अर्थात, हे तीनही व्यवसाय करणारे अनेक जण आपले मित्र असतात आणि अतिशय छान माणसे असतात. त्यांच्या व्यवसायातील गमतीजमती ऐकताना कधी अंगावर रोमांच उभे राहतात तर कधी काटा येतो. हे तीनही व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती जर जागरूक असतील तर आपले व्यवसाय फोफावलेले सामान्यपणे चांगले नाही, हे त्यांना नीटच माहीत असते. कारण हे व्यवसाय फोफावणे याचाच अर्थ वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सामाजिक स्वास्थ्य वाईट आहे. शहरात एकाही रुग्णालयाची जरूर नसल्यास शहरातील नागरिकांचे आरोग्य अर्थातच चांगले आहे. या उलट रुग्णालये वाढत असतील तर काहीतरी बिनसलेले आहे हे सर्वाना समजले पाहिजे. रुग्णालये बंद पडत असतील आणि व्यायामशाळा वाढत असतील, औषधे बनविणाऱ्या कंपन्या टाळेबंदी करत असतील तर सगळे ठीक चालले आहे.
शहरात पोलीस दिसत नसतील तर लोक सभ्य आणि सुजाण आहेत. सार्वजनिकरीत्या कसे वागावे हे त्यांना कळते आहे हे परदेशातील कित्येक शहरांत असे दिसते. त्या उलट रस्तोरस्ती पोलीस दिसत असतील तर लोक कायदे मानत नाहीत, त्यांचा व्यवस्थेवर विश्वास नाही, हे कुणालाही कळेल.
कोर्टात केसेस नाहीत म्हणून न्यायाधीश आणि वकील आपापल्या चेंबरमध्ये झोपा काढत असतील तर अर्थातच अनेक पातळय़ांवर विशेषत: कौटुंबिक पातळीवर सारेकाही आलबेल आहे आणि जगणे मजेदार आणि आनंददायक आहे, हे कुणालाही कळेल.
वरील विवेचन हे तर्कशुद्ध असेल, पण ‘बरोबर’ नाही असे अनेकजणांना वाटणारच. असे होणे शक्यच नाही असे तर सर्वानाच वाटणार. पण एक जरा वेगळे बघितले नाही तर केवळ परदेशात दर हजारी ज्या प्रमाणात डॉक्टर, पोलीस आणि वकील असतात त्या प्रमाणात आपल्याकडे डॉक्टर, वकील आणि पोलीस उत्पन्न करणे हे निर्बुद्धपणाचे लक्षण आहे, हे आपल्या ध्यानात येईल. कारण हे सर्व व्यवसाय करणारे लोक जर आपले महत्त्व वाढावे म्हणून काही करायला लागतील तर सामान्य माणसाला रुग्ण, अशील आणि गुन्हेगार ‘बनविले’ जाईल आणि केवळ अस्वास्थ्य, अव्यवस्था आणि अशांतता आपल्या पदरी येईल.
अस्वच्छ पाण्यामुळे होणारे रोग बरे करण्यासाठी गावात डॉक्टर असणे महत्त्वाचे की सर्वाना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे महत्त्वाचे? भारतात हे असे रोग एकंदर रोगांच्या ऐंशी टक्के असतात. घाणेरडे पाणी पिणे, स्वयंपाकासाठी वापरणे अगर अंघोळ, कपडे धुणे यासाठी वापरणे यामुळे हे रोग होतात. आपण आपले मलमूत्र विसर्जन करून ते तसेच ओढे, नदीनाले यात सोडून देतो. तेच पाणी नदीच्या खालच्या अंगाची गावे पितात. मग तेथील लोक आजारी पडतात. तिथे डॉक्टर नाही म्हणून शंख होतो. डॉक्टर असला तर तो सलाइन लावतो. औषधे देतो. औषधे विकणारा खूश होतो, पण तेच पाणी पितो. फार श्रीमंत लोक बाटलीतले पाणी पितात. पाणी विकणारे खूश होतात. शहराचे मलमूत्र शहरातच जिरविले पाहिजे. शौचालय, गॅस प्लँटसारखी संयंत्रे वापरली पाहिजेत. नदीत एक ग्रॅमसुद्धा मलमूत्र जाता कामा नये.
आपण स्वातंत्र्यानंतर अणुबॉम्ब फोडले, विविध क्षेपणास्त्रे उडवली, सणासुदीला टनाने दारू उडवली, फोडली, जाळली, भयंकर मोठी धरणे बांधून त्यासाठी हजारो वर्षे तेथे राहणाऱ्या हजारो लोकांना हाकलून दिले, भयंकर प्रलयकारी अशा अणुशक्तीचा वापर वीजनिर्मितीसाठी केला, करोडो संगणक आणून ते वापरणाऱ्यांची फौज निर्माण केली, अस्वच्छ पाणी पिऊन होणाऱ्या रोगांसाठी इस्पितळावर इस्पितळे उघडली. त्याला ‘प्रगती’ म्हणून होणाऱ्या अधोगतीकडे डोळेझाक केली. पण अजून सर्वाना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत नाही. दु:ख होऊ द्यायचे, मग त्याच्यावर इलाज करायचा, पण दु:ख का होते आहे हे शोधायचे नाही, ही आपल्या देशाची परंपरा बनू पाहात आहे. ‘हेयं दु:खं अनागतम्’ (न आलेल्या दु:खाचा नाश करा.) असे म्हणणारा पतंजली याच प्रदेशात जन्मावा हा किती विरोधाभास!
कुठलाही पैसा कसा आणि कुठे वळवावा, प्राधान्य कशाला द्यावे हे राजकारणी जाणतात. तर ज्यामुळे ऐंशी टक्के रोग होतात अशा समस्येकडे ‘आरोग्य’ सेवेतला ऐंशी टक्के पैसा वळवला तर हे शक्य होईल. सारे आनंदात राहतील.
