आपल्याला आपला ‘स्वधर्म’ शोधून काढायचा असतो. अक्षरश: असा धर्म की जो जगात कुणाचाही नाही, फक्त माझा आणि माझाच असतो. हा स्वधर्मच मला आनंदात ठेवू शकतो. आनंदात राहण्यासाठी उत्स्फूर्त व्यवहार करणे हे जितके योग्य, तितकेच ‘नियम नसलेले नियम’ असणेही आवश्यक असते. आणि हे नियम नसलेले नियम शोधून आत्मसात करणे याला म्हणायचे स्वधर्माचा शोध.
नियम नसलेले नियम हे शोधण्यापासून सुरुवात करावी. हे नियम आपल्या आयुष्यात उमलत जातात. हे कुणी आपल्याला सांगितलेले नसतात. हे पाळताना आनंद तर होतोच, पण अधूनमधून मोडले तर अजिबात दु:ख होत नाही. आयुष्याच्या वाटेवर चालताना उत्फुल्ल फुलांचा सुगंध घेत जावा आणि तो आपल्या अंत:करणात दरवळत राहावा असे ते असते. ‘जाग आली की उठावे’ हा असाच एक नियम जो आपल्याला आयुष्यात आनंद आणतो, पण ‘रोज पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठावे’ हा नियम जाचक ठरतो. अंथरूण सोडवत नसताना ते सोडणे हे दु:खकारक असते.
आयुष्यात अनेक गोष्टी आपण करतो तर अनेक गोष्टी होत असतात. शरीरधर्म शोधताना या होणाऱ्या आणि करायच्या गोष्टींचे एक संतुलन गाठायचे असते. हे सतत करायचे असते म्हणजे शरीरधर्म पाळला जातो आणि अतिशय आनंदकारक असतो. सामान्यपणे पाहता भूक लागली पाहिजे. पोट साफ झाले पाहिजे. झोप आली पाहिजे. पण याच गोष्टी करायला लागल्या की फार दु:खकारक ठरतात. त्याचबरोबर ताकदीचे, लवचीकपणाचे, दमश्वासाचे व्यायाम करायचे असतात नाहीतर शरीर कमजोर होत जाते आणि दु:ख देऊ लागते.
शरीरमनाला जोडणारी गोष्ट म्हणजे श्वास. ही गोष्ट होतही असते आणि करता पण येते. नुकते जन्मलेले मूल हा श्वास सतत पोटाने घेत असते, हा नैसर्गिक स्थिरता प्राप्त करून देणारा श्वास हळूहळू बदलत जातो. सामान्यपणे सामाजिक मन उत्क्रांत होत जाते तसा श्वासावर परिणाम होऊ लागतो. आपल्या जन्माबरोबर आलेल्या मनाला मुरड घालायला लागते. आपल्याच शरीराच्या आनंद देणाऱ्या भागाला नुसता हात लावला तरी मार खावा लागतो आणि आनंद होणे यात काहीतरी चूक आहे असा समज होऊ लागतो. आनंद दडपला जाऊ लागला की श्वास बिघडतो. श्वास बिघडला की शरीरमन बिघडते आणि दुसरा कुणी आनंदात दिसला की त्याच्या आनंदात व्यत्यय कसा आणता येईल असा विचार करू लागते. काही जण ते प्रत्यक्षात आणायला प्रयत्न करू लागतात. आपल्या दु:खापेक्षा दुसऱ्याचा आनंद हा जास्त दु:खकर होऊ लागतो.
त्यामुळे श्वासाचे अनुसंधान हा ‘स्वधर्माचा’ फार महत्त्वाचा भाग ठरतो. आपली शरीरमनाची स्थिती बिघडली की आपला श्वास बिघडलेला असतोच हे जाणवून घेणे याकरिता आवश्यक ठरते. सतत श्वासाकडे पाहता येणे ही पहिली गोष्ट. तो छाती फुलवून येत असेल तर त्याची दिशा बदलणे ही दुसरी गोष्ट. हे सतत करायचे असते. सुरुवातीला दुर्लक्ष होणे स्वाभाविक असते, पण हळूहळू सहज होऊ लागते. करण्याचे ‘होण्यात’ रूपांतर होते, साहजिकच आनंद पसरू लागतो.
एक व्यक्ती आनंदात असली की त्या व्यक्तीच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तींवर दोन प्रकारचे परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे आपण या व्यक्तीच्या जवळ राहून समजून घ्यावे किंवा आधीच सांगितल्याप्रमाणे ज्या अर्थी हा आनंदात आहे त्याअर्थी काही तरी करून त्याला त्रास दिला पाहिजे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे तुकोबा म्हणतात. ते उत्पन्न होऊ शकते. नाही झाले तर फारच छान; पण झाले तर त्याचा उपयोग धार लावण्याच्या दगडासारखा करावा म्हणजे आपला श्वास सतत स्थिर ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यावा. अगदीच अंगचटीस आले तर श्वास बिघडू न देता ‘नाठाळाचे काठी हाणू माथा’ होऊ द्यावे, कारण उत्तम तंदुरुस्ती असतेच!
