सॅबी परेरा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रिय मित्र दादू यास..
सदू धांदरफळेकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्तमानपत्राच्या संपादकीय विभागाच्या नाकावर टिच्चून मार्केटिंग डिपार्टमेंटवाले ऑनलाइन वेबसाइट्स, सुपरमार्केट आणि मॉलवाल्यांच्या भल्यामोठय़ा जाहिराती पेपरच्या पहिल्या पानावर देऊ लागले की आपल्याला कळते.. कुठला तरी सण येऊ घातलाय. वसुबारसला सुरू होऊन मोती साबण संपेपर्यंत पुरणारा दिवाळी हा तसा वर्षभरातला आपला सर्वात मोठा सण! त्यामुळे दिवाळीला खरं तर पेपरवाल्यांनी अग्रलेखाच्या जागी जाहिरातदारांच्या ‘सबसे सस्ता दिन’च्या जाहिराती छापायला हव्या होत्या. अजून तरी पेपरच्या मार्केटिंग टीमला त्यात यश आलेलं दिसत नाहीये. पण आपण आशा सोडू नये. कारण- मेरा देश बदल रहा है! मला खात्री आहे, वर्तमानपत्रं असोत की टीव्ही मीडिया- त्यांची मार्केटिंग टीम त्यांच्याच संपादकीय विभागाला एक दिवस घूस के मारेंगे.. क्यूं की ये नया इंडिया है!
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रकाशाचा सण. भेटीदाखल मिळणाऱ्या मिठाईचा, सुक्यामेव्याचा सण. सरकारी तसेच खासगी अधिकारपदावरील व्यक्तींना अधिकृतरीत्या लाच मिळण्याचा सण. मुंबईच्या बीईएसटीवाल्यांनी आणि महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी बोनससाठी संपाची धमकी द्यायचा सण! यंदा मात्र तशी कुणी संपाची धमकी दिल्याचं कानावर आलं नाही, म्हणून मी काल बसच्या कंडक्टरला विचारलं, ‘या वर्षी बोनस मनासारखा आणि वेळेत झाला की काय?’ कंडक्टर आपल्या व्यावसायिक मख्खपणाला जागून उदयनराजेंसारख्या बेफिकीरीत म्हणाला, ‘‘असेल!’’ त्यावर ‘Excuse me! I beg your pardon’ किंवा ‘will you please come again…’ इतके इंग्लिश शब्द खर्च न करता त्याच अर्थाचा ‘‘ऑ?’’ हा मराठी प्रतिशब्द मी वापरला. तेव्हा तो कंडक्टर (त्याच्या संतापाला सात्त्विकतेचे सोवळे परवडत नसल्याने) सामिष संतापाने बोलला, ‘अरे, हे मागच्या दोन-चार वर्षांत जितके टक्के बोनस देताहेत ना, तितक्या रिश्टर स्केलचा भूकंप आला तरी आपल्याला जाणवत नाही, मग खात्यावर बोनस जमा झाल्याचं काय xx जाणवणार आहे!’
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मलबार हिल किंवा पेडर रोडला राहणारा उमेदवार उपनगरातून निवडणूक लढवत असल्यासारखा मला फील येतो. म्हणजे बघ- वर्षभर दक्षिण मुंबईत राहणारी लक्ष्मी दिवाळीला वसई-विरारला किंवा कल्याण-डोंबिवलीला येते आणि म्हणते, ‘करा माझी पूजा. द्या मला मते! मी तुमचीच आहे. मला आपलं म्हणा!’ मला म्हणावंसं वाटतं, ‘बाई गं, आम्ही गिरगाव, दादरच्या चाळीतील आमच्या खोल्या गुजराती-मारवाडी बिल्डरला नाइलाजाने विकून या इथे उपनगरात येऊन पडलो तेव्हा का नाही म्हणालीस, मी तुमचीच आहे, मला आपलं म्हणा म्हणून?’ पण दादू, आपले संस्कार आड येतात रे. दारी आलेल्या चिल्लर लक्ष्मीला नाराज करणंही आपल्या संस्कारांत बसत नाही. आपण मुकाटय़ाने पूजेचे ताट घेऊन तिच्यासमोर पूजेला बसतो.
