नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली तेव्हाची गोष्ट. अंगात चोळीसुद्धा न घातलेली एक आजी तिच्या बेशुद्ध झालेल्या नातीला घेऊन माझ्याकडे आली. तिच्याबरोबर कोणी पुरुष माणूस नव्हते. जवळ नवा पैसाही नव्हता. पण ती मोठय़ा धीराची होती. डोळय़ात समज होती. बोलण्यात शहाणपणा होता आणि का कोणास ठाऊक,  माझ्याबद्दल विश्वास होता. ती म्हणाली, ‘‘वंदनाला तुमच्या ओटीत घातले आहे. तिला जगवा, नाहीतर मारा. तुमच्या हातून जे होईल ते करा. आत्ता माझ्याजवळ पैसा नाही. जो पैसा लागेल तो खर्च करा. वंदना जगली नाही तरी तुमची पै न् पै मी चुकती करीन.’’ तिचे बोलणे स्वच्छ होते. समजुतीचे होते आणि प्रामाणिक होते. पेशंटने एवढा विश्वास दाखविला तरी दहा हत्तींचे बळ येते. त्यावेळी माझे स्वत:चे हॉस्पिटल नव्हते. मी तिला दुसऱ्या एका डॉक्टरांच्या नर्सिग होममध्ये अ‍ॅडमिट केले. माझ्याजवळ ज्ञान होते, उत्साह होता, वेळ होता आणि उपाययोजना करण्याचा पूर्ण अधिकार मिळाला होता. मी आत्मविश्वासाने केस हातात घेतली. खूप प्रयत्न केले. आजार खरेच खूप गुंतागुंतीचा होता. पण यश आले. वंदनाच्या आयुष्याची दोरी बळकट होती. आठ-दहा दिवसांत ती घरी जाण्याइतपत सुधारली. ती माणसे व्यवसायाने ‘वडार’ होती. नाही म्हटले तरी औषधालाही त्यांचा खूप पैसा खर्च झाला होता. त्यांचे बिल ३०० रु. झाले. २५ वर्षांपूर्वी ही रक्कम कमी नव्हती. त्यांनी विनंती केली तर बिल थोडे कमी करण्याचेही मी ठरवले होते. पण आश्चर्य म्हणजे वंदनाचे वडील एक-एक रुपयांच्या मळक्या नोटांचे तीनशे रुपयांचे बंडल घेऊन आले. बिल देऊन आणि माझे पुन्हा पुन्हा आभार मानून ते वंदनाला घेऊन गेले. आज इतकी वर्षे झाली तरी मी वंदनाच्या आजीचे शब्द आणि ते मळक्या नोटांचे बंडल विसरू शकलेले नाही.
या घटनेला २५ वर्षे झाली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. डॉक्टर-पेशंट नातेही काळाच्या ओघात बदलत गेले. या नात्यात आता ‘ग्राहक कायदा’ही आला आहे. पेशंट हा ग्राहक झालाय आणि ‘वैद्यकी’ हा व्यवसाय झालाय! ‘डॉक्टर-पेशंट’ व्यवहारही ‘दुकानदार-गिऱ्हाईक’ या व्यवहारासारखा होऊ लागलाय.
परवाचीच गोष्ट. आठ वर्षांच्या विक्रमला घेऊन त्याचे वडील दवाखान्यात आले. विक्रमला १५ दिवस वरचेवर ताप येत होता. हे कुटुंब मुंबईत राहत होते. मे महिन्याच्या सुट्टीत ते गावाकडे आले होते. मुंबईचा पेशंट म्हटला, की आमच्या मनात प्रथम क्लोरोक्विनला दाद न देणाऱ्या मलेरियाची शंका येते. विक्रमचा चेहरा पांढुरका दिसत होता. जिभेवर पांढरा थर होता. पाणथरीला सूज होती. मी सांगितले, ‘‘१५ दिवस वरचेवर ताप म्हणजे हा साधा ताप वाटत नाही. मलेरिया किंवा टायफॉईड किंवा दोन्हीही असण्याची शक्यता वाढते. रक्त तपासून पाहू.’’ वडिलांनी कपाळाला आठी घातली. म्हणाले, ‘‘आम्ही मुंबईला रक्त तपासलेय. त्यात काही दोष नाही, असे मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितलेय.’’ आपण मुंबईत राहतो म्हणजे आपोआपच आपली एक यत्ता वरची असते, असा साधारणपणे मुंबईच्या माणसांचा समज असतो. अशा वेळी मी मात्र एक पाऊल मागे जाते. ‘‘तपासणी केल्याशिवाय औषध देता येणार नाही.’’ मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. तपासणी झाली. त्यात टायफॉईडचा दोष सापडला. मलेरियाचे जंतू सापडले नाहीत. विक्रमला अ‍ॅडमिट केले, औषधोपचार सुरू केला. साधारण तीन दिवसांनंतर ताप उतरायला लागेल, असे मी सांगितले. परंतु चार-पाच दिवसांनंतरही ताप येतच राहिला. त्याचा जोर कमी झाला होता, पण दिवसातून एक-दोन वेळा सणकून ताप चढे. रोज मी विक्रमच्या वडिलांशी बोलत होत. पण त्यांना माझ्याविषयी कधीच विश्वास वाटला नाही. ‘‘तुम्हाला नक्की निदान सापडलेय का?’’, ‘‘औषधे बाळाला सोसतील का?’’ अशा प्रश्नांपेक्षाही त्यांची देहबोली मला अस्वस्थ करीत होती. एकूणच ‘डॉक्टर’ या प्राण्याबद्दल त्यांच्या मनात अविश्वास असावा. विक्रमला टायफॉईडबरोबरच मलेरियाही असावा असे मला राहून राहून वाटत होते. दुसरा एखादा पेशंट असता तर मी मलेरियाचेही औषध देऊन कधीच रिकामी झाले असते, परंतु विक्रमबाबत माझे असे धाडस होईना. मी त्याच्या वडिलांना म्हटले, ‘‘टायफॉईडवरची दोन प्रकारची औषधे देऊनही ताप उतरत नाही. मला वाटते, मलेरियाचेही औषध देऊ या.’’ ते म्हणाले, ‘‘आधी म्हणालात टायफॉईड आहे. आता म्हणताय, मलेरिया आहे. म्हणजे इतक्या तपासण्या करूनही अजून निदानच झाले नाही काय? आणि मलेरियाच्या औषधाने दुष्परिणाम झाले तर कोण जबाबदार?’’ मी गप्प बसले. खरेच होते ते. आज कायद्याने पुराव्यावर आधारित औषधोपचार करण्याचे (ी५्रीिल्लूी ुं२ी िेी्िर्रूल्ली) डॉक्टरांवर बंधन आहे. पुरावा कोणता? तर तपासणीचे निष्कर्ष. रक्त-लघवी तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, इ. आज समाजमनात ‘मशीन’भोवतीचे वलय वाढतेच आहे. नवनवीन चाचण्या आणि अद्ययावत मशीनचा लोकांचे आयुर्मान वाढविण्यासाठी लक्षणीय उपयोगही होतोय. परंतु डॉक्टरांचे अनुभव, निरीक्षण, तर्क, विवेकशक्ती आणि तारतम्य यांची जागा मशीन घेऊ शकणार नाही. हे सारे मला कळत होते, पण तसेच ग्राहक कायद्याच्या बंधनाचीही जाणीव होती.
विक्रमचे वडील वाक्बाण सोडू लागले तसे त्यापासून बचाव करण्यासाठी मी अलिप्ततेचे चिलखत चढवू लागले. दोष सापडला तरच औषध द्यायचे असे मी मनोमन ठरवूनच टाकले. ताप खूप जास्त चढतो तेव्हा रक्तात मलेरियाचे जंतू सापडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून विक्रमला जेव्हा थंडी वाजून ताप भरे तेव्हा आम्ही त्याचे रक्त तपासणीस घेत असू. प्रत्येक वेळी रक्त तपासणीस घेताना विक्रमचे वडील एखाद्या खलनायकाकडे पाहावे तसे माझ्याकडे पाहत. शेवटी आठव्या दिवशी रक्तात ‘फाल्सिपारम मलेरियाचे’ जंतू सापडले. त्यावर औषधे दिली. बाळ बरे झाले. घरी जाताना विक्रमचे वडील म्हणाले, ‘‘तापाचे निदान करायलाच तुम्हाला आठ दिवस लागले.’’
मी अंतर्मुख झाले. कोठे आलो आहोत आपण? ‘‘वंदनाला तुमच्या ओटीत घातले आहे, तिला जगवा किंवा मारा’’ हा विश्वास कोठे आणि ‘‘आम्ही पैसे फेकतो, तुम्ही बाळाला बरे करा!’’ ही व्यापारी वृत्ती कोठे!
या बदलत्या डॉक्टर-पेशंट नात्याला डॉक्टरही तितकेच जबाबदार आहेत. आज डॉक्टरांच्या नीतिमत्तेबाबतही भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘समाजात किती टक्के डॉक्टर नीतिमान आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर ‘समाजात जितके टक्के लोक नीतिमान आहेत, तितकेच टक्के!’ असे आहे. वैद्यकीय व्यवसाय हा इतर व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. त्याचा प्रत्यक्ष जिवाशी संबंध आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नैतिकतेने वागावे अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. परंतु ही अपेक्षा वास्तवाला धरून नाही. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देताना जशी इंग्रजीला किमान ५० टक्के मार्क असावेत अशी अट असते, तशी नैतिकतेची अमूक टक्के पातळी असावी अशी अट नसते. त्यामुळे समजा, समाजात १५ टक्के  रिक्षा ड्रायव्हर प्रामाणिक आहेत, १५ टक्के दुकानदार प्रामाणिक आहेत, तर १५ टक्केच डॉक्टर प्रामाणिक असणार. जे आडात आहे, तेच पोहऱ्यात येणार!
मग ही कोंडी फोडायची कशी? सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आज ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अस्तित्वात आला आहे. तो असू दे. त्याच्या त्याच्या जागी तो महत्त्वाचा आहेही. परंतु रोजच्या डॉक्टर-पेशंट नात्यात विश्वासाची जागा कायदा घेऊ शकणार नाही. फसवणूक टाळण्यासाठी ‘माणूस’ ओळखण्याची कला आत्मसात करण्याला मात्र आजच्या जगात पर्याय नाही. आज खूप डॉक्टर्स.. अगदी प्रत्येक अवयवाचे स्पेशालिस्ट उपलब्ध आहेत. निवडीला खूप पर्याय आहेत. पण ‘निवड’ करण्याला पर्याय नाही. मात्र, निवड केली की डॉक्टर-पेशंट नात्यात विश्वासाचा पूल बांधण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हायला हवेत.
पेशंटनी हे समजून घ्यायला हवे की, डॉक्टरांना फक्त ‘फी’ मिळाल्याने समाधान मिळत नसते. त्यांना हवा असतो थोडा आदर, थोडा धीर, थोडा विश्वास आणि चार प्रशंसेचे शब्द. डॉक्टरांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे की, पेशंटचे कोरडय़ा प्रीस्क्रिप्शनने समाधान होत नाही. त्यालाही आणखीन काही हवे असते. मोठी सहवेदना, थोडा आधार, थोडे आश्वासन आणि चार आपुलकीचे शब्द!  
(समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा