डॉ. डी. वाय. पाटील वैद्यक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांचे आपल्या भवतालातील सुंदर घटितांची दखल घेणारे ललित सदर…
मुलुंड पूर्वेला असलेली आमची ‘संस्कार’ सोसायटी म्हणजे उच्च मध्यमवर्गीय कष्टकऱ्यांची एक सुंदर वसाहत. एक-दोन नव्हे, तर तब्बल चौऱ्याऐंशी कुटुंबांना सामावून घेणारी ‘डी’ िवग. शर्मा, मेहता, रॉय, ताम्हणकर, अभंग, कुलकर्णी, डिसोझा.. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यांचे प्रतिनिधित्व. या टॉवरच्या तळमजल्यावर काचेच्या दाराआड बसविलेली गणपतीबाप्पाची एक सुरेख संगमरवरी मूर्ती. मुंबईत नव्याने बांधल्या गेलेल्या प्रत्येक टॉवरच्या तळमजल्यावर कोणत्या ना कोणत्या देवाला काही स्क्वेअर फूट अॅलॉट झालेले आहेतच. अर्थात बाजूची मार्बल किंवा ग्रॅनाइटची चौकट, काचेचे दरवाजे, एक मार्बल प्लॅटफॉर्म या साऱ्या गोष्टी देवालाही सुपर बिल्टअप्च्या हिशेबात स्वीकाराव्या लागल्या आहेत. सर्वसामान्यत: ही मूर्ती केवळ काचेच्या दरवाजाआडच नाही, तर कुलूपबंदही झालेली दिसते. कधी हा मान बालाजीकडे गेलाय, तर कधी श्रीनाथजींकडे. पण मेजॉरिटी अर्थातच आमच्या लाडक्या गणोबाची. काही ठिकाणी त्याला कोरलेली संगमरवराची महिरप लाभलीय, तर काही ठिकाणी शिसवी लाकडाचे देवालय. अॅक्रिलिकच्या फुलांनी किंवा चंदनाच्या माळेने तो सजलायही. पण या सर्वापेक्षा संस्कार ‘डी’ िवगचा आमचा गणोबा वेगळा आहे. त्याला त्याचे हे वेगळेपण बहाल केलंय- आठव्या मजल्यावरच्या शांता नटराजन् आजींनी!
असा एकही दिवस जात नाही, की शांताआजींनी सकाळ-संध्याकाळ या मूर्तीची, काचांची, बठकीची साफसफाई केली नाही. सकाळची दूधवाल्यांची, पेपरवाल्यांची, शाळेत जाणाऱ्या पोरांची, ऑफिसला धावणाऱ्या प्रौढांची वेळ सरली की दहाच्या सुमारास शांताआजी खाली उतरतात. हातात गोडेतेलाची बाटली, वळलेल्या वाती, फुलांचा हार, लाल जास्वंदाचे फूल, देव पुसायचे वस्त्र, काचांचे दरवाजे पुसायचे फडके, उदबत्त्या, निरांजन, ताम्हण.. पुढच्या अर्धा-पाऊण तास स्वत:शीच हळूहळू मंत्र म्हणत अतिशय तन्मयतेने या कोपऱ्याची साफसफाई होते. निर्माल्य काढून प्लॅस्टिकमध्ये भरणे, मूर्ती स्वच्छ करणे, नवा हार, नवे फूल वाहणे, तेलाचे दिवे, अगरबत्ती.. हे सर्व झाल्यावर छोटय़ा फळकूट पाटीवर पांढरी ठिपक्यांची रांगोळी काढणे.. काचा साफ करणे..
आपण लिफ्टच्या प्रतीक्षेत उभे असताना तो उदबत्तीचा मंद सुगंध प्रसन्नता देतो आणि हात आपोआपच जोडले जातात. लिफ्टमधून बाहेर पडणारा प्रत्येकजण प्रथम डावीकडे बघतो. मान तुकवतो. छातीला, तोंडाला हात लावतो. अस्मादिकांसारखे काही स्पेशल भक्तगण चप्पल-बूट काढतात. गायत्री मंत्र म्हणतात. काही क्षण का होईना, तिथे रेंगाळतात. शाळेची बस गाठण्यासाठी धडपडणाऱ्या चिमण्या टॉमची आणि त्याचे प्रोजेक्ट वर्क, टिफिन सांभाळत नाइट गाऊनमध्येच बसपर्यंत धावणाऱ्या त्याच्या मॉमचीही गणोबाशी पहिली नजर होते आणि दिवस सुरू होतो.
संध्याकाळच्या वेळीही शांताआजीचा हा नेम चुकत नाही. तेल वाढवून दिवे पेटते ठेवणे, उदबत्ती लावणे, हे सांजवेळी व्हायलाच हवे. ऑफिसमधून घरी परतल्यावर घरात पाऊल ठेवण्यापूर्वीच तुमच्या मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करण्याचे विलक्षण सामथ्र्य त्या इवल्याशा पेटत्या उदबत्तीत असते. दिवसभराचा शीण, ताण, ऑफिसमधल्या कुरबुरी, कटकटी लिफ्टमध्ये पाय ठेवण्यापूर्वीच विरण्याचा अद्भुत संस्कार शांताआजींची उदबत्ती करते.
बरे, हे सगळे कोणीही न सांगता, कोणाकडे वर्गणी न मागता आपल्या पशांतून, आपल्या श्रमांतून.. कोणीही न सांगता! काय असतील या मागच्या प्रेरणा, हे समजून घेण्यासाठी मी एकदा शांताआजींना गाठले अन् विचारता झालो. त्यांच्या दाक्षिणात्य तोडक्यामोडक्या िहदीत त्या एवढेच म्हणाल्या, ‘‘अच्छा लगता है।’’
शांताआजी हा कदाचित तुमचा विरंगुळा असेल; पण तुमचे हे ‘अच्छा लगना’.. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास ‘फील गुड फॅक्टर’ साऱ्या चौऱ्याऐंशी बिऱ्हाडांत पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. कळत-नकळत संस्कार करत्या झाला आहात. लिफ्टच्या पॅसेजला देवालयाच्या गाभाऱ्याचे रूप देत्या झाला आहात. आज आमच्या घराघरात गणपतीचे म्युझियम वाटावे एवढय़ा मूर्ती आहेत. काही झोपाळ्यावर, काही लवंडलेल्या. काही वाचणाऱ्या, तर काही लिहिणाऱ्या. त्यांना आम्ही शोकेसमध्ये ठेवले आहे. दहा-पंधरा दिवसांनी आम्ही त्यांच्यावरची धूळ झटकतो, पण पूजेअर्चेचे मनात येत नाही.
शांताआजी, तुम्ही मात्र बिल्डरने दिलेल्या एका अॅमेनिटीला त्याचा अर्थ प्राप्त करून दिला आहे. खरं सांगायचं तर घरी परतताना तुमच्यामुळेच आम्हाला ‘अच्छा लगता है।’
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
अच्छा लगता है।
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांचे आपल्या भवतालातील सुंदर घटितांची दखल घेणारे ललित सदर...

First published on: 05-01-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sanjay oaks article