अमेरिकेत आणि भारतात सारखेच म्हणजे दहा लाख वकील आहेत, पण अमेरिकेत हे प्रमाण दर २६५ माणसामागे एक असे पडते, तर भारतात लोकसंख्या जास्त असल्याने त्यापेक्षा कितीतरी माणसामागे एक असे पडते. आपला व्यवसाय चालण्यासाठी छोटय़ामोठय़ा कारणावरून दावे लावायला सामान्य माणसांना उचकवणे हे अमेरिकेत सर्रास चालते हे आता सर्वमान्य आहे. वैद्यकीय दावे लावण्यासाठी उचकवणाऱ्यांना ‘अॅम्ब्युलन्स चेसर्स’ असे म्हणतात. इस्पितळातून बाहेर पडताना दावा लावायचा आहे का असे विचारले जाते. आपल्याकडे कोटय़वधी खटले पडून आहेत आणि प्रकरण कोर्टात गेले की ते कधी मिटणार याची कुणी खात्री देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. मिळालेले आयुष्य आनंदात काढताना सामान्यपणे कोर्टकचेऱ्या टाळण्याकडे माणसांची प्रवृत्ती अधिकाधिक व्हावी असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आनंदाला अग्रक्रम असेल तर अनेक गोष्टी दुय्यम वाटू लागतात. जे एकमेकांशी संवाद झाल्याने शक्य आहे त्यासाठी लोक कोर्टात जाणार नाहीत. आपल्याला सुसंवाद हवा आहे, विसंवाद नको.
काही देश हे ‘पोलीस स्टेट’ असे संबोधले जातात. पूर्वीचा यूएसएसआर किंवा नाझी जर्मनीला असे म्हणत असत. सारी जनता भयग्रस्त असे आणि पोलीस कुणालाही कधीही पकडून नेऊ शकत. अर्थातच भयंकर परिस्थिती होती. आनंद तर सोडाच, मोकळा श्वास घेणेही अवघड असणार. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील माणसांच्या आयुष्यातील सगळय़ात आनंददायक दिवस कोणता? याविषयी एक गोष्ट सांगतात ती अशी : मध्यरात्री तुमच्या दारावर ठकठक होते. तुम्ही दार उघडता. बाहेर केजीबीचे पोलीस उभे असतात. ‘इव्हान इव्हानोविच देशविघातक कारवाया केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे.’ तुम्ही सांगता, ‘मी इव्हान चायकोव्हस्की. इव्हान इव्हानोविच शेजारी राहतो.’
हे तीनही व्यावसायिक समाजाला आवश्यक कधी असायला हवेत? तर आपण आपल्या बाजूने नीट वागत असतानादेखील नशीब म्हणा किंवा इतर काही म्हणा, वेळ आली तर त्यांच्यासारखा देवमाणूस नाही. म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची, काही कारणाने आजारपण आले तर डॉक्टरची घ्यायची. कुणी खोडसाळपणे वागले तर वकिलांची अगर पोलिसांची मदत घ्यायची. तर आपल्या आनंदात आलेला व्यत्यय लवकरात लवकर दूर होऊ शकतो.
हे अनेक बाबतींत लक्षात ठेवण्यासारखे आहे. आपण शहरात घाण कमी करायची तर सफाई कामगारांना शहर स्वच्छ ठेवणे सोपे जाणार. आपण दिवाळीत फटाके फोडून घाण करायची आणि रस्ते साफ नाहीत म्हणून ओरडायचे, हे बरे नव्हे. आम्ही घाण करणार आणि सफाई कामगार कामे करीत नाहीत, हे म्हणणे बरे नव्हे. घाण पाणी पिऊन आजारी पडायचे आणि डॉक्टर नाही म्हणून ओरडत सुटायचे. पोलिसांना ते जेरीस येतील इतका ताण द्यायचा म्हणजे सारखे मोर्चे काढायचे, ऊठसूट निदर्शने करायची, घेराव घालायचे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राब राब राबवायचे आणि मग भुरटे चोर उत्पन्न झाले की पोलीस काही कामे करीत नाहीत म्हणून शंख करायचा, हे बरे नव्हे. माणसांनी नीट राहावे यासाठी सतत समाजप्रबोधन न करता कायदे करून टाकायचे आणि मग लोक ते कायदे नीट पाळत नाहीत म्हणून त्यांच्यावर खटले भरायचे, इतके भरायचे की लाखो खटले सुनावणीला यायलाच वर्षे गेली पाहिजेत. असे झाले की न्यायसंस्थेवरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे म्हणून हाकाटी करायची.
आपल्याला प्राधान्य म्हणजे काय हे कळत नाही किंवा आपण ते कळवून घेत नाही. शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून बसायला आपल्याला आवडते. परदेशातल्या गोष्टींची कॉपी केली की आपण आधुनिक असा आपला बिनडोक समज आहे. प्लॅस्टिकच्या बाटलीतले पाणी पिऊ, पण नद्या साफ ठेवणार नाही. वैयक्तिक आनंद, स्वास्थ्य आणि सुरक्षितता याबाबत सतत समाजप्रबोधन करणार नाही, पण कायदे करू. म्हणजे दारूबंदीचा कायदा करू. हेल्मेट घालायचा कायदा करू. इस्पितळावर इस्पितळे काढू, पण हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण करतच राहू आणि हेल्थ चेकअप करत राहू, पण व्यायाम करणार नाही.
तर ठरवून टाका- या तीन लोकांना भेटणार नाही म्हणून; आणि बघाच आयुष्यात आनंद कसा येतो ते!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा