पीटर ब्रुक यांच्या बहुसांस्कृतिक ‘महाभारता’तील द्रौपदी साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मल्लिका साराभाई यांचा महानाटय़ानुभव..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला आठवतंय, माझं आणि पीटरचं कडाक्याचं भांडण झालं की माझ्या छोटय़ा मुलासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन तो घरी यायचा. भेटवस्तू म्हणजे कधी कॉर्डरॉय ट्राऊजर, तर कधी स्वेटर असायचा. त्याच्या या कृतीने माझा राग विरघळेल अशी त्याला जणू खात्रीच असायची. पण तालमींदरम्यान आमच्यात सतत वाद होत. माझ्या आवाजाची पट्टी वाढली की तो मला ओरडे, ‘‘मल्लिका, तुझा आवाज चढवू नकोस. तू द्रौपदी नाही, एखादी कजाग बाई वाटते आहेस.’’ पीटरनं असं म्हणताच मी त्याला म्हटलं, ‘‘अरे, आमच्या पुराणात कजाग स्त्रिया नाहीत, फक्त शक्तीदेवता आहेत.’’

ऑक्टोबर १९८४ मध्ये मी पीटर ब्रुकबरोबर ‘महाभारत’च्या तालमी सुरू केल्या. सुरुवातीच्या काळात आमचं नातं कसं होतं ते उलगडून दाखवायला आमचा हा संवादच बहुधा पुरेसा आहे.

आधीच व्यावसायिक नाटकांच्या जगात मी तेव्हा पूर्णपणे नवखी होते. त्यात भरीस भर म्हणून मला गंधही नसलेल्या एका भाषेत मी काम करत होते. माझं बाळ जेमतेम पाच आठवडय़ांचं होतं. त्यामुळे मी सदैव त्याला चिकटलेली असे. तशात फ्रान्समधल्या त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत घर उभं करण्याची माझी धडपड सुरू होती. त्यात पीटर ब्रुकसारख्या दिग्दर्शकाच्या नाटकाचा मी एक भाग होते. ‘महाभारत’साठी एक कलाकार म्हणून पीटरला माझी गरज होती हे खरं; परंतु मी एक सुशिक्षित, चांगलं वाचन असलेली आणि त्यामुळेच सतत वाद घालणारी भारतीय होते. त्यामुळे पीटर आणि माझ्यात सतत वाद होत.

एप्रिल १९८४. पीटर ब्रुक ‘महाभारत’ करण्याच्या तयारीत होता. द्रौपदी किंवा कृष्ण यांच्या शोधार्थ तो त्याचा लवाजमा घेऊन भारतात आला आहे याची मला कल्पना होती. मी प्रेग्नंट होते. त्यातच कावीळ झाल्यामुळे पिवळी पडून अक्षरश: हडकुळी झाले होते. एकदा सकाळी सकाळी मला फ्रेंच कल्चरल विभागाकडून एक तार आली- ‘‘तू अहमदाबादमध्ये आहेस का? पीटर ब्रुक येऊन तुला भेटतील..’’असं तारेत लिहिलं होतं. दुसऱ्या दिवशी हे महाशय माझ्या घरी हजर. पीटरबरोबर त्याची असिस्टंट मेरी हेलन एस्टिएन, सिद्धहस्त लेखक ज्याँ क्लोद कारिएर, शो डिझाईनर क्लोए ओबेलान्स्की आणि तिची असिस्टंट पिप्पा असे सगळे होते. मी गडद हिरव्या रंगाचा ड्रेस घालून माझा पिवळा रंग झाकत होते. गुडघ्यापर्यंत रुळणारे केसही मी मोकळेच सोडले होते. दिवाणखान्यात आम्ही अगदी मोजकं बोललो. त्यानं विचारलं, ‘‘तू द्रौपदीसाठी ऑडिशन देशील का?’’

मला आठवतं तेव्हापासून महाभारताच्या किमान डझनभर आवृत्त्या मी वाचल्या होत्या. त्यामुळे द्रौपदी ही माझी अत्यंत आवडीची स्त्री होती. आणि आज तिच्याच भूमिकेसाठी दस्तुरखुद्द पीटर ब्रुक मला विचारत होता. एकाच वेळी मला आनंदही झाला होता आणि मी सैरभैरही झाले होते. मी नुकतीच एक प्रकाशन संस्था सुरू केली होती. लवकरच मला बाळ होणार होतं.  

सात देशांमधून आलेल्या दोनशे नर्तकांच्या बरोबर मी एका प्रचंड मोठय़ा लोककला महोत्सवाचं आयोजन केलं होतं. अशा परिस्थितीत मी पीटरला कशी हो म्हणणार होते? मी विचारात बुडालेली असताना पीटरनं मला विचारलं, ‘‘तू या आठवडय़ात पॅरिसला येशील?’’ मी म्हटलं, ‘‘शक्यच नाही. मी न्यू यॉर्कला निघाले आहे.’’ त्यावरही अत्यंत शांतपणे ‘‘हरकत नाही. माझी असिस्टंट जीन पॉल ‘कार्मेन’ या प्रकल्पाच्या  निर्मितीसाठी लिंकन सेंटरमध्ये आहे. तुझी पहिली ऑडिशन तिथे घेता येईल,’’ असं म्हणत पीटरनं तो मुद्दाही निकाली काढला आणि त्यानंतर फास्ट फॉरवर्ड- आय वॉज देअर. अ‍ॅलियान्स फ्रान्सेचा दिग्दर्शक आणि माझा मित्र एचिल फॉर्लरनं फ्रेंचचा सराव करायला म्हणून एक स्क्रिप्ट दिलं होतं. ते पाठ करण्यात, उच्चार नीट जमवण्यात मी माझे कित्येक महिने खर्च केले आणि नंतर मला कळलं की, मला पाठवलेलं ते स्क्रिप्ट हे खरं स्क्रिप्ट नव्हतंच. प्रत्यक्ष नाटकात सगळं काही उत्स्फूर्त असणार होतं. त्यामुळे त्या स्क्रिप्टचा तसा थेट काही उपयोग नव्हता. हे ऐकलं आणि मी अक्षरश: उडालेच. प्रत्यक्ष तालमींच्या वेळी माझ्या आजूबाजूला जपानी ते सेनेगली अशा तऱ्हेतऱ्हेच्या अ‍ॅक्सेंट्समध्ये फ्रेंच बोललं जात होतं. पीटरचं फ्रेंच ब्रिटिश वळणाचं होतं आणि ते तेवढंच फक्त मला त्यातल्या त्यात कळत होतं. मी ज्या ग्रुपचा भाग होते तो ग्रुप पीटरला अक्षरश: गुरू मानत असे. त्यांच्यात मी एकटीच गुरूचं वावडं असलेली होते. मला गुरू आवडत नव्हते आणि नकोही होते.

 मी पीटरशी इंग्रजीत वाद घालत असे. व्यक्तिरेखेच्या आकलनाबाबत, खाष्ट स्त्रिया आणि शक्तीदेवता याबाबत त्याच्याशी तासन् तास चर्चा झडत. त्याला यात रक्तपिपासूपण दिसायला नको होता. त्यावेळी मला वाटे, ब्रुकने महाभारतापेक्षा रामायण निवडायला हवं होतं. महाभारतातील स्त्रीव्यक्तिरेखा आणि त्यांचं अन्वयन याच्या बाबतीत पीटर हा अ‍ॅँग्लो सॅक्सन वाटावा असा होता. शेवटी एकदा पीटरने मला सांगितलं की, नाटकातले प्रवेश, व्यक्तिरेखा, त्याबाबतचं माझं आकलन यांची चर्चा त्याच्या खोलीत शक्यतो खासगीत करावी. एकदा आम्हा दोघांच्यात चर्चा झाली की त्याबाबत तो इतरांशी बोलेल असं ठरलं. १४-१४ तास तालमी केल्यानंतर मला त्याचं ‘ग्यान’ ऐकण्यात अजिबात रस नसे. आणि हे असं का, हे पीटरला कधीही कळत नसे. एकदा तो मला म्हणाला, ‘‘तुझ्याबरोबर काम करणं म्हणजे प्रिन्सेस मार्गारेटबरोबर काम करण्यासारखं आहे.’’ त्यावर, ‘‘पीटर, तू प्रिन्सेस मार्गारेटबरोबर काम केलंयस, हे मला माहीत नव्हतं!’’ असं म्हणत मी त्याची गंमत करत असे. सतत चिंता आणि ताणतणावाखाली काम करण्याची मला चीड येत असे. त्यातून कित्येकदा तर मला चक्क पळून परत भारतात यावंसं वाटत असे. पीटर ब्रुक नामक हा दिग्दर्शक आम्हाला सांगायचा- आम्ही ती व्यक्तिरेखा व्हायचं नाही.. आम्ही फक्त तिचं आकलन करायचं. आम्ही फक्त कथेकरी व्हायचं. नवरस हा आमचा ‘एक्सरसाईज’ असे. एखादा प्रवेश विनोदी करा.. मग तोच संतापाने करा.. वगैरे. ‘मल्लिका, हा प्रवेश वाईट झालाय. आता तू युधिष्ठिर साकार..’ असं काहीही चाले. एकदा ‘नोह’ या जपानी ध्वनितंत्र प्रकारात पीटरनं मला योशी ओईदा यांच्याबरोबर आवाजावर एक्सरसाईज करायला लावला. भारतीय सिनेसृष्टीत माझ्या खडय़ा आवाजासाठी मी ओळखली जात असे. पण त्याच्या अगदी विरुद्ध पीटरला मात्र माझा आवाज अत्यंत करुण असण्याची आवश्यकता वाटत होती.

योशी ओईदा यांच्या मार्गदर्शनाखाली पीटरने मला नोह पद्धतीचे आवाजाचे व्यायाम करायला लावले. कित्येक तास, कित्येक दिवस मी योशींसमोर मांडी घालून बसून तो रियाज करत असे. व्यक्तिरेखा ही कांद्यासारखी असते, त्या व्यक्तिरेखेच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक-एक पापुद्रा उलगडत जावं लागतं, हे मला पीटरने शिकवलं. त्याला हवं ते कलाकाराकडून करून घेण्याच्या बाबतीत तो अत्यंत थंड आणि निर्दयी होता. पण एक खरं, की त्यामुळेच मी आज आहे तशी कलाकार झाले.

पुढे आम्ही दोघं घनिष्ट मित्र झालो. पीटरचं ‘महाभारत’ आणि माझी ‘द्रौपदी’ यशाच्या एक-एक पायऱ्या चढत गेले. आमचं भरपूर कौतुक झालं. कित्येक मोठमोठय़ा सोहळय़ांमध्ये आम्ही व्यासपीठावर किंवा पत्रकार परिषदेत एकत्र असू. अशा कार्यक्रमांमध्ये त्याचं बोलून झालं की पीटर स्वत:च जाहीर करे.. ‘माझ्याबरोबर काम करणं ही किती भीषण कटकटीची गोष्ट आहे, हे आता मल्लिका तुम्हाला सांगेल.’ २०१८ मध्ये आम्ही भेटलो. त्याचं काही नवं काम मी त्याच्याबरोबर पाहिलं. त्याचे डोळे नेहमीसारखेच लकाकत होते. पण ती आमची शेवटचीच भेट ठरली.

पीटर, अस्वस्थ करणाऱ्या आणि विचारात पाडणाऱ्या कथा विणण्यास तू मला प्रवृत्त केलंस. तुझ्या आणि द्रौपदीच्या सहवासातली ती पाच वर्ष मला कलाकार म्हणून अंतर्बा घडवणारी ठरली. तुझी मी मन:पूर्वक ऋणी आहे. थँक यू, पीटर!                            

अनुवाद : भक्ती बिसुरे (‘आयएएनएस’ वृत्तसंस्थेकडून साभार)