जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश गतवर्षीचा जगज्जेता डिंग लिरेनचा पराभव करून अवघ्या अठराव्या वर्षी विश्वविजेता बनला. हा किताब मिळवतानाच त्यानं अन्य खेळाडूंचे अनेक विक्रम मोडून काढले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा क्रीडापटू यशस्वी म्हणून लोकांना जेव्हा कळतो त्यापूर्वी त्यानं आपल्या खेळावर हजारो तास मेहनत घेतलेली असते. गुकेशच्या खेळामागचे कष्ट काय होते, यासह दक्षिणेतीलच खेळाडू बहुतांश खेळांमध्ये परमोच्चस्थानी का पोहोचतात त्याचा दोन अव्वल बुद्धिबळपटूंनी घेतलेला शोध…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंगापूरमधील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद सामना… १३ फेऱ्या उलटून गेल्या तरी कोंडी फुटेना आणि १४ वा आणि अखेरचा डावही त्याच दिशेने जाण्याची चिन्हे दिसत होती. अचानक जगज्जेत्या डिंग लिरेनने भक्कम बचाव करता करता ५५ व्या खेळीत आपला हत्ती चुकीच्या ठिकाणी हलवला आणि जगभरातील १९४ हून अधिक देशांतून आपापल्या संगणक आणि मोबाईलवरून हा सामना बघणाऱ्या लाखो प्रेक्षकांतून औत्सुक्याची एक लहर पसरली. जगज्जेत्याकडून अशी घोडचूक? आंतरशालेय सामन्यातसुद्धा अशी चूक सहसा होत नाही आणि इथे तर साक्षात विश्वविजेता असे खेळला आहे हेच प्रेक्षकांना पटेना! गुकेशचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना आणि त्याने थरथरत्या हाताने आपली बाटली उचलून पाण्याचा घोट घेतला. फक्त आपण स्वप्नात नाही याची खात्री करून घेण्यासाठी स्वत:ला चिमटा घेणेच बाकी होते. अखेर त्याने हत्तीने हत्ती मारला आणि भारतभर आनंदाचे उधाण आले. दोन खेळ्यांनंतर जगज्जेत्या डिंग लिरेनने शरणागती पत्करली आणि एक नवा इतिहास रचला गेला!

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी दोम्माराजू गुकेशने आपली अलौकिक प्रतिभा आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर जगाच्या इतिहासातील सर्वांत तरुण जगज्जेता बनण्याचा मान मिळवला. भारतात जन्मलेल्या बुद्धिबळातील सर्वोच्च सन्मानाने गुकेशमार्फत आपल्या जन्मस्थानी पुनरागमन केले आणि तेही चिनी जगज्जेत्याला हरवून !

तरुण खांद्यावरील विचारवंत डोके

गुकेशला जरी नुकताच मताधिकार मिळालेला असो; परंतु त्याच्या तरुण खांद्यावर असणारे डोके मात्र एखाद्या प्रौढ विचारवंताचे आहे. त्यासाठी आपण त्याची मायक्रोबायॉलॉजिस्ट आई पद्मावती हिचे आभार मानले पाहिजेत. गुकेशवर लहानपणापासून त्याच्या आईने केलेले संस्कार पदोपदी जाणवतात. आता तो जगज्जेता झाला तो भावपूर्ण क्षण बघा! डिंग लिरेन आपली शरणागती लिहून निघून गेल्यावर गुकेशने लगेच आनंदोत्सव साजरा केला असता तरी त्याला कोणी दोष दिला नसता. पण गुकेशने आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देत असताना एकीकडे पटावर सगळी मोहरी व्यवस्थित लावून ठेवली. बुद्धिबळाच्या मोहऱ्यांना नमस्कार केला, देवाचे आभार मानले आणि मगच हात उंचावून आपला आनंद साजरा केला! ज्या गोष्टी तो रोज डाव संपल्यावर करत आला होता त्याच करायला तो अशा अत्यानंदाच्या क्षणीही विसरला नाही. अशा गोष्टींसाठी तुमच्या मनाला शिस्त लागते आणि एक प्रकारे मनावर ताबाही लागतो. गुकेशने त्याच्या आईची शिकवण सांगताना तिचे एक वाक्य सांगितले- ‘‘तू जगातला सर्वात चांगला खेळाडू होताना चांगला माणूस बनायला विसरू नकोस.’’

