आडवाटेला एक गाव होतं, तिथं शोषित शेतकरी राहात होता. अस्मानी आणि सुलतानी संकटाला कंटाळून तो शेतातच एका झाडाखाली रडत बसला असताना वरून पंतप्रधान, मंत्री आणि त्यांच्या बायका (सचिवासह) दौऱ्यावर जात होत्या. रडणाऱ्या शेतकऱ्याला पाहून पंतप्रधानांच्या बायकोला दया आली. तिने साहेबांजवळ हट्ट धरला.. की मला त्याला भेटायचंय. पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं- तो आपला विषय नाही. खालच्या लोकांच्या अशा अचानक भेटीगाठीचं खातं युवराजांकडे आहे. पण काही केल्या मॅडम ऐकेनात. मी आजपर्यंत महिला-लहान मुलं रडताना पाहिली. मोठा माणूस मी पहिल्यांदाच रडताना पाहातेय. पंतप्रधानांनी खूप समजावलं, अगं तो मोठा नाही सामान्य शेतकरी आहे आणि त्याला नेहमीच रडायची सवय आहे. मॅडम म्हणाल्या मग तर चलाच, तुम्ही नेहमी आम-आदमी, आम-आदमी म्हणता तो नेमका कसा असतो मला पाहायचाय आणि झुप्कन विमान खाली उतरले. रडणाऱ्या शेतकऱ्यास विचारले ‘रडतोस का?’ तेव्हा शेतकरी म्हणे, ‘पाऊस न्हाई, पाणी न्हाई, पिकल्या मालाला भाव न्हाई, आत्महत्या करायला पैसे नाही.’ मॅडमने त्याच्याकडे न्याहाळून पाहिले. त्याचे अंग ओले दिसू लागले. शेतकरी म्हणाला, ‘हे पावसाचं पाणी नसून मेहनतीने शरीरातून बाहेर पडते ते पाणी आहे. याला घाम म्हणतात. पण माझ्या घामाला किंमत नाही.’ मॅडमने साहेबांकडे पाहून विचारले.. ‘आपल्याकडे घामाला मार्केट नाही?’ साहेब, ‘आहे.’ मॅडम, ‘आपल्याकडे घाम जास्त पिकतो?’ साहेब, ‘नाही, सध्या आपण ऑफिस, घरांना एसी लावून बचतीचे धोरण अवलंबतोय. सध्यातरी आपलं यांच्या घामावर मस्त चाललंय. देशपण चालतो. म्हणून आपण यांचाच जास्तीत जास्त घाम काढायचं धोरण राबवतो. मॅडम, ‘पण उद्या दिवाळी, यांचे डोळे पुसण्यासाठी काय करायचं? बरं तूच सांग, तुझ्यासाठी आम्ही काय द्यावं?’ शेतकरी उठला, हात जोडले,‘ मागनं मह्य़ा रक्तात न्हाई. फक्त यंदा माझ्याकडून काही घेऊ नका.. खतावरची सबसिडी काढून घेऊ नका. माझ्या लेकराकून शाळा-कॉलेजची फिस घेऊ नका. दवाखाना घेऊ नका. माझ्या मालाचा टोल. लेव्ही. आडत टॅक्स. माझा माल बाहेर जात असनं त आडवायचं धोरण..’ शेतकरी बरंच काही सांगत व्हता. मॅडम खूश झाल्या, त्यांना शेतकऱ्याची दया आली. त्यांनी हे सगळं मंजूर करून आजून तुला काय द्यावं, हे विचारलं.. शेतकरी हात जोडून नम्रपणे म्हणाला ‘खरंच मला द्यायसारखे तुमच्या जवळ काहीच नाही. पण द्यायचाच असेल तर तुमच्या मालकांनी (नवऱ्यानी) माझा स्वाभिमान घेतलाय तेव त्याह्य़च्याकडं तसाच पडून हाई. तेवढा परत करता आला तर बघा.’ मॅडम म्हणाल्या, ‘अरे, ते तर स्वाभिमान जवळ ठेवू शकत नाही. स्वाभिमान बाळगणे प्रत्येक पक्षात निशिद्ध आहे. ते श्रेष्ठींनाही आवडत नाही.’ शेतकरी, ‘आमच्या लेकरायनं दारू कोंबडय़ावर मागच्याच इलेक्शनलाच दिलाय. मला माहित्ये साहेब बी तेव जवळ बाळगत न्हाईत.’ त्याचा प्रामाणिकपणा पाहून मॅडम अजूनच खूश झाल्या आणि त्यांनी शेतकऱ्याला दिवाळी बोनस जाहीर करा म्हणून सांगितलं. त्यासाठीचा निधी गोळा करताना कर्मचाऱ्यांनी न केलेल्या कामाचे सगळे पैसे परत करून दरवर्षी एक महिन्याचा पगार द्यायचा. अधिकारी आणि राज्यकर्त्यांनी जमवलेली बेकायदा संपत्ती वारस म्हणून शेतकऱ्यांना देताना विकासनिधी खान्याऐवजी शेतकऱ्यात वाटायचा. व्यापाऱ्यांनी साई-बालाजीऐवजी शेतकऱ्यांच्या झोळीत दान टाकायचं ठरलं. बोगस पावत्यांवर जमणारा पैसाही द्यायचा. उद्योजकांनी निवडणुका आणि पक्षाऐवजी शेतकऱ्याला निधी द्यायचं ठरलं. बँकांनी वसुल्या बंद करायच्या. कारखान्यांऐवजी शेतीला पाणी द्यायचं.. सकाळी लागणाऱ्या पेस्टपासून ते मसीटी मॅक्सपर्यंत सगळ्या (रात्री झोपताना) गोष्टीवर निर्यात बंदी आणून किमान आधारभूत किमतीच्या आत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायच्या.. म्हाडानं राहायला घर द्यायचं, स्कोडानं रानात जायला गाडी द्यायची.. खरं होईन का हे स्वप्न? हे सगळं स्वप्न होतं.. आहो पहाटचं स्वप्न खरं होतं म्हणतेत.. पण आता पस्तोर पहाटं झोपायलाच भेटलं नाही. कोंबडं आरडलं की उठायची सवय. कामाला लागायसाठी. कोंबडय़ायनं बी आमचे स्वप्न पूर्ण होऊ देले न्हाई. खरं तर आतापर्यंत राग यायचा कामासाठी कोंबडं मागनाराचा.. पण आता आदरच वाटायलाय. ज्या दिवशी कामासाठी सगळे कोंबडे खाऊन संपतेन त्या दिवशी आम्हाला निवांत झोप लागन.. असं पहाटचं स्वप्न पाहायला.. पण उद्या येनाऱ्या दिवाळीच्या आधीच ते पाहायचं. आमचं दिवास्वप्न ठरू नये म्हणून. चिन्ती वसे ते स्वप्नी दिसे म्हणतेत. त्याच्यामुळं आम्ही आता दिवसभर चांगल्या स्वप्नाचे क्लास लावनार हेत. अस्या गुरुजीचा शोध घेणं सुरू हे. अन् हो, दिवाळीच्या आधी अजून एक काम करायचंय. त्या वामनाला पण भांडायचंय त्वा आम्हाला तीन पावलं जागा माघितली, आम्ही देली. आता उसनं फेड. आम्हालाबी तीन हात जागा दे. त्याच्यासाठी आम्ही तुझ्या सोबत दोन हात करायला बी तयार हेत. त्वा आमच्या बळीकडून तीन पावलं जागा घेतली. बरं घेईनास का. पण तुला काय उपयोग झाला तिचा? तुला न मला अन् घाल कुत्र्याला झालं. मजा इंद्रान मारली. खरंतर तुम्ही बळीला हावा भरतभरत फुगीलं असनार. त्याच्यासाठी काही मानसं आवती भोवती पेरले असनार. फक्त बळीला हरबऱ्याच्या झाडावर चढवायला. बळीसारखा एक जबानी मानूस आख्ख्या दुनियात न्हाई. त्याच्या कानावर जाईन अस्या आवाजात चर्चा घडवून आनली असनार. बळीसारखा दानशूर जगात न्हाई. मग चार-दोन महिने फुटकळ गोष्टी मागून घेतल्या असल्यानं दानात. पुन्हा त्याचा गाजावाजा केला असनार. अन् मग अचानक एक दिशी गपकन् तीन-पावलं जागा मागितली असनार. अन त्या तीन पावलांचा अर्थ मंजी स्वर्ग, मृत्यू, पाताळ असा तुम्हीच सांगितला असनार. आधीच