– अभिजीत सौमित्र

सिनेमानिर्मितीचे पारंपरिक शिक्षण न घेता, दृश्यकला आत्मसात केल्यानंतर डॉक्युमेण्ट्रीच्या वाटेला गेलेल्या दिग्दर्शकाचा माहितीपट बनविण्याचा हा विस्तृत प्रवास. आपल्यासमोरील पडद्यावरच्या दृश्यचौकटी बदलत जाणाऱ्या काळातील कामाचे दर्शन.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!

पावसाळा नुकताच संपला होता. अजिंठ्यातल्या एका लेण्यासमोर मी आणि माझा मित्र उभे होतो. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश होता, आकाशही निळ्या रंगाच्या सुंदर, स्वच्छ छटेचं होतं. पर्यटकांची गर्दीही नव्हती आणि अजिंठा चित्रित करण्यासाठी कॅमेराही सज्ज होता. पण आम्ही अडलो होतो एका प्रश्नापाशी. चित्रीकरण कालबाह्य होत चाललेल्या ४:३ या दृश्यचौकटीत (व्हिजुअल अॅस्पेक्ट रेशोमध्ये) करायचं की अत्याधुनिक १६:९ दृश्यचौकटीत. त्या वेळी १६:९ अॅस्पेक्ट रेशोचे चित्रपट, माहितीपट, जाहिराती आपल्या देशात रुजू पाहात होते. पण भारतात बहुसंख्य संगणक आणि टेलिव्हिजन स्क्रिन्स मात्र चौकोनी आकाराच्या म्हणजेच साधारण ४:३ अॅस्पेक्ट रेशोच्या होत्या. चित्रीकरणासाठी ही दृश्यचौकट निवडताना आमचं दुमत झालं. अजिंठा हा एका अर्धगोलाकृती विस्तीर्ण कातळात कोरलेल्या लेण्यांचा समूह आहे. त्यातल्या बहुसंख्य लेण्या या आयताकृती, आडव्या प्रवेशमंडपाच्या आहेत. त्यामुळे अजिंठा १६:९ या आयताकृती दृश्यचौकटीत चित्रित करावं हे मित्राचं म्हणणं साहजिक होतं, पण तरी तोही संभ्रमात होताच. आम्ही दोघांनी दोन्ही दृश्यचौकटींमध्ये एक एक दृश्य चित्रित करून पाहिले आणि अजिंठ्याच्या त्या विस्तीर्ण कातळात कोरलेल्या आयताकृती प्रवेशमंडपाच्या लेण्यांतही आम्हाला एक चौकोनी प्रमाणबद्धता दिसली, जाणवली. आम्ही चकित झालो. लेण्यांच्या रचनेतली चौकोनी आणि आयताकृती प्रमाणबद्धतेची गुंफण अनुभवण्यात आम्ही काही वेळ हरखून गेलो आणि ४:३ ही दृश्यचौकट चित्रीकरणासाठी निश्चित केली. चौकोन हा मानवी कलानिर्मितीचा पाया का राहिला असावा याची उत्तरं आम्हाला अजिंठ्याच्या लेण्यांच्या चित्रीकरणादरम्यान सापडत गेली. अजिंठ्याच्या चित्रीकरणात आम्ही रमून गेलो. अजिंठा आम्हाला काही शिकवू पाहात होतं.

‘माहितीपट’ हा डॉक्युमेण्ट्री फिल्म या सिनेप्रकारासाठी वापरला जाणारा पर्यायवाची मराठी शब्द आहे. डॉक्युमेण्ट्री फिल्म या सिनेप्रकाराचा प्रांत विस्तीर्ण आणि सुंदर आहे. ‘साक्षित्व’ हा डॉक्युमेण्ट्री फिल्मचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. डॉक्युमेण्ट्री फिल्म हा मला सिनेमाकलेचा सात्त्विक आविष्कार वाटतो आणि आवडतो. डॉक्युमेण्ट्री फिल्म नेमकेपणानी कशाला म्हणायचं याबद्दल अनेक दृष्टिकोन आहेत.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…

