डॉ. आशुतोष जावडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकरंग’मध्ये ‘वा म्हणताना’ हे सदर लिहिले तेव्हा मराठीतील अनेक नव्याजुन्या उत्तम लेखक-लेखिका मला अभ्यासता आल्या आणि त्यांच्यावर मन:पूत लिहिता आले. पण दुर्गाबाई राहिल्या! आणि मग एकदम वाटले, अरे ही आपली फेव्हरेट आजी-मैत्रीण भासणारी लेखिका- जिची अनेक वैशिष्टय़े अन्य लेखकांहून आजच्या काळाशी सुसंगत आहेत- तिचा ‘पैस’ आपल्याला जसा आकळला आहे तसा आतातरी मांडायला हवा. आता हा ‘आकळणे’ हा खास दुर्गाबाईंचाच शब्द! आणि या लेखातदेखील बहुधा अनेक त्यांचे शब्द माझ्या लेखनात नकळत उतरतील, कारण वाचकाचे मन सगळय़ा दिशांनी वेढून अर्थ-गारुड करण्याची दुर्गाबाईंची क्षमता विलक्षण आहे. एकदा का वाचक दुर्गाबाईंच्या लेखनप्रवाहात ओढला गेला की त्याने ऐहिक वर्तमानाचा काठ सोडला असेच समजायचे! आता तो वावरणार एका मोठय़ा अनंतापर्यंत झेप घेऊ बघणाऱ्या आशयडोहात. आणि हा अनुभव सगळय़ात अधिक भिडतो तो त्यांचे ‘पैस’ हे पुस्तक वाचताना. ख्रिस्त, बुद्ध, ज्ञानेश्वर, कृष्ण, विठोबा यांच्या आयुष्यावर आणि तत्त्वचिंतनावर भाष्य करणारे, अभ्यास करणारे हे पुस्तक त्या सगळय़ांचा माणूस म्हणूनदेखील विचार करते. धर्मचिकित्सा, धर्म-ओढ आणि धर्मापलीकडे असणारे नास्तिकाचे अध्यात्म या साऱ्याला ते वेगवेगळय़ा कोनातून तपासत जाते. आणि हे सारे माणसाच्या मूलभूत अडचणींकडे, प्रश्नांकडे, ईर्षेकडे जाणतेपणे तरी अनुकंपेने बघते. दीडशे पानांत इतकी आशयसंपृक्तता असलेली पुस्तके मराठीत नाहीत असे नाही. पण दुर्गाबाईंनी त्या ललित लेखनात घट्ट ठोस आशय मांडतानाही जी कविता ओतली त्याला तोड नाही! ज्ञानोबाचा खांब नेवाशामध्ये आहे. त्यावर लिहिताना दुर्गाबाई म्हणतात, ‘‘यालाच टेकून ज्ञानोबाने गूढ आणि प्रांजळ, वेदना आणि सुख, मृत्यू आणि जीवन, भोळेपणा आणि ज्ञान यातले ऐक्य टिपले. निर्द्वद्वाची खूण त्याने ओळखली. ज्ञानेश्वरीच्या ओळीओळींत ती भरली. ती ज्ञानेश्वरी आज इतकी शतके मराठय़ांच्या घरोघर फिरते आहे. भजना-दिंड्यात गाजते आहे.’’ काय विलक्षण लेखन! चार ओळींत वाचकाला शतकांचा प्रवास घडवून आजपर्यंत- नव्हे उद्यापर्यंत आणणारी ही लेखणी! ‘ख्रिस्त संगत’ हा एक माझा आवडता लेख. दुर्गाबाई मुंबईच्या सेंट थॉमस कॅथीड्रलमध्ये जातात तेव्हा आपणही त्यांच्यासोबत आत जातो. त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या नजरेतून ब्रिटिश राज्य संपल्यावर साम्राज्यशाहीच्या क्रूर सत्तेतून मोकळा होऊन भारतीय जनतेच्या धर्मगोतावळय़ातला एक झालेला, विशाल प्रेम देणारा ख्रिस्त आपण बघतो. अजंठय़ाला दुर्गाबाई आपल्याला नेतात आणि तिथल्या नुसत्या कलाकृती नव्हे, तर तिथले डोंगर, तिथल्या मिथकथा आपल्याला दाखवतात. श्रेयस आणि प्रेयस यांचं द्वंद्व बुद्ध आणि मार यांच्या रूपाने कसे झाले हे त्या सविस्तर सांगतात आणि आपण त्या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी रेंगाळत राहतो. वेश्यावस्तीत कानडी वेश्यांपुढे मंद गिरक्या घेणाऱ्या नारिवेषधारक तृतीयपंथी आणि त्यांच्या जोगव्यामागचे योगनृत्य हे दुर्गाबाई नसत्या तर कधीच आपल्याला दिसले, कळले आणि पचले नसते. वाचकाला अडाणी न मानता (आणि सहसा आपण असतोच दुर्गाबाईंपुढे) त्याला स्नेही, मित्र मानून त्याला आपल्या प्रवासात अधेमध्ये हक्काने, प्रेमाने घेणारे हे लेखन! विलक्षण अभ्यासू आणि तरी आत्मीय!
‘पैस’कडे बघताना प्रख्यात समीक्षक हॅरोल्ड ब्लूम यांचे एक विधान मला आठवते आहे. ‘Reading well is a struggle because literary works are bound to be misread.’ यातला ‘मिसरीड’ हा शब्द नकारात्मक छटेचा नाही. त्यात वाचकाच्या अर्थनिष्पत्तीवर नकळत विश्वास आहे. एखाद्या कवितेसारखे ‘पैस’ हे पुस्तक प्रत्येक वाचनात रीड आणि मिसरीड देखील केले जाते आणि दुर्गाबाई नव्याने भेटत राहतात. ज्या निबंधातील हे वाक्य आहे त्याचे शीर्षक आहे.

आणखी वाचा-आदले।आत्ताचे : कहाणी एका लढय़ाची

‘The Breaking Of Form’. हेदेखील बोलके आणि ‘पैस’ला शतश: लागू होणारे. ललितबंधाचे अनेक घाट दुर्गा भागवत यांनी तपासले आणि तोडले मोडले. त्याची संपन्न पुनर्रचना त्यांनी मागाहून केली! ‘पैस’ मधली भाषाशैलीदेखील ती मोडतोड दाखवते. दुर्गाबाई भूतकाळाविषयी लिहिताना बव्हंशी वर्तमानकाळ वापरतात! त्या लिहितात, ‘‘वर्षांनुवर्षे हे चालले आहे. कालमानाने लेणी खचताहेत. सारे पार्थिव सौन्दर्य कालौघात विरते आहे.’’ व्याकरण वर्तमानकालीन आहे पण आशय सार्वकालिक! अनेक कवितांच्या पंक्ती हे या शैलीचे अजून एक वैशिष्टय़ आहे. ‘‘मृदू सुखद उष्णता मिळता रविरायाची..’’ ही ओळ मला नकळत पाठ झाली असं दुर्गा भागवत लिहितात. गंमत म्हणजे, वाचक म्हणून माझीही ती ओळ वाचल्यावर पाठ झाली आणि आता अनेक वर्षे मला साथ देते आहे. पण शैलीविशेषाहून अधिक मोलाचे असते त्या लेखनाचे एकंदर काळाचे, समाजाचे, घटनांचे भान आणि त्या सगळय़ांशी असलेला चिंतनाचा ऋणानुबंध. मार्क माय वर्डस् अनेक प्रख्यात मराठी लेखक बघता बघता पुसल्या जातील, पण दुर्गा भागवत आजच्या आणि पुढच्या पिढीतल्या सगळय़ा नव्हे, पण चोखंदळ वाचकाला भेटतच राहतील. तो वाचक संख्येने प्रबळ नसेल, पण विचाराने असेल. हा इंजिनीयिरगच्या तिसऱ्या वर्षांला असलेला माझा तरणा मित्र हर्ष अनिरुद्ध जोशी मला लिहितोय- ‘‘बाईंचे विद्वान तरीही रसिक, तर्कनिष्ठ आणि संवेदनशील, मार्मिक आणि अनेकविद्यानुरागी असे स्वातंत्र्येच्छु, सत्यनिष्ठ मन समजून घेतले म्हणजे दुर्गाबाई चटकन् आकळतात. या चिरतरुण, सदभिरुचीसंपन्न मनाची जपणूक समाजाच्या वैचारिक उत्थानासाठी फार आवश्यक आहे.’’ किती यथार्थ लिहिले आहे हर्षने आणि ते लिहिताना त्याच्याही नकळत त्याची भाषाशैली दुर्गाबाईंसारखी काही ठिकाणी झाली आहे! हेच ते दुर्गा-गारुड! समाजाचा हर्षने केलेला उल्लेख मोलाचा अशासाठी की ‘पैस’ सारख्या लेखनाला ‘सुपर एलिट’ म्हणून काहीशी हेटाळणी करत बघणारेही साहित्य-समाजदूत आसपास आहेत. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, सामाजिक बांधिलकीचे अत्यंत उन्नत रूप या पुस्तकात आहे. धर्माची चिकित्सा करणारे असे निर्भीड लेखन तेव्हाही आणि आताही पटकन् कुणी केले आहे? लिंगाधारित समीक्षेच्या नजरेने एकदा सहज पैस अभ्यासत होतो. त्यातला स्त्रीवाद तर उघड आहेच. मुळात लेखिका ही निर्भीड प्रवासिनी आहे. नैनाच्या पुलावरून दंगल सुरू असताना केलेला आगगाडीतील महिला वर्गातला प्रवास, बुद्धलेण्यात आढळलेली काळी राणी आणि अहिल्याबाई होळकर यांच्या लेखात स्त्रीची ताकद, संयम आणि दु:ख हे सगळे आहे. पण बुद्ध स्मशानाच्या वाटेवर चालताना एकदम त्या लिहितात, ‘‘वारा सारखा डोंगरमाथ्याभोवती चकरा घालत असतो. समलिंगीयांच्या प्रीतीसारखा त्याचा आवेग पिसाट असतो. आपल्या प्रीतिस्थानावर सदैव आपली ममता अगणित तऱ्हांनी ओतत राहायचे तेवढे त्याला माहीत.’’ तृतीयपंथीयांचा उल्लेख मागे आलेला आहेच लेखात. LGBTQ चा उच्चार नसलेल्या काळात दुर्गाबाई हे लिहीत आहेत!

आणखी वाचा-आदले । आत्ताचे : अद्भुताला स्पर्श…

आणि हे सगळे वाचताना वाटते, आजच्या तरुण पिढीला दुर्गाबाई अधिक जवळच्या वाटणार! त्यांच्यातले हे मोकळेपण, स्वीकार, सोलो जर्नी करण्याचे धाडस आणि इच्छा हे सगळे चिरतरुण आहे! वयाने आणि मनाने तरुण असणाऱ्या कुणालाही ‘पैस’ मधलं तारुण्य जाणवणार नाही असं होणार नाही! दुर्गाबाई मनस्वीपणे अनेकदा एकेकटय़ा अनेक ठिकाणी भेट देतात, त्यांचे मन अनेक भावनांनी उचंबळून येते हे संवेदन आज सोलो ट्रॅव्हल करणाऱ्या पिढीला आधीच्या कुठल्याही पिढीतून जवळचे आहे. आणि तरीदेखील त्यातलं जे स्थैर्य आहे ते मात्र पोक्त आहे, समजूतदार आहे! नवधार्मिकतावादात जगभर अडकलेल्या तरुणांना हे लेखन नितळ शांतता देईल. गंगा समुद्राजवळ येते त्याचे वर्णन करताना माउली म्हणतात, ‘‘का वोघ सांडूनी गांग / रिघोनि समुद्राचे आंग /निस्तरली लगबग / खळाळाची’. ‘पैस’ हे पुस्तक म्हणजे अशी खळाळ दाखवून मग त्याची लगबग निस्तरणारी देखणी नदी! आणि ती लिहिणारी दुर्गा भागवत नावाची माझी फेव्हरेट आजी मैत्रीण! आय लव्ह हर पैस!

व्यवसायाने दंतचिकित्सक. हौस आणि आवड म्हणून इंग्रजी साहित्यात एम.ए. छंदांनी गायक, संगीतकार, लेखक आणि कवी. ‘डिस्कोर्स समीक्षा’ आणि ‘स्थलांतर वाङ्मय’ हे अभ्यासाचे विषय. ‘मुळारंभ’ ही कादंबरी, ‘वा ! म्हणताना’, ‘विशी तिशी चाळिशी’ ही खुसखुशीत लिखाणाची पुस्तके प्रकाशित.
ashudentist@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ashutosh javadekar article on writer durga bhagwat book pais mrj
Show comments