डॉ. शंतनू अभ्यंकर
डॉ. अरुण गद्रे एक संवेदनशील, समाजभान असणारे डॉक्टर आणि लेखक म्हणूनही आपणा सर्वाना परिचित आहेत. ते माझे मित्र आहेत. त्यांचे ‘उत्क्रांती – एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ हे पुस्तक त्यांनीच मला पाठवले. मी ते वाचले आणि वाचून न वाचल्यासारखे करायचे ठरवले! पण या अवैज्ञानिक, छद्मवैज्ञानिक मांडणी करणाऱ्या पुस्तकाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विज्ञान पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, हे चूक आहे. आता बोलणे भागच आहे.
विज्ञानाबाबतच या पुस्तकात खंडीभर शालेय आणि अक्षम्य चुका आहेत. थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या नियमानुसार उत्क्रांती अशक्य असल्याचे सांगत त्यांनी त्या नियमाचा साफ चुकीचा अर्थ लावला आहे. प्रत्येक अमायनो अॅसिडसाठी तीनऐवजी चार अक्षरी कोड असल्याचे म्हटले आहे. E= mc2 हे समीकरण, E= MC2 (कॅपिटल एम आणि सी) असे छापले आहे. मानवी शरीरात अन्ननलिका पुढे आणि श्वासनलिका त्यामागे असल्याचे म्हटले आहे. असे फक्त मस्तानीच्या मानेत शक्य आहे, कारण त्याशिवाय तिने गिळलेले पान नितळ मानेतून दिसणार नाही!
‘इलेक्ट्रॉन आपण पाहू शकत नाही, मग जे आपण पाहू शकत नाही ते विज्ञान कसे?’ असले प्रश्न डॉक्टर विचारतात. मग इलेक्ट्रॉन हे एक मॉडेल आहे हे त्याचे उत्तर स्वत:च देतात. मग म्हणतात की, हे मॉडेल तर काल्पनिक आहे. म्हणजेच विज्ञान कल्पनाशक्तीवर अवलंबून असते! आपण समजतो तसे प्रयोगातून निर्माण होत नाही. लिखाणाचा रोख असा की हे सगळे तकलादू आहे. बुद्धिभेद म्हणतात तो हाच.
पुढे विज्ञानाचे वर्णन उपरोध, उपहास आणि क्षुल्लकीकरण करणाऱ्या भाषेत आहे. ‘चला म्हणजे विज्ञान कुठे तरी कमी पडते तर!’, ‘जमिनीपासून चार अंगुळे वर चालणारा धर्मराजाच्या विज्ञानाचा रथ जमिनीवर आला म्हणायचा.’ अशी वाक्यरचना येते. विज्ञान अहंकारी, आढय़ताखोर असल्याची हेटाळणीखोर, विज्ञानाचे सैतानीकरण करणारी भाषा पुस्तकात वारंवार वाचायला मिळते. डार्विनने पेन, कान्ट,ह्यूम या तत्त्वज्ञांच्या सुरात सूर मिसळून देवाविरुद्ध मांडणी केली, म्हणून तो स्वीकारला गेला, असं म्हणत डॉ. गद्रे डार्विन पक्ष हा सैतानाचा पक्ष आहे, असे हळूच सुचवतात. एकूणच भाषा आणि मांडणी ही शास्त्रीय नाही, एखाद्या धर्मप्रसारक प्रवचनकारासारखी आहे. लेखकाला याची जाणीव आहे. ‘उत्क्रांती विज्ञान वास्तवात फ्रॉड ठरल्यानंतरही उत्क्रांतीचे पुरावे पाठय़पुस्तकातून काढले जात नाहीत! तेव्हा मला वाटू लागलेल्या सात्त्विक संतापाचे रूपांतर माझ्या उपरोधिक शैलीत झाले,’ असे स्पष्टीकरण खुद्द लेखकाने पुस्तकातच दिले आहे.
अर्थातच सैतानी विज्ञानाशी फारकत घेत, एकेका प्रकरणागणिक, डॉक्टर तर्कहीनतेच्या चढत्या पातळय़ा गाठतात. विज्ञान अर्धवट आहे, माझी थिअरीही अर्धवट आहे, म्हणून ती विज्ञान आहे! जे जुने ते फेकून देते ते विज्ञान, मी डार्विनला फेकून देतो सबब मी म्हणतो ते विज्ञान! जुन्या काळी सेमेन्वेलीस या शास्त्रज्ञाला विरोध झाला, पण नंतर त्याचेच खरे ठरले; तद्वतच आज मला विरोध होतो आहे म्हणून माझे म्हणणे बरोबर आहे! असे अजब तर्कशास्त्र डॉक्टर इथे मांडतात.
सजीवांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनातूनच (जनुकीय बदल) सजीवांच्या शरीरात बदल घडतात. यातील प्राप्त परिस्थितीत तगून राहण्यास साहाय्यभूत ठरतील असे बदल असलेले सजीव तगतात, त्यांच्या पिढय़ा फोफावतात. बाकीचे काळाच्या उदरात लुप्त होतात. थोडक्यात, सगळा खेळ उत्परिवर्तनावर आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. अशा जनुकीय रचना इतक्या नेमक्या, सुंदर, सुचारू, सुबक आणि सुभग की आहेत असे वाटावे, की या रचना नक्कीच कोणी तरी जाणीवपूर्वक घडल्या आहेत; कोणा बुद्धिमान रचियत्याने अभिकल्पिलेल्या (Designed by an Intelligent Designer) आहेत. विज्ञान सांगते हा तर फक्त आभास, अशा रचना आपोआप निर्माण होणे शक्य आहे.
पण जगणे सुलभ करणारे, सोयीचे उत्परिवर्तन आपोआप होण्यासाठी लागणारा काळ हा पृथ्वीच्याही वयापेक्षा जास्त आहे असे डॉ. गद्रे यांचे गणित आहे. तेव्हा हा अनाकलनीय वेगाने उद्भवलेला बुद्धिमान अभिकल्प, म्हणजे कोणी तरी अभिकल्पक असल्याचा, म्हणजेच ‘निर्मिक’ असल्याचा पुरावा आहे असे ते म्हणतात. ‘निर्मिक’ हा शब्द त्यांनी महात्मा जोतीबा फुले यांच्याकडून घेतला, असेही आवर्जून नमूद आहे.
डॉ. गद्रे यांचे गणित बरोबर असले तरी निष्कर्ष चुकीचा आहे. एक उदाहरण घेऊ. दर वेळी सरासरी एक दशकोटी १०^८ (एकावर आठ शून्य) पुंबीजापैकी एकाचा संयोग होऊन मानवाला मूल होते. प्रत्येक पुंबीज अनन्य जनुके बाळगून असते. तेव्हा तुम्हाला तुमचीच जनुके मिळाली याची शक्यता एका दशकोटीत एक एवढी झाली. ही जनुके तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळाली आणि त्यांना तुमच्या आजोबांकडून..! अर्थातच नेमकी तुमचीच जनुके तुम्हाला संक्रमित होण्याची शक्यता, दर पिढीत एका दशकोटीत एक, अशा घटकाने दुर्मीळ होत जाईल. असे मागे मागे गेल्यास दहाव्या पिढीत तर तुमची जनुके तुम्हाला प्राप्त होण्याची संख्याशास्त्रीय शक्यता जवळपास शून्य आहे असे गणिती उत्तर येईल; पण तुम्ही तर आहात! हे वाचता आहात! आणि तुमची अनन्य जनुकेही आहेत. थोडक्यात, तुमचा आत्ता आहे तो संच जुळून येण्याची शक्यता शून्यवत असली तरी कोणता तरी संच जुळून येणारच. तुम्ही आहात म्हणजे यायलाच हवा, नव्हे आलाच आहे! रमी खेळताना तेरा पाने मिळणार हे फिक्स, कोणती ते नॉट फिक्स्ड.
