माझी एक मैत्रीण एकदा मला म्हणाली, ‘तुला तिघा-चौघांची मोट बांधायला आवडतं.’
‘म्हणजे काय?’ बुचकळ्यात पडून मी विचारलं.
‘काहीतरीच..’ मी जरा फणकाऱ्याने म्हटलं. पण नंतर जरा विचार करू लागले तेव्हा तिचं म्हणणं पटलं. खरंच की! ‘चष्मेबद्दूर’ या माझ्या सिनेमात तीन सडेफटिंग एका खोलीत राहतात. त्यानंतर माझ्या अगदी अलीकडे लिहिलेल्या ‘आलबेल’ या नाटकात खुनाचा आरोप असलेले तीन कैदी. ते एका कोठडीत डांबलेले आहेत. त्यातल्या एकाने आपल्या मुलीनं केलेला गुन्हा स्वत:वर घेतला आहे; एकाने नको ते दृष्टीस पडल्यामुळे रागाच्या भरात बायकोचा खून केला आहे; तर तिसरा चक्क धंदेवाईक मारेकरी आहे. आणि ‘माझा खेळ मांडू दे’मधल्या या ‘ईना, मीना, डिका.’ ..म्हणजे या आरोपात काहीतरी तथ्य आहे तर! एखादं
या तिघींची तीनपदरी कथा बरीचशी गतयुगात घडते. त्या घटनांचं तोंडी वर्णन कंटाळवाणं झालं असतं. फ्लॅशबॅकचा वापर दोन ठिकाणी केला होता. सगळेच प्रसंग या तंत्राने सांगण्यासारखे नव्हते. ऊ.श्.ऊ.चा वापर अद्याप सुरू व्हायचा होता. एक तोडगा निघाला. स्लाइड्स! काही ठळक घटनांचे आम्ही बोलके आणि अव्वल दर्जाचे फोटो काढून घेतले. पडद्यावर दाखवलेल्या या फोटोस्लाइड्स शब्दांच्या पलीकडचं असं बरंच काही सांगून गेल्या. वेडय़ांच्या इस्पितळात मामी, त्यांनी केलेला आपल्या पाशवी सासऱ्याचा खून, स्टंटमॅन डेव्हिडचे विक्रम, त्याचा झालेला अपघाती मृत्यू, आपल्या तान्ह्य़ा बाळासह रिबेका- असे अनेक प्रसंग या चित्रणामुळे जिवंत झाले. नाटकाची गंभीर प्रतिमा जरा उजळली.
नाटक शब्दबंबाळ किंवा घनगंभीर होऊ नये म्हणून करमणूकप्रधान प्रसंग मी ठिकठिकाणी पेरले होते. मामींच्या खोचक विनोदाव्यतिरिक्त रिबेकाच्या खोडकर लीला पण अतिशय वेधक ठरल्या. मामी, पद्मिनी, सेवा (आणि प्रेक्षक) यांना हसवणाऱ्या. तिची जाहिरातबाजीवरची ‘टिंगलिका’ खूप लोकप्रिय झाली. कारण अगदी सराईत मॉडेलच्या थाटात ती पेश केली जाई.
रिबेका : मेरे लंबे, घने, रेशमी बालों का रखवाला-
है खुशबूदार श्ॉम्पू शिकेला.
ऊ लाला, शिकेला.. शिकेला.. शिकेला!!
मामी : फ्याशनेबल बायांसाठी बरं ही थेरं.
रिबेका : गृहिणींसाठीसुद्धा खूशखबर आहे बरं का!
(आवाज बदलून) अगं सुशीला, तू उदास का बरं?
(आवाज बदलून) काय सांगू प्रमिला? माझा स्वयंपाक अगदी बेचव होतो बघ. म्हणून पतिदेव नाराज, आणि मुलं दुर्मुखलेली असतात. तुझ्या सुग्रणपणाचं रहस्य तरी काय?
(आवाज बदलून) हात् वेडे. अगदीच सोपं. माझ्या सुग्रणपणाचं रहस्य ‘पतंग छाप हिंग.’ वापरायला लागल्यापासून माझा संसार सुखाचा झाला. ह्य़ांना नोकरीमध्ये बढती मिळाली. आणि रोहनचा वर्गात पहिला नंबर आला.
तुमच्या यशाचा पतंग, मारी भरारी उत्तुंग
नेहमी ठेवा संग, पतंग छाप हिंग..
नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. संतोषने मॅनेजमेंटमध्ये मदत म्हणून जोडीला छोटू आजगावकरला घेतलं होतं. दोघेजण तारखा मिळवणं, परवानग्या काढणं, जाहिराती देणं, सामग्री, सुतार, मेकअप, रेकॉर्डिग, फोटो, इ. तपशील ठरवणं या उद्योगाला लागले. मी तालमी, सेट, संगीत, पोशाख यांच्यात गुंतून गेले. म्हणजे खरं तर ‘निर्माती’ म्हणून माझ्या कार्यशैलीत फारसा बदल जाणवला नाही.
शनिवार, २७ सप्टेंबर १९८६ रोजी गडकरीला शुभारंभाचा प्रयोग झाला. अपेक्षेप्रमाणे प्रेक्षागृह गच्च भरलं होतं, आणि लोकांनी भरभरून दाद दिली. कलाकार, संगीत, प्रकाशयोजना सगळ्याचं वारेमाप कौतुक झालं. फक्त
संतोष आणि छोटूने माना डोलावल्या. पण पुन्हा तेच. येरे माझ्या मागल्या. संतोष मला तिकीट विक्रीच्या खिडकीपाशी घेऊन गेला. लोकांची झुंबड उडाली होती. तिकिटं भराभर संपत होती. पण वेळ होऊन वर वीस मिनिटं झाली होती.
‘तत्काळ तिसरी घंटा दे..’ मी ठामपणे म्हटलं.
‘पण मॅडम, लोक परत जातील.’ संतोष काकुळतीला येऊन म्हणाला.
‘जाऊ देत! उद्या परत येतील- आणि वेळेवर येतील.’
वक्तशीरपणाचा हा लढा मी सपशेल हरले, हे इथे जाहीरपणे कबूल करायला हवं. संतोष आणि छोटू नाना क्लृप्त्या करून मला गुंतवून ठेवत. मुहूर्ताची वेळ टळून जात असे. लोक शेवटपर्यंत तिकिटे विकत घेत असत. अगदी आरामसे. संतोष एखाद्या घारीप्रमाणे विक्रीच्या खिडकीभोवती घिरटय़ा घाली. पडदा उशिरा वर जाई. गंमत म्हणजे या गोष्टीचा फक्त मलाच त्रास होतो असं माझ्या लक्षात आलं. सहनशील प्रेक्षकांची फारशी तक्रार नसे. हां, आता अगदीच वीस मिनिटं, अर्धा तास उलटून गेला तर हॉलमध्ये थोडी चुळबूळ सुरू होई. पण ‘शी! काय हे? किती उशीर?’ यापलीकडे फारशी तक्रार जात नसे. मग मी माझा आग्रह (दुराग्रह?) आवरता घेतला. पाण्यात राहून माशाशी वैर कशाला?
संतोष एक मजेदार आठवण सांगतो. एकदा आडवार असूनही दीनानाथला प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ गेला. अतिशय उत्साहाने संतोष हिशेबाचा तपशील घेऊन माझ्याकडे आला. ‘हाऊसफुल्ल’ या मथळ्याखाली त्याने छान रेघ ओढली होती. पण माझी काकदृष्टी तिसरीकडेच गेली. ‘काय रे?’ मी म्हणे विंचू चावल्यागत ओरडले, ‘तू दीनानाथचा ‘दी’ ऱ्हस्व कसा काढतोस? ‘दिनानाथ’ नाही ‘दीनानाथ’! आपल्या जंत्रीमध्ये अशी अशुद्ध नोंद कशी चालेल? जा. पुन्हा नीट लिहून आण.’
नाटक खूपच छान चालले होते. दिल्लीला दोन प्रयोग गाजले. एक मंझर नाटय़महोत्सवात आणि दुसरा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सुप्रसिद्ध वसंतोत्सवात!
त्यावर्षीचे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक- सुवर्णपदक ‘माझा खेळ मांडू दे’ला मिळालं. हा खरोखरच मानाचा तुरा होता. मग काय विचारता? चांगले चालणारे नाटक दौडू लागले.
पुण्याला एक प्रयोग झाला. तो कुठल्याशा संस्थेला दिलेला होता. त्याला एवढी गर्दी लोटली, की बऱ्याचजणांना परत जावे लागले. परत गेलेल्या प्रेक्षकांसाठी दुसऱ्या दिवशी आणखी एक प्रयोग करण्याचा आम्हाला आग्रह झाला. अडचण अशी होती, की कारखानीसांची भूमिका करणाऱ्या शशिकांत शिर्सेकरांचा मुंबईला ‘सीमेवरून परत जा’ या नाटकाचा प्रयोग होता. सकाळी. आमच्या प्रयोगाची वेळ दुपारची होती. संतोषने हिशेब केला. आमच्या नाटकात कारखानीस मध्यंतरानंतर एंट्री करतात. म्हणजे सकाळचा प्रयोग आटपून तडक टॅक्सीत बसलं तर मध्यंतरानंतरची एंट्री गाठणे शक्य होते.
आमचा प्रयोग सुरू झाला. कारखानीसांचा पत्ता नाही. पहिला प्रवेश झाला. दुसरा झाला. मध्यंतर झाला. कारखानीसांचा पत्ता नाही. मग संतोषने आमचा बॅकस्टेज पंटर ज्ञानेश्वर काळे याला पढवलं. ऑफिसच्या कामाचा लखोटा त्याच्या हाती दिला. ज्ञानेश्वर ऑफिसचा शिपाई म्हणून स्टेजवर अवतरला. त्याला पाहून स्टेजवरच्या तिघी प्रचंड बावचळल्या. त्यांना काहीच कल्पना नव्हती. ज्ञानेश्वरने लखोटा पद्मिनीच्या हातात दिला. ‘वाचा’ म्हणाला. आत कागदावर कारखानीसांचे संवाद लिहिलेले होते. प्रचंड अवधान ठेवून ते ज्योतीने मोठय़ाने वाचले. वेळ कशीतरी निभावून गेली. ज्ञानेश्वरने कडक सलाम ठोकून स्टेजवरून एक्झिट घेतली आणि त्याचक्षणी शिर्सेकर मेकअपरूममध्ये हाश्हुश् करीत पोहोचले.
मला विचारलं जातं की, ‘माझा खेळ मांडू दे’ या नाटकाचा शेवट गोड आहे, की ते शोकान्त आहे? उत्तर कठीण आहे. कारण या नाटकात तीन नायिका आहेत, आणि तिघींच्या तीन तऱ्हा होतात.
रिबेकाबरोबर काम करणारा फोटोग्राफर टोनी तिच्यावर प्रेम करतो. तिला तो लग्नाची मागणी घालतो. तिलाही तो आवडतो, आणि म्हणूनच आपल्या डागाळलेल्या गतआयुष्याचा त्याला विटाळ होऊ नये यासाठी ती झटते. आपले अनौरस मूल आणि ब्लॅकमेल करणाऱ्या गोवर्धनचा ससेमिरा या गोष्टी ती टोनीपासून लपवून ठेवते. लग्नाला नकार देणारे पत्र ती त्याला द्यायला मामींकडे जाते, आणि स्वत: बाहेर निघून जाते.
(मामी टोनीच्या हातात पत्र देतात. ते लिफाफ्यातून काढून तो वाचतो. त्याचा चेहरा उतरत जातो. मामी बाजूला उभ्या आहेत. टोनी जायला वळतो.)
मामी : थांबा! मला तुमच्याशी बोलायचं आहे.. रिबेकाच्या संबंधात. (टोनी वळतो.) त्या पत्रात काय आहे, ते ठाऊक आहे मला.. चोरून वाचलं मी. तुमच्या भानगडीत मी नाक खुपसते याचं नवल वाटत असेल तुम्हाला.
टोनी : हो.
मामी : दोन कारण आहेत. एक तर मला सवय आहे लोकांच्या उठाठेवी करायची.. आपपरभाव नाही.
टोनी : हे पहा, माझी मन:स्थिती..
मामी : आणि दुसरं म्हणजे मला ती पोरगी फार आवडते. भावनेच्या आहारी जाऊन स्वत:चं नुकसान करते आहे, ते पाहवत नाही मला. तिचा पण तुमच्यावर जीव आहे बरं.
टोनी : म्हणून हा नकार?
आणि मग मामी टोनीला रिबेकाची इत्थंभूत कथा सांगतात. स्लाइड्सचा इथे प्रभावी वापर केला आहे. आणि जोडीला काळजाला भिडणारे संगीत आहे. मामी टोनीला दोन दिवस थांबून निर्णय घेण्याचा सल्ला देतात. पण टोनीचा निश्चय पक्का आहे. ‘तिच्या आयुष्यात यापूर्वी काय घडलं, त्याच्याशी मला कर्तव्य नाही. तिचा इतिहास मागे राहिला. पुढे आहे ते भविष्य. तिचं. माझं. दोघांचं.’ तर रिबेकाची सुखान्तिका आहे.
पद्मिनीचा ऑफिसमधल्या कारखानीसांबरोबर स्नेह जुळला आहे. पण त्यांच्या प्रीतीचा मार्गही खडतर आहे. कारखानीसांची सतरा वर्षे अंथरुणाला खिळलेली बायको आत्महत्येचा प्रयत्न करते. पण रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये झटून तिला वाचवलं जातं. शय्येला जखडलेलं तिचं जीवन पूर्ववत चालू राहतं. आणि मग एक दिवस अचानक पद्मिनीला भेटायला खोलीवर कारखानीस येतात.
पद्मिनी : अचानक कसे आलात?.. काही विशेष?
कारखानीस : हो विशेषच.. मी तुला न्यायला आलो आहे.
पद्मिनी : मला न्यायला? कुठे?
कारखानीस : घरी. माझ्या घरी.
पद्मिनी : काहीतरीच काय! मी तुमच्या घरी कशी येणार? हॉस्पिटलची गोष्ट वेगळी होती. तेव्हा त्या शुद्धीवरही नव्हत्या.
कारखानीस : आता आहे! तिनंच पाठवलं आहे मला. तुला आणायला.
पद्मिनी : मी- मी समजले नाही.
कारखानीस : तिला सगळी कल्पना आहे आपल्याबद्दल.
पद्मिनी : म्हणूनच त्यांनी-
कारखानीस : नाही. तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला परावलंबनाला कंटाळून.. मला मोकळं करायचा उद्देशही असेल कदाचित. सुरुवातीला तिला- आणि मला आशा होती. हौसेचा संसार मांडू म्हणून.. पण तसं झालं नाही. तिनं मनानं मला कधीच सोडचिठ्ठी दिली होती. कदाचित याआधी तू-
पद्मिनी : जर आणि तर.. केवळ स्वप्नरंजन. निष्फळ.
कारखानीस : नाही. पुढेमागे आपण लग्न करणार आहोत. हा हक्काचा थोडा वेळ का वाया दवडायचा? बी प्रॅक्टिकल. आपलं सहजीवन सुरू करायला काय हरकत आहे?
पद्मिनी : सहजीवन? तुम्ही, मिसेस कारखानीस आणि मी?
कारखानीस : तिची इच्छा आहे तशी.
पद्मिनी : आणि माझ्या इच्छेचं काय?
कारखानीस : पद्मिनी, मला वाटलं, तुझं माझ्यावर-
पद्मिनी : आहे. म्हणूनच रखेलीसारखं राहणं मला मानवणार नाही. आपण दोघंही विवाहित आहोत-
कारखानीस : कागदोपत्री- ठीक आहे. येतो मी. तू विचार कर. (जातात.)
पद्मिनी दोन दिवस थांबून जुगार खेळायचा निर्णय घेते; आणि सेवाचा आणि मामींचा निरोप घेऊन आपले सामान घेऊन खोली सोडते. एका नव्या भवितव्याला सामोरी जाते.. एका धूसर प्रश्नचिन्हामध्ये विलीन होते.
आपल्या तरुण सख्यांना सहचर मिळाल्याचा मामींना प्रथम मनापासून आनंद होतो. पण हळूहळू त्यांना स्वत:च्या एकलेपणाची जाणीव पोखरू लागते. भूतकाळामधली श्वापदं एकेक करीत पुन्हा मोकळी सुटतात. मामींचा तोल डगमगू लागतो. आणि मग रेडिओवर सुहाग रात्रीचं दुष्ट गाणं सुरू होतं. मामी बिथरतात. पिसाट हसत विणलेली लेस उसवू लागतात. हळूहळू प्रकाश मावळतो.
स्टेजवर स्पॉटलाइटमध्ये सेवाताई उभ्या आहेत. त्या फोनवर बोलताहेत.
सेवा : हॅलो.. नारी सहायक समिती? मी सेवा श्रॉफ. माझ्याकडे आता तीन पेइंग गेस्ट्ससाठी जागा आहेत.. हो, हो.. गरजू आणि असहाय अशाच स्त्रियांना इथे निवारा मिळतो.
‘माझा खेळ मांडू दे’(भाग-२)
माझी एक मैत्रीण एकदा मला म्हणाली, ‘तुला तिघा-चौघांची मोट बांधायला आवडतं.’ ‘म्हणजे काय?’ बुचकळ्यात पडून मी विचारलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-07-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director sai paranjpyes hugely acclaimed films plays