१९९६/९७ दरम्यान केव्हातरी डिस्कव्हरी की नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर मी द्राविडी मंदिरांवर आधारित एक फिल्म पाहिली. तिला डॉक्युमेण्ट्री फिल्म असं म्हणतात हे मोठ्यांकडून कळलं. त्या फिल्ममध्ये एक शांतता होती, भव्यता होती, स्निग्धता होती, संपृक्तता होती, चित्ताला स्थैर्य आणेल अशी ताकद होती. त्या डॉक्युमेण्ट्रीने माझ्यावर काही संस्कार केले आणि मला प्रभावितही केलं, याची जाणीव मला तेव्हाच झाली. आपणही अशी एखादी फिल्म करण्याचा अनुभव का घेऊ नये, असं त्यानंतर वारंवार वाटायला लागलं. त्या काळात विशेषत: महाराष्ट्रातल्या लेण्यांवर आणि मंदिरांवर डिस्कवरी/ नॅशनल जिऑग्राफिकनी केलेल्या डॉक्युमेण्ट्रीज किंवा त्या धर्तीवरचं काही बघायला उपलब्ध आहे का याची बरीच शोधाशोध मी करत होतो. पण काही तुरळक फिल्म्स वगळता मला काही मिळालं नाही. डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकिंगचा अनुभव आपण एकदा तरी घ्यावा असं वाटत होतंच. महाराष्ट्रातल्या लेण्या आणि मंदिरांवर फिल्म्स मिळत नाहीत म्हटल्यावर आपण स्वत:च कराव्यात असं ठरवलं. अर्थात ते काही लगेच झालं नाही. त्या काळात काही कामानिमित्ताने मी शिल्पकला क्षेत्राच्या खूप जवळ गेलो. तिथे मला जे शिकायला मिळालं ते संपृक्त म्हणावं असं होतं. ते दिवस फार भारलेले होते. दृश्यकलेच्या विविध आयामांकडे मित्रांनी माझं लक्ष वेधलं. शिल्प म्हणजे नेमकं काय, ते कसं पाहावं, शिल्पनिर्मितीमध्ये तांत्रिक आणि कलात्मक अंगांचा संगम कसा होतो, शिल्पकलेचं सौंदर्यशास्त्र काय सांगतं, शिल्पांचं चित्रीकरण करताना कॅमेऱ्यामधून एखाद्या शिल्पाकडे पाहतानाचा दृष्टिकोन कसा असावा अशा अनेक आयामांचं दर्शन मला माझ्या शिल्पकार मित्रांनी घडवलं. पुढे दृश्यकला कलावंतांच्या सहवासात राहायला लागलो. त्यांत आर्किटेक्ट्स होते, चित्रकार होते, अभिनेते होते, दिग्दर्शक होते. सर्व ज्येष्ठ आणि प्रतिभावंत कलाकार.

डॉक्युमेण्ट्री करायची हे ठरलं होतं, पण निर्मिती प्रक्रियेबद्दल मला काहीच अनुभव नव्हता. मुळात मी नाट्य क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन करणारा होतो. त्याच क्षेत्रातले मित्र मदतीला आले. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्यांनी मला त्यांच्या संग्रहामधल्या कित्येक विषयांवरच्या दर्जेदार आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय डॉक्युमेण्ट्री फिल्म्स दाखवल्या. त्यावर चर्चा केली. प्रसंगी स्वत:चे कॅमेरे देऊन फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करायला प्रोत्साहित केलं.
प्रायोगिक पातळीवर एकदोन डॉक्युमेण्ट्रीज केल्यानंतर या माध्यमाचा आणि मी निवडलेल्या विषयाचा आवाका माझ्या लक्षात आला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ए. एस्. आय.) ही भारतीय इतिहासावर काम करणारी एक महत्त्वाची शासकीय संस्था. या संस्थेच्या काही अधिकाऱ्यांनी मी केलेले काम पाहिले आणि अजिंठा तसेच वेरूळ या दोन वारसास्थळांवर डॉक्युमेण्ट्री करण्याचा प्रस्ताव त्यांनी माझ्यासमोर ठेवला. मी प्रोत्साहितही झालो आणि थोडं दडपणही आलं. जागतिक वारसास्थळांवर काम करायला मिळणं ही एक मोठी संधी होती. अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या मी अगदी लहानपणापासून अनेकदा पाहिलेल्या होत्या. त्यांत रमूनही गेलो होतो. पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून ही स्थळं आणि त्यांचा इतिहास अत्यंत व्यामिश्र आहे याची जाण मला अनुभवातून आलेली होती. शिवाय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या संस्थेची एक शिस्त आहे, नियमावली आहे, काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. शास्त्रीय आणि संशोधित माहितीपलीकडे काही लिहायचं बोलायचं नाही असा या संस्थेचा शिरस्ता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करताना मला एका विशिष्ट चाकोरीतून जावं लागणार होतं. हे काम मी करायला घेतलं तेव्हा अनेक मातब्बर संशोधकांनी या विषयांवर संशोधनं केली होती आणि काही संशोधक, अभ्यासक या विषयांवर संशोधकीय कामं करतही होते. त्यांनी केलेली संशोधनं वाचणं, ती समजून घेणं आणि त्यातून डॉक्युमेण्ट्रीसाठी लागणारा सारांश काढणं हे मोठं काम होतं. अजिंठा, वेरूळची सर्वसमावेशक तोंडओळख करून देणं हे डॉक्युमेण्ट्रीचं उद्दिष्ट असावं असं पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचं मत होतं. या विषयांना महत्त्वाची अशी तीन अंगं होती. एक म्हणजे धर्माचा इतिहास, दुसरं म्हणजे लेण्यांचा इतिहास आणि तिसरं म्हणजे आजवर झालेल्या संशोधकीय कामांची दखल. या तीन अंगांचं एकत्रीकरण करणं आव्हानात्मक होतं. कामाचा विस्तार मोठा होता. वाचन, तज्ज्ञांशी चर्चा, त्यांच्या मुलाखती, भेटीगाठी आणि रोज मिळणारा नवीन दृष्टिकोन यांतून लेण्यांची आणि त्यातल्या घटकांची नेमकेपणानी निवड करण्याचं काम मी टप्प्याटप्प्याने केलं. अजिंठ्यात साधारण एकोणतीस लेण्या आहेत आणि वेरूळमधल्या लेण्यांची संख्या तर साधारण पस्तीसच्याही पुढे आहे. त्यातलं प्रत्येक लेणं महत्त्वाचं आहे. त्यातलं काय चित्रित करायचं आणि काय वगळायचं हे निवडानिवडीचं काम खूप सांभाळून आणि लक्षपूर्वक करावं लागलं. अजिंठा सर्वार्थानी मोहक आणि सुंदर आहे. तीच गत वेरूळची आहे. वेरूळच्या बाबतीत गुंतागुंत अशी की इथे चार वेगवेगळ्या पंथांच्या लेण्या आहेत- बौद्ध, जैन, शैव, आणि वैष्णव (शैव, वैष्णव लेण्यांसाठी तज्ज्ञ मंडळी ‘ब्राह्मणी लेण्या’ असा शब्दप्रयोग तेव्हा तरी करायचे). वेरूळवर केलेल्या फिल्मच्या संहितेची गुंफणही अजिंठ्याच्या संहितेइतकीच किंबहुना अधिक गुंतागुंतीची होती. या पंथाचं/ धर्मांचं तत्त्वज्ञान, त्यांचा इतिहास, लेण्यांमध्ये झालेलं त्याचं प्रकटीकरण, तज्ज्ञांची त्याबद्दलची मतं या सर्वांची दखल घेत फिल्मची रचना करताना मी हे दोन्ही लेणीसमूह अनेकवार पाहिले, निरखले. जवळपास प्रत्येक लेण्यांचं करता येईल तितकं निरीक्षण, नोंदी, छायाचित्रणं केली. निरनिराळ्या दृष्टिकोनांतून संहिता लिहून पाहिल्या, चित्रीकरणं करून पाहिली, संपादनं करून पाहिली. या कालखंडात बौद्ध, जैन, शैव, वैष्णव पंथ/ मतांबद्दल बरंच जाणून घेता आलं. त्यातून ‘द केव्हज् ऑफ अजंठा : अॅन इण्ट्रोडक्शन’, ‘द केव्ह्ज ऑफ एलोरा : अॅन इण्ट्रोडक्शन’ या डॉक्युमेण्ट्रीज तयार झाल्या.

या प्रकल्पाला एक मोठी मर्यादा होती ती म्हणजे जे काही चित्रीकरण करायचं होतं ते कृत्रिम प्रकाशाचा वापर न करता करावं लागणार होतं. हे आव्हानात्मक होतं, पण या मर्यादेमुळे सूर्याचा दिवसभरातला आकाशातला प्रवास आणि लेण्यांमध्ये येणाऱ्या प्रकाशाची वेळ याचा माझा भरपूर अभ्यास झाला. दुसरी मर्यादा होती ती संशोधकीय मत-मतांतरांची. ती मत-मतांतरं टाळून संहिता लिहायची होती. या मर्यादेमुळे संशोधकीय लेखनाचे अन्वयार्थ लक्षात घेऊन संशोधनातलं सारतत्त्व संहितेत कसं मांडता येईल याचाही माझा अभ्यास झाला. तिसरा महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे निवेदनाचा. अजिंठा-वेरुळच्या मी केलेल्या चित्रीकरणाचा पोत, मी लिहिलेली संहिता याला साजेसा आवाज या डॉक्युमेण्ट्रीसाठी मला हवा होता. सयानी गुप्ता या अभिनेत्रीने ती जबाबदारी घेतली आणि श्रवणीय निवेदन या फिल्म्सना मिळालं.

मी स्थापत्य या विषयावर डॉक्युमेण्ट्री करतो. मी ज्या कालखंडातलं स्थापत्य चित्रित करतो त्या स्थापत्यात दृश्यकला आणि स्थापत्यकला या दोन्ही कलांचा अतूट संगम आहे. या विषयांतून स्थापत्य व दृश्यकला ही दोन अंगं वेगवेगळी काढता येत नाहीत, त्यामुळे अशा विषयवस्तूवर माहितीपर संहिता लिहिताना कला आणि माहिती यांचं एक विशिष्ट गुणोत्तर ठेवावं लागतं. फक्त कोरडी माहितीही अपेक्षित नाही आणि नुसतंच अलंकारिक वर्णनही. त्यामुळे घडतं असं की या विषयांवर लिहिता लिहिता एक विशिष्ट कथन आकाराला यायला लागतं. एका अर्थानी डॉक्युमेण्ट्री निर्मितीच्या या टप्यावर आपण कलानिर्मितीच्या प्रक्रियेचे साक्षीदार व्हायला लागतो. शब्द आणि दृश्य मिळून जे चलचित्र रेखाटायचं त्याचं एक समीकरण तयार व्हायला लागतं. ऐतिहासिक स्थापत्यावर डॉक्युमेण्ट्री करताना माहिती, ऐतिहासिक पुरावे, साधनं, तज्ज्ञांची मतं या सर्व आयामांचा विचार एकीकृत मांडणीच्या रूपात करावा लागतो. इथे पुरावा, अभ्यास आणि कलात्मक सौंदर्य हे हातांत हात घालून नांदत असतात. कडक शिस्तीत केलेल्या वस्तुनिष्ठ संशोधनांतही कलातत्त्वाचा साक्षात वास इथे असतो.

हेही वाचा – लिलीपुटीकरण…

संग्रहालय हा अजून एक विषय मी डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकर म्हणून हाताळतो. ‘सांगली म्युझियम्स : अॅन इण्ट्रोडक्शन’ त्यातूनच तयार झाली. कित्येकांना माहिती नसेल, पण राज्यात शासनाची उत्तमोत्तम संग्रहालयं आहेत. अगदी इसवीसनपूर्व कालखंडापासून ते अगदी अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या कालावस्तूंचा संग्रह इथे आहे. संग्रहालयांवर डॉक्युमेण्ट्री फिल्म्स करताना थोडा वेगळा दृष्टिकोन ठेवावा लागतो. एका कलाप्रकाराच्या एका कलावस्तूची माहिती सांगताना दुसऱ्या कलाप्रकाराच्या कलावस्तूतील कलातत्त्वाची, त्या कलावस्तूच्या कालखंडाची, त्या वस्तूच्या इतिहासाची, कलामूल्यांची जाण ठेवत आणि संग्रहालयातील सर्व कालावस्तूंतील समान धागा शोधत संग्रहालयांवरच्या डॉक्युमेण्ट्रीचा विचार करावा लागतो.
डॉक्युमेण्ट्री म्हणजे माहिती देणारा चित्रपट अशी जरी व्याख्या असली तरी इंटरनेटच्या प्रचार-प्रसारानंतर वारसास्थळांवर आणि कलावस्तूंवर केल्या जाणाऱ्या डॉक्युमेण्ट्रीची प्रक्रिया बऱ्याचअंशी बदलली आहे. कोणत्याही कलेविषयी अथवा कलाकृतींविषयी माहिती मिळवणं आज खूप सोपं झालं आहे. मग डॉक्युमेण्ट्री म्हणजे आता नेमकं काय हा प्रश्न व्यापक होत जातो. टेलिव्हिजन चॅनल्स, ओटीटी, इन्स्टाग्राम रील्स, फेसबुक रील्स, यूट्यूब या माध्यमांमुळे डॉक्युमेण्ट्री या कलाप्रकाराच्या घडणावळीमध्ये अनेक बदल झालेले आहेत. ‘लोकांची एकाग्रक्षमता घटली आहे’ या सबबीखातर डॉक्युमेण्ट्रीच्या सीन आणि शॉट्सचा कालावधी लक्षणीयरीत्या लहान झालेला आहे. विषयवस्तूच्या संपूर्ण आकलनासाठी आवश्यक अशी मांडणी, ठेहराव, शॉट्स आणि दृश्यकालावधी, पार्श्वसंगीत, दृृक्-रचना हे सर्वच आयाम आटल्यासारखे वाटतात. माहितीपट घडवण्याच्या प्रक्रियेला आणि कलेला आता अनेक वाटा फुटल्या आहेत आणि या सर्वच वाटा आपापल्या परीनं महत्त्वाच्या आहेत.

abhijeetsaumitra@gmail.com

Story img Loader