एकदा एक उनाडटप्पू माणूस एका झाडाखाली झोपलेला असताना त्याच्या कानावर एक दवंडी येते, ‘ऐका हो ऐका! राजेसाहेबांना असे स्वप्न पडले आहे की, कुणीतरी त्यांच्या पाठीला खंजीर लावून उभा आहे. जो कुणी या स्वप्नाचा अर्थ सांगेल, त्याला पाचशे मोहोरा इनाम मिळतील हो…’ ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक.. तो उनाडटप्पू विचारात पडतो. ‘पाचशे मोहोरा? आपलंच काय, आपल्या दहा पिढय़ांचं आयुष्य सुखात जाईल. कोण असेल हा नशीबवान?’ तो असा विचार करतो आहे तोच झाडातून एक आवाज येतो, ‘मी सांगीन तुला, पण मला निम्म्या मोहोरा द्यायच्या तरच सांगीन.’ तो चमकून वर पाहतो तर एक पक्षी हे सांगतो आहे, असे त्याला दिसते. ‘अरे, जरूर देईन निम्म्या मोहोरा. तू सांगच मला.’ पक्षी म्हणतो, ‘राजेसाहेबाना सांग, विश्वासघाताचे युग आहे. आपण ज्याच्यावर जास्तीत जास्त विश्वास टाकतो तोच जास्तीत जास्त विश्वासघात करू शकतो.’ उनाडटप्पू उठतो तो थेट राजवाडय़ात पोचतो. राजेसाहेबांना सांगितल्यावर ते खूश होतात. पाचशे मोहोरा घेऊन तो घरी परत येतो. काही वर्षांनी आपल्या घरच्या गच्चीवर बसलेला असताना त्याला परत एक दवंडी ऐकू येते, ‘ऐका हो ऐका!!! राजेसाहेबांना असे स्वप्न पडले आहे की त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत आहेत. जो कुणी या स्वप्नाचा अर्थ सांगेल त्याला पाचशे मोहोरा इनाम मिळतील हो… ’ ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक.. उनाडटप्पू आता गावातला प्रतिष्ठित माणूस झालेला असतो. त्याला पक्ष्याची आठवण येते आणि आपण त्याला कबूल केलेले पैसे दिलेले नाहीत, हेदेखील आठवते. पण पैशाचा मोह कुणाला सुटला आहे? तो निर्लज्जपणे त्या झाडापाशी जातो. पक्षी तिथेच बसलेला असतो. पक्ष्याला विचारल्यावर तो,  ‘मी सांगीन तुला. पण मला निम्म्या मोहोरा द्यायच्या तरच सांगीन.’ असे गेल्या वेळेसारखे म्हणतो; पण पैसे बुडविल्याची आठवणदेखील करून देत नाही. निम्मे पैसे देतो, असे म्हटल्यावर पक्षी म्हणतो, ‘हिंसाचाराचे युग आहे, तर सावध राहा.’ पुन्हा पाचशे मोहोरा घेऊन घरी येताना त्या माणसाच्या डोक्यात येते- या पक्ष्याची एकदा वाट लावून टाकली पाहिजे. काहीतरी वाक्य सांगतो आणि निम्म्या मोहोरा मागतो. हे फार होतंय. तो एक मोठा दगड खिशात ठेवतो. पक्ष्याजवळ आल्यावर पैसे ठेवण्याच्या मिषाने तो दगड मारतो, पक्षी दगड चुकवतो आणि उडून जातो. याला वाटते, मेला असता तर बरे झाले असते. मनाची टोचणी तरी गेली असती. अनेक वर्षांनी त्याला परत एक दवंडी ऐकू येते, ‘ऐका हो ऐका!!! राजेसाहेबांना असे स्वप्न पडले आहे की, त्यांच्या मांडीवर एक पांढरे कबूतर आहे आणि ते त्याला थोपटत आहेत. जो कुणी या स्वप्नाचा अर्थ सांगेल त्याला पाचशे मोहोरा इनाम मिळतील हो..’ ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक.. हा प्रतिष्ठित माणूस हे ऐकून परत त्या झाडापाशी जातो. पक्षी सगळे ऐकून घेतो. कोणतीही आठवण न देता त्याला म्हणतो, ‘राजेसाहेबांना सांग, अमन- सुखशांतीचे युग आहे. निर्धास्त राहा,’ पाचशे मोहोरा मिळाल्याबरोबर तो त्यांचे दोन भाग करतो. झाडाजवळ आल्यावर पक्ष्याला त्या देताना म्हणतो, ‘मी तुझ्याशी फार वाईट वागलो. पण या मोहोरा घे.’ पक्षी म्हणतो, ‘पहिले युग विश्वासघाताचे होते. तू माझा विश्वासघात केलास. दुसरे युग हिंसाचाराचे होते; तू मला ठार मारायचा प्रयत्न केलास, तिसरे युग सुखशांतीचे आहे, तू मला पैसे देतो आहेस. यात तू कधी वागलास? जसा काळ होता तसा वाहवत गेलास. स्वत: काही ठरवून कधी वागलास?’
वाचक हो!! हे नमनाला घडाभर तेल कशासाठी? तर आजचा काळ
हा घबराट उत्पन्न करून आपल्या पोळीवर तूप ओढणाऱ्यांचा आहे. पुढे काही तरी भयंकर होऊ शकेल म्हणून आताच पैसे खर्च करा, असे सांगून तुमचे मदाऱ्याचे माकड करणाऱ्यांचा काळ आहे. आपण जर घाबरलो तर आपल्या अंगावरचे कपडेदेखील ओढून न्यायला कमी करणार नाहीत. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ ही म्हण ‘घाबरलेल्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी थोडी बदलायची एवढेच.
आयुष्य जगताना माणसापाठी अनेक प्रकारचे भय असते. साधा रस्ता ओलांडतानादेखील वाहने ज्या पद्धतीने अंगावर येतात, त्याचे भय असतेच प्रत्येकाला. पण आपण न घाबरता रस्ता ओलांडतो. सामान्यपणे काही होत नाही. भीतीला सामोरे जाऊन आपल्याला पाहिजे ते नीट करणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. मूर्तिमंत भीती समोर उभी असताना धैर्याने प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडणे हे नंतर खूपच मनोरंजक वाटते.सामान्य आयुष्यात भीती दाखवून काळजी घेण्याचा आव आणणारे अनेक असतात. कित्येक लोकांच्या घरातच अशा व्यक्ती असतात की, कोणतीही एक नवी कल्पना मांडली की त्याच्यामुळे संपूर्ण नुकसान कसे होणार आहे हेच ते सांगू लागतात. ब्रह्मज्ञानी माणूसदेखील इतके छातीठोक बोलत नाही. ज्या माणसाने ही कल्पना मांडली त्याने त्यामागे काही विचार केला असेल तेव्हा एकदम त्यातले फक्त धोके सांगणे फारसे बरोबर नाही हे त्यांच्या गावीदेखील नसते. एखादा कमी हिमतीचा माणूस गडबडून जाईल, त्याच्या आयुष्यात अशी संधी पुन्हा लवकर येणार नाही याचे सोयरसुतक त्यांना नसते. तरुण आणि विशेषत: तरुणींचे आयुष्य उधळून लावणारे हे ‘अहितचिंतक’ असतात, पण आव आणतात हितचिंतक असल्याचा.
असे कुणी आपल्या आयुष्यात आले असेल तर त्यांच्या या बडबडीचा सदुपयोग करावा. म्हणजे ते जो जो मुद्दा सांगतील तो आपल्या माहितीवर तपासून पाहावा. काहीच शेंडी बुडखा नसेल सोडून द्यावा.  एखादे वेळी काही योग्य सूचना असू शकते. ती नीट नोंदवावी आणि अधिक माहिती मिळवून पुढे जावे. आपल्या हिमतीवर पुढे जाताना जबाबदारी पूर्णपणे आपली असल्याचे भान ठेवून पुढे जावे. समविचारी लोकांची मदत जरूर घ्यावी, पण जात असताना या सर्व नकारात्मक विचारांची धोंड गळ्यात बांधून जाऊ नये. मनाची अस्थिरता जाऊन ते स्थिर राहावे म्हणून कधीही भीती वाटली आणि मनात विचार आला, ‘आपण करतो आहोत ते नीट होईल ना? का ते अमूक अमूक म्हणाले होते तसे सगळे फसेल?’ तर पोटाने खोल श्वास घेत राहावे, मन स्थिर होईल आणि यश मिळवून देईल.
सामाजिकदृष्टय़ा भेडसावणारे तर अनेक असतात. सामान्यपणे वैयक्तिक, लैंगिक, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्याशी निगडित असे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मालमत्तेला, तुमच्या मरणोत्तर आयुष्याला (म्हणजे नरकात जाल!!) काही तरी होऊ शकेल म्हणून आताच आम्ही म्हणतो तसे करा आणि त्यासाठी इतके इतके पैसे टाका,अशा प्रकारचे त्यांचे बोलणे असते. यामध्ये सर्व व्यावसायिक, धर्मगुरू, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि राजकीय नेते असू शकतात. साधारण अशा प्रवृत्तीचे लोक तुम्हाला भयंकर घाई करत असतात. ‘लवकर सांगा, नाहीतर फार उशीर होईल आणि मग जे काही होईल, त्याला आम्ही जबाबदार असणार नाही’, अशी त्यांची भाषा असते. अशा वेळेस शांतपणे चार चौघांना विचारून निर्णय घेणे आवश्यक असते. भीतीपोटी निर्णय घेऊन मग पस्तावणे काय कामाचे?
‘नाहीतर फार उशीर झालेला असेल,’ हे वाक्य ऐकून मनाचे संतुलन न ढासळलेला माणूस भेटणे अवघड. आयुष्य हे सतत जात असते. त्यात लवकर, वेळेवर आणि उशिरा या मानवनिर्मित कल्पना असतात. कारण ‘वेळ’ ही कल्पनाच मुळी असत्य आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती किंवा वेळ आली होती, पण काळ आला नव्हता या दोन्हींचा अर्थ एकच असतो. भीतीदायक गोष्टी पाहणे, पण न घाबरणे हे सारे जण चित्रपटाच्या माध्यमातून करत असतातच; पण त्यावेळचे न घाबरणे हे खरे नाही. कारण तुम्ही आरामशीर पहुडलेले असता आणि तुम्हाला एका गोळीचा किंवा नखाचा स्पर्श होणार नसतो.
आपल्याला एखाद्या योद्धय़ासारखे आयुष्य काढायचे असते म्हणजे युद्धावर निघताना आपण परत येऊ की नाही ही भीती मनात दाटलेली असताना त्या भीतीवर पूर्ण नियंत्रण ठेवून विजयी होण्याच्या विश्वासाने संपूर्ण कार्यक्षमतेने लढणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. पण आयुष्यात हे पावलोपावली करायचे असते. त्यासाठी आपल्या शरीर-मनापुढे सतत वेगवेगळी आव्हाने ठेवायची असतात आणि न घाबरता त्यांच्या पार जायचे असते. त्यासाठी उंच डोंगर चढायचे, दऱ्या ओलांडायच्या, समुद्र पार करायचे, त्यांचा तळ गाठायचा. हवेत उडायचे असे काहीही करायचे. अशा प्रकारे भीतीवर नियंत्रण ठेवून, संपूर्ण कार्यक्षमतेने वागणे जमू लागले की, कुणीही तुम्हाला घाबरवू शकणार नाही. तुम्ही भेदरून जाऊन निर्णय घेणार नाही, तुमचे मदाऱ्याचे माकड कधीही होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा