प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणूस! अगदी खरं आहे. कुत्र्याचा पाळीव प्राणी ‘माणूस’ आहे! खरं तर माणूस पाळणं हे कुत्र्याच्या दृष्टीने अत्यंत स्वाभाविक आहे. मुळात कुत्र्याचे खाण्यापिण्याचे, खेळण्याचे, हिंडण्या-फिरण्याचे लाड करण्याकरता त्याने हा माणूस नावाचा प्राणी पाळलेला आहे, हे आपण सर्वात प्रथम समजून घेतलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर अगदी महाभारत काळापासून ते इतिहास काळापासून ते अगदी आत्तापर्यंतच्या माणूस आणि कुत्र्याच्या हजारो गोष्टी, किस्से आपण ऐकलेले असतात. तसं माणसांबद्दलच्याही अनेक कथा, समजुती वगैरे कुत्र्यानेही दुपारी पडल्या पडल्या कान टवकारून ऐकल्या असतीलच की!

आणखी एक म्हणजे कुत्र्याने कधी मांजर, कबुतर, उंदीर, कावळा वगैरे पक्ष्या/प्राण्यांशी मैत्री केल्याचं आपण कधी पाहिलेलं नाही. पण माणसांशी त्याचं नात अगदी खास आहे, हे नक्की. या प्रेमापोटीच माणसाने कुत्र्याची चित्रं काढली, सिनेमे बनवले, त्याच्याबरोबर सर्कशीत काम केलं. अनेक अ‍ॅनिमेशन चित्रपटांत त्याला प्रमुख भूमिका दिल्या. उदा. डिस्नी (प्लुटो), टॉम अ‍ॅण्ड जेरी (स्पाइक), टिनटिन (स्नुई) इत्यादी, इत्यादी. इतकेच नव्हे तर अनेक व्यंगचित्रकारांनीही आपल्या हास्यचित्र मालिकेतून त्याला प्रमुख व्यक्तिरेखा दिल्या. वास्तविक ‘मला प्रसिद्धी द्या’ असं म्हणत कधी कोणता कुत्रा शेपटी हलवत, आशाळभूतपणे व्यंगचित्रकाराच्या ड्रॉइंग बोर्डपाशी बसला नव्हता. पण माणूस हा इमानदार प्राणी आहे हे कुत्र्याच्या लक्षात यावं, या हेतूनेच या कलाकृती सादर झाल्या असाव्यात.

त्यामुळे मग माणसाने आपल्या मालकाला- म्हणजे कुत्र्याला खूश ठेवण्यासाठी त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि त्यातून असंख्य व्यंगचित्रं आकारास आली. कुत्र्याचा स्वभाव, त्याचं वास घेणं, इतर कुत्र्यांबरोबरचं नातं, मांजर, पोपट, ससा, उंदीर वगैरेंबद्दलची त्याची मतं, त्याला ब्रेड आवडतो की हाडूक, डॉग फूड आवडतं की दूध, त्याला कोचावर बसून डुलकी काढायला आवडतं की बागेत जाऊन जमीन उकरायला, फेकलेल्या वस्तू परत आणायला आवडतात की नेहमीच्या पोस्टमनवर भुंकायला.. इत्यादी, इत्यादी. या सगळ्यांवरती जगभर हजारो-लाखो व्यंगचित्रं आणि कॉमिक स्ट्रिप्स तयार झाल्या. या कॉमिक स्ट्रिप्समध्ये वेगवेगळ्या जातींचे कुत्रे रेखाटले जायचे.. त्यांच्या वैशिष्टय़ांसकट. डिस्नी यांनी तर वेगवेगळ्या जातींच्या वीस-बावीस कुत्र्यांच्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या.

विनोदाच्या ज्या असंख्य शक्यता आहेत, त्यात कुत्र्याने बागेत टाकलेले वर्तमानपत्र मालकाला वाचायला आणून देणं ही एक आवडती कल्पना आहे. या एका कल्पनेभोवती अनेक व्यंगचित्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्रं रेखाटली आहेत. त्यातली दोन मासलेवाईक व्यंगचित्रं सांगता येतील. एक कुत्रा दुसऱ्याला मोबाइल दाखवत म्हणतो, ‘‘हल्ली वर्तमानपत्र ऑनलाइन झाल्यामुळे रोज सकाळी मी मालकाला फक्त लिंक पाठवतो!’ तर दुसऱ्या एका चित्रात कुत्र्याने पेपर आणून देण्याचं काम केल्याबद्दल मालक कुत्र्याला टीप म्हणून डॉलर देतो.. आणि मुख्य म्हणजे कुत्रा ते पैसे आनंदाने स्वीकारतो!! हे म्हणजे कुत्र्याचं व्यंगचित्रकाराने केलेलं मानवीकरणच!

एखादा कुत्रा नायक असलेल्या ज्या कॉमिक स्ट्रिप्स आहेत त्यात व्यंगचित्रकार ग्रॅहम आणि त्यांचा फ्रेड  हा कुत्रा ही कॉमिक स्ट्रिप खूप वैशिष्टय़पूर्ण आहे. मूळचे स्कॉटिश असलेले अलेक्झांडर ग्रॅहम यांनी फ्रेड बास्से हे कुत्र्याचं पात्र ‘डेली मेल’ या वृत्तपत्रासाठी तयार केलं. १९६३ पासून सुरू असलेली ही मालिका अजूनही वाचली जाते. लडिवाळ, हसऱ्या चेहऱ्याचा आणि गुबगुबीत असलेला हा फ्रेड तोंडाने एक अवाक्षरही काढत नाही. पण त्याच्या मनातले सगळे विचार वाचकांपर्यंत मात्र व्यवस्थित पोहोचतात. बास्से हाऊंड ही कुत्र्याची जात म्हणजे लांब कान, बुटके पाय, मोठे डोळे आणि विचारवंतासारखा दु:खी चेहरा असे रूप! त्याचं व्यंगचित्रात रूपांतर करताना ग्रॅहम यांनी त्याला लडिवाळ रूप दिलं. शेपटी अधिक टोकदार करत, डोळ्यांवर तीन रेषा ओढून वेगवेगळे भाव दाखवण्याची सोय केली. त्याच्या नाकावर एक मोठा काळा ठिपका आणि त्यावर छोटा पांढरा टिक्का आणि हसणारी मोठी जिवणी ही या फ्रेडची ओळख.

त्याची चित्रं आपण सतत पाहत राहिलो तर हळूहळू त्याचं सगळं कुटुंब आपल्या ओळखीचं होतंच, पण आपला हा हीरो फ्रेड हाही आपल्याला आवडायला लागतो. त्याचं आयुष्य अगदी साधं आहे. रोजचे प्रसंग.. उदाहरणार्थ- जेवण, टीव्ही बघणं, पेपर वाचणं, शब्दकोडी सोडवणं, बागेमध्ये फेरफटका मारणं, पाहुण्यांचं स्वागत करणं, कधी कधी बाबांच्या खुर्चीत बसणं, वगैरे प्रसंगांभोवती फ्रेडचं आयुष्य फिरत असतं. यातल्या काही प्रसंगांमध्ये प्रचंड अ‍ॅक्शन जरूर आहे. उदाहरणार्थ- बागेमध्ये लपवून ठेवलेले हाडूक सापडत नसल्याने सगळी बाग उकरणं, वगैरे. तर काही प्रसंग अगदी सुस्तावल्यासारखेसुद्धा आहेत. घरी राहायला आलेल्या पाहुण्यांसोबतचे काही प्रसंग तर खूपच मजेदार रेखाटले आहेत. ‘हे पाहुणे मला रोज संध्याकाळी फिरायला घेऊन जातात ते मला आवडतं. पण ते अंतर खूपच कमी असतं..’ असं फ्रेड म्हणतो. त्याचं कारण चित्राच्या शेवटच्या फ्रेममध्ये ते पाहुणे जवळच्याच एका पबमध्ये जाताना दाखवले आहेत.

फ्रेडला खाण्यासाठी नवीन डिश आणली आहे, पण ती त्याला फारशी आवडलेली नाही म्हणून तो नाराज आहे. याचं कारण म्हणजे डिशवर लिहिलेलं ‘डॉग’ शब्दाचं स्पेलिंग ‘ऊॅड’ असं लिहिलंय! तर आणखी एका चित्रात त्याची आई ‘हेल्प’ अशी ओरडते आहे आणि ते ऐकून शूरवीर फ्रेड मदतीसाठी धावतो!! ..आणि उंदराला घाबरून उलट पावली धावत सुटतो. या चित्रात फ्रेडच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे आहेत. अशा कल्पना सुचणं.. तेही चाळीस-पन्नास र्वष.. हे खरंच कौतुकास्पद आहे.

एकदा फ्रेडच्या वडिलांच्या बॉसचा पाय चुकून फ्रेडच्या कानावर पडतो. त्याबद्दल फ्रेड फक्त ‘ओह!’ एवढंच म्हणतो. फ्रेडचे बाबा ‘सॉरी’ म्हणतात. बॉस म्हणतो, ‘आश्चर्य आहे.. फ्रेड फारच सहनशील आहे!’ फ्रेड मनातल्या मनात म्हणतो, ‘‘तू बाबांचा बॉस आहेस म्हणून सोडून दिलं. दुसरा कोणी असता तर कडकडून चावल्याशिवाय राहिलो नसतो!’’

या फ्रेडच्या सुख-दु:खांत ग्रॅहम हे अगदी समरस झालेले दिसतात. सोबतच्या चित्रात सर्वोत्कृष्ट कुत्रा म्हणून फ्रेडला बक्षीस मिळतं आणि ते सेलिब्रेट करायला त्याचे आई-बाबा त्याला घरी एकटय़ाला सोडून बाहेर जेवायला जातात.

तर कॉमिक्स स्ट्रिप्स हा व्यंगचित्र कलाप्रकार जगभरात कमालीचा लोकप्रिय आहे. त्यातल्या एखाद्या पात्राशी लहानपणीच तुमची घट्ट मैत्री झाली की मग तुम्ही ती बरीच र्वष निभावता. या स्ट्रिप्स सतत पाहत राहता. त्या व्यक्तिरेखा तुमच्या अंतर्मनात लपून बसतात आणि पुढे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर त्या पुन्हा भेटल्या की तुम्ही पुन्हा क्षणभरासाठी लहान होऊन जाता. ही किमया व्यंगचित्रकार नावाचे जादूगार करतात!