जगातल्या प्रत्येक धर्माचे अनेक तुकडे झाले आहेत. प्रत्येक तुकडा हा आपलाच ‘धर्म’ हा खरा असल्याचे मानत आहे. एखाद्या तलम रेशमी वस्त्राचे अनेक तुकडे केल्यावर त्या वस्त्राची काय शोभा राहील? आज इंटरनेटच्या माध्यमातून आपण सर्व धर्माच्या सर्व तुकडय़ांचा व्यवस्थित अभ्यास करू शकतो. आपल्याला त्यातील जी भावतील ती तत्त्वे अंगीकारू शकतो. त्या तुकडय़ांची एक गोधडी बनवू शकतो. नीट जोडले तर ते तुकडे अतिशय सुंदर दिसतीलसुद्धा. भले वेडेवाकडे जोडले गेले तरी गोधडीच्या मायेची ऊब ब्लँकेटला कधी तरी येऊ शकेल काय? ही मायेची ऊब स्वधर्माला असते. त्या उबेत आपली चांगली वाढ होते आणि आपण अंतर्बाह्य़ बदलत राहतो.
‘धर्माचा’ उपयोग व्यक्तीबरोबर समाजाचाही उत्कर्ष व्हावा याकरिता होण्याऐवजी आजकाल ‘वैयक्तिक’ स्वार्थासाठी केला गेलेला आपण सर्रास पाहतो. गटबाजी करून दुसऱ्या धर्माविरुद्ध आरोळ्या ठोकून अडाणी माणसांना बहकावून आपल्या पोळीवर तूप ओढणारे अनेक जण आपल्या पाहण्यात असतात. ‘धर्मा’बरोबर वैयक्तिक उत्कर्ष होण्याऐवजी विशिष्ट कपडे, वेशभूषा, केसांची ठेवण असे बाह्य़ांग बदलणारे, पण अंतरंग तसेच दरुगधीयुक्त ठेवणारे अनेक नियम येतात. असे कोणतेही नियम ‘स्वधर्मा’त नसतात. ‘स्वधर्माचरण’ करणारा अगर करणारी मुक्त असते. सहजता हा स्थायिभाव होऊन जातो. उत्तम कपडे घातले काय किंवा साधे कपडे घातले काय, त्या व्यक्तीची आभा ही वेगळीच असते.
स्वधर्माला कोणतेही पवित्र पुस्तक नसते. सारी पुस्तके पवित्र असतात. कोणताही एक प्रेषित अगर महात्मा नसतो. आपण सर्वाचाच आदर करीत असतो. त्याचबरोबर एखाद्या माणसाचे मत आपल्याला पटले नाही तर ते सहज नाकारू शकतो. आपण एकटेच त्या धर्माचे असल्याने आपला गट नसतो. आपला धर्म अनामिक असल्याने त्याचे नाव घेऊन कुणी आपला सन्मान अगर अपमान करू शकत नाही. आपल्याला कोणतेही एक प्रार्थनास्थळ नसते, कारण सर्व जगच आपले प्रार्थनास्थळ असते. आपल्याला ऊर्जा वाढेल असे आचरण करायला पूर्ण मोकळीक असते. कोणतीही गोष्ट आचरणात बरे वाटण्याऐवजी कोंडमारा होतो आहे म्हटल्यावर ते सोडून द्यायला काहीही वाटत नाही.
स्वधर्माचे पालन करताना अंतरंग आणि बहिरंग यांचे अद्वैत लक्षात येऊ लागते. आपपरभाव नाहीसा होतो, तर धर्माचरण करताना ‘तो दुसऱ्या धर्माचा’ असा आपपरभाव वाढीस लागतो. एकदा मी आणि तू यात काही फरक नाही, असे कळले, की तुला काही छान मिळाले की, मला वाईट वाटत नाही कारण तुझा आनंद हा माझाच होऊन जातो. मी आणि निसर्ग असे न वाटता मी म्हणजेच निसर्ग आणि निसर्ग म्हणजेच मी असे समजते. लहान मूल जसे आईला आनंद देत तिचे दूध प्राशन करते, तसेच निसर्गाला वृद्धिंगत करत त्याच्याकडून आपल्याला गरज असेल तेवढे आपण घेत राहतो.
स्वधर्माचरण करणारी माणसे भेटली की मनाला प्रसन्न वाटते. विचारांची देवघेव होते. दुसऱ्याच्या स्वधर्मातील एखादे चांगले तत्त्व आपल्याला मिळून जाते. आपला स्वधर्म सुधारतो. हे आयुष्यभर करीत राहणे हे अतिशय आनंदकारक असते. आपल्याबरोबर आपला धर्मही नाहीसा होतो ही त्यातली सवरेत्कृष्ट गोष्ट. धर्म बुडतो आहे अशा कितीही आरोळ्या ऐकल्या तरी लक्ष देऊ नये.
धर्म सोडला की विनाकारण बारगळलेली ओझी नाहीशी होतात आणि हलके वाटते. त्यात सणवार, व्रत-वैकल्ये, प्रार्थना, उत्सव हे सारे येते. रोजच आनंदात राहतो म्हटल्यावर उसने अवसान आणून उत्सवाचे ढोल बडवावे लागत नाहीत. आनंद होत राहतो, करावा लागत नाही. स्वधर्माने दिलेली मोकळीक अवर्णनीय असते. धर्माच्या तुरुंगाबाहेर पडल्यावरच ती समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा