|| डॉ. संजय ओक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजच्या लेखांकाचे शीर्षक अनेकांना बुचकळ्यात टाकेल. पण आज जी व्यक्ती आणि वृत्तीविशेषांबद्दल मला लेखन करायचे आहे, त्यांचा ट्रेडमार्क ‘विंचू’ आहे. ते कोणी विंचूछाप जर्दा पुडीचे निर्माते नाहीत, तर ते आहेत एक आधुनिक वैद्यकाचे खंदे पुरस्कर्ते.. डॉ. हिम्मतराव बावस्कर. हिम्मतराव महाराष्ट्राला नवे नाहीत. जगातल्या वैद्यकविश्वाला वृश्चिक- दंशावर त्यांनी केलेले मूलभूत संशोधन आणि Prazosin या औषधाचा आजच्या संज्ञेत केलेला काहीसा Repurposed वापर यामुळे हिम्मतरावांचे वैद्यकीय लिखाण British Medical Journal JAMA, New England J. of Medicine and Science मधून छापून आले आहे. ‘इटख’ने त्यांच्या कामावर संपादकीयं लिहिली आहेत. आणि Lancet ने करोनाच्या काळात गावकऱ्यांनी विविध झाडांची पाने मास्क म्हणून कशी वापरली, हे दर्शविणारा त्यांनी काढलेला फोटो नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर टाकला आहे. यातील प्रत्येक उपलब्धी बावनकशी सोनं आहे. आणि वैद्यक क्षेत्राच्या अकादमिक विश्वात चार दशके काढलेल्या माझ्यासारख्या अक्षयी विद्यार्थ्यांला त्याचे महत्त्व नेमके ठाऊक आहे.
हिम्मतरावांवर हा लेख नाही, तर त्यांनी आजही करोनाशी दोन हात करताना आपल्यातला संशोधक कसा जिवंत ठेवला याची ही कहाणी आहे. मूलभूत संशोधन हे सतत विचार, अभ्यासू विश्लेषण आणि अखंड क्रियाशीलता या त्रिसूत्रींवर आधारित असते. संशोधनाला संस्था, न्यास आणि धनराशीच लागते असे नाही, तर विवेक, झपाटलेपण आणि विजिगीषु वृत्ती यांचे खतपाणीही घालावे लागते, हे त्रिवार सत्य आहे. हिम्मतरावांनी गेल्या वर्षभरात साडेआठशे करोनाचे रुग्ण बरे केले आहेत. महाडमधल्या आपल्या क्लिनिक आणि नर्सिग होममधून या रुग्णांची निरीक्षणे आणि नोंदी ठेवून जगातल्या प्रसिद्ध जर्नल्समध्ये महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत प्राथमिक स्तरावरही करोना कसा हाताळला याचे शोधनिबंध त्यांनी लिहिले.
हिम्मतराव आणि माझे मैत्र गेल्या पंधरा वर्षांचे आहे. मी नायरचा डीन असताना एकदा कोल्हापूरला ‘IMA’ला व्याख्यान द्यायला गेलो होतो. सहवक्ते म्हणून हिम्मतराव विंचूदंशावर आपले अभ्यासपूर्ण व्याख्यान देते झाले. ग्रामीण लहजा, रांगडय़ा मराठीच्या वळणावर अडखळणारी इंग्रजी, साधा वेश.. यातले काहीही त्यांना आड येत नव्हते. मला हा माणूस पहिल्याच भेटीत आवडला तो त्याच्या सच्चेपणामुळे. २००५ साल होते. त्यांच्याकडे व्हेंटिलेटर नव्हता. त्यापायी काही रुग्ण दगावतात, ही त्यांची खंत माझ्या मनात घर करून राहिली. मी मुंबईला परत आलो. कर्मधर्मसंयोगाने एका दानशूर व्यक्तीने एक व्हेंटिलेटर दान करण्याची तयारी दाखवली. मी कंपनीला गळ घातली आणि पंधरा लाखापर्यंतचा व्हेंटिलेटर कंपनीने सवलतीच्या दरात महाडला प्राणप्रतिष्ठित केला. दुसऱ्या दिवशी हिम्मतरावांचा फोन.. ‘‘हा वापरायचा कसा, ते शिकवा सर.’’ वास्तविक पाहता ते वयाने माझ्याहून मोठे आहेत. पण आमचे संभाषण ‘हिम्मतराव’ आणि ‘सर’ या स्तरावरच चालते. मी म्हटले, ‘‘या नायरला.’’ गडी दुसऱ्या दिवशी हजर. मी त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. दवेंकडे सुपूर्द केले. सकाळी साडेसातला हिम्मतराव थिएटरमध्ये येत. आणि पुढच्या आठ दिवसांत त्यांनी व्हेंटिलेटरचे वेगवेगळे मोड्स आणि वापरायच्या पद्धती आत्मसात केल्या. ‘‘आता जातो आणि पेशंट वाचले की तुम्हाला कळवतो,’’ असे सांगून आठ दिवसांनी हिम्मतराव महाडला परतले. आणि त्या देणगीचे पैसे १००% वसूल झाले असतील याबाबतीत माझी खात्री आहे.
हिम्मतरावांना टीकाकार नाहीत असे नाही. आयुष्यभर त्यांनी विंचवाचीच नांगी ठेचली असे म्हणणाऱ्या शहरी पंडितांना मला त्यांचे करोनाचे काम सांगावेसे वाटते. दूरवरचे खेडे, लॅबची अनुपलब्धता, गरिबी यापैकी काहीही त्यांना आड येत नाही. उलट, या सर्व अडचणींत त्यांना संधी खुणावतात, हे वैद्यकीय विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांच्या या कामात पत्नी प्रमोदिनी यांनीही त्यांना खूप परिश्रमपूर्वक साथ दिली आहे.
वैद्यक हा व्यवसाय किंवा उद्योग न बनता धर्म बनावा आणि ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स’ हे नगदी नोटांच्या स्वरूपात न मोजता वाचवलेल्या जिवांत आणि सावरलेल्या आयुष्यांत मोजले जावेत यासाठीच तर आपण एमडी, एमएस वगैरे वगैरे व्हायचे असते. हिम्मतरावांनी मला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते- ‘‘डॉक्टरांच्या जीवनात कोविडसारखे प्रसंग क्वचितच येतात. आपण अहोरात्र काम करायचे असते. डॉक्टरांनी तिरडीवरच्या पेशंटला उठून उभे करायचे असते, त्याला खांदा द्यायचा नसतो.’’
..कोविडवरचे त्यांचे काम, आयोडिनचे थेंब नाकात सोडण्याचा नवा विचार, बीसीजी/ एमएमआर व्हॅक्सिनेशनचा वापर हे सगळं मी वाचलं. टास्क फोर्सला हे विचार झेपणारे नव्हते. पण म्हणून हिम्मतरावांची तळमळ दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती. मी फोन फिरवला आणि म्हणालो, ‘‘हिम्मतराव, High Flow Nasal Cannula या यंत्राचा खूप फायदा होतो. जरा डोनेशन मिळवून एक तुम्हाला पाठवू का?’’
क्षणाचाही विलंब न लावता हिम्मतराव उद्गारले, ‘‘सर, त्याच्या ट्रेनिंगला कधी येऊ?’’
sanjayoak1959@gmail.com