‘कलावैभव’चं ‘जास्वंदी’ लोकांना खूप आवडलं. विजया मेहताने प्रयोग मेहनत घेऊन बसवला होता. नाटकामधल्या नावीन्याचे प्रेक्षकांना अप्रूप वाटले आणि मन्या-बन्याच्या भूमिकेत दिलीप कोल्हटकर आणि सुरेश भागवत खूप भाव खाऊन गेले. विजया आणि नवोदित विक्रम गोखले यांचं प्रेमप्रकरण मला फारसं पटलं नाही, कारण ते मनस्वी वाटलं नाही. लुटूपुटूचं वाटत राहिलं. नाटकाचा शेवट विजयाने (अर्थात मला विचारून) बदलला. नाखुशीने मी परवानगी दिली होती. त्याचा तपशील सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा छापील नाटकाच्या प्रस्तावनेचा इथे आधार घेते.
मन्या आणि बन्या माणसांची कुकर्मे आणि दुहेरी वर्तणूक पाहून विटून जातात. परंतु सोनियाचा त्यांना विलक्षण लळा असतो. तिच्याखातर ते मन मारून माणसांच्या आसऱ्याला राहतात; परंतु अखेर जेव्हा तिचेच भयंकररीत्या अध:पतन होते, तेव्हा मनुष्यजातीचा तिटकारा अनावर होऊन दोघे घर सोडून निघून जातात. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेली सोनिया आयुष्यावर सूड उगविण्यासाठी म्हणून की काय, जाणूनबुजून आत्मघाताला सामोरी जाते. दारू पिऊन ती स्वत:ला तानपुरे ड्रायव्हरच्या बाहुपाशात सोडून देते. हा प्रसंग विजयाला भडक वाटला. तसा तो आहे, आणि असायलाही हवा. एरवी मांजरांच्या दैवताला तडा जाणार नाही. परंतु मराठी प्रेक्षकांना तो मानवणार नाही (इथे मराठी प्रेक्षकांच्या हळुवारपणाबद्दल पुन्हा आमचे दुमत!) असे वाटून विजयाने शेवट बदलला. सोनिया पुन्हा ‘सोशल सर्किट’च्या जाळ्यात स्वत:ला गुरफटवून घेते आणि मेलेल्या मनाने जगण्याचा उपचार चालू ठेवते. माझ्या मते, हा शेवट फार sophisticated आहे, आणि मांजरांना सोनियाबद्दल तिटकारा लावण्याइतका समर्थ नाही.
या प्रयोगाला बरीच र्वष लोटली. ‘जास्वंदी’ (‘पंजे’)चे लिखाण आणि त्याचे वेगवेगळे आविष्कार हा माझ्या नाटय़प्रवासामधला एक फार विरंगुळ्याचा टप्पा होता. त्या सुखद आठवणी जतन करून मी माझ्या स्मृतिकोशात बंदिस्त केल्या होत्या.
पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. दिल्लीची टी.व्ही.ची नोकरी सोडून मी मुंबईला आले. माझ्या आधीच अरुणने मुंबई गाठली होती. आम्ही आता विभक्त झालो होतो. आणि तरीसुद्धा आमचे स्नेहबंध तुटले नव्हते. आमच्या परिचयाच्या वेगवेगळ्या माध्यमांतून संधी मिळेल तेव्हा आम्ही एकत्र काम करीत होतो. ‘बेगार’, ‘स्पर्श’, ‘कथा’ हे चित्रपट; ‘बिकट वाट वहिवाट’, ‘सख्खे शेजारी’, ‘पुन्हा शेजारी’, ‘सोयरीक’ ही नाटके आणि शिवाय ‘अडोस-पडोस’, ‘छोटे-बडे’, ‘हम पंछी एक चॉल के’ आणि मुंबई दूरदर्शनचा ‘गजरा’ असे अनेक टी. व्ही. कार्यक्रम आम्ही मिळून केले. बीमोडीमधली तडजोड! मी काहीही लिहिलं तरी आधी अरुणला वाचून दाखवीत असे आणि तो काही नवा उपक्रम स्वीकारण्याआधी माझ्याशी सल्लामसलत करीत असे. लोकांना आमचे नवल वाटत असे.