जगज्जेता झाल्यानंतर वार्ताहर परिषदेत गुकेशने पराभूत डिंगवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आणि त्याला खराखुरा लढवय्या असे गौरवले; आणि ते खरेच होते. गेले दीड वर्ष ढेपाळलेला डिंग लिरेन इतकी कडवी लढत देईल असा कोणाचाही अंदाज नव्हता. या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर फॉर्मात असलेल्या गुकेशच्या तोंडचे पाणी पळवून जगज्जेत्या डिंगने सामना चुरशीचा केला.

डिंग लिरेनचे मानसिक नैराश्य

माजी जगज्जेता मिखाईल बोटविंनीक जगज्जेतेपदाच्या अनेक लढती खेळला होता. त्याच्या मते, प्रत्येक लढत खेळाडूंच्या मन:स्थितीचा कस लावते आणि दोघाही खेळाडूंचे आयुष्य किमान दहा वर्षांनी कमी करते. डिंग लिरेन स्वत: रशियाच्या इयान नेपोमानेंचीला अतिशय चुरशीच्या लढतीत हरवून विश्वविजेता झाला होता. तब्बल १०० डाव अपराजित राहणारा जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला जलदगती आणि विद्याुतगती क्रमवारीत मागे टाकणारा डिंग त्यानंतर अंतर्धान पावला आणि मानसिकदृष्ट्या खचलेला लिरेन गेले दीड वर्ष आपण बघत होतो.

चिनी खेळाडू म्हणजे निष्ठुर आणि नेहमी खेळात सर्वस्व ओतणारे अशी जी त्यांची प्रतिमा आपल्या मनात आहे त्याच्या अगदी विरुद्ध डिंग लिरेन आहे. मागे करोना काळात भारतातील विनोदवीरांनी एकत्र येऊन एक ऑनलाइन सांघिक स्पर्धा आयोजित केली होती, त्यामध्ये डिंगच्या पिव्होटल पॉन्स नावाच्या संघात माजी आशियाई विजेती भक्ती कुलकर्णी होती. तिला डिंगला जवळून बघायचा योग आला होता. ‘‘सगळे डाव संपले की आम्ही ऑनलाइन भेटून दुसऱ्या दिवशीचे डावपेच आखायचो. आम्हाला रात्रीचे ११. ३० वाजत असत. डिंगसाठी चीनमध्ये भल्या पहाटेची वेळ असायची ती. सर्वांनी त्याला सांगितले होते की तुला उद्या खेळायचे आहे. आम्ही बाकी संघ ठरवतो. तू झोप काढ! पण डिंग रोज आमच्यासह शेवटपर्यंत ऑनलाइन थांबायचा. त्याच्या अनिश गिरीवरील विजयामुळे आमचा संघ अंतिम विजयी ठरला होता. त्यावेळी त्या आनंदात हा महान खेळाडू आमच्याबरोबर सहभागी झाला होता. चिनी खेळाडूंच्या आमच्या अनुभवापेक्षा डिंग खूपच वेगळा आहे.’’

बुडापेस्टमध्ये ४५ व्या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघ गुकेश आणि अर्जुन एरिगेसीच्या पराक्रमामुळे सुवर्णपदकांचा विक्रम करत असताना डिंग मात्र त्याच्या कारकीर्दीतला काळा अध्याय लिहीत होता. ऑलिम्पियाडच्या इतिहासात संपूर्ण स्पर्धेत एकही विजय न मिळवणारा तो पहिला विश्वविजेता ठरला. या उलट गुकेश एकाहून एक सरस विजय मिळवून पहिल्या पटावरील वैयक्तिक सुवर्णपदक खिशात घालत होता. या पार्श्वभूमीवर गुकेश डिंगला सहजी पराभूत करेल अशी सर्वांची अटकळ होती.

सिंगापूरमधील नाट्यमय लढत

कोणत्याही खेळात अग्रमानांकित खेळाडू अनपेक्षितरीत्या का पराभूत होतात? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना मिळणारी कडवी लढत! ‘‘याला तर मी कच्चा खाईन,’’ याप्रकारे मनातल्या मनात बढाया मारणाऱ्या मानांकित खेळाडूला जर प्रतिस्पर्धी प्रखर प्रतिकार करायला लागला, तर खरा विजेता नसणारा मानांकित खेळाडू ढेपाळतो आणि हरतो. पहिल्या डावातील गुकेशच्या पराभवानंतर गुकेशचे असे तर होणार नाही ना, याची चिंता सर्वांना भेडसावू लागली. स्वत:च्या शैलीच्या संपूर्ण विरुद्ध जाऊन खेळणाऱ्या गुकेशला सुरुवातीलाच फटका बसला. सोपी तुलना करायची तर लेग स्पिन टाकणाऱ्या गोलंदाजाला ऐन वेळी जलदगती गोलंदाजी करायला लावण्यासारखे होते ते! अशा वेळी गुकेशच्या ऐवजी दुसरा कोणताही खेळाडू असता तर तो पार ढासळून पडला असता. पण गुकेश हा खराखुरा विजेता आहे हे त्याने स्वत:ला लगेच सावरून दाखवून दिले.

तिसरा डाव जिंकल्यावर त्यानंतर तब्बल ८ डाव बरोबरीत सुटले. सामन्याचे पारडे हळूहळू डिंगच्या बाजूने झुकत चालले होते. कारण होते ते ७-७ अशा बरोबरीनंतर खेळल्या जाणाऱ्या टाय ब्रेकर्सचे! हे टाय ब्रेकर्स जलदगतीने खेळले जाणार होते आणि डिंग येथे खूपच वरचढ होता. आज डिंग जलदगतीच्या जागतिक क्रमवारीत मॅग्नस कार्लसनच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर आहे तर गुकेश ४२! विद्याुत गतीमध्ये तर तफावत खूप मोठी होती. डिंग पाचवा तर गुकेश ८२! परंतु डिंगच्या घाईमुळे ती वेळ आलीच नाही.

अचानकपणे डिंगच्या घोडचुकीमुळे चौदावा डाव आटोपल्यामुळे दोम्माराजू गुकेशच्या रूपाने भारताला नवा जगज्जेता मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी गुकेशचे अभिनंदन केले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तर पाच कोटींचे इनाम जाहीर करून टाकले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला जाहीर सत्कारासाठी महाराष्ट्रभेटीचे आमंत्रण दिले आहे. याउलट गुकेशचे यश न बघवणारे काही कमी नव्हते. रशियन फेडरेशनचे अध्यक्ष फिलॅटोव्ह यांनी गुकेश विरुद्ध अखेरचा डाव डिंगने फेकल्याचे सूचित करून आपले आणि आपल्या देशाचे हसू करून घेतले. जागतिक संघटनेचे रशियन अध्यक्ष डॉरकोविच यांनी हे आरोप फेटाळून फिलॅटोव्ह यांना घरचा आहेर दिला.

सारेच खेळसम्राट दक्षिणेतून का?

सगळ्या क्रीडाप्रेमींना एक प्रश्न सतावत असतो की तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून सगळ्या वैयक्तिक खेळांचे विजेते का जन्म घेतात? उत्तर जास्त कठीण नाही. ही राज्ये आर्थिकदृष्ट्या फार सक्षम आहेत अशी काही गोष्ट नाही. परंतु त्यांचे राज्यकर्ते क्रीडाप्रेमी आहेत- कमीत कमी तसे दाखवायला ते विसरत नाहीत हेच खरे! खेळाडूंमध्ये त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे, कारण गरजू खेळाडूला त्यांच्याकडून तातडीने मदत मिळते.

तमिळनाडूचे उदाहरण वाखाणण्याजोगे आहे. तेथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी कोणत्याही खेळाच्या संघटनेचा पदाधिकारी पटकन संवाद साधू शकतो आणि त्यांची समस्या तेथे चुटकीसरशी सोडवली जाते. त्यांचे उपमुख्यमंत्री स्वत: क्रीडामंत्रीही आहेत. तेथे बुद्धिबळाला किती महत्त्व आहे ते २०२२ च्या चेन्नई ऑलिम्पियाडच्या वेळी माझ्या लक्षात आले. रशियाला देण्यात आलेले ऑलिम्पियाड त्यांनी आयत्या वेळी राजकीय कारणामुळे नाकारले. आता केवळ सहा महिन्यात कोण नवा यजमान पुढे येणार अशी पंचाईत जागतिक संघटनेची झाली होती. अखिल भारतीय संघटनेचे सचिव भारत सिंग चौहान यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी संपर्क साधला आणि अवघ्या एका दिवसात तमिळनाडू सरकारने शेकडो खेळाडूंच्या सहभागाच्या महाजत्रेला मंजुरी दिली. एका आठवड्यात महाबलीपूरम येथील सर्व हॉटेल आरक्षित झाली. या यशस्वी ऑलिम्पियाडचा बाकी इतिहास सर्वांना माहितीच आहे.

संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या दातृत्वाची एक कथा खेळाडूंमध्ये प्रसिद्ध आहे. भारताची अग्रगण्य खेळाडू कोनेरू हंपी हिला खेलरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर तिला नायडूंनी आपल्या कार्यालयात बोलावून तिचा सत्कार केला. त्या वेळी त्यांनी तिला तिचे घर बांधण्यासाठी बंजारा हिल परिसरात एक प्लॉट निवडण्यास सांगितले आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव तिला तात्काळ बरोबर घेऊन निघाले. हम्पीने प्लॉट निवडला आणि सचिव चंद्राबाबूंच्या कामाला लागले. हम्पीने निवडलेला प्लॉट हा मोठा होता आणि तो सरकारी कार्यालयासाठी राखून ठेवण्यात आला होता. चंद्राबाबू म्हणाले, ‘‘हम्पीने निवडलेला प्लॉट आपण तिलाच देऊ. ऑफिससाठी दुसरा प्लॉट बघूया.’’

वेलम्माल शाळा आणि कॉलेजमधून गुकेश, प्रज्ञानंद, वैशाली यांसारखे २१ ग्रँडमास्टर शिकून बाहेर पडले आहेत. गुकेश आव्हानवीर झाला त्या वेळी शाळेने त्याला मर्सिडिस कार बक्षीस दिली होती. वेलम्माल शाळा बुद्धिबळपटूंना सर्व प्रकारे मदत करते. त्यांना खास शिक्षण वर्ग, त्यांच्या सोयीनुसार परीक्षा वगैरे सर्व काही करण्यात येते. या उलट महाराष्ट्रात अनेक शाळा आपल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धांसाठी परीक्षेत सूट देण्यास तयार नसतात- स्पर्धेच्या तयारीसाठी सवलत मिळण्याची गोष्ट सोडा. मुंबईतील एका कॉलेजचे प्राचार्य तर जाहीरपणे म्हणाले होते, ‘‘मला या महाविद्यालयातून रामनाथन कृष्णन नको आहे, मला सर्वपल्ली राधाकृष्णन हवेत.’’

तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांच्याकडून स्फूर्ती घेऊन ओदिशाचे माजी मुख्यमंत्री पटनाईक यांनी बुद्धिबळासाठी खूप काही केले. त्यांनी गावोगावी बुद्धिबळ केंद्रे उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आणि इतकेच नव्हे तर चीनमधील अंधांच्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळवणाऱ्या सौंदर्य प्रधान या युवकाला तब्बल दीड कोटीचे बक्षीस दिले. हे सर्व राजकारणी अनेक वर्षे लोकांच्या मनावर राज्य करत आहेत यामागे त्यांनी खेळाद्वारे मिळवलेल्या शुभेच्छा असाव्यात. तुलनेने फार कमी पैसे खर्च करूनही भरपूर प्रसिद्धी (आणि अर्थात जनतेच्या शुभेच्छा/ मते)मिळवता येते, याचे हे उदाहरण आहे.

याउलट महाराष्ट्राची काय स्थिती आहे? नंदुरबारसारख्या आडबाजूच्या छोट्या गावातून येऊन ८ वर्षांच्या नारायणी मराठे या बुद्धिबळपटूने निव्वळ राष्ट्रीय स्पर्धाच जिंकली एवढेच नव्हे तर ३४ देश सहभागी होत असलेल्या आशियाई स्पर्धेत भाग घेऊन भारतासाठी दोन सुवर्णपदके मिळवली. आज तिच्या पालकांना तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी नेण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे. अंधारात प्रकाशाचा कवडसा बघायचा तर विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांना ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण मिळवल्याबद्दल प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करून महाराष्ट्र सरकारने चांगली सुरुवात केली आहे, पण निश्चित धोरण अजूनही ठरवण्यात आलेले नाही. बघूया नवे सरकार क्रीडापटूसाठी काय करते ते!

(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)

gokhale.chess@gmail.com