संस्कृत नाटककार भास यांची नाटके काळाच्या उदरात गडप झाली होती. टी. गणपती शास्त्री या विद्वानाने १९१२ साली ती शोधून काढली. त्रावणकोर संस्थानातील एका मठात मल्याळी लिपीत ताडपत्रांवर ती लिहिलेली आढळली. हा प्राचीन खजिना प्रकाशात आला त्या घटनेस २०१२ साली शंभर वष्रे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा विशेष लेख..
ना टक हा संस्कृत साहित्याचा प्राण. काव्येषु नाटकं रम्यम् हे तर खरेच. कारण डोळे आणि कान या दोन्ही इंद्रियांद्वारे रसिकाच्या हृदयाला थेट भिडण्याचे सामथ्र्य फक्त नाटकाच्याच ठिकाणी असते. संस्कृत नाटककारांच्या मांदियाळीमध्ये जन्माने आणि गुणांनीही पहिले स्थान मिळवले आहे ते महाकवी भास याने!
श्रेष्ठ नाटककार म्हणून भासाचे कौतुक संस्कृत वाङ्मयात ठायी ठायी केलेले दिसते. भासासारख्या प्रथितयश महाकवीच्या उत्तमोत्तम कलाकृती समोर असताना आपल्या नवीन नाटय़कृतीचे स्वागत रसिक मंडळी कसे काय करतील, अशी काळजी प्रत्यक्ष कालिदासालाही पडली होती. दंडीने ‘मृत्यूनंतरही आपल्या नाटकांच्या रूपाने अमर झालेला महाकवी’ म्हणून भासाची स्तुती गायली आहे. बाणभट्टाने भासाच्या नाटकांची मंदिरांशी तुलना करून त्यांची वैशिष्टय़े नमूद केली आहेत.
नाटकांची संख्या हा निकष लावला तरी भासाचे स्थान पहिलेच आहे. कारण भासाच्या उपलब्ध नाटकांची संख्या तेरा आहे. म्हणूनच भासाच्या नाटय़वाङ्मयाला भासनाटकचक्र या नावाने ओळखले जाते. भासनाटकचक्राकडे नुसता दृष्टिक्षेप टाकला तरी त्यातले वैविध्य जाणवते.
रामायण- महाभारत ही प्राचीन महाकाव्ये भारतीयांच्या नसानसांत भिनलेली! त्यांतून वेचक नाटय़बीजे उचलून भासाने आपल्या स्वतंत्र प्रतिभेने ती नाटय़रूपाने फुलविली. त्याशिवाय लोकवाङ्मयाच्या आधाराने त्याने दोन नाटके रचली; त्यांतले ‘चारुदत्त’ हे नाटक ‘संगीत मृच्छकटिक’च्या रूपाने मराठी रसिकांना चांगलेच परिचित आहे. उदयन हा भासाच्या अगोदर इतिहासात होऊन गेलेला लोकप्रिय राजा. त्याच्याविषयी प्रचलित असलेल्या आख्यायिकांना अनुसरून भासाने दोन नितांत सुंदर नाटय़कृती रचल्या. याखेरीज कृष्णचरित्रावर आधारित आणखी एक नाटक त्याने लिहिले आहे. नुसते नाटय़विषयांचे वैविध्य हे भासाचे वेगळेपण नव्हे; भासाचे प्रत्येक नाटक आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसणारे आहे. प्रत्येक नाटक वाचताना वेगळ्या वाटेने जाणाऱ्या या स्वयंप्रज्ञ, प्रयोगशील नाटककाराला मानाचा मुजरा केल्याखेरीज पुढे जाताच येत नाही. भासाचे सृजनशील मन चाकोरीच्या बाहेर जाऊन मूळ कथावस्तूचा, त्यातील पात्रांच्या मानसिकतेचा विचार करते.
