ललित लेखिका आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे गेल्या २५-३० वर्षांत बदललेल्या वैद्यक व्यवसायाचा तसेच त्यातल्या विविध स्थित्यंतरांचा वेध घेणारे मासिक सदर…
‘ए क झाड, दोन पक्षी’ ही संकल्पना म्हणून खूपच आवडली होती. एक जगणं ‘अनुभवणारा’, दुसरा निरीक्षण करून ‘वर्णन करणारा’! दुसरा पहिल्याच्या ‘कृती’चे अगदी सविस्तर वर्णन करू शकेल; परंतु पहिल्याच्या मनातील वादळांचे काय? दुसऱ्याला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. प्रत्यक्षात खरं तर एकच पक्षी असतो. अनुभवणाराही तोच, सांगणाराही तोच. फक्त मधे पुरेसा काळ जावा लागतो; जेणेकरून ‘सांगणाऱ्या त्याची’ मानसिकता ‘अनुभवणाऱ्या त्याच्या’ मानसिकतेपेक्षा वेगळी होण्यासाठी थोडी सवड मिळते. सांगणाऱ्याला पुरेसे तटस्थ होता येते.
बालरोगतज्ज्ञ म्हणून मी सलग तीस वर्षे व्यवसाय केला. कोणत्याही नोकरीत म्हणा किंवा व्यवसायात म्हणा; कालांतराने ‘पाटय़ा टाकणे’च राहते. रोज नवीन आव्हाने कुठून येणार? आणि रोज नवीन आव्हाने पेलण्याची मानसिकता तरी कशी टिकवता येणार? आमचा व्यवसायही रोज ‘तेच ते आणि तेच ते’ या शापापासून मुक्त नाही. ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, अशक्तपणा वाटतोय.. तेच ते आजार, त्यांची तीच ती औषधं, तेच ते उपाय आणि तोच तो परिणाम. आज वाटतंय- बस्स झालं! आता निवृत्त होण्याची वेळ आलीय.
थोडासा त्रयस्थपणे विचार करू लागले. खरंच का तेच ते आणि तेच ते आहे? छे! सगळंच तर बदललंय! तीस वर्षांपूर्वीचे आजार वेगळेच होते. औषधेही वेगळी होती. तपास वेगळे होते. उपचार वेगळे होते. पेशंटच्या गरजा वेगळ्या होत्या. पालकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. डॉक्टरांची मानसिकता वेगळी होती. आणि मी? मीही किती वेगळीच होते. किती बदललंय सगळं! हळूहळू, पण सतत. एकमेकांवर परिणाम करत.
तीस वर्षांपूर्वी आमचे वॉर्ड धनुर्वात, घटसर्प, पोलिओ, क्षय, सिफिलिस, जन्मत: गुदमरल्यामुळे येणारा मतिमंदपणा, आनुवंशिक आजार यांनी भरलेले असायचे. आता लसीकरणामुळे, प्रभावी औषधांमुळे, गरोदरपणीच्या सोनोग्राफीमुळे आणि जन्मत: डॉक्टरांनी घेतलेल्या काळजीमुळे हे आजार बरेचसे कमी झाले आहेत. परंतु असं असलं तरी आजही आमचे वॉर्ड रिकामे नाहीत; ते आता अपुऱ्या दिवसांची बाळे, अँटिबायोटिक्सना दाद न देणाऱ्या विषाणूंचे आजार, क्लोरोक्विनला न जुमानणारा मलेरिया, एड्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे पूर्वी माहीत नसलेले आजार यांनी भरले आहेत. कुपोषण, खरूज, जंत कमी झाले आहेत. परंतु लठ्ठपणा, नैराश्य, मधुमेह वाढले आहेत. अनेक चक्रे अदृश्यपणे एकमेकांना गती देत आहेत.
आम्ही शिकत होतो तेव्हा पेनिसिलिनची जादू सर्वज्ञात होती. मृत्यूमध्येच ज्याचे पर्यवसान होई तो न्यूमोनिया पेनिसिलिनच्या एका इंजेक्शनने विरघळू लागला होता. पेनिसिलिनपाठोपाठ अनेक अँटिबायोटिक्स आली. जणू अल्लाउद्दीनचा दिवाच आमच्या हाती आला. कित्येक आजार- अगदी टीबी, महारोग, सिफिलिससुद्धा सहज बरे होऊ लागले. जंतूंविरुद्धच्या युद्धात आपण जिंकलो असा गर्व होऊ लागला. या गर्वाचा फुगा गेल्या दोन-तीन वर्षांत फुटला आहे. अँटिबायोटिक्सना दाद न देणारे जंतू आता सर्रास सापडू लागले आहेत आणि माणसाचे धाबे दणाणले आहेत. अनेक अदृश्य चक्रांतील हेही एक चक्र!
गेल्या वीस-पंचवीस वर्षांत वैद्यक क्षेत्रातही तंत्रज्ञानाने भरीव कामगिरी केली आहे. रोगनिदान करण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची खूप मदत होते आहे. एक्स-रे, सी. टी., एम. आर., सोनोग्राफी, अद्ययावत लॅब, सुसज्ज आयसीयू, ऑपरेशन थिएटर आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स असलेली भलीमोठी हॉस्पिटल्स लोकांसाठी आज उपलब्ध आहेत. परंतु त्याचवेळी ‘फॅमिली डॉक्टर’ ही जमात नष्ट झाली आहे. लोकांचा डॉक्टरांवरचा विश्वास कमी झाला आहे. डॉक्टर पेशंटपासून मनाने अलिप्त होत आहेत. बदललेली परिस्थिती डॉक्टर-पेशंट नात्याचे चक्रही फिरवते आहे.
या बदलांच्या पाश्र्वभूमीवर मला माझे तीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवताहेत. एक भाडय़ाने घेतलेली लहानशी खोली. टेबल-खुर्ची, स्टेथोस्कोप आणि मी. पहिल्या दिवशी माझ्या एका मित्राने ‘गॉन विथ द विंड’ हातात ठेवले. म्हणाला, ‘‘तुला आता काहीच काम नसेल, तेव्हा हे वाचून होईल.’’ खरेच होते ते. मी त्या पुस्तकात रंगून गेले. क्वचित एखादा पेशंट आलाच, तर वाटायचे- कशाला आलाय हा? पण हळूहळू एकाचे दोन, दोनाचे चार पेशंट होऊ लागले. एका आजीने स्पष्टच सांगितले, ‘‘दुसऱ्या दवाखान्यात लई गर्दी. कुणी म्हटलं, हितं मुलावरची एक बाई हाय. तिच्याकडं कोऽऽण नसतं. लगी लगी नंबर लागतो. तवा आली.’’ एक बरं होतं- खेडय़ातल्या माणसांना ‘सॉफ्ट स्किल्स’ शिकवलेली नसतात. शिवाय ‘अरे-तुरे’ करणे हा त्यांच्या प्रेमाचा आविष्कार असतो.. तेही दिवस सरले.
तीस वर्षे अगदी नियमित, पूर्णवेळ व्यवसाय केला. माझ्या व्यवसायाने माझ्या मानसिक, शारीरिक शक्तीवर, वेळेवर हक्क गाजवला. पण तसेच दिलेही भरभरून! पुरेसा पैसा दिला. समाजात मानाचे स्थान दिले. माझ्या लहान लहान पेशंट्सच्या चेहऱ्यावरचे निखळ हसू दिले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणूस या प्राण्याची छान ओळख करून दिली. माझ्या दहा बाय दहाच्या तपासण्याच्या खोलीत मला मनुष्यस्वभावाची इतकी वेगवेगळी रूपे पाहायला मिळाली, की मी जर वैद्यकीय व्यवसायात नसते तर त्यासाठी मला शंभर जन्म घ्यावे लागले असते. माणसांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांचे एकमेकांशी नाते, त्यातील ताणेबाणे, आयुष्याला भिडण्याची त्यांची पद्धत, त्यांचे नीतिनियम मला वेगळीच जाण देऊन गेले. या प्रवासात अनेक सौंदर्यस्थळे, ज्ञानाचे क्षण, माणुसकीचे झरे भेटले. माझे आयुष्य समृद्ध झाले.
आज वाटते, मी तीस वर्षे उशिराच जन्माला आले असते तर..? एका लहानशा खोलीत फक्त स्टेथोस्कोप घेऊन बसण्याचे धाडस केले असते? समजा- केले असते, तर कोणते आई-वडील बाळाला घेऊन माझ्याकडे आले असते? मला खात्रीने कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन सुसज्ज हॉस्पिटल थाटावेच लागले असते. अशावेळी पेशंटची वाट पाहत पुस्तकात रमणे मला परवडले असते? पुस्तक वाचायला सोडाच; पण ‘माणूस वाचायला’ तरी मला वेळ मिळाला असता? माणसांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांचे जगणे समजून घेण्याची मानसिकता टिकली असती? अंतर्मुख व्हायला सवड मिळाली असती? झाले ते बरेच झाले!

Story img Loader