासानं टाकलेल्या जबाबदारीमुळेच. पुढे मग मी स्वत:च नाटक दिग्दर्शित करायचं ठरविलं. बाबानं दुसऱ्या नाटकात छोटे-छोटे रोल्स मला आणि संतोषला दिले होते. पण आम्हाला आमचं काहीतरी करायचं होतं. बाबाला सांगायची हिंमत नव्हती. सगळे म्हणत- त्याला विचारलं तर तो नवं नाटक करायला नाही म्हणेल किंवा तुम्हाला ग्रुपमधून काढून टाकेल. मग आम्ही तसंच घाबरून, लपून काम करीत होतो. बाबाची तालीम न चुकवता आपली तालीम वेळ जुळवून करत असू.

नाटक तयार झालं. प्रयोगाचा दिवस जवळ आला. बाबाला सांगायची आमच्यात हिंमत नव्हती. खूप गिल्टी वाटत होतं. पण नाटकाचा सेट लावत असताना अचानक ट्रकचा हॉर्न वाजला. लुनावर बाबा गोरे थिएटरमध्ये हजर झाला होता. कुणाशी काहीही न बोलता आत आला. खिळे उचलले, हातोडी घेतली अन् सरळ सेट लावायला लागला. मी बाबाजवळ गेलो. त्यानं माझ्याकडे न बघता मला म्हटलं. ‘‘घोडी खेच! बास. पूर्ण मेजरमेण्ट चुकलंय. बाजूच्या २०-२० सीट्सला नाटक दिसायचं नाही.’’ एक जोरदार शिवी हासडून बाबा कामाला लागला होता.

पुढे मी ‘एनएसडी’मध्ये गेलो. बाबाला माझा प्रचंड अभिमान, सगळीकडे मिरवायचा, सांगायचा, ‘‘अपना लडका एनएसडी गया है बास.’’ मी त्याला सांगितलं, ‘‘आम्ही २५-२५ डीमसर्वंर लाइट ऑपरेट करतो.’’ त्यावर त्याचे विस्फारलेले डोळे मला अजून आठवतायत.

‘‘एक नाटक उधर करना है बास.’’ पण ते काही जमलं नाही. मी दिल्लीत असताना बाबाची तब्येत खालवत गेली. तो दरवर्षी नाटकाबरोबर दिल्लीत यायचा. मी भेटायला जायचो. एकदा माझ्याजवळ माझ्या एका मित्रानं फॉरेनमधून आणलेलं ‘झिप्पो लायटर’ होतं. बाबा लहान मुलासारखा मागे लागला.

‘‘बास, कितीपण महाग असलं तरी चालेल, पर ये लाईटर चाहिये.’’ मी त्याला प्रॉमिस केलं की ‘इन्दौरला येईन तेव्हा मी ते लायटर घेऊन येईन.’ मग ते विसरून गेलो. पण बाबा जिथं भेटेल तिथं विचारायचा, ‘‘बास, लायटर?’’ मी ते लायटर काही नेलं नाही. एक दिवस संतोषचा फोन आला- ‘‘बाबा गया..’’

माझ्या तोंडातून एकच वाक्य निघालं, ‘‘अरे मी लायटर आणणारच होतो.. पण..’’

बाबा कशामुळे गेला या खोलात मी नाही जात. पण इन्दौरी भाषेत बोलाल तर बाबा खरा ‘हवाबाज’ होता. पोलीस म्हणा, राजकीय लोक म्हणा सगळीकडे त्याची ओळख होती. अन् ती मिरवायची त्याला हौसपण होती. जो कुणी नाटक करायला नाही म्हणेल, त्याला ‘लाल दिव्याची गाडी पाठवून घेऊन येऊ ना बास’ असं म्हणायचा. आमच्या अभय बर्वेच्या भाषेत सांगायचं तर बाबाला कुणी विचारलं की ‘‘बाबा तुझ्या गळय़ातलं ते रुद्राक्ष चांगलं आहे.’’ तर बाबा म्हणेल, ‘‘डायरेक्ट शंकरानं दिलं ना बास. बोला ये ले बास, तेरेको सूट होता है.’’

मला खात्री आहे की देवानं आपलं खासगी विमान पाठवून त्याला बोलावून घेतलं असेल.. आणि बाबा आपल्या ट्रकचा हॉर्न वाजवून स्वर्गातसुद्धा नाटकासाठी नट गोळा करीत असेल. ‘‘अप्सरेच्या रोलसाठी डायरेक्ट मेनका को कास्ट किया न बास!’’

swanandkirkire04@gmail.com