राहता राहिला प्रश्न विशिष्ट जनुकीय क्रमाचा. (पानांचा नेमका संच) मुळात विपुल असलेल्या सजीवांत उत्परिवर्तने प्रचंड प्रमाणात घडतात. उत्परिवर्तने जरी यादृच्छिक असली तरी त्यातली परिस्थितीला अनुरूप असणारीच पुढच्या पिढीत संक्रमित होतात. कालांतराने, सोयीचे क्रम आबादीत आबाद ( Become dominant in the population) होतात, गैरसोयीच्या क्रमांचे तण आपोआपच लुप्त होते. येणेप्रमाणे पिढीगणिक अधिकाधिक नेमक्या, सुंदर, सुबोध, सुबक आणि सुभग रचना साकारू लागतात. आपल्याला मात्र भासत राहते, वाटत राहते, अरे कोणी जाणूनबुजून, डोकं लढवून, घडवल्याशिवाय असली कारागिरी शक्य नाही.
डार्विनचा पहिल्या पेशीच्या आगमनाबाबतचा तर्क इथे टवाळी करण्यासाठी वापरला आहे. पण याबाबतची आपली समज आता फार पुढे गेलेली आहे. नुकत्याच जन्मलेल्या पृथ्वीवर जैविक महारेणूंचे (प्रथिने, न्यूक्लीक आम्ले, कबरेदके इ.) मूलभूत घटक (अमिनो आम्ले, न्यूक्लीओटाइड, सिम्पल शुगर, सिम्पल लिपिड) संपूर्णपणे नैसर्गिकरीत्या कसे तयार झाले असतील हे आज आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. हे एकमेकांशी जोडले जाऊन लडी कशा बनवू शकतात हेही दाखवले गेले आहे; पण यातील गुंतागुंत आणि कित्येक रिकाम्या जागा पाहता यामागे कोणी बुद्धिमान अभिकल्पक आहे, निर्मिक आहे, असे डॉ. गद्रे यांचे म्हणणे.
जो उत्क्रांती सिद्धांत अंधश्रद्धा ठरवायचा आहे, त्याबद्दलच्या ढोबळ चुकांनी हे पुस्तक भरलेले आहे. ‘माकडापासून माणूस तयार झाला’, ‘माणूस चिंपांझीपासून निर्माण झाला’ (आपण माकडाचे वंशज नाही, पण आपले पूर्वज समान आहेत), ‘उत्क्रांतीतून प्रगत जीव निर्माण होतात’ (प्रगत नव्हे तर अनुकूलता साधलेले); अशी उत्क्रांतीबद्दल प्राथमिक समजही नसल्याचे दर्शवणारी अनेक विधाने पुस्तकात आहेत. एके ठिकाणी ते ‘अमिबाचे जीवाश्म सापडतात’ असं म्हणतात. अमिबा हा आज अस्तित्वात असलेला एकपेशीय प्राणी आहे. तो अब्ज वर्षांपूर्वी नव्हता. त्यांना एकपेशीय स्ट्रोमलोलाइट्स ( Stromatolites) म्हणायचे असावे.
डॉ. गद्रे सलग फॉसिल रेकॉर्ड कुठाय, असा खडा सवाल करतात. वास्तविक ही अपेक्षाच अवास्तव आहे. फॉसिल रेकॉर्ड म्हणजे काही विमानाची ब्लॅकबॉक्स नाही, की जी सलग आणि सततची माहिती पुरवेल?
मधेच एके ठिकाणी डॉ. गद्रे ‘खऱ्या अर्थाने निर्मिकापुढे नतमस्तक होणे’ हे या पुस्तकाचे प्रयोजन असल्याचे सांगतात. ‘निर्मिकाप्रति कृतज्ञ व्हा.’ वगैरे आज्ञार्थी वाक्येही येतात. ‘जेव्हा एखादी गोष्ट चमत्काराकडे जाते तेव्हा ते विज्ञान उरत नाही, एक श्रद्धा म्हणून उरते.’ हेही येते आणि हे उघडपणे प्रचारी पुस्तक असल्याचे स्पष्ट होते. विज्ञानाच्या भाषेत इथे निर्मिकाच्या धर्माचाच प्रचार दिसतो. हे तर छद्मविज्ञान.
या निर्मिकाबद्दल मात्र डॉक्टर तो त्यांचा शाळेतला सवंगडी असल्यासारखे ठाम दावे करतात. निर्मिकाच्या या विश्वात माणसाला मात्र विशेष स्थान आहे. निर्मिकाने माणसाला मर्यादित प्रमाणात कृतिस्वातंत्र्य दिले आहे. तो या विश्वाबाहेर आहे तेव्हा कुणाही माणसांत निर्मिक नसतो. अहं ब्रह्मास्मी, चराचरात विश्वंभर वगैरे भारतीय संकल्पनांतील हा नव्हे. मग हा कुठला बरे असावा? डॉक्टर सांगतात, ‘माणूस हा निर्मिकाची प्रतिकृती आहे.’ मग बायबलच्या जेनेसिसमधली ओळ आठवते ‘ So God created man in his own image’, आणि लक्षात येते की, हा तर येशू ख्रिस्त आहे! फुले पगडी घातलेला येशू ख्रिस्त!!
पण एकदा ‘निर्मिकाला’ फुले पगडी घातली, की कित्येक आपोआपच मूक होतील ही डॉक्टरांची अटकळ खरी ठरलेली दिसते. सत्यपालसिंह वगैरे अनेक मंत्र्यांच्या अशास्त्रीय विधानांची उत्साही चिरफाड करणारे मातब्बर, या येशूच्या कोकराबद्दल गप्प आहेत. का ‘फक्त हिंदूंवर टीका करतो तो पुरोगामी’, या व्याख्येतही तथ्य आहे म्हणायचे? कदाचित भाजपचे माजी खासदार मा. प्रदीपदादा रावत यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने पंचाईत झाली असावी; पण डॉ. गद्रे भाग्यवान की ते ख्रिस्ती आहेत. त्यांचे आडनाव सुचवते त्या धर्माचे जर ते असते, तर जात्यंधांनी त्यांची जात काढून त्यांना पळता भुई थोडी केली असती.
उत्क्रांतीचा सिद्धांत हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. गुरुत्वाकर्षण, अणुरचना, पुंजकीय विज्ञानाइतक्याच ठाम पायावर तो उभा आहे. उद्या हा सिद्धांत बाद करणारा नवा सिद्धांत आलाच तर त्याने आजवर जे ठाऊक आहे त्याचा उलगडा देऊन शिवाय आज असलेली काही कोडी तरी लीलया सोडवली पाहिजेत. बुद्धिमान अभिकल्प या परीक्षेस उतरत नाही. निर्मिक तर तपासताही येत नाही. जे तपासता येत नाही आणि त्यामुळे नापासता येत नाही (Falsifiability, कार्ल पॉपर) ते विज्ञान कसे म्हणवता येईल? उत्क्रांती सिद्धांताचे तसे नाही. तो उद्या नापासही ठरेल. पुरेसा, सबळ, पर्यायी पुरावा मिळाला की ठरेलच. ठरला तर ठरो बापडा. विज्ञानरीत हीच आहे; पण अज्ञानाच्या क्रूसवेदीवर निर्मिकाची प्राणप्रतिष्ठा करणे आणि अशा पुस्तकाला विज्ञानाचा म. फुलेंच्या नावाचा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे साक्षात विज्ञानाला क्रुसावर चढवण्यासारखे आहे. ही विज्ञानरीत निश्चितच नाही. तेव्हा पुरस्कार गैर आहे. ते काय करत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाहीये. देवा (असलास तर) त्यांना क्षमा कर.
लोकहो, सावधान, डार्विन मेल्याचे दु:ख नाही, पण गद्रे सोकावतील.
(या लेखासाठी जैववैज्ञानिक असीम चाफळकर, दिल्ली यांचे विशेष साहाय्य झाले.)
shantanusabhyankar@hotmail.com