हवा मारून फुगील्याला आमचा पूर्वज भळभळला असनार दानशूराच्या यादीत चाललो म्हणून. वामनराव तुम्ही बळीला येडपटात गणती काढलं. पण इंद्रानं तुम्हाला तसंच केलं. त्याचा फायदा असला की तेव तुम्हाला धरतू. त्याच्या काही अंगलट आलं की, तुम्ही आठोतात. त्राहीमाम म्हणतु. अन् तुम्ही फुगंतात अन् त्या छंदीफंदीसाठी हकनाक चांगल्या मानसाला गड्डय़ात घालता अन् एखादा शुक्राचार्यासारखा हितचिंतक मधी पडला तर त्याचा डोळा फोडून बदनाम करता. अन् बळीला बी पुढं तुला इंद्र करीन म्हणून चाकलेट देता..मंजी पुन्हा लुच्चाच करणार ना? तुम्ही तरी काय केलं, एवढं राज्य इंद्राला देलं अन् बळीच्या दारात वाचमनकी करीत बसले.. त्याला कोन्ही फितवू न्हाई म्हणून. बरं त्याला पाताळात घातलं अन् त्याच्या वारसाला त्याच दिवशी नवे कपडे घालून, मोती साबनानं अंघूळ करायला लावून, घरातल्या ऐवजी घरावर दिवे लावायला लावले. बोंबलायच्या ऐवजी फटाके फोडतोत. तीरडीला बी तोरण बांधून दु:खाला आनंदात कनव्हट करायचं काम केलं. अन् रडायच्या ऐवजी गाणं गायला लावलंत. इडा-पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे.. आता कशाचं राज्य येनार. कालच तुमच्या इंद्रानं नवं भूसंपादन विधेयक मंजूर करून घेतलंय, आन्शीच्या ऐवजी आता साठ टक्केच संमतीची गरज हे. तुम्ही म्हणतान मला काय सांगता, पण देवा तुमचा नवा अवतार सगळ्यायला माहीत झालाय.. तुम्ही मीडियावाले, तुम्ही विचारवंत, तुम्ही अर्थतज्ज्ञ, तुम्ही समाजसुधारक, तुम्ही सल्लागार. तुम्हीच सांगता राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा फक्त सोळा का आठराच टक्के हे. मायच्या इमानदारीनं सांगा, मानसं जिवंत ठेवन्यात शेतीचा वाटा किती? इंद्राला हे समजून सांगा की रेल्वेला बजट हाई अन् शेतीला न्हाई. ते यंटम हेत. त्यांना काही कळत नाही. त्याह्य़ला फक्त निवडणुकीत दारूनं पैसे वाटायचं नियोजन येत आहो. नवीन गावाचे महिना-महिना रस्ते माहीत होत नाहीत, तर तीन महिन्यांत बदलनाऱ्या खात्यातलं काय कळत आसनं. वामनराव उद्या दिवाळी अन् ह्य़ा दळभद्रय़ायनं दाळ आयातीला अनुदान जाहीर केलंय. तेच पिकविनाराला देलं असतं तर फुकट शिजवून तोंडात घास घातला असता. ही दलालधार्जिनी संस्कृती बंद करा, आम्हालाबी सपनं हेत हो. ते पहान्यासाठी झोप लागन येवढं तर ताटात उरू द्या जेवणं..’
’‘१ंल्लॠ@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे
दिवा (ळी) स्वप्न
आडवाटेला एक गाव होतं, तिथं शोषित शेतकरी राहात होता. अस्मानी आणि सुलतानी संकटाला कंटाळून तो शेतातच एका झाडाखाली रडत बसला असताना वरून पंतप्रधान, मंत्री आणि त्यांच्या बायका (सचिवासह) दौऱ्यावर जात होत्या.
आणखी वाचा
First published on: 11-11-2012 at 11:25 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diva swapna diwali dreams