– सचिन बाळासाहेब सूर्यवंशी

फिल्म किंवा डॉक्युफिल्म बनविण्यासाठी चांगले कॅमेरे, चांगली ध्वनिमुद्रण यंत्रणा अनिवार्य. कोल्हापुरातील या चित्रकर्त्याने मात्र मित्रांचे अद्यायावत होत गेलेले ‘आयफोन’, लग्नसमारंभाच्या चित्रीकरणासाठी वापरला जाणारा कॅमेरा घेऊन आपल्या परिसराला जगभरात गाजवले. राष्ट्रीय पुरस्कारासह दोन फिल्मफेअर पारितोषिके मिळवणाऱ्या दिग्दर्शकाचा कार्यप्रवास…

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम

माझे मित्र कोल्हापुरात ‘फुटबॉल महासंग्राम’ नावाची स्पर्धा आयोजित करतात. त्याच्या जाहिरातीची जबाबदारी माझ्यावर असायची. त्यामुळे कोल्हापूरचे फुटबॉल क्षेत्र जवळून बघत होतो. आमच्या कोल्हापुरात स्थानिक खेळांच्या स्पर्धांचे सामने बघायला पंधरा-वीस हजार लोक येतात, हे जेव्हा मी माझ्या पुण्या-मुंबईच्या मित्रांना सांगायचो; तेव्हा त्यांना वाटायचं मी माझ्या गावच्या बढाया मारतोय. दुसरी गोष्ट होती ती म्हणजे इथे जी मुलं त्यांच्या फुटबॉल खेळामुळे ‘सेलिब्रिटी’ होती, ज्यांचा मोठा चाहता वर्ग होता- ते कुठे तरी चहाच्या गाडीवर किंवा एमआयडीसीमध्ये काम करत असत. खेळाची आवड जपत त्यांना आपलं घरसुद्धा चालवायला लागत असे. हे सारं पाहत असताना युरोपसारख्या खंडात फुटबॉल खेळाडूंचं जगणं पूर्णत: भिन्न असल्याचं माध्यमांतून कळत होतं. कोल्हापुरात फुटबॉल इतका रुजलेला आहे, लोकांनी डोक्यावर घेतला आहे हे बाहेर समजावं आणि इथल्या खेळाडूंना बाहेरील कंपन्यांचं आर्थिक पाठबळ मिळावं- ज्यामुळे त्यांना फक्त खेळावर लक्ष केंद्रित करता येईल… इथे फुटबॉल हा फक्त खेळ नसून उत्सव आहे हे सरकारदरबारी समजावं… खेळाडू, मैदान आणि इतर सुविधांसाठी सरकारी मदत मिळायला एक ‘प्रेझेन्टेशन’ करावं या हेतूनं मी ‘द सॉकर सिटी’ या माहितीपटाच्या कामाला सुरुवात केली.

इथे खेळाडू आणि त्यांच्या संघ समर्थकांमध्ये इतकी ईर्षा आहे की मैदानांवर सतत भांडणं असायची, त्यामुळे पोलीस प्रशासन काही काळ फुटबॉल हंगाम बंद करायचे. परिणामी खेळाचं नुकसान व्हायचं. कोल्हापुरातील फुटबॉलज्वराचा मागोवा घेताना समजलं की, हा खेळ १०० वर्षांपासून इथे खेळला जातोय. आजोबा, वडील, मुलगा आणि आता या मुलाचा नातू फुटबॉल खेळतोय. अशी किती तरी घराणी कोल्हापुरात आहेत ज्यांनी फुटबॉलचा वारसा जपला आहे. इथल्या खेळाडूंना हे ज्ञात आहे की, हा आपल्या पायात आलेला फुटबॉल असाच आयता आलेला नसून, त्याच्यामागे कितीतरी पिढ्यांचा त्याग आणि समर्पण आहे. हा खेळ जपणं आपली जबाबदारी आहे. बऱ्याच खेळाडूंच्या घरात खेळ सोडून नोकरी-धंदा करण्यासाठी तगादा लागलेला असतो. त्या सगळ्यांना आपला मुलगा कोणता वारसा जपतोय हेही समजवून सांगावं याची गरज मला वाटली.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम

हा माहितीपट तयार करायचा तर आमच्याकडे अजिबातच पैसे नव्हते. माझा मित्र प्रसाद पाध्ये याच्याकडे ‘आयफोन सेव्हन’ होता, तो मी काही काळासाठी त्याच्याकडून घेतला. त्यावर बरंचसं चित्रीकरण केलं. सध्या लग्न समारंभ चित्रित करायला जे कॅमेरे असतात ते वापरून काही भाग चित्रित केला. हा माहितीपट पूर्ण झाल्यावर आम्ही कोल्हापुरातील पेठांमध्ये गल्लोगल्ली जाऊन एलईडी स्क्रीनवर दाखवला. संघचालक, खेळाडूंच्या घरच्यांनी, समर्थकांनी बघितला. हा माहितीपट पाहिल्यानंतर आपल्यात जे बदल करणं गरजेचे आहेत ते आपण करूया, अशी सकारात्मक वाटचाल सुरू झाली.

आमचा दुसरा माहितीपट ‘वारसा’. तो कोल्हापूरच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धकला तालमींनी पिढ्यान्पिढ्या कशी जपली यावर आधारित आहे. माझं एका मराठी सिनेमाचं काम सुरू होतं. त्याचं शूटिंग संपलं की त्या फिल्मसाठी आलेल्या मोठ्या कॅमेऱ्यावर, त्याच व्यावसायिक तंत्रज्ञांसोबत पुढे पाच-सहा दिवस या माहितीपटाचा मुख्य भाग चित्रित करायचा असा माझा विचार होता. पण त्या फिल्मचंच काम खोळंबलं. लगेच करोना आला. त्यात दीडेक वर्ष सगळंच थांबलेलं.

कोल्हापुरातील कोणत्याही पेठेमध्ये तुम्ही रात्री गेलात तर रस्त्याकडेला वीस-तीस मुलं काठी फिरवायचा सराव करताना दिसतील. अगदी रस्त्यावरच त्यांचा सराव सुरू असतो. एखादी गाडी त्यांना धडकू शकते, मोठा अपघातसुद्धा होऊ शकतो; तर या मुलांना सरावासाठी महानगरपालिकेचं जवळचं उद्यान मिळावं- जे रात्रीचं बंदच असतं- आणि तिथं प्रशासनानं एखादा बल्ब लावून द्यावा यासाठी एक व्हिडिओ सादरीकरण करावं असं वाटत होतं…
या सगळ्याचा शोध घेताना कळलं की, ही मुलं जी काठी फिरवत आहेत ती साधी काठी फिरवणी नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा युद्धसराव आहे. मला हे मांडायचं होतं, पण पैशांमुळे अडलं होतं आणि हे मला अस्वस्थ करत होतं. माझी झोप उडाली.

शेवटी उपलब्ध साधनांमध्येच करूया असं ठरवलं. कामाला सुरुवात केली. सिद्धेश सांगावकर आणि चिन्मय जोशी या दोन मित्रांच्या ‘आयफोन थर्टीन प्रो’ मोबाइलवर यातला बहुतांश भाग चित्रित केला. अगदी मोजक्या भागांसाठी लग्न समारंभासाठी वापरला जाणारा कॅमेरा वापरला. पार्श्वसंगीताची बाजू अमित पाध्ये आणि साऊंड डिझाईनची जबाबदारी मंदार कमलापूरकर यानं सुंदररीत्या पार पाडली. त्यामुळे ‘वारसा’ अधिक समृद्ध झाला.

परदेशी युद्धकला आपल्या शालेय क्रीडा अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत, पण स्वराज्य ज्या युद्धकलेवर उभे राहिले ती छत्रपती शिवरायांची युद्धकला महाराष्ट्र राज्याच्या शालेय क्रीडा अभ्यासक्रमात नाही याचा धक्का बसला. यासाठी आम्ही मंत्री, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, याचं महत्त्व समजावून सांगितलं. शाळेत ग्रेस गुण मिळाले तर पालक मुलांना प्रोत्साहन देतील आणि आपोआप या खेळाचा प्रसार होईल, असंही वाटू लागलं.
माहितीपट बनवण्यातच आमचे पैसे संपून जातात, त्यामुळे आम्ही कोणत्याही फिल्म फेस्टिव्हलला आमचे माहितीपट पाठवत नाही. आम्ही बऱ्याच फेस्टिव्हल्सच्या आयोजकांना विनंती केली की, आम्ही शुल्क भरू शकत नाही. आम्हाला तुमच्या स्पर्धा विभागात घेऊ नका, पण तुम्ही आमची फिल्म दाखवू शकता. त्यालाही अल्प प्रमाणात यश मिळाले. या वर्षी गणेशोत्सवात कोल्हापूर आणि पुण्यातील काही मंडळांनी एलईडी स्क्रीनवर ‘वारसा’चं प्रदर्शन केलं.

फिल्मला मिळालेल्या राष्ट्रीय पातळीवरील मान्यतेच्या जोरावर आम्ही माहितीपट ओटीटीवर विकू शकत होतो- ज्यातून आमचा किमान निर्मितीखर्च निघू शकत होता. पण ज्यांच्यासाठी हे माहितीपट बनवले आहेत त्यांना हे माहितीपट बघता आले नसते. जास्तीत जास्त लोकांनी बघावेत म्हणून आम्ही ते यूट्यूबवर ‘लेझी लिओ फिल्म्स’ या आमच्या चॅनलवर शेअर केले आहेत.

दोन्ही माहितीपट करताना संबंधित विषयांमध्ये मला खूप संशोधन करावं लागलं. चित्रपट करताना तुम्ही काहीही काल्पनिक मांडू शकता, माहितीपट करताना ते टाळावे लागते. तुम्हाला मिळालेली माहिती खरीच आहे का, याची सत्यता वारंवार पडताळून पाहावी लागते. पुढे जाऊन मागे यावे लागते. माहितीपटाची गोष्ट हळूहळू सापडत जाते. तुम्ही ठरवलेल्या दिशेनं पुढे जाता, नवनवीन माहिती मिळत जाते. कधी कधी समजते की आपण ठरवलेल्या दिशेनं जाऊ शकत नाही, मिळालेल्या माहितीच्या आधारावर तुम्हाला नवीन दिशेला जावं लागतं. आपलं ध्येय छान माहितीपट बनवण्यापेक्षा सत्याशी प्रामाणिक असलेला माहितीपट बनवणे असायला हवं.

माहितीपट बनवावा असं मला कधीही वाटलं नव्हतं, ठरवलंही नव्हतं. मला चित्रपट बनवायचा होता. व्यक्त होण्याच्या गरजेतून मी चित्रपट माध्यमाकडे वळलो असं माझ्या लक्षात आलं आहे. चित्रपटाच्या प्रोसेसपेक्षा माहितीपटाच्या प्रोसेसची मला अधिक मजा येते. चित्रपटात तुम्ही काय हवं हे आधी ठरवता आणि मग तेच चित्रित करता. माहितीपटात तुम्हाला सुरुवातीपासून नवनवीन गोष्टी सापडत जातात. एखादं कोडं सोडवल्यासारखी मजा येत जाते. तुम्ही अनोळखी प्रदेशात फिरायला जाता आणि पावलापावलावर अचंबित होता तशी माहितीपट निर्मितीची गंमत आहे. आपल्याकडे माहितीपटांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर असं नाही. माहितीपटांचे महोत्सव भरतात. माहितीपटांमध्ये मांडलेले विषय समजून घेतले जातात. त्यावर चर्चासत्रं होतात. आपल्याकडेसुद्धा हळूहळू ही संस्कृती रुजेल अशी आशा आहे. काम करताना सन्मान मिळण्यासाठी किंवा ‘रेकमेंडेशन’साठी न करता एखाद्या चळवळीसारखं काम केलं तर कामाचं समाधान मिळतंच. तसंच वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांचं जगणं समजून घेता येतं. जीवन समृद्ध होत जातं. कोल्हापुरात फुटबॉल जेव्हा खेळायला सुरुवात झाली तेव्हा चिंध्या गोळा करून त्याचा बॉल तयार करून फुटबॉल खेळायचे. आज तो खेळ बघायला हजारो लोक जमतात. सुरुवात छोटीच असते, पण सुरुवात केली पाहिजे.

हेही वाचा – विळखा काजळमायेचा!

मला जगातली सगळ्यात भारी फिल्म बनवायची नाही. आता आपल्याकडे जी माणसं, जी साधनं उपलब्ध आहेत ती घेऊन, जास्तीत जास्त चांगलं मांडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपलं सर्वोत्तम देऊन हातात घेतलेलं काम पूर्ण करायचं. लोकांसमोर सादर करायचं ही माझी फिलॉसॉफी आहे. आणि हे करायला माझ्या मित्रांची टीम मला खूप मदत करत असते. चांगले कॅमेरे, चांगले साऊंड रेकॉर्डिंग इक्विपमेंट वापरायला हवीत. पण त्याची वाट पाहण्यात कामच राहत असेल तर? आमच्या कोल्हापुरात कलामहर्षी बाबूराव पेंटरांनी कॅमेरा मिळाला नाही तर त्यांनी स्वत: प्रोजेक्टर उलटा जोडून कॅमेरा तयार केला. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा हजार मावळ्यांची फौज तयार केली आणि मग स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली का? त्यांनी स्वराज्य निर्मितीची सुरुवात मूठभर मावळ्यांना सोबत घेऊनच केलेली.

आज रात्री झोपल्यानंतर उद्या झोपेतून जागं होऊच कशावरून? याची मला सतत भीती वाटत असते. त्यामुळे मला जे करायचं आहे ते आज, आता करायचं असतं. करत राहायचं.

sooryawanshi@gmail.com