पराग कुलकर्णी
तुम्हाला जास्त आश्चर्य कशाचं वाटतं? कधी कधी आपलं शरीर बरोबर काम करत नाही आणि आपल्याला छोटे किंवा मोठे आजार होतात याचं, का बहुतांश वेळा आपलं शरीर, आपले अवयव अगदी व्यवस्थित काम करतात याचं! एकमेकांत गुंतलेल्या, एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अनेक गोष्टी जुळून येतात तेव्हा आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालतं. कदाचित आपलं शरीर नेमकं काम कसं करतं हे आपण जाणून घेतलं तर ते एका चमत्कारापेक्षा कमी वाटणार नाही. आजची आपली संकल्पना अशीच आपल्या शरीराच्या सर्व कार्याच्या, चमत्काराच्या मुळाशी असणारी आणि किमान नावाने ऐकून माहिती असलेली अशी आहे – ‘डीएनए’ (DNA).
आपलं शरीर हे करोडो पेशींनी बनलेलं आहे. या पेशींचे दोनशेहून अधिक प्रकार आपल्या शरीरात असतात- ज्याद्वारे वेगवेगळी कामं त्यांच्याकडून केली जातात. पाहण्यासाठी, आवाज ऐकण्यासाठी, त्वचेवरचा स्पर्श जाणण्यासाठी जशा पेशी असतात, तशाच आपल्या रक्ताच्या, केसांच्या आणि हाडांच्याही पेशी शरीरात असतात. या पेशींचं केंद्र (Nucleus) हा या पेशींचा महत्त्वाचा भाग असतो, जिथून पेशींचं कार्य नियंत्रित केलं जातं. पण प्रत्येक पेशीला नेमकं काय काम करायचं आहे हे ठरवतो कोण? पेशींना त्यांचे काम नेमून देणारा एक विशिष्ट रेणू म्हणजेच ‘डीएनए’ (DNA) – ‘डीऑक्सिरायबो न्यूक्लिक अॅसिड’ (Deoxyribo Nucleic Acid). या रेणूमध्ये प्रत्येक पेशीला त्यांचं कार्य करण्यासाठी लागणाऱ्या सूचना आणि माहिती उपलब्ध असते. म्हणूनच त्याला आपल्या पेशींची आणि पूर्ण शरीराचीच ब्लू प्रिंन्ट म्हटलं जातं. या सूचना लिहिलेल्या असतात फक्त चार घटकांपासून तयार होणाऱ्या अगणित साखळ्यांच्या माध्यमातून. हे कसं होतं हे समजण्यासाठी आपल्याला ‘डीएनए’ची संरचना कशी असते हे आधी बघावं लागेल. ‘डीएनए’ची रचना एका चक्राकार जिन्यासारखी असते (Double Helix). या जिन्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या पायऱ्या. डीएनएच्या चक्राकार जिन्याच्या पायऱ्या चार घटकांनी बनलेल्या असतात- ज्याला बेसेस (bases) म्हणतात. सायटोसीन (C ), ग्वेनाइन (G), अडेनाइन (A) आणि थायमिन (T). हे घटक त्यांच्या आद्याक्षरानेच ओळखले जातात आणि यातही A नेहमी T सोबत आणि C नेहमी G सोबतच जोडलेला असतो. ‘डीएनए’मधली माहिती म्हणजे याच A, C, T, G या अक्षरांनी बनलेली एक प्रचंड मोठी साखळी असते. ही मोठी डीएनएची साखळी (त्यामानाने) छोटय़ा अनेक साखळ्या जोडून बनलेली असते. या छोटय़ा साखळ्यांना ज्यात स्वतंत्र, अर्थपूर्ण पण मर्यादित माहिती असते त्यांना जीन्स किंवा जनुकं म्हणतात. जीन्समध्ये केवळ माहिती आणि सूचना असतात. पण जेव्हा या सूचना पेशींकडून प्रत्यक्ष अमलात आणल्या जातात, तेव्हाच तो जीन्स सक्रिय होतो आणि या प्रकाराला जीन एक्स्प्रेशन (Gene Expression) असं म्हणतात. खरं तर या जीन्समधल्या सूचना म्हणजे प्रोटीन बनवण्याची एक कृतीच असते. जीन्स त्यातील सूचनांनुसार वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे प्रोटीन बनवतो आणि हेच प्रोटीन ती पेशी काय काम करणार आहे हे ठरवते. थोडक्यात, आपला ‘डीएनए’ म्हणजे एक पाककृतींचे पुस्तक आहे असं मानलं तर जीन्स म्हणजे ते वाचून ठरवलेला (त्या पेशींपुरता) स्पेशल मेनू. अर्थात, यातून जो पदार्थ बनतो तो म्हणजे प्रोटीन- जो त्या पेशी काय काम करतील हे ठरवतो.