आणि मग एके दिवशी अचानकपणे अरुणने जगाचा निरोप घेतला. व्याधी, आजार, दुखणंखुपणं यापैकी त्याला काही ठाऊक नव्हतं. फोनवर मित्राशी गप्पाटप्पा करीत असताना तो एकदम गेला. आपल्या स्वभावाला अनुसरून.. हसतखेळत. एक भलीमोठी पोकळी मला सोबतीला ठेवून तो गेला.
मग मी स्वत:ला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये झोकून दिले. सगळ्याच कलामाध्यमांचा समाचार घेण्याचा यत्न केला. एका माध्यमासाठी लिहिणे; ते मंचावर (किंवा पडद्यावर) उतरविणे आणि मग दुसऱ्या माध्यमाकडे वळणे; हा आळीपाळीचा खो-खो सुरू केला. आईला माझ्या या धरसोडपणाचा राग यायचा. ‘‘हे काय हे? एक ना धड, भाराभर चिंध्या..’’ ती म्हणत असे. तर आता त्या चिंध्यांची छानशी गोधडी बनवण्याच्या प्रयत्नांत आहे.. ‘सय’!
तर त्या भगभगलेल्या वर्षांमध्ये मी बरेच उद्योग केले. माझा आवडता वाक्प्रयोग वापरायचा, तर ‘भतेरे पापड बेले.’ त्या उद्योगांचे (निवडक) नंतर वर्णन येईलच; पण सध्या जे एक ‘जास्वंदी’चे फूल खुडले आहे, त्याचा विषय पुरा करते.
२०१० च्या मध्याचा सुमार होता. संतोष कोचरेकरचा घरी फोन आला.
‘‘बाई, बोलायचं आहे.’’
‘‘मग बोल ना.’’
‘‘फोनवर नको. प्रत्यक्षात भेटल्यावर सांगतो. कधी येऊ?’’
‘‘केव्हाही ये.’’
संतोषची माझी आधीची ओळख होती. ‘माझा खेळ मांडू दे’ हे माझे नाटक मी स्वत:च निर्माण केले होते. तेव्हा तो माझा मॅनेजर होता. वेळप्रसंगी तो मला दमदाटी करीत असे. संतोषला त्याच्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’ या नाटय़संस्थेतर्फे ‘जास्वंदी’ पुन्हा फुलवायचे होते. लेखिका म्हणून माझी संमती घ्यायला तो आला होता.
‘‘बरा आहेस ना?’’ मी त्याला विचारलं, ‘‘जुनं, झालं-गेलं नाटक घेऊन तुला बुडायचं आहे का?’’
‘‘काही बुडत नाही मी. कसा झकास तरंगतो बघा.’’ संतोषने प्रयोगाबद्दल बराच विचार केला होता. त्याने दिग्दर्शक पण जो ठरवला होता, तो अनुभवी होता. तेव्हा मला हरकत घेण्याचे कारण नव्हते. मी संमती दिली. संतोषने उत्साहाने मला मानधनाचा आगाऊ रकमेचा चेक दिला आणि ‘‘तालमी सुरू झाल्या की कळवतो,’’ असं सांगून गेला.
दहा दिवसांनी त्याचा परत फोन आला.
‘‘बाई, बोलायचं आहे.’’
‘‘मग बोल ना.’’
‘‘फोनवर नको. प्रत्यक्षात भेटल्यावर सांगतो..’’
काही कारणांवरून संतोषचे आणि ठरविलेल्या दिग्दर्शकाचे फिस्कटले होते.
‘‘मग काय? आता बेत रद्द?’’
‘‘छे छे. आता पाय मागे नाही घ्यायचा. बाई, नाटक तुम्हीच बसवा. लेखिका-दिग्दर्शिका सई परांजपे. ठरलं.!’’ मग बरंच ‘होय-नाही’ करत करत अखेर मी जबाबदारी पत्करली. (पुन्हा ‘अगं, अगं म्हशी’चा प्रत्यय आला. ही म्हैस बरीक नेहमी माझ्या मदतीला धावून येते.)
नाटक तद्दन व्यावसायिक पातळीवर करायचं होतं, तेव्हा निर्मात्याला (आणि दिग्दर्शिकेला पण) वजनदार पात्रयोजना हवी होती. शोध सुरू झाला. दिल्लीच्या आमच्या प्रयोगाला मुळी शोध घ्यावाच लागला नव्हता. सगळीच्या सगळी पात्रे जणू विंगेतच उभी होती.. एण्ट्री घेण्याच्या पवित्र्यात. सोनिया सर्वप्रथम. त्यामुळे साजेसे कलाकार जमवायला मुंबईला एवढी प्रचंड खटपट करावी लागेल याची अजिबात कल्पना नव्हती. प्रत्येक पसंतीस उतरलेल्या कलाकाराच्या कपाळावर ‘व्यस्त’ असे लेबल चिकटवलेले. जो-तो वाहिनी किंवा सिनेमाच्या शूटिंगमध्ये अडकलेला. बरं, या नाटकाचं प्रलोभन वाटल्यामुळे स्वच्छ ‘नाही’ म्हणायला कुणी तयार नाही. अटी, वाटाघाटी यांना सुरुवात झाली. आम्हाला कोणत्याही प्रकारची तडजोड नको होती. शोध चालूच राहिला. सोनियासाठी तर विशेषच प्रयास घ्यावे लागले. कारण आम्हाला खास ‘आखुडशिंगी बहुगुणी’ नायिका हवी होती. अमुक वयाची, आकर्षक, उच्चभ्रू, उत्तम अभिनेत्री, तारखा मोकळ्या असणारी आणि अर्थातच परवडणारी. या भूमिकेसाठी असंख्य होतकरू सोनिया हिरीरीने पुढे आल्या. पण वरील सर्व अटी जुळेनात.
हिंदी चित्रपट आणि नाटय़सृष्टीत नाव कमावलेली एक आकर्षक अभिनेत्री एकदा तालमीच्या हॉलमध्ये दाखल झाली. तिला पाहून आमचा तमाम नटवर्ग पागल झाला. ‘‘ही भूमिका करायला मी उजवा हात द्यायला तयार आहे..’’ ती मला म्हणाली. एक छोटीशी अडचण होती. तिला मराठीचा गंध नव्हता. तिचा उजवा हात घेऊन मी काय करू? पुण्यात राहणाऱ्या एका अभिनेत्रीने ‘जास्वंदी’ करण्यासाठी माझा पिच्छा पुरविला. तिने माझ्या एका सिनेमात चांगले काम केले होते. तिची अडचण अशी की, मुलीच्या परीक्षेमुळे आठवडय़ातला फक्त एक दिवस ती मुंबईला तालमीला येणार. कसं शक्य होतं? ती रोज मला फोन किंवा टेक्स्ट करीत असे. एक संदेश फार गोड होता- ‘‘म्याऊं.. मी येऊ?’’
आणि मग एके दिवशी निमिषार्धात आमचा शोध संपला. डौलदार पावलं टाकीत जास्वंदी तालमीच्या हॉलमध्ये आली. मोठाले टपोरे डोळे, लांबसडक काळेभोर केस आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व. ब्रह्मदेवाने खवा घेऊन हिला घडवलीय का, असं क्षणभर वाटलं. सारिका नवाथे (निलाटकर). तिचं मी वाचून घेतलं. तिनं ठीक वाचलं. पण माझ्या घुसमटलेल्या नायिकेच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या सर्व छटा ती दाखवू शकेल का, याचा नीटसा अंदाज या एका वाचनात नाही आला. पण मी चक्क जुगार खेळायचं ठरवलं. माझा होरा अचूक ठरला. सारिका तालमी- तालमीगणिक फुलत गेली.
पळपुटय़ा बोक्यांनी पण खूप हैराण केलं. मन्या-बन्यासाठी आम्ही वीस ते अठ्ठावीस या वयोगटामधल्या मुलांच्या चाचण्या घेतल्या. ही सगळी तरुण मुलं आपल्या भावी कारकीर्दीच्या उंबरठय़ावर उभी होती. साहजिकच त्यांना आपल्या भवितव्याबद्दल विवंचना होती. त्यामुळे निवडला गेलेला नट दुसऱ्या दिवशी उगवेलच याची हमी नव्हती. त्याचा ‘ब्रेक’साठी शोध निरंतर चालू असे. एखादी मालिका मिळाली किंवा कुठे जास्त ‘नाइट’ मिळाली की तो खुशाल ‘उद्या येतो’ असं सांगून पसार होत असे. मला खेदपूर्वक म्हणावं लागतंय की, सडेतोड बोलण्याचा आपल्या नाटय़ (किंवा कोणत्याच) सृष्टीत रिवाज नाही. केवळ नटच नाहीत, तर निर्माते, वितरक आणि तंत्रज्ञ यांच्या बाबतीतही असा हा कितीतरी वेळा अनुभव आला आहे.
अखेर अभय जाधव आणि सनीभूषण मुंगेकर हे दोन अभिनयपटू, तरबेज आणि उत्साही नट मिळाले. दोघांची जोडी झकास होती आणि त्यांच्यामधली देवाणघेवाणही मनोवेधक होती. तानपुरे ड्रायव्हरसाठी मी आनंद अळकुंटे या नटाला बोलवून घेतले. ‘कबड्डी’मधली त्याची भूमिका मला आवडली होती. तानपुरेही आनंदने सराईतपणे उभा केला. उदयन आणि रंगाबाईसाठी संतोषने आपले जाळे पसरले होते. साहिल हा प्रायोगिक रंगभूमीचा भोक्ता होता, ही माझ्यासाठी त्याची एक जमेची बाजू. त्याने प्रांजळपणे त्याच्या गुंतवणुकीची माहिती सांगितली, ही दुसरी जमेची बाजू. त्याने उदयनचा संवाद समजून वाचला, ही तिसरी निर्णायक जमेची बाजू. काही वर्षांपूर्वी कलावैभवने नवे कलाकार घेऊन ‘जास्वंदी’चे पुनरुज्जीवन करण्याचा घाट घातला होता. काही थोडक्या तालमी पण झाल्या होत्या. पण तोंडवळकरांचा आणि माझा व्यवहार जुळला नाही म्हणून तो बेत स्थगित झाला. पण गंमत म्हणजे त्या प्रयोगात रंगाबाईचे काम करणाऱ्या स्वाती बोवलेकर नेमक्या त्याच भूमिकेसाठी आमच्याकडे आल्या होत्या. त्यांना निश्चित करून मी तालमी सुरू केल्या.
स्वातीताईंना डायरेक्ट करणं अवघड काम होतं. त्यांना काही सांगू लागलं की त्या आखडून, मिटून जायच्या. मी त्यांचे दोष काढते आहे असा त्यांचा समज होत असावा. ‘‘ती तुम्हाला घाबरते,’’ संतोष म्हणाला. आता काय करावं? ‘‘तुम्ही मंडळींनी उगाच धाक दाखवून माझा बागुलबुवा (का बागुलबाई?) बनवला आहे,’’ मी संतोषवर आरोप केला व माझा पवित्रा बदलला. रंगाबाईंना मी मोकळीक देऊ लागले. त्यांच्या चांगल्या जागांना दाद देऊ लागले. ‘अहो’वरून ‘अगं’वर आले. पाहता पाहता त्यांचा नूर बदलला. रंगाबाई आकार घेऊ लागली. दिग्दर्शकाचंसुद्धा प्रत्येक नाटकाबरोबर शिक्षण चालूच असतं. N.S.D. चा डिप्लोमा आहे, तेव्हा मला सगळं येतं म्हणून चालत नाही. दादरला मकरंद सोसायटीच्या हॉलमध्ये आमच्या तालमी होत. गंमत म्हणजे तालमींना सोसायटीमध्ये वावरणारा एक भटका बोका आवर्जून येऊ लागला. अंगभर मारामारीच्या खुणा असलेला, खरबुज्या तोंडाचा हा बोका मोठय़ा ऐटीत येत-जात असे. कधी पूर्ण तालमीला बसायचा, तर कधी ‘चालू दे तुमचं’ असं सूचित करून निघून जायचा. त्याचं नाव आम्ही ‘बाजा’ ठेवलं होतं. त्याचे खायचे-प्यायचे लाड व्हायचे, हे वेगळं सांगायला नकोच. कारण तो आमचं शुभचिन्ह (mascot) बनला होता.
‘जास्वंदी’ची तांत्रिक बाजू भक्कम होती. नेपथ्य उभारणी आणि प्रकाशयोजना सुनील देवळेकर या त्या प्रांतामधल्या तज्ज्ञ संयोजकाने सांभाळली. अतिशय कल्पकतेने त्याने सेट उभारला आणि त्याला साजेल अशी गूढरम्य प्रकाशयोजना स्वतंत्रपणे कल्पिली. संगीताचा जिम्मा राहुल रानडेने दमदारपणे पेलला. राहुल हा माझ्या सख्ख्या मैत्रिणीचा- मीराचा मुलगा. लहान असताना त्याने माझ्या पहिल्यावहिल्या मुलांच्या चित्रपटात छोटय़ा श्यामूचं काम केलं होतं. काळ काय भराभर धावतो! सोनिया उदयनचे हळुवार प्रणयप्रसंग; मांजरांचं हुंदडणं, तानपुरेचं ब्लॅकमेलचं थरारनाटय़ हे सगळेच प्रवेश पोषक संगीतलहरींवर तरंगत उलगडले. या नाटकाचा कपडेपट हा काही वेगळाच प्रकार होता. आजवर मी माझ्या कोणत्याही कलाकृतीपायी पोशाखावर एवढा विचार केला नव्हता. पण राणी पाटीलने वस्त्रभूषा करायची असं ठरलं आणि त्या कामगिरीचं स्वरूपच पालटून गेलं. एखाद्या प्रबंधासाठी संशोधन करावं तसं राणीने प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रसंगांचा अभ्यास करून समयोचित पोशाख ठरविला. उदा. बोके प्रथम प्रवेश करतात ते थेट उकिरडय़ावरून आलेले असतात. नंतर सोनिया त्यांना छान न्हाऊ-माखू घालते. ते उजळून जातात. ‘‘मग त्यांच्या अवतारात फरक वाटायला नको का?’’ राणीने सडेतोड मुद्दा उपस्थित केला. खरी गोष्ट! मग आम्ही दोन्ही बोक्यांसाठी दोन- दोन जोड टी-शर्ट-जीन्स आणले. आधीचे फाटके, मळके, चुरगळलेले आणि नंतरचे चकाचक. जास्वंदीला फार छान वॉर्डरोब होता. वैविध्यपूर्ण. साडी, सलवार, जीन्स, ड्रेसिंग गाऊन आणि नाइटी. सोनियाच्या हौसेला मोल नव्हतं. कोणत्याही नटीची जन्माची ददात फिटावी. एका प्रवेशाअखेरीस ती बॅलेला जाण्यासाठी एक सुंदर लाल साडी नेसून येते. गुडघ्यापर्यंत रुळणारा काळा केशसांभार मोकळा सोडलेला! भारावलेला उदयन म्हणतो, ‘‘जास्वंदी! जास्वंदी आंटी.’’ पण हा तुकडा फारच लहान आहे. म्हणजे ती स्टेजवर येते आणि लगेच दोघे जातातही. प्रयोग पाहायला विजया राजाध्यक्ष आल्या होत्या. नाटक आवडलं म्हणून सांगायला त्या आवर्जून आत मेकअप रूममध्ये भेटायला आल्या. बाकी तपशिलांबरोबर त्यांनी वेशभूषेचेही कौतुक केले. पण म्हणाल्या, ‘‘अगं, ती सुंदर लाल साडी. नजर ठरत नाही. पण सोनिया ती नेसून येते आणि लगेच जाते. सगळ्या बायका हळहळतात.’’ त्यांचे म्हणणे रास्त होते. मग राणीने आणि मी सोनियाच्या शेवटच्या एका महत्त्वाच्या प्रवेशाला सोनियाला पुन्हा ती साडी नेसायला दिली. त्या प्रवेशाच्या उत्कटतेला ती साडी अगदी साजेशी होती.
नाटकाचा शेवट मी अर्थातच मूळचा ठेवला होता. ‘कलावैभव’चा प्रयोग पाहिलेले काही प्रेक्षक विचारीत, ‘‘का हो? शेवट बदलला का?’’ मग मी ठणकावून सांगत असे, ‘‘नाही. शेवट असाच आहे! तो आधीच्या प्रयोगात बदलला होता.’’ विजयाच्या भाकिताप्रमाणे पाच-सहा प्रयोगांमध्ये एखाद् वेळा आपला निषेध नोंदवायला काहीजण बॅकस्टेजला येत. बहुतेककरून बायका. तथाकथित संस्कृतीरक्षिका. सोनियाचे अध:पाती वर्तन त्यांना मान्य नसे. मग मी नम्रपणे म्हणत असे, ‘‘भगिनींनो, कुणी कसं वागावं हे कोण ठरवणार? तुम्हाला मान्य असलेल्या चौकटीतच पात्रे वावरली, तर नाटकात नाटय़ उरणार नाही. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळी माणसं कशी, का वागतात, हे जोखण्याचे, त्यांच्या वर्तणुकीचा अर्थ लावण्याचे, त्याचे विश्लेषण करण्याचे नाटककाराचे कार्य आहे. स्टेजवरून इसापनीतीचे धडे देणे हे त्याचे उद्दिष्ट नाही. फक्त निष्कलंक व्यक्तींवरच नाटक करण्याचा पायंडा असता तर ‘ईडिपस’, ‘मॅकबेथ’, ‘किंग लियर’, ‘फादर’ किंवा आपल्या रंगभूमीवरची ‘एकच प्याला’, ‘शारदा’, ‘तो मी नव्हेच’, ‘सखाराम’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र’, ‘मी नथुराम..’ अशासारखी नाटके दिसलीच नसती.
तालमी ‘बाजा’च्या देखरेखीखाली जोरात चालू होत्या. रंगीत तालमीला मी देवळेकरांना सहज म्हटलं, ‘‘एवढा देखणा सेट; पण बागेत लॉनचा पट्टा असता तर बहार आली असती. हे वाटतं संतोषने ऐकलं. प्रयोगाच्या आधी त्याने मोठा खर्च करून लॉनची बिंडाळी बागेत पसरवली. ‘‘हे काय?’’ मी स्तिमित होऊन म्हटलं. ‘‘हा माझा हातभार..’’ संतोष हसून म्हणाला.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये ५ मार्च २०११ ला ‘जास्वंदी’ पुन्हा एकदा बहरली. तिला प्रेक्षकांचे प्रचंड आणि उत्साही प्रोत्साहन मिळाले. नाटकाला लाभलेल्या सर्व जमेच्या गोष्टींमुळे प्रयोग देखणा झाला. ‘सर्वागीण’ या शब्दाचे सार्थक झाले. मीच वर्णन करीत बसण्यापेक्षा काही थोडक्या परीक्षकांना पाचारण करते..
रवींद्र पाथरे, लोकसत्ता : हा विषय आजही तितकाच पकड घेतो, तो त्याच्या टोकदार मांडणी व सादरीकरणामुळे.. बोक्यांकरवी माणसांच्या नैतिकतेचा पंचनामा करणं, ही सईबाईंची अफलातून कल्पना!.. सर्वागसुंदर नाटय़ानुभव.
कमलाकर नाडकर्णी, आपलं महानगर : मांजरांच्या हालचाली इतक्या चपखल बसवल्या आहेत, की मार्जार-परिचित प्रेक्षक त्यांना उत्स्फूर्त दाद देईल. सनीभूषण आणि अभय जाधव यांनी अशी बेफाट कामगिरी केली आहे, की ही बोलकी मांजरेच नाटक गिळंकृत करणार की काय, असा संशय येतो. सुदैवानं तसं होत नाही.
जयंत पवार, महाराष्ट्र टाइम्स : पूर्ण उमललेलं देखणं नाटय़फूल.. सोनियाचे उदयनला जवळ करणे आणि शेवटी तानपुरेने तिला तोल सावरत तिच्या बेडरूमकडे नेणे- हे बटबटीत होऊ शकणारे प्रसंग अतिशय सहज आणि नाजूकपणे येण्यात नाटकाचा विजय आहे.. सर्व बाजूंनी जमून आलेल्या या प्रयोगाची लज्जत एकदा तरी नक्कीच चाखायला हवी.
रमेश उदारे, पुण्यनगरी : स्त्रीमनाच्या वेदनेचा वेध घेण्याचा प्रयत्न अत्यंत सुरेख गुंफला आहे. दर्जेदार निर्मिती.
राज काझी, पुणे सकाळ : सलाम करावा इतकं लेखनदृष्टय़ा श्रेष्ठ नाटक.. स्वाती आणि आनंद आलकुंटे नाटकाची रंगतच नव्हे, तर गुणवत्ता वाढवतात. संगीत एक मोठे अॅसेट.
परीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे दिवसेंदिवस नाटक जोर पकडू लागले. दिल्लीला ठ.र.ऊ. च्या नाटय़महोत्सवात (भारंगम्) त्याने वर्णी लावली. ‘जास्वंदी’ला टकाळअ चे पारितोषिक जाहीर झाले आणि ते घ्यायला संतोष थेट लंडनला गेला. मला अतिशय आनंद झाला. ‘महाराष्ट्र रंगभूमी’चे (आणि संतोषचे) जनक नाना कोचरेकर हयात असते तर त्यांना मुलाचे निश्चित कौतुक वाटले असते.
‘जास्वंदी’चे १२५ प्रयोग झाले. केलेला अवाढव्य खर्च चांगला भरून निघत होता. आणि
सारिकाने नाटकाला सोडचिठ्ठी दिली होती. तिच्या घरी पाळणा हलणार होता..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा