|| डॉ. आशुतोष जावडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘तू आता इथे स्वयंपाकघरात आत डायिनग टेबलवर बसतोस का? म्हणजे तुझ्यासाठी पोहे करताना एकीकडे आपल्या गप्पा सुरू राहतील..’’ गीतामावशीने अरिनला म्हटलं आणि एकीकडे पोहे भिजवायला घेतले. माही तिच्या आई-बाबांसोबत राखीच्या निमित्ताने तिच्या वडिलांकडच्या नातेवाईकांचं ‘फंक्शन’ होतं म्हणून बाहेर गेलेली. आणि गीतामावशी एकटी पडू नये म्हणून तिने अरिनला घरी चक्कर मारायला सांगितलेलं.
‘‘तू पोहे करणार आहेस हे धमाल आहे. आय लव्ह पोहे.’’ अरिन आत येत म्हणाला. त्याने डायिनग टेबलची एक खुर्ची ओढली, तिरकी केली आणि बोलायला लागला.
‘‘तर मी तुला सांगत होतो की, नातेवाईक हे अगदी बोअिरग वाटतात मला. आता राखी ते भाऊबीजसारखे सणवार असणार आणि त्यामुळे नातेवाईकांच्या भेटी असणार. शिवाय डिसेंबरमध्ये कुणाचं तरी लग्न होत असतंच! इतका कंटाळा येतो यार.’’
‘‘का रे?’’ गीतामावशीने आश्चर्याने विचारलं आणि मग कांदा एकीकडे कापायला घेत ती म्हणाली, ‘‘मला तर बाई नातलगांची काही खास अॅलर्जी नाहीए!’’
‘‘सेम माझी आई आणि मावशी आहेत तशीच तू आहेस. तुम्हा सगळ्या बायकांना काय एवढे नातेवाईक आवडतात, हेच कळत नाही.’’ अरिन समोरचं बिस्कीट खाता खाता म्हणाला.
गीतामावशी हसली आणि म्हणाली, ‘‘सल्ले देतात म्हणून आवडत नाहीत का तुला नातेवाईक?’’
अरिन हवेत हात उंचावत म्हणाला, ‘‘एक नंबर ओळखलंस. लांबचे नातेवाईक फुकटचे सल्ले देतात तेव्हा इरिटेट होतं. एक तर वर्षांत दोन-तीनदाच भेटायचं असतं. खा, प्या, बेसिक गप्पा मारा आणि निघा. तर हे लोक भयानक सल्ले देतात. आम्ही सगळे मित्र वैतागतो.’’
अरिनने फोन उघडला आणि त्याच्या तरुण दोस्तांच्या ग्रुपवर गेला. परवाच ‘नातलग’ या विषयावर चर्चा झाली होती. खरं तर त्या ग्रुपमध्ये शुभ्र व अल्पवस्त्रांकित काश्मिरा शहाचा फोटो पडला होता आणि त्यावर उसासेयुक्त गरमागरम चिन्हांची बरसात सुरू होती; पण तितक्यात कुणीतरी लिहिलं- ‘‘भेंडी! इथे पन्नास मावश्या मागून माझ्या मोबाइलवर लक्ष ठेवून आहेत.’’
आणि मग त्या ग्रुपवर जोरदार चर्चा झालेली. नातलग अनावश्यक कॉमेंट्स करतात, उगाच जवळीक साधतात, स्पेस देत नाहीत. आणि बेसिकली त्यांना या तरुणांचं काही जगच समजत नाही- यावर बहुतेक एकमत होतं. अरिनने गीतामावशीला वाचून दाखवायला सुरुवात केली.. ‘‘हे बघ, हा आमचा सिद्धू काय म्हणतोय.’’ सिद्धार्थने ग्रुपवर लिहिलेलं- ‘‘नेहमीचं एक वाक्य अशा वेळी असतं- किती लहान होतास तू! केवढा मोठा झाला आहेस! अरे, भेंडी! काकूंचेही केस काळ्याचे पांढरे झालेत ना!’’
गीतामावशी हसली आणि म्हणाली, ‘‘हे खरं. अजून काय म्हणतात तुझे मित्र? काहीच आवडत नाही का तुम्हाला नातेवाईक-भेटीत?’’
‘‘असं नाही गं..’’ अरिन म्हणाला- ‘‘हा बघ अनिरुद्ध सांगतोय की, नकळत दहा-बारा भावंडांचा ग्रुप जमतो आणि मग अगदी लांबचे नातलग असले तरी अशा फंक्शनच्या वेळेस ते सगळे मजा करतात.’’
‘‘तुला नाही आवडत मग तुझी भावंडं?’’ गीतामावशीने पोह्य़ावर साखर आणि हळद लावताना विचारलं.
‘‘आवडतात ना! पण अगं, माझ्यासोबतचे चौघे आता अमेरिकेत. इथे दोघे आहेत ते नुसते टॉन्ट मारत बसतात. आणि एक बहीण आहे ती भलतीच ऑलराऊंडर असल्याने मग मला बोअर होतं. आणि लांबचे काही आहेत; पण त्यांची माझी वेव्हलेन्थ नाही जुळत. आता बघ ना- तुझी माझी जुळते! तू कुठे माझ्या नात्यातली आहेस? पण आपलं जमतं! मी, माही आणि तेजसदा कुठे नातलग आहोत? पण आमचं अशक्य जमतं!’’
गीतामावशी हसून म्हणाली, ‘‘खरं. माही माझी लाडकी भाची आणि तू माझा नव्याने भेटलेला लाडका भाचा! पण थांब मेल्या, मला फोडणी देऊ दे आधी.’’ मग तापल्या तेलावर मोहरीचा चुर्र्र आवाज आला तेव्हा अरिन फोनमध्ये डोकं खुपसून हसत राहिला.
अस्मितने लिहिलं होतं- ‘‘आमच्या गावाकडे लग्नाला या एकदा. अरे, कोण सालं कुणाचा कुठला भाऊ हेच कळत नाही! मावस, चुलत का मामेभाऊ- सगळंच कन्फ्युजन होतं राव.’’
कुणीतरी तक्रार केलेली की.. आई-बाबा बोअर नातेवाईकांना भेटायला लावतात तेव्हा सगळ्यात वैताग येतो. एक-दोघांनी या विधानावर अंगठा ते मधलं बोट असं सगळं वापरून चॅटमध्ये अनुमोदन दिलेलं. ईशानची जबऱ्या कॉमेंट मात्र अरिनला वाचून दाखवायचा मोह झालाच.
‘‘गीतामावशी, हे ऐक. ईशानने लिहिलंय : ‘तात्पर्य- नातेवाईक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पिडतात. लहानपणी शैक्षणिक प्रगती विचारून आणि मोठेपणी लग्न कधी करणार, हे विचारून आणि स्थळं आणून. भारी लिहिलंय ना?’’
गीतामावशीला कांदा परतताना ठसका लागला हसून! तिची मुलगी अमेरिकेत शिकायला गेल्यापासून इतक्या तरुण मुलांशी तिचा पटकन् संवादच झाला नव्हता. तिने पटकन् पोहे कढईत वाफवायला टाकले आणि मग हात पुसून तीही दोन मिनिटं टेबलच्या खुर्चीवर बसली.
‘‘माही आणि तेजस काय म्हणतात रे नातेवाईकांविषयी?’’ तिने अरिनला विचारलं.
‘‘तेजसदा फुल गोंधळ घालतो यात. तो म्हणतो की, नांदेडला गेलं की सगळ्यांना भेटून छान वाटतं. पण त्याचं आत्ताचं इथलं जग तिथल्या नातलगांना कळत नाही. मला वाटतं गीतामावशी, बेसिकली तो लहान असताना बहुधा त्याची सगळी भावंडं सारखी एकत्र असायची सुट्टय़ांमध्ये. त्या आठवणी आहेत त्याच्याकडे म्हणून त्याला छान वाटत असणार.’’
गीतामावशी म्हणाली, ‘‘आणि आता भेट होत असेल तेव्हा तो सांधा जुळत नसणार अनेक कारणांनी. म्हणून मग छान वाटतानाच मधेच तेजसला कंटाळाही येत असणार.’’
‘‘चक्! काय ओळखलंस तू!’’ अरिन म्हणाला.
गीतामावशीने पोहे थोडे हलवायला घेतले. थोडी साखर आणि मीठ टाकलं. तिला गौरी देशपांडेची ‘उत्खनन’ कादंबरी आठवली. मागच्याच आठवडय़ात माहीच्या आईने तिला वाचायला दिलेली. त्या कादंबरीमध्ये सख्ख्याहून जास्त नातं जमतं ते शेजाऱ्यांचं! ‘दुनिया’ आणि ‘अभया’ या दोन मत्रिणींची मुलं आणि घरं एकमेकात मिसळून जातात. त्यातलं एक वाक्य फार छान होतं. दुनिया म्हणते, ‘‘अभया, तिचा नवरा आणि त्यांची तीन मुले हे माझ्या मणी-दयालसारखे, माझ्या आई-बापूंसारखे माझ्या आयुष्याचे आधार, आनंद ठरले.’’
गीतामावशीला ते आठवलं. तिला आठवलं की, तिचे यजमान गेले तेव्हा अनेक नातेवाईकांनी तिला आधार दिला. तो खोटाही नव्हताच; पण रत्नागिरीहून तिची सर्वात जवळची मत्रीण असलेली सुनंदा जेव्हा पोमेंडीच्या घरात आली तेव्हा तिच्या गळ्यात पडून रडताना मन सगळ्यात हलकं झालं होतं. नुसती मत्रीण नव्हती सुनंदा. नात्याने नसली तरी सख्खी बहीणच होती. उत्कट मत्रीचं ते प्रेम होतं, तो आधार होता. नातेवाईकांच्या रूपाने जो जवळच्या जनुकांचा पसारा आसपास असतो तो नाकारण्याजोगा नव्हताच; पण तेवढाच खरा आणि बरा असतो असं म्हणायचे दिवस संपत चालले होते, हे गीतामावशीला पुन्हा एकदा प्रकर्षांने आत्ता जाणवलं. तिने पुन्हा एकदा पोहे वाफवायला ठेवून म्हटलं, ‘‘पटतं मला तुझं, पण थोडं थोडं. आणि माझी माही काय म्हणते रे? का माझी थट्टा करते?’’
‘‘माही सध्या आहे का आपल्यात चार दिवस? नुसता तो धीरज..धीरज! भेंडी! मी आणि तेजसदाने परवाच त्या धीरजच्या नावाने चॅटवर खूप बेक्कार शिव्या घातल्या.’’ अरिन वैतागून बोलला.
गीतामावशी हसली नुसती. अरिनने एक जुना चॅट तोवर उघडला आणि म्हटलं, ‘‘हे बघ.. माहीने एकदा हे लिहिलेलं आमच्या गप्पांत.’’
माहीने लिहिलं होतं : रिकी हा खास अमेरिकन मुलगा होता. त्याला नातेवाईक ही संकल्पनाच आधी कळत नसे. मी वाद घालायची त्याच्याशी. सांगायचे त्याला- की ‘नातेवाईक शक्ती देतात नकळत. एकटं जगून करायचंय काय?’ तर मग त्याने एकदा वैतागून म्हटलेलं- ‘माही, पण एकटं जगूच नये असं काही तुम्हा भारतीय आणि चायनीज लोकांचं मॅन्युअल आहे का? मला आवडतं एकटं भटकायला. फिरायला. राहायला. वाचायला.’
गीतामावशीने गॅस बंद केला. ती विचारपूर्वक म्हणाली, ‘‘पण नातलग असले की स्थर्य असतं. सुरक्षितता असते काहीशी. अगदी व्यावहारिक पातळीची असते असं म्हण हवं तर.’’
अरिन उत्तरला- ‘‘तुमच्या पिढीला सारखं स्थर्य का लागतं? स्थर्य म्हणजे काय कुतुबमिनार आहे का? समजा, तात्पुरतं नातं जुळलं, घट्ट सख्ख्यासारखं आणि मग तुटलं.. तर की फर्क पदाये! काही घंटा फरक पडणार नाही. इंटेन्स जगताच आलेलं नाहीये तुझ्या पिढीला गीतामावशी.’’
गीतामावशीने हसून पोहे डिशमध्ये घेतले. पिवळेधमक सुंदर पोहे. छान येणारी वाफ. वर पिळलेलं लिंबू आणि त्याचा दरवळणारा सुवास. अरिनने घास घेतला आणि म्हटलं, ‘‘एक नंबर! जगात भारी आहेत तुझे पोहे गीतामावशी!’’
ती हसून म्हणाली, ‘‘माझ्या सासूला तिच्या सासूने जे मीठ-साखर-हळदीचं प्रमाण सांगितलेलं ना, तेच मीही वापरते. ते स्थर्य आहे. म्हणून अरिन, तुला प्रेमाने पोहे करून देता येतात. स्थर्य निदान यासाठी लागतं.’’
अरिन एक क्षण चमकला. त्याला काय म्हणावं कळेना. पण गीतामावशीच त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाली, ‘‘पण तू म्हणतो आहेस तेही खरं. त्या स्थर्याच्या नादानं अनेकांची आयुष्ये वाया गेली. नातलगांमध्ये, घराघरांमध्ये जो छुपा सत्ताधीश असे, त्याला गरम पोहे मिळत. अनेकांच्या वाटय़ाला वाफच आली. हे मला आता समजतं. तुझ्या पिढीसारखं मी इंटेन्स नाही जगणार आता; पण माझ्या आसपासच्या बाया-बापडय़ा जशी तुम्हा तरुणांना नावं ठेवतात तशी मी नाही ठेवत- हे तुलाही माहिती आहे.’’
‘‘मावशी..!’’ अरिन हक्काने, प्रेमाने एवढंच म्हणाला आणि मग गीतामावशीने त्याच्या डिशमध्ये अजून थोडे गरम, वाफाळणारे पोहे वाढले.
ashudentist@gmail.com