यार दादू, आम्ही लहानपणी वर्षांचे तीनशे पासष्ट दिवस संकष्टीच साजरी केलेली असल्यामुळे आताशा मी उपासतापास किंवा डाएटबिएटच्या भानगडीत पडत नाही. विचाराने पुरोगामी असल्यामुळे मी उपासतापासाच्या विरोधात आहे, पण फराळाच्या नाही. (बायकोला भाऊबीजेला मिळालेली साडी- आपण तिच्यासाठी पाडव्याला घेतलेल्या साडीपेक्षा भारी असेल तर फराळाऐवजी टोमणे खाऊनच आमची दिवाळी साजरी होते, तो भाग वेगळा.) ‘जे जे मिळेल, ते ते चरावे, येनकेनप्रकारेण उदर भरावे, लाजो नये, अजिबात’ हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ते माझ्याचसाठी आहे असे मी धरून चाललो आहे. (समजा, त्यांनी असं काही म्हटलेलं नसेल तर पुढेमागे माझं सरकार आल्यावर तुकारामाच्या अभंगगाथेत हा अभंग समाविष्ट करण्यात येईल.) पण दादू, आज जेव्हा मी आजूबाजूला पाहतो तेव्हा दिसतं की, वर्षभर ग्रीन टी पिणारे, कॅलऱ्या आणि फॅट मोजूनमापून खाणारे, व्यायाम, योगा करणारे हेल्थ कॉन्शस लोकदेखील दिवाळीच्या या दिवसांत मनगटाच्या मागच्या बाजूला थुंकी लावून आपल्या डाएटमधून टाइम प्लीज घेतात आणि मिठाईवर तुटून पडतात. खरं सांगू, माझ्या डाएटग्रस्त मित्रमत्रिणींना दिवाळीत मिठाई आणि फराळावर आडवा हात मारताना मी पाहतो तेव्हा मला असे वाटते, जणू डायबिटीसरूपी बाऊजी सिमरनचा हात मिठाईरूपी राजच्या हाती देऊन म्हणतोय, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी!
हल्ली ग्रीन दिवाळी, पीसफुल दिवाळी अशी काय काय फॅडं दरवर्षी निघत असतात. तुला सांगतो दादू, गेल्या वर्षी दिवाळीनंतरच्या रविवारी आमच्या बाजूच्या सोसायटीमधून फटाक्यांचा जोरदार आवाज आला. सारखे तासभर फटाके पेटत, वाजत, उडत होते. नंतर चौकशी केली तेव्हा कळलं की त्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायची ठरवली होती. तो इव्हेंट यशस्वी झाल्याचं सेलिब्रेशन सुरू आहे.
खरं म्हणजे माझा फटाके वाजवून आवाजाचं आणि हवेचं प्रदूषण वाढवण्याला विरोध आहे. माझं हे मत ऐकल्यावर माझ्या एका भक्त संप्रदायी मित्राने मागे मला तंबी दिली होती.. ‘‘लक्षात ठेव सदूभौ, तू ज्याला उदात्त विचारसरणी म्हणतोस ना, ती अंडरवेअरसारखी असते. आपली आपण आपल्यासाठी ठेवायची. ती इतर कुणाला दाखवायची नाही; आणि इतरांची कशी आहे, आहे की नाही याची तू पंचायत करायचीही गरज नाही.’’ थोडक्यात काय, तर माणसाने ‘आपल्या चड्डीत राहावं.. कसं?’ तेव्हापासून माझा हा फटाक्याबद्दलचा विचार आणि त्याची अंमलबजावणी मी माझ्यापुरतीच ठेवतो. उगीच आपण शहाणपणा करून कुणाला फटाक्यांचे दुष्परिणाम समजवायला जायचो आणि आपल्यालाच फटक्यांचे चटके भोगावे लागायचे. तेवढय़ावर भागलं तर ठीक, नाहीतर आपल्यावर देशद्रोही असल्याचा शिक्काही बसू शकतो. दादू, तू मला सांग, फक्त गप्प राहून देशद्रोही बनण्याचा धोका टळत असेल तर आपण का उगाच तोंड उचकटा? कितीही बकवास असले तरी अक्षयकुमार, विवेक ओबेरॉय, कंगना राणावत यांचे सिनेमे आपण तिकिटं काढून पाहतो, त्यामुळे आपण ऑलरेडी देशभक्त आहोतच. ते समीकरण उगाच का बिघडवा? अरे, देशभक्त होण्यासाठी सगळ्यांनीच सीमेवर लढायला जायला पाहिजे असं नव्हे. माणसाने झेपेल तितकं देशभक्त असावं असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणूनच मी हल्ली विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसारखी मिशी वाढवायला घेतलीय! असो. बाटली लवंडल्यावर त्यात ठेवलेला रॉकेट बॉम्ब जसा कुठल्या कुठे घुसतो, तसं होतं बघ माझं कधी कधी!
दादू, दिवाळीला आपल्या गावाची, बालपणीच्या मित्राची किंवा परदेशी असलेल्या कुणा सुहृदाची आठवण आणून डोळ्यात पाणी यायचा काळ आता राहिला नाही. खरं म्हणजे आपल्या डोळ्यातून हमखास पाणी काढणारा ग्लिसरीन हा एकमेव नातेवाईक आता उरलाय. मोबाइल आणि इंटरनेटने जग असं जवळ आणलंय, की मनात आलं की आपल्या माणसाशी बोलता येतं, त्याला पाहता येतं, सुख-दु:खाचे क्षण शेअर करता येतात. फक्त नेटवर्क पाहिजे.. दोन मनांमध्ये!
आपल्यासाठी डोंगराच्या पलीकडील गवत नेहमीच हिरवं असतं. विरुद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्यावरील ट्रॅफिक नेहमीच कमी असतं आणि आठवणीचा प्रदेश नेहमीच रमणीय असतो. अरे दादू, तुला गंमत सांगतो, केवळ जुने-वृद्ध आणि नव-वृद्ध मंडळीच आठवणीत रमतात असे नाही. ‘कितीही केलं तरी लहानपणीच्या दिवाळीची सर आताच्या दिवाळीला येऊच शकत नाही..’ असं काल माझी नऊ वर्षांची मुलगी म्हणत होती! आता काय बोलणार.. बोल!
दादू, मला मात्र बालपणीच्या दिवाळीच्या उबेतून बाहेरच येता येत नाहीये. सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरू झाली की मी मामाकडे जायचो. छान थंडी पडलेली असायची. दिवसभर खेळ, मातीचे केलेले किल्ले, त्याला गेरूने दिलेला भगवा रंग, वाऱ्याने पडणारे पुठ्ठय़ाचे मावळे, चिखल सुकून किल्ल्याच्या बुरुजाला पडणाऱ्या भेगा, कुत्र्या-मांजराचे किल्ल्यावरील हल्ले.. अरे, अक्षरश: बाजीप्रभूच्या निष्ठेने आम्ही गड राखायचो! आम्ही न सांगताच मामा फटाके घेऊन यायचे. अख्खी पिशवी माझ्यासमोर ठेवून मामा म्हणायचे, आधी तुला जे काय हवं ते घे. लवंगी, लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनळे, चक्र, फुलझडी, नागगोळी, टिकल्या, पिस्तुल अन् काय काय! मी एकेक फटाका उचलून त्याचा रंग, वास सगळं बघायचो. मामाची मुलं कधी एकदा माझं सिलेक्शन संपतं आणि त्यांचा नंबर येतो याची वाट बघत असायची. मी पुन्हा पुन्हा एकेक फटाका उचलून त्याचा रंग, वास सगळं बघायचो. उडणाऱ्या फटाक्यांची मला भीती वाटते.. आवाज करणाऱ्या फटाक्याने माझे कान दडतात.. धूर करणाऱ्या फटाक्यांची मला अॅलर्जी आहे.. असं करत करत मामाच्या मुलांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत मी सगळे फटाके बाजूला काढायचो आणि कॉंग्रेसने सगळे पर्याय चाचपल्यासारखे करून गांधी घराण्यातलाच अध्यक्ष निवडावा तसा मी माझ्यासाठी फक्त फुलझडी निवडायचो.
पहाटेच्या कुडकुडणाऱ्या थंडीत उटणे लावून केलेली अंघोळ, आई, मामीकडून ओवाळून घेणं, तो कोऱ्या कपडय़ांचा गंध, ते पुरवून पुरवून वाजवलेले फटाके, अंगणातून वेचलेले न फुटलेले फटाके.. साला, शेवटचं असं कधी जगलो तेच आठवत नाही रे. भाकरीचा चंद्र शोधायला आपण रॉकेट घेऊन निघालो आणि बालपणीची आवडणारी दिवाळी मात्र मागे धरतीवरच राहून गेली की रे!
दादू, तुला सांगतो, सारखं मागचं आठवत राहतं. त्या रम्य दिवसांतून बाहेर पडूच नये असं वाटतं. सोनेरी आठवणींचा ठसका बसतो. पूर्वी काही खाता-पिताना ठसका बसला की आई पाठीवर थाप मारून ‘वर बघ’ म्हणायची. आता जुन्या आठवणींचा ठसका बसला की पाठीवर मारून ‘मागे बघू नकोस, पुढे बघ..’ असं म्हणणारं तरी कोण आहे?
तुझा नॉस्टॅल्जिक मित्र..
सदू धांदरफळे
sabypereira@gmail.com