बुद्धिबळात प्रसिद्ध खेळींची वैचित्र्यपूर्ण नावे आहेत. त्यांचा वापर दोन बुद्धिबळ खेळणाऱ्यांच्या संभाषणात सुरू असला, तर तिसऱ्याला ती अगम्य भाषा वाटू शकते. ‘ड्रॅगन व्हेरिएशन’ या नावातील ड्रॅगनचा त्या चिनी ड्रॅगनशी काहीएक संबंध नाही. गायनाकोलॉजिस्टचा जेवढा गायनाशी संबंध तेवढाच ‘गायको पियानो’ या खेळीचा गायन आणि वाद्याशी आहे. बुद्धिबळातील खेळींच्या नावांच्या सुरसकथांवर आज चर्चा..

कधी बुद्धिबळ प्रशिक्षक आणि खेळाडू यांचा संवाद ऐकला आहे का? किंवा दोन चांगल्या बुद्धिबळपटूंना एकमेकांशी खेळाविषयी चर्चा करताना ऐकले आहे का? त्यांच्या संभाषणात ‘स्पॅनिश’, ‘सिसिलियन’, ‘मॅरॉक्झी बाईंड’ असे अगम्य शब्द येत असतात आणि ज्याला बुद्धिबळाचा गंध नाही त्यालाही ‘ओपनहाइमर’ आणि ‘आईन्स्टाईन’ यांच्यामध्ये चाललेली अणुशास्त्राविषयीची गहन चर्चा वाटण्याचा संभव आहे. असा प्रसंग पालकांवरही येतो. प्रशिक्षक फोनवर विचारतो, ‘‘तुमचा मुलगा हरला? काय ओपिनग झाले?’’ मग रडणाऱ्या मुलाकडून उत्तर आले की पालक सांगतात, ‘‘सिसिलिअन डिफेन्स.’’ पुढचा प्रश्न येतो, ‘‘कोणते व्हेरिएशन?’’ आधीच मुलाच्या रडण्याने कावलेले पालक आणखीनच मेटाकुटीला येतात. मुंबईतीलच काय, पण जगात सगळीकडे असे प्रसंग बघायला मिळतात.

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक

हेही वाचा – आदले । आत्ताचे: एका पिढीच्या अवस्थांतराची नोंद

यावरून एक गंमतही झालेली मला आठवते. मागे एकदा गॅरी कास्पारोव्हचं रशियन राजकारणाविषयीचं व्याख्यान इंडिया टुडेच्या दिल्ली येथील चर्चासत्रात होतं. मला त्याचं निमंत्रण होतं आणि मी व्याख्यानाला पोचलो त्या वेळी मला (त्या वेळच्या) उगवता ग्रँडमास्टर परिमार्जन नेगीच्या वडिलांचा फोन आला. परिमार्जनला त्याचं दैवत गॅरी कास्पारोव्हला भेटायचं होतं. पण त्यांच्याकडे प्रवेशिका नव्हती. मी इंडिया टुडेची क्रीडा संपादक शारदा उग्राला गाठलं आणि तिला म्हटलं की, परिमार्जनला गॅरीला फक्त भेटायचं आहे. ती क्रीडा विभाग सांभाळत असल्यानं तिला परिमार्जन माहीत होता. मी गॅरीशी परिमार्जनची ओळख करून दिली आणि यजमान शारदा आणि तिचा फोटोग्राफर यांना तेथे सोडून आत गेलो. थोड्या वेळानं शारदा धावत आत आली आणि मला म्हणाली की, ‘‘ते दोघे अगम्य भाषेत बोलत आहेत आणि मधेच गॅरी मला माझं मत विचारतो आहे. मी कशीबशी सुटका करून पळून आले आहे. तुम्हीच आमच्या वतीनं तिकडे जा आता.’’

बुद्धिबळाच्या डावाच्या सुरुवातीच्या प्रकाराला वेगवेगळी अनेक नावं असतात. ती सगळी प्याद्यांच्या रचनेवर अवलंबून असतात. ही नामावली खेळाडू किंवा गावं, प्रदेश यांच्यावर ठेवलेली असतं. उदाहरणार्थ, ‘पॅनोव्ह हल्ला’, ‘सिसिलिअन बचाव’, ‘बुडापेस्ट गँबिट’. आता हा ‘गँबिट’ प्रकार म्हणजे एक लालूच असते. खेळाडू आपलं एखादं प्यादं स्वत:हून बळी देतो जेणेकरून ते खाल्ले की देणाऱ्या खेळाडूला प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करायची संधी मिळते; गेलाबाजार वरचष्मा तरी मिळतोच. आता या सगळ्यात सर्वात जुनं नाव कोणतं असेल? ते आहे ‘पाँझियानी ओपिनग’. १४९७ सालातील पुस्तकामध्ये या ओपिनगचं नाव आढळतं. बुद्धिबळाची कला आणि त्यावरील प्रेमाची पुनरावृत्ती नावाच्या हस्तलिखितामध्ये हा उल्लेख आढळतो. लुसियाना नावाच्या लेखकानं हे लिहिलं होतं. लुसियानाच्या नावानं डावाच्या अंतिम भागातील पोझिशन प्रसिद्ध आहे. मात्र बुद्धिबळपटूंचाही गैरसमज होईल की ‘पाँझियानी ओपिनग’ हे ‘डोमिनिको लॉरेन्झो पाँझियानी’ या खेळाडूच्या नावावर आधारित आहे. पण हा खेळाडू त्यामानानं अलीकडचा म्हणजे १८व्या शतकातील आहे.

दुसरं येतं रुई ‘लोपेझ’ ऊर्फ ‘स्पॅनिश ओपिनग’. रुई लोपेझ हा एक ख्रिश्चन धर्मगुरू होता. त्याला लुसियानाचं हस्तलिखित आवडलं नाही म्हणून त्यानं नवीन पुस्तक लिहिलं आणि नव्या प्रकारच्या ओपिनगची शिफारस केली. हेच ते स्पॅनिश अथवा रुई लोपेझ नावाचे ओपिनग- जे आजही सर्वत्र खेळले जाते. या रुई लोपेझ ओपिनगमध्ये अनेक खेळाडूंनी आपापल्या परीनं भर घातली होती आणि ते उपप्रकार त्यांच्या नावानं प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, मॉर्फी, कार्पोवचा साहाय्यक झैत्सेव, पहिला विश्व विजेता स्टाइनिट्झ इत्यादी इत्यादी. पण सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट आहे ती अमेरिकन विजेत्या फ्रँक मार्शलची. त्या वेळचा जगज्जेता जोस राउल कॅपाब्लांका हा खंबीर खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याला हरवणं हे प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचं ध्येय बनलं होतं. फ्रँक मार्शलनं रुई लोपेझ ओपिनगमध्ये दिवसरात्र अभ्यास करून एक आक्रमक पद्धत शोधून काढली होती. काळ्या सोंगट्यांकडून खेळून आपण कॅपाब्लांकाला पराभूत करायचं यासाठी तो तब्बल १३ वर्षे वाट बघत होता. बाकी कोणाही विरुद्ध त्यानं ती पद्धत वापरली नव्हती. अखेर ती वेळ आली. कॅपाब्लांकाविरुद्ध मार्शलनं प्याद्यांचा बळी दिला. या ठिकाणी कॅपाब्लांकाला काय वाटत होतं? त्यानं स्वत:च लिहून ठेवलं आहे. ‘‘मार्शलनं अचानक एका प्याद्याचा बळी दिला. माझ्या लक्षात आलं की त्यानं या प्रकारचा बारकाईनं अभ्यास केला आहे. माझ्यापुढे दोन पर्याय होते- त्या प्याद्याचा बळी न स्वीकारणं किंवा ते प्यादं स्वीकारून पुढच्या अग्निदिव्यास सामोरं जाणं. मी जगज्जेता आहे आणि त्यामुळे मी आव्हान स्वीकारण्याचं ठरवलं.’’ आणि एका महान डावाचा जन्म झाला. मार्शलने त्याच्याकडील सर्व मोहरी पांढऱ्या राजावर सोडली आणि कॅपाब्लांकाने आपला राजा किल्ल्यातून बाहेर काढून भर युद्धभूमीतून सुखरूप पळवून नेला. मार्शलचा भले पराभव झालेला असो, पण त्याच्या प्याद्याचा बळी ‘मार्शल गँबिट’ नावानं आजही खेळला जातो.

तुम्ही ‘इंडियन’ हे नाव पण वाचलं असेल की आज आनंद ‘निमझो इंडियन’ बचाव खेळाला किंवा नाकामुरा किंग्ज इंडियन बचावानं जिंकला. हा इंडियन प्रकार काय आहे याविषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत. १९२४ साली टारटाकोव्हर या प्रख्यात खेळाडूनं ‘INDISCH ’ नावानं एक पुस्तक लिहिलं त्यात पहिल्यांदा हा उल्लेख लेखी स्वरुपात आढळतो. पण कोक्रेन नावाचा एक खेळाडू १९ व्या शतकात भारतात येऊन गेला. त्याच्याशी महेश सुंदर नावाच्या खेळाडूनं घोडा आधी बाहेर काढून काळ्या सोंगट्यांकडून सुरुवात केली होती. त्यामुळे कोक्रेन युरोपमध्ये परत गेल्यानंतर त्यानं स्वत: त्या पद्धतीनं खेळायला सुरुवात केली म्हणून पांढऱ्यानं वजिराच्या प्याद्यानं सुरुवात केली आणि काळ्या सोंगट्यांकडून खेळणाऱ्यानं त्याला आपला राजाच्या विभागातला घोडा बाहेर काढून प्रत्युत्तर दिलं की काळा इंडियन पद्धतीनं खेळला असं म्हणायची प्रथा सुरू झाली असावी. मग अनेक उपप्रकारांचा जन्म झाला. निमझोवीच नावाच्या ग्रॅण्डमास्टरनं त्यात अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आणल्या आणि त्यामुळे त्या उपप्रकाराला ‘निमझो इंडियन’ असं नाव पडलं आणि आजही जागतिक स्तरावर हे ओपिनग खेळलं जातं.

अनेक नावं तर अनाकलनीय आहेत. काळ्या सोंगट्यांनी खेळणाऱ्यानं फक्त आपली प्यादीच एक एक घर हलवून सुरुवात केली आणि मोहरी मागे ठेवली तर त्याला ‘हिप्पोपोटॅमस’ बचाव असं नाव आहे. पाणघोडा जसा धाव घेण्यापूर्वी दबा धरून बसतो आणि नंतर अचानक हल्ला करतो तसं या ओपिनगचं आहे. ‘हॉलोवीन गँबिट’पण असंच! एका घोड्याचा अचानक बळी देऊन पांढरा काळ्याला गांगरवून टाकतो म्हणून हे नाव पडलं असावं. ‘गायको पियानो’ नावाचं एक प्रख्यात ओपिनग आहे. गायनाकॉलॉजिस्टचा जेवढा गायनाशी संबंध तेवढाच ‘गायको पियानो’चा गायकीशी आणि पियानोवादनाशी येतो. खरं तर हा इटालियन भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे शांत डाव. साधारणपणे नवखा खेळाडू या प्रकाराने डावाची सुरुवात करतो. यामध्ये भरपूर सापळे असल्यामुळे नावाप्रमाणे शांत न होता या सुरुवातीस पटावर तुंबळ युद्ध होतं. नुकतीच ११ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपदाची स्पर्धा जिंकलेला मुंबईकर अंश नेरूरकर खेळत असलेले ‘सिसिलियन’ बचावातील ‘ड्रॅगन व्हेरिएशन’ नावाप्रमाणेच आग ओकणारं आहे. परंतु या ड्रॅगनचा आणि चिनी ड्रॅगनचा काहीही संबंध नाही. यातील काळ्या प्याद्यांची रचना ड्रॅगन नावाच्या तारका समूहाप्रमाणे दिसते म्हणून त्याला ड्रॅगन असं नाव पडलं आहे. जरी हल्ली ग्रॅण्डमास्टर्स हा प्रकार खेळत नसले तरी आंतरराष्ट्रीय मास्टर्स आणि त्याखालच्या दर्जाच्या खेळाडूंमध्ये ड्रॅगन आवडीनं खेळलं जाणारं ओपिनग आहे.

माजी विश्वविजेता मिखाईल ताल याचे आवडतेबेनॉनी ओपनिंग’ खेळणं म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे. ‘बेन ऑनी’ या हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ आहे- माझ्या दु:खाचा मुलगा. यामागे एक कथा आहे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे एका मातेनं मरण्यापूर्वी नुकत्याच जन्मलेल्या आपल्या मुलाचं नाव बेनॉनी ठेवलं आणि प्राण सोडला. विजय अगदी हातातोंडाशी आलेला असताना अचानक आपल्या हातून घोडचूक होते आणि आपलीही त्या मातेप्रमाणे आनंदातून दु:खाकडे वाटचाल होते. बेनॉनी ओपिनग खेळणाऱ्यांची अशी हालत अनेक वेळा होते. ग्रँडमास्टर जॉन नन गॅरी कास्पारोव्हशी किंवा मिखाईल ताल जोनाथन पेनरोजविरुद्ध याच ओपिनगमध्ये हरले होते.

हेही वाचा – निवडू आणि वाचू आनंदे..

‘ओरँग उटॅन’ नावाचंही एक ओपिनग आहे. त्याची जन्मकथापण प्रसिद्ध आहे. १९२४ साली न्यूयॉर्क शहरात एक प्रख्यात स्पर्धा होऊन गेली. त्याच्या मधल्या सुट्टीच्या दिवशी खेळाडूंना सफरीसाठी ब्रॉन्क्समधल्या प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयात नेण्यात आलं होतं. तेथे नव्यानंच ओरँग उटॅन नावाचं माकड आणलं होतं. ही माकडाची जात हुशार मानली जाते. हे ऐकल्यावर ग्रँडमास्टर टारटाकोव्हरला राहवलं नाही. त्यानं त्या माकडाला विचारलं की उद्या ग्रँडमास्टर रिचर्ड रेटी विरुद्ध मी काय खेळू. त्यावर त्याला पिंजऱ्यातून 1.b4 असं ऐकू आलं (असं टारटाकोव्हर म्हणतो). दुसऱ्या दिवशी टारटाकोव्हर खरोखरच तोपर्यंत ग्रॅण्डमास्टर्सच्या स्पर्धेत न खेळली गेलेली ही खेळी खेळला आणि त्यानंतर त्याला चांगली परिस्थिती आली. परंतु टारटाकोव्हर हा त्या ओरँग उटॅनएवढा हुशार नसल्यामुळे डाव बरोबरीत सुटला.

माजी जगज्जेत्या अलेक्झांडर आलेखाइनच्या नावानं ‘आलेखाइन’ बचाव प्रसिद्ध आहे. स्वत: आलेखाइन हा बचाव चुकून खेळला होता अशी एक दंतकथा आहे. रात्री जास्त झाल्यामुळे आणि झोप कमी आल्यामुळे आलेखाइननं पटावर येता क्षणीच चुकून घोड्याला स्पर्श केला आणि अनाहूतपणे या बचावाचा जन्म झाला असं म्हणतात. पण त्यानं हा बचाव नंतर अनेक वेळा खेळला होता. त्यानंतर बॉबी फिशरनं या बचावानं बोरिस स्पास्कीला हरवलं होतं आणि अधूनमधून मॅग्नस कार्लसनपण हा बचाव खेळतो. त्यामुळे ही दंतकथाच असावी. अशा अनेक मनोरंजक गोष्टी बुद्धिबळातील ओपिनगच्या नावामागे दडलेल्या आहेत. बुद्धिबळ खेळाडूंप्रमाणे इतर वाचकांचंही या डावांच्या नावाच्या या सुरस रम्य कथा मनोरंजन करतील अशी आशा आहे.

gokhale.chess@gmail.com