युरोप-अमेरिकेत हेरगिरी, रहस्यमयता, अद्भुतता या विषयांवरील कथा-कादंबऱ्यांचं मोठं आकर्षण आहे. त्यामुळे या विषयांवरील कथा-कादंबऱ्या मोठय़ा प्रमाणात लिहिल्या-वाचल्या जातात. जॉर्जिना हार्डिग या अशाच रहस्यमय कादंबऱ्या लिहिणाऱ्या ब्रिटिश लेखिका आहेत. त्यांची ‘द सॉलिटय़ूड ऑफ थॉमस केव्हज’ ही पहिली कादंबरी बरीच गाजली. त्यानंतर त्यांनी ‘द स्पाय गेम’ ही कादंबरी लिहिली. तिचा हा मराठी अनुवाद. अद्भुतता आणि नाटय़मता ही दोन या कादंबरीची वैशिष्टय़ं आहेत. १९६१ मधील हिवाळ्यातील एका गोठलेल्या सकाळी कॅरोलिन अचानक गायब होते. त्यानंतर आठ वर्षांची अॅना आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ पीटर यांना त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे, एवढंच सांगितलं जातं. पण आपली आई हेर होती, याची तिच्या बोलण्यातून आलेली पुसटशी कल्पना आणि नंतर वर्तमानपत्रातील बातम्या यातून पिटर-अॅना वेगवेगळ्या कल्पना करतात. पुढे मोठेपणी अॅना आईचा शोध घ्यायला लागते, त्यातून तिला कल्पनातीत सत्य समजते. त्याची ही गोष्ट आहे. अतिशय हळूवार मांडणी आणि मन हेलावून टाकणारे प्रसंग यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
‘हेरगिरीचा पोरखेळ’ – जॉर्जिना हार्डिग, अनुवाद उज्ज्वला गोखले, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – २३०, मूल्य – २४० रुपये.
राजकारणातील विधायक बदलासाठी..
सध्या राजकारणाबद्दल समाजात प्रचंड नकारात्मक पद्धतीने बोलले जाते. याचे कारण ‘राजकारण म्हणजे भ्रष्टाचार’ ही लोकांची समजूत दृढ झाली आहे. याला अर्थातच रोज उजेडात येणारे हजारो-लाखो कोटींचे घोटाळे कारण आहेत. राजकारण्यांची राजेशाही जीवनशैली आणि त्यासाठी मिळेल तिथे ओरपण्याची त्यांची वृत्ती यामुळेही हा समज दृढ झाला आहे. परिणामी, एकंदरच राजकीय नेते, पक्ष आणि राजकारण हे समस्त भारतीयांच्या दृष्टीने काहीसा घृणा आणि तुच्छतेचा विषय झाले आहे. साध्या साध्या कामांसाठीही शासकीय पातळीवर सामान्य माणसांना जी ससेहोलपट अनुभवावी लागते, त्यातून प्रशासन आणि राजकारण याविषयीची नकारात्मकता वाढत जाते. हे राजकारण बदलायचं असेल तर काय करायला हवं, या प्रश्नाच्या शोधातून ‘चला राजकारणात!’ या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. राजकारणात जेवढी चांगली माणसं, विशेषत: तरुण येतील, तेवढा राजकारणाचा गढूळ प्रवाह कमी होत जाईल, हा त्यावरचा एक उपाय आहे. तरुणांनी राजकारणात यावं यासाठीच पत्रकार दीपक पटवे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय राजकीय विश्वाची- म्हणजे भारतीय राज्यघटना, पक्षपद्धती, निवडणूक पद्धती, प्रत्यक्ष राजकीय पक्ष आणि त्यांच्या यंत्रणा आदी माहिती या पुस्तकात दिली आहे. राजकारण बदलायचं असेल तर आपली मानसिकताही बदलली पाहिजे. अशा बदललेल्या, सकारात्मक मानसिकतेच्या तरुणांनी राजकारणात प्रवेश करायला हवा. त्यातूनच भारतीय राजकारण अधिक विधायक स्वरूपाचे व्हायला मदत होऊ शकेल.
‘चला राजकारणात!’- दीपक पटवे, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २०७, मूल्य- २०० रुपये. ल्ल