रामाला वनवासात पाठवल्यामुळे अपकीर्तीची धनीण झालेली कैकेयी. पोटच्या मुलापेक्षा रामावर जास्त प्रेम करणारी कैकेयी अचानक अशी का वागली असा प्रश्न आपल्याला कधी पडला आहे का? भासाला तो पडला आणि त्याने त्यामागच्या कारणांचा विचार केला. कुळाच्या कल्याणासाठी पतीने, मुलाने आणि लोकांनी केलेली निर्भर्त्सना पचवायला तयार झालेली उदात्त कैकेयी ही भासाची निर्मिती आहे. तसाच तो बालचरित नाटकातला कंस! भासाने त्याला परंपरेप्रमाणे जाणीवपूर्वक क्रूरपणा करणारा खलनायक म्हणून रंगवलेले नाही; पूर्वकर्मामुळे अणि शापामुळे विनाशाकडे खेचला जाणारा, नियतीच्या हातचे बाहुले बनलेला दुर्दैवी माणूस म्हणून रंगवलेले आहे. परंपरेने ज्यांच्यावर दुष्ट म्हणून शिक्कामोर्तब केले आहे, अशा व्यक्तींमधले माणूसपण शोधणे, त्यांच्या तथाकथित दुष्कृत्यांची वेगळ्या दृष्टीने मीमांसा करणे, हे भासाचे वेगळेपण आहे.
संस्कृत नाटकांमध्ये करुणरसाचा परिपोष पुष्कळ आढळून येत असला तरी शोकांतिका हा नाटय़बंध आढळून येत नाही. या नियमाला अपवाद भासाच्याच दोन एकांकिकांचा- ‘कर्णभार’ आणि ‘उरुभंग’ यांचा! ‘कर्णभार’ ही अगदी लहानशी एकांकिका, पण कर्णाच्या दुर्दैवी जीवनाचा सगळा पट तिच्यात सामावलेला आहे. भासाने कमालीच्या उत्कटपणे, हळुवार सूचकतेने रंगवलेली ही शोकांतिका वाचकाला नि:संशय चटका लावते.
‘उरुभंग’ दुर्योधनाच्या आयुष्याच्या शेवटच्या घटिकांचे करुण, उदात्त आणि गंभीर चित्र आहे. महाभारतातल्या दुर्योधनापेक्षा भासाचा दुर्योधन फार वेगळा आहे. त्याच्या मनाचे सूक्ष्म पदर भासाने फार कौशल्याने उलगडले आहेत. संस्कृत नाटय़संभारात कारुण्य आणि शृंगार ही मळलेली वाट सोडून सामाजिक, राजकीय असे विषय हाताळणारे नाटककार एका हाताच्या बोटावर मोजण्यासारखे! भास त्यांच्यापकीच एक. त्याचे प्रतिज्ञायौगंधरायण हे राजकीय नाटक आहे. वत्सराज उदयनाला अवंतीच्या सम्राटाने पकडून कैद केले, तेव्हा त्याला सोडवण्यासाठी त्याच्या स्वामिनिष्ठ अमात्याने कोणती प्रभावी योजना आखली आणि ती कशी तडीला नेली याचे रोमहर्षक चित्रण भासाने या नाटकात केले आहे. चारुदत्त नाटकात सर्वसामान्य समाजात घडणाऱ्या घडामोडींचे प्रतििबब पडलेले आहे. रस्त्यावर चाललेला तरुण स्त्रीचा पाठलाग, भामटय़ांचे अचकटविचकट बोलणे, चोऱ्यामाऱ्या, पात्रता नसताना वशिल्याने अधिकाराच्या जागेवर बसणारे नादान लोक या साऱ्याचे भासाने केलेले चित्रण पाहिले, की आपण इसवी सनपूर्व चौथ्या शतकातले नाटक पाहत आहोत, की एकविसाव्या शतकातले, असा संभ्रम पडावा!
‘स्वप्नवासवदत्ता’ हे नाटक म्हणजे भासाने रंगदेवतेला अर्पण केलेला अजोड नजराणा आहे. असे म्हणतात की, भासाच्या नाटकांची योग्यता पारखण्यासाठी परीक्षकांनी ती अग्नीमध्ये टाकली. आणि काय आश्चर्य! तुकोबाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहातून वर आल्या, तसे भासाचे ‘स्वप्नवासवदत्त’ आगीच्या तावडीतून सहीसलामत बाहेर आले- स्वप्नवासवदत्तस्य दाहक: अभूत् न पावक:। प्रेमाला आपला सच्चेपणा सिद्ध करण्यासाठी सत्त्वपरीक्षा द्यावीच लागते. पण ती देत असताना माणसाच्या मनाची होरपळ होते, पण एकनिष्ठ प्रेमिक हसत हसत त्या दिव्याला सामोरा जातो आणि त्या दिव्यामुळे प्रीतीला नवी झळाळी प्राप्त होते. हे सारे अनुभवायचे असेल तर भासाचे हे नाटक वाचायलाच हवे. स्वप्नवासवदत्त भारतीय नाटय़सृष्टीला पडलेले स्वप्नच आहे!
भास खऱ्या अर्थाने प्रयोगशील नाटककार आहे. त्याच्या कविमनाला नावीन्याची ओढच आहे. गोकुळातल्या गोपांचे समूहनृत्य ‘बालचरित’मध्ये त्याने दाखवले आहे; तर ‘चारुदत्त’मध्ये रंगमंचावर द्विकेंद्री दृश्याचा नवाच घाट घातला आहे. ‘बालचरिता’त कंसाच्या मनातला चांगल्या-वाईटाचा संघर्ष दाखवण्यासाठी कंसाला पडत असलेले स्वप्नच रंगमंचावर साकारले आहे, तर ‘दूतवाक्य’ या नाटकात दुर्योधनाच्या एकटय़ाच्या भाषणाद्वारे संपूर्ण राजसभा भरलेली असल्याचा आभास निर्माण केला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी नाटय़पूर्ण रचना, अगदी मोजक्या शब्दांत प्रभावीपणे उभे केलेले भावपूर्ण प्रसंग, प्रसन्न विनोदाचा शिडकावा, मानवी मनाचा अचूकपणे घेतलेला वेध अशा कितीतरी गुणांमुळे भासाची नाटके फार वेधक, आकर्षक झाली आहेत.
‘तू माझी आईच नव्हेस’ असे कैकेयीला बजावणारा भरत, बेडर क्षात्रवृत्तीचे प्रतीक असलेला दुर्योधन, स्नेहशील आणि निरागस पद्मावती, निव्र्याज मनाचा घटोत्कच अशी भासाने रंगवलेली व्यक्तिचित्रे विसरू म्हणता विसरता येण्यासारखी नाहीत. जनमानसात रुजलेल्या कथांना अभिनव रूप देण्याचे भासाचे कसब केवळ लाजवाब आहे. भीम आणि हििडबा यांच्या पुनर्मीलनाची महाभारताला मुळीच माहीत नसलेली गोष्ट त्याने ‘मध्यमव्यायोग’मध्ये मोठय़ा रंगतदारपणे सांगितली आहे; तर ‘पंचरात्र’मध्ये दुर्योधन कबूल केल्याप्रमाणे अध्रे राज्य युधिष्ठिराला देऊन टाकतो, असे चित्रण करून सगळे महाभारतच उलटेपालटे करून टाकले आहे. आज एकविसाव्या शतकातसुद्धा क्षुल्लक कारणावरून धार्मिक भावना दुखावल्याचे स्तोम माजवले जाते, मग इसवी सनपूर्व चौथ्या शतकात भासाने एवढे धाडस कसे दाखवले असेल?
भासाची भाषा कमालीची सुबोध आणि सहज आहे. बोलीभाषेचा साधेपणा तिच्यात असला तरी जरुरीप्रमाणे ती कधी खटय़ाळ तर कधी खटकेबाजही होऊ शकते. भासाची शैली अलंकारांनी बोजड झालेली नाही. पांडित्याचे ओझेही भासाने विनाकारण तिच्यावर लादलेले नाही. लांबलचक संवाद आणि भरपूर श्लोक यामुळे बरीच संस्कृत नाटके प्रयोगाच्या दृष्टीने निरस वाटतात; पण भासाची बहुतेक नाटके याला अपवाद आहेत. भास केवळ प्रयोगशील लेखक नव्हे, तर प्रयोगशील सूत्रधारही (आजच्या भाषेत दिग्दर्शक) असावा असे वाटल्यावाचून राहत नाही.
या महाकवीचे दुर्दैव असे की, त्याची नाटके शतकानुशतके काळाच्या उदरात गडप झाली होती. ती शोधली टी. गणपतीशास्त्री या विद्वान संशोधकांनी. त्रावणकोर संस्थानातल्या एका मठात मल्याळी लिपीत ताडपत्रावर लिहिलेली ही नाटय़संपदा त्यांनी अभ्यासली आणि १९१२ साली प्रसिद्ध केली. संस्कृतप्रेमींसाठी आणि नाटय़रसिकांसाठी ही मोठीच खळबळजनक पण आनंदाची घटना होती. हा एवढा महान वाङ्मयनिधी प्रकाशात आला, या घटनेला २०१२ साली शंभर वष्रे पूर्ण झाली. एका दृष्टीने २०१२ हे भास-नाटकांचे शताब्दी वर्षच होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा