-उषा देशपांडे

काही वर्षांपूर्वी एका टुरिस्ट कंपनीबरोबर मी आणि माझी बहीण हिमाचल प्रदेशाच्या सफरीवर गेलो होतो. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतराजींचं सौंदर्य न्याहाळत आम्ही मनालीला पोचलो. आता मात्र मला वेगळीच उत्सुकता लागून राहिली होती. मी शोध मोहीम सुरू केली. पण कुठलाच धागा हाती लागेना. मग मी स्थानिक दुकानदारांकडे मोर्चा वळवला, पण त्यांनीही नकारघंटा वाजवली. ‘‘जुन्या जमान्यातल्या अभिनेत्री देविका राणी कुठे राहत होत्या?’’ या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच सापडेना. तेवढ्यात एक वयस्कर विक्रेता माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘तुम्ही शोधता आहात तो एका रशियन चित्रकाराचा बंगला आहे. इथून साधारण एक तासाच्या अंतरावर नग्गर नावाचं छोटसं गाव आहे तिथे आहे तो.’’

chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
story of hrishikesh palande about konkan rain
किती याड काढशील?
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…
Health care also has a different system of advertising
आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल
Rahul Gandhi marathi news
‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!
documentary maker
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…
Rain Memories, memories of rain, Emotional Landscape of rain memories, challenges in rain, rain memory story, lokrang article, marathi article,
कहाण्या तर ओल्याचिंबच राहतात…
सांधा बदलताना: वैष्णव जन…

देविका राणीने निकोलस रोअरिक या रशियन चित्रकाराशी लग्न केलं होतं हे मला माहीत होतं, त्यामुळे आम्ही लगेच तिथे गेलो. व्यवस्थित निगा राखलेली सुंदर वास्तू, चित्रप्रदर्शन आणि काळजीपूर्वक जपलेलं देविका राणीचं ऑफिस बघून खूप समाधान वाटलं. परतीच्या प्रवासात मात्र मी विचार करत होते, ज्या देविका राणीने ‘फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा’ हा किताब मिरवला, पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवला, बॉम्बे टॉकिजची मुहूर्तमेढ रोवली, ती मात्र आज भूतकाळाच्या अंधारात हरवली आहे. ती प्रकाशात यायला हवी. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या तिच्या अमूल्य योगदानाची वर्तमानकाळालाही जाणीव करून द्यायला हवी. फिल्म्स डिव्हिजनच्या प्रमुख स्मिता वत्स-शर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनाही ती कल्पना पसंत पडली, पण ‘डिस्कव्हरिंग देविका’ या माहितीपटाच्या करारावर मी सही केली आणि मला प्रचंड तणाव आला.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…

असं का व्हावं? मी आजपर्यंत अनेक डॉक्युमेण्ट्री फिल्म्स बनवल्या होत्या. अगदी सुरुवातीच्या काळात चित्रपट निर्देशनाच्या कोर्सच्या अखेरच्या वर्षी मी ‘गुलझार-कवि आणि कविता’ असा माहितीपट बनवला तेव्हा त्यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकाबरोबर शूटिंग करतानाही माझ्या मनावर असे दडपण आले नव्हते. पुणे विद्यापीठातून बी.ए. आणि नंतर पत्रकारितेची पदवी घेतल्यावर मी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला तेव्हा टेक्निकल अभ्यासक्रमात दोनच मुली होत्या. फिल्म एडिटिंगसाठी रेणू सलुजा आणि फिल्म डायरेक्शनसाठी मी.

तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून मी बाहेर पडले त्याकाळात दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्त्रियांचा फारसा वावर नव्हता. हातात पदवी होती, पण काम नव्हते. त्यावेळी प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांचे पती अमर वर्मा फिल्म्स डिव्हिजनमध्ये मोठ्या अधिकारपदावर होते. माझे वडील दत्तोपंत देशपांडे यांचा शास्त्रीय संगीत क्षेत्रात वावर असल्यामुळे माणिकताईंशी आमचा कौटुंबिक स्नेह होता. त्यामुळे अमर वर्माजींच्या साहाय्याने मी फिल्म्स डिव्हिजनमध्ये पोचले. सुरुवातीला तिथे मी काँट्रॅक्टवर १०/२०/३० मिनिटांच्या फिल्म्स बनवल्या. अंदमानच्या आदिवासींवर फिल्म करायला तर पार निकोबारच्या घनदाट जंगलात हिंडून आले. या साऱ्या फिल्म्स मी फ्री-लान्सर पद्धतीने केल्या होत्या. म्हणजे असे की, स्क्रिप्ट आणि दिग्दर्शन ही माझी जबाबदारी आणि युनिट मात्र एफ.डी.च्या कर्मचाऱ्यांचे. त्यामुळे पुढचा प्रोजेक्ट स्वतंत्र काँट्रॅक्ट पद्धतीने करायचे असे मी ठरवले खरे, पण मी कोणत्या शिवधनुष्याला हात घालतेय याची मला कल्पना नव्हती.

हिंदुस्तानी शास्त्रीय गायकीच्या ‘घराना’ परंपरेवर एक फिल्म व्हायला हवी ही माझी कल्पना माहिती मंत्रालयाने मान्य केली. साधारण एक तासाच्या या माहितीपटाची निर्मिती आणि निर्देशन अशी दुहेरी जबाबदारी माझ्यावर होती. प्रत्येक घराण्याचा इतिहास, त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये आणि सद्या काळातील मान्यवर कलाकाराने सादर केलेले प्रात्यक्षिक असे त्या विषयाचे स्वरूप होते. त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागणार हे तर उघडच होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे होते ते प्रख्यात कलाकारांचे सहकार्य. त्या साऱ्याच कलाकारांशी माझ्या वडिलांचे स्नेहसंबंध असल्याने ती समस्या सुटली आणि पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं जसराज, पं. रविशंकर, बेगम परवीन सुलताना अशा दिग्गज कलाकारांकडून संमती मिळाली.

आणखी वाचा-ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा संघर्ष

या फिल्मविषयी विचार करताना मी ठरवले होते की शास्त्रीय गायन आणि गायक यांच्याविषयी पूर्वी झालेल्या फिल्म्सपेक्षा आपल्या फिल्ममधले सादरीकरण वेगळे असायला हवे. त्यासाठी एखाद्या हॉल, मांडव किंवा दूरदर्शनच्या सेटवर होणाऱ्या मैफलींच्या चौकटीतून बाहेर पडायला हवे. मग त्यानुसार लोकेशनसाठी शोधमोहीम सुरू केली. पंडित जसराजजींच्या गायनातला आध्यात्मिक स्पर्श लक्षात घेता एखाद्या सुंदर मंदिरात त्यांचे शूटिंग करावे यासाठी मी टिटवाळ्याच्या बिर्ला मंदिराची निवड केली. कंपनीचे अधिकारी दाद देईनात तेव्हा खुद्द आदित्य बिर्लांनाच फोन केला. पंडितजींनीही अगदी खुल्या मनाने सहकार्य केले.

आत्तापर्यंत माहितीपटात निवेदन पडद्यामागच्या अदृश्य आवाजात ऐकू यायचे. पण आपल्या फिल्मचा निवेदक पडद्यावर दिसायला हवा, त्याने प्रेक्षकांशी संवाद साधायला हवा अशी माझी इच्छा होती. ‘ऑन-स्क्रीन अँकर’ हा प्रयोग आणि तोही कधी फतेहपूर-सिक्री आणि ताजमहाल, तर कधी ग्वाल्हेर फोर्ट आणि आमेर फोर्ट अशा विषयानुरूप वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन शूट करणे ही एक सर्कसच होती. उस्ताद झाकीर हुसेन यांनी अत्यंत सहनशीलता वापरून हा डोलारा उभा केला. पडद्यावरचा त्यांचा प्रसन्न आविष्कार हा ‘खयाल’ नामक फिल्मच्या लोकप्रियतेचा एक मोठा घटक ठरला.‘खयाल’च्या निर्मितीत तीन वर्षे घालवल्यानंतर मी इतर विषयांकडे वळले. पण एक गोष्ट खरी की, माझी स्वाभाविक आवड कलाक्षेत्राकडे झुकणारी होती. माझ्या वेगवेगळ्या फिल्म्ससाठी मी अंदमानपासून आसामपर्यंत आणि आंध्र प्रदेशपासून गुजरातपर्यंत फिरले. प्राणिसंग्रहालयापासून चोरबाजारापर्यंत आणि कीटकनाशकापासून पैठणीपर्यंत विविध विषय मी हाताळले.मग याच वेळी असे टेन्शन का यावे?

देविका राणींचा शोध घ्यायचा तर शंभर वर्षांची पाने उलटायला लागणार होती. गुरुदेव रवींद्रनाथांच्या वंशवृक्षाच्या एका शाखेवर १९०८ साली उमललेली ही सुंदर कलिका. बालवयातच शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहिलेली, संगीत, वेशभूषा, शिल्पकला अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेली. तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात झाली १९३३ सालच्या ‘कर्मा’ चित्रपटापासून. १९४३ साली प्रदर्शित झालेला ‘हमारी बात’ हा तिचा अखेरचा चित्रपट. पण एक सुंदर, कुशल अभिनेत्री एवढीच तिची ओळख नव्हती. जर्मनीच्या स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या तांत्रिक पैलूंचे प्रशिक्षण, अद्यायावत बॉम्बे टॉकीज स्टुडिओच्या स्थापनेत पती हिमांशू राय यांच्या बरोबर सहभाग आणि त्यांच्या यशामधील अमोल योगदान, राय यांच्या निधनानंतर समर्थपणे कारभार पेलणारी निर्माती अशा अनेक पैलूंनी तिचे व्यक्तिमत्त्व समृद्ध झाले होते; आणि त्या साऱ्यांचे वस्तुनिष्ठ सादरीकरण होणे आवश्यक होते. किंचितशीही चूक होऊन चालणार नव्हती. आणि तीच तर मोठी समस्या होती. देविका राणींचे समकालीन सहकारी तर आता जीवित नव्हतेच, पण त्यांच्या पुढची पिढीही कालवश झालेली होती. त्यामुळे विश्वसनीय माहिती मिळणे कठीणच होते. हेच माझ्या टेन्शनचे मुख्य कारण होते.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले :‘कान’ महोत्सवापर्यंत नेणारा प्रवास…!

पुण्यातल्या ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया’ची लायब्ररी हे माझे एकमेव आश्रयस्थान होते. तिथल्या खजिन्यात १९३३ पासूनचे फिल्म वर्ल्ड आणि व्हरायटी विकली, १९३५ पासूनचे फिल्म इंडिया अशा अनेक जुन्या नियतकालिकांचे अंक जपून ठेवलेले आहेत. त्यामधून स्वत: देविका राणींच्या मुलाखती, त्यांच्या चित्रपटांची परीक्षणे सापडतात. तसेच फिल्म फेअर, स्टार अँड स्टाईल अशा आधुनिक मासिकांच्या प्रतीही आहेत. त्या समुद्रमंथनातून माहितीचे अमृतकण शोधावे लागले.

अशोक कुमार, दिलीप कुमार, हंसा वाडकर, निरंजन पाल, नबेंदू घोष, जयराज अशा देविका राणींच्या सहकाऱ्यांच्या आत्मचरित्रातून आणि मुलाखतीमधून एक व्यक्तिमत्त्व साकार होऊ लागले. या शोधमोहिमेत एक वर्ष संपून गेले. त्यासाठी मला उदार सहकार्य केले त्यावेळी तिथे निर्देशकपदावर असलेल्या प्रकाश मगदूम यांनी. मी जमवलेल्या माहितीच्या आधारे सुसंगत संहिता लिहिण्यासाठी प्रसिद्ध लेखक अंबरीश मिश्र यांचा सहभाग मिळाला.

अभिनेत्यांच्या जीवनावरील माहितीपट बरेचदा त्यांच्या चित्रपटातले प्रसंग, गाणी यांनीच भरून टाकलेले असतात. मला असला ‘चित्रहार’ बनवायचा नव्हता. देविका राणींच्या जीवनातल्या क्षणांचे प्रतिबिंब तिच्या चित्रपटात पकडता यायला हवे असा माझा आग्रह होता. त्यासाठी तिच्या सर्व चित्रपटांची पारायणे करून त्यातले लहान-लहान शॉट्स निवडून स्क्रिप्टमध्ये योग्य जागी ‘फिट्ट’ बसवावे लागले.

कोणत्याही माहितीपटाची ही तर केवळ पूर्वतयारी असते. त्यानंतर प्रत्यक्ष प्रॉडक्शन प्रक्रिया सुरू होते. तेव्हा प्रत्येक डॉक्युमेण्ट्रीवाल्यासमोर उभा असतो अडचणींचा डोंगर. तुमचा प्रोजेक्ट सरकारी मर्जीवर अवलंबून असेल तर तुम्हाला ‘निष्काम कर्मयोग’ आपोआपच शिकायला मिळतो. ‘‘प्रसंग कुठलाही असो, तुम्हाला फक्त तीन लाइट्स मिळतील, कॅमेरे दोन असले तरी कॅमेरामन एकच मिळेल, शूटिंगसाठी तीन दिवस जरुरी असले तरी दोनच मिळतील, परगावी शूटिंगसाठी जायचे असेल तर तुमचा स्वत:चा सर्व खर्च तुम्हालाच करावा लागेल’’ असे अनेक अडथळे रोजच पार करावे लागतात.

खाजगी कंपनी किंवा संस्थेसाठी फिल्म बनवताना बजेटचा बागुलबुवा नसतो. पण तिथे फारसे मतस्वातंत्र्यही नसते. क्लायंटच्या मनाप्रमाणे स्क्रिप्टमध्ये बदल करणे किंवा रिशूट करणे भाग पडते. शूटिंगसाठी जमवाजमव करण्याच्या काळात ‘‘ही कोण देविका राणी?’’ या प्रश्नाने माझा सतत पाठलाग केला होता. चित्रपटसृष्टीतल्या काही जाणकारांच्या मुलाखती मिळवण्याचा मी प्रयत्न करत होते, पण प्रख्यात दिग्दर्शक, नामवंत समीक्षक, अभ्यासक यातल्या बहुतेकांना त्याबद्दल फारशी जाणीव नव्हती किंवा पर्वाही नव्हती. हिंदी सिनेमात अभिनयाचा महामेरू मानला गेलेला एक कलाकार देविका राणींची ‘फाईंड’ होता हे तर सर्वश्रुत आहे. त्याच्या आत्मचरित्रात, अनेक मुलाखतींत त्याने हे ऋण मान्य केले होते. तो कालवश झाल्यामुळे मी त्याच्या फिल्म-स्टार पत्नीला ती आठवण सांगण्याची विनंती केली तेव्हा ती उत्तरली, ‘‘मला साहेबांनी देविका राणींबद्दल कधीच काही सांगितले नाही.’’ हतबुद्ध होऊन फोन बंद करणे एवढेच माझ्या हातात होते. या उलट शर्मिला टागोर, सुभाष घई यांच्याकडून स्नेहपूर्ण सहकार्य मिळाले. फिल्ममध्ये निवेदिकेची भूमिका पार पाडण्याची विनंती स्मिता जयकरांनी तुटपुंज्या मानधनासकट स्वीकारली आणि स्वखर्चाने पुण्याला येऊन दोन दिवस शूटिंग केले. देविकाच्या शेवटच्या मुलाखतीचा काही भाग इंडिया टुडेच्या कृपेने मिळाला. बॉम्बे टॉकीजच्या जुन्या चित्रपटाची क्लिपिंग्स फेमस स्टुडिओचे राजकुमार सक्सेरिया यांनी विनामूल्य देऊन टाकली.

आज सगळीकडे संस्कृतीरक्षणाचे नगारे वाजत आहेत. या संस्कृतीच्या नामशेष झालेल्या अनेक पैलूंचे जतन करण्याचे अमूल्य कार्य माहितीपटांनी केले आहे. पण तो खजिना डब्यांमध्ये पडून गंजला आहे. विनोद चोप्रा, प्रकाश झा यांच्या कारकीर्दीचा आरंभ डॉक्युमेण्ट्रीपासूनच झाला आहे. सुखदेव, मणी कौल, गुलझार, जब्बार पटेल अशा दिग्गज दिग्दर्शकांनीही या क्षेत्रात काम केले आहे.

डॉक्युमेण्ट्रीवाले शंभर-दोनशे कोटी गल्ला जमवण्याची भाषा बोलू शकत नाहीत, पण समाजाला वस्तुस्थितीचा आरसा दाखवण्याचे महत्त्वाचे काम ते करत असतात. समाजातील उणिवांची जाणीव ते करून देतात. ज्या देशात माहितीपटांची चळवळ सशक्त असते त्या देशाची विवेकबुद्धी जागृत राहते. पण त्यासाठी माहितीपटांना प्रकाशात आणण्याची गरज आहे. केवळ सरकारी मेहरबानीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या सामाजिक संस्था, कॉर्पोरेट्स, किंवा प्रमुख उद्याोजक यांनी फायद्याचे गणित न मांडता चांगल्या विषयांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.

usha.deshpande1707 @gmail.com