पाककृतीच्या पुस्तकात जसे चटण्यांचे प्रकार, कोशिंबिरींचे प्रकार, गोड पदार्थ अशा सगळ्या रेसिपी व्यवस्थित मांडलेल्या असतात, तसंच या जीन्सरूपी प्रोटीनच्या लांबच लांब रेसिपीही नीट गुंडाळी करून क्रोमोझोम्सच्या (गुणसूत्रं) स्वरूपात व्यवस्थित रचलेल्या असतात. माणसाच्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात अशा क्रोमोझोम्सच्या २३ जोडय़ा असतात. त्यातला एक क्रोमोझोम आईकडून आलेला असतो तर दुसरा वडिलांकडून. आई-वडिलांचे आनुवंशिक असणारे गुण-अवगुण, शारीरिक वैशिष्टय़ं, आजार अशा बऱ्याच गोष्टी याद्वारे आपल्या शरीरात याच क्रोमोझोम्सद्वारे येतात. पण वर सांगितल्याप्रमाणे ही केवळ माहिती असते, सूचना असते. जीन्स एक्स्प्रेशन ठरवते की यातील कोणते जीन्स, किती प्रमाणात सक्रिय होतील. म्हणूनच मुलगा किंवा मुलगी आई किंवा वडिलांची एकदम हुबेहूब नक्कल नसतात, तर त्यांच्यात बरेच बदलही झालेले असतात.
डीएनएचा शोध हा मागच्या शतकातील एक खूप महत्त्वाचा शोध आहे. आनुवंशिकता किंवा आई-वडिलांचे गुण त्यांच्या मुला-मुलींमध्ये येतात ही माहिती जरी लोकांना हजारो वर्षे होती तरी हे नेमकं कसं घडतं हे ‘डीएनए’मुळे कळू शकलं. डार्वनिच्या उक्रांतीवादाचं समर्थन करणारा पुरावा म्हणूनही डीएनएचा उपयोग झाला. चिंपांझी आणि माणूस यांचे ९६ टक्के जीन्स सारखे आहेत, हे आता तुलना करून सिद्ध झालं आहे. आपल्या शरीरातल्या कुठल्या गोष्टी आजूबाजूच्या परिस्थितीने बदलू शकतात आणि कुठल्या आनुवंशिक पद्धतीने येतात याचीही कल्पना डीएनएमुळे येते. त्यातूनच प्रत्येक माणसाची वैशिष्टय़ं, त्याला होऊ शकणारे रोग इत्यादी माहितीही आज उपलब्ध होत आहे. अनेक रोगांवरच्या संशोधनालाही त्यामुळे मदत झाली आहे. पितृत्व चाचणी तसेच अनेक गुन्ह्यंची उकल करण्यात डीएनएचा किती उपयोग होतो हे ज्ञान आपल्याला अनेक मालिका, चित्रपटांतून आधीच प्राप्त झालेले आहेच. शेवटी काय तर, जीवशास्त्रात ‘जीव’ रमत नसला आणि रसायनशास्त्रात फारसा ‘रस’ वाटत नसला तरीही त्यावरच आधारलेली आपल्या आयुष्याची ही पूर्णब्रह्म रेसिपी आज आपल्याला रुचकर बौद्धिक खुराक पुरवू शकली म्हणजे झालं.
parag2211@gmail.com