हा दुष्काळ तसा एकदम येत नाही. लपूनही किंवा दबे पाँवही येत नाही. उघड, जाहीरपणे, चांगली दाणदाण पावले टाकत येतो. जानेवारीपासूनच डोळे वटारतो, आरोळ्या ठोकतो, पण आम्ही सावध होत नाही. कारण झोपेचे सोंग घेतलेल्यांना कोण जागे करणार?
माणसा खावया अन्न नाही।
अंथरूण पांघरूण तेही नाही।
घर कराया सामग्री नाही।
काय करिती।।
पुढे आला प्रजन्यकाळ।
धान्य महर्घ दुष्काळ।
शाकार नाही भळभळ।
रिचवे पाणी।।
संत रामदासांच्या काळाने अनुभवलेला हा दुष्काळ. सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या तीसेक वर्षांतला. अस्मानी-सुलतानी या प्रकरणांमध्ये त्यांनी वर्णन केलेला. तेव्हापासून कळते ते असे की, दुष्काळाला अस्मानी आणि सुलतानी हे दोन प्रभावशाली घटक प्रामुख्याने कारणीभूत असतात. त्यात असेही जाणवते की, सुलतानी ही अस्मानीला दुष्काळासाठी अधिक जबाबदार धरत असते. अस्मानीला जर वाचा असती तर तिने सुलतानीची कर्तबगारी आणि जबाबदारी नक्कीच सविस्तर वर्णन केली असती. हा दुष्काळ मानवी जीवनच नव्हे, तर पशू, पक्षी, प्राणी, सृष्टी या साऱ्यांना आपल्या कराल दाढांनी कसा भरडून काढत असतो, हे आज आपण महाराष्ट्रात पाहतो आहोत.
संत तुकारामांच्या तर अवघ्या कुटुंबाची उसकावासक या दुष्काळाने करून टाकली.
इ.स. १६२८-२९ तो दुष्काळ. तुकोबा लिहितात-
दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान।
स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली।।
दुष्काळ किती अघोरी असावा? वडीलभाऊ सावजीची पत्नी गेली. तो सैरभैर झाला. घर सोडून गेली. पहिली पत्नी गेली तुकोबांची. दुसरा मुलगाही गेला. शेती, व्यवसायाची धूळधाण झाली.
आता काय खावे कोणीकडे जावे- अशी परिस्थिती आली. तुकोबा हताश होऊन वदले-
बरे झाले देवा निघाले दिवाळे।
बरी या दुष्काळे पीडा केली।।
या संतकवींच्या काव्यातील ऐतिहासिक नोंदी आहेत. लौकिक, ऐहिक सुख-दु:खे वगळून पारमार्थिक जीवनाचा अलौकिक आनंद उपभोगता येत नाही, हेच सत्य यातून प्रकट होते.
दुष्काळाची कृपा एवढीच म्हणायची आपल्यावर, की नियमितता हा त्याचा स्वभाव नाही; पण काही प्रदेश कायम दुष्काळी राहत असतील तर आजच्या काळात दोष अस्मानीला नाही, सुलतानीलाच द्यावा लागेल.
आज लोक १९७२ च्या दुष्काळाची आठवण काढत आहेत. होय, आठवण राहील असाच तो दुष्काळ होता. ४० वर्षे झाली तरी मनावर त्या दुष्काळाचे भाजलेले चट्टे अजून आहेत. त्यात वाईट गोष्ट अशी की, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तर तेव्हा नव्हतीच; वर्तमानपत्रेही फारशी नव्हती, जी होती- त्यांचे वार्ताहर तालुका पातळीच्या खाली उतरलेली नव्हती. काँग्रेसचे एकछत्री राज्य होते आणि आकाशवाणी हे सरकारी प्रचारमाध्यम होते. त्यामुळे कोणी जगले काय नि मेले काय? हाक ना बोंब. पण तरीही होरपळण्याची धग सर्वदूर पोचावी असा दुष्काळ पडला. तेव्हा पहिल्यांदा ग्रामीण भागातील आम्ही भाग्यवंतांनी विदेशी अन्नाची म्हणजे अमेरिकेने कृपावंत होऊन पाठवलेल्या मिलो नावाच्या लाल गव्हाची चव चाखली. तो इतका विचित्र चवीचा न पचणारा गहू होता की दुसऱ्या दिवशीचे विसर्जनदेखील लालभडक रंगाचे असायचे. त्यात कुठेतरी छापून यायचे की, हा गहू अमेरिकेत डुकरांना खाऊ घालतात. हे वाचून फार अपमानित असे वाटायचे (तेव्हा हे माहीत नव्हते की, अमेरिकेतील डुकरेदेखील गौरवर्णीय असतात.)
खरे तर ‘दुष्काळी कामे काढा आणि मजुरांना हा गहू द्या’ अशी ती योजना होती. पाहा- दुष्काळ हा काही जणांसाठी सुकाळ असतो हेही कळून आले. नवीन तलावाचे खोदकाम ‘दाखवण्यात’ आले. कागद काळे झाले. पुढारी-गावातले, बाहेरचे; कर्मचारी, अधिकारी यांनी घरचे कार्य म्हणून हिरिरीने काम केले आणि आम्ही म्हणजे आमच्या भावबंदांनी आख्खी योजना फस्त केली. धूर्पताबाई ज. सखाराम आणि उस्मान वल्द सुलेमानशी जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींची हजारो नावे कागदावर होती. नावापुढे अंगठे लावलेले होते आणि तलाव खोदून पूर्ण झालेला होता (अर्थातच कागदावर) आणि शेकडो हातांना दुष्काळात काम मिळाले होते- जे त्या लोकांना माहीत नव्हते, पण मग त्या शंभर पोते मिलो गव्हाचे काय करायचे? तो आम्ही रातोरात ट्रकने हलवला. राशनवाल्या आणि इतर किराणा दुकानदारांना विकून टाकला. दुष्काळ पावला.
माणसं वणवण भटकू लागली. बाया टायरच्या चपला घालून काटय़ा, तुराटय़ा जळतणासाठी गोळा करत तेवढंच एक काम होतं. त्या काटय़ा तळहाताला टोचत नसत इतक्या शेताच्या धुऱ्यावर उभ्या शेताच्या मालकाच्या नजरा टोचायच्या.
बैल, गायी पाणी पाजायसाठी दोन-दोन मैलांवर, जिथं पाणी आसलं तिथं न्यावं लागायच्या. गवताचे भारे जिथं सुडीतून काढू काढू मदत म्हणून मुक्या जनावरांकडे पाहून वाटले, तिथे लोक आता कडब्याची एक एक पेंडी विकू लागले हे पाहूनच डोळ्यांत पाणी येत असे. खुंटय़ावर बांधलेले बैल रात्री गोठय़ात गेलो की दाव्यात अडकवलेल्या मानेला ताण देऊन मोठय़ा आशेने पाहत. त्यांचे पिंगट, हिरवे, कथिया डोळे अंधारात चमकायचे. त्यांची मागणी एवढीच फक्त असायची- मालक, फक्त एक पेंढी गवताची अन् एक बादली पाण्याची..
त्या वेळी ‘सत्यकथे’त (फेब्रुवारी ७३ चा अंक असावा) अनिल भीमराव पाटील या लेखकाची ‘बैलं’ नावाची कथा आली होती. दुष्काळाच्या तडाख्यामुळं बैलं चाऱ्याअभावी हाडं हाडं होतात; त्यांचं नाव वस्या अन् फाकडय़ा; शेतकऱ्याचं नाव इसरामा- तो गाडीला बैलांना जुपून त्यांची ‘काही तरी’ सोय लावायला निघतो. हे वाचून माझ्या पोटात धस्सच झाले. सोय म्हणजे काय? अशा हाडं निघालेल्या बैलांची सोय म्हणजे बैलबाजारात गिऱ्हाईकाचं रूप घेऊन उभे असलेले खाटीक. लेखकाची विषय आणि वातावरणाला अनुरूप अशी ग्रामीण बोली आणि लळा लावणारी शैली. कथेचा आणि बैलांचा शेवट माहीत असल्यासारखा मी अस्वस्थ आणि व्याकूळ होऊ लागलो. वाटचाल करताना इसरामा एका ठिकाणी गाडी थांबवतो. तिथं पाणी पाजतो. बाजूला नदी सौम्य खळखळ आवाज करीत वाहत असते. उसाचं लहानसं पीक डोलताना दिसते. तो मळेकरी रात्रीला मुक्काम करा म्हणतो. इसरामा थांबतो आणि बैलांना म्हणतो, ‘नशीबवान हैसा बेटय़ानं.’ रात्री गुपचूप उठतो. बायकोनं दिलेली भाकरी बैलांना खाऊ घालतो. त्यांचा मुका घेतो. अश्रू ओघळतात आणि सोन्यासारखे, जिवापाड जपलेले बैल कायमचे सोडून तिथून दु:खाने पण समाधानाने निघून जातो. कारण काय तर- ‘बैलं वैरणीला लागलीवती’.
– कथा संपली तर घळघळा माझे डोळे वाहू लागले. हायसे वाटू लागले. एक प्रचंड ताण उतरला होता. असं वाटलं की, हा लेखक कुठे असेल तिथे जाऊन त्याचे पाय धरावे आणि म्हणावे की, मी भीती बाळगत होतो तसा तुम्ही कथेचा शेवट केला नाहीत. असं वाटू लागलं की, इसरामाच्या वस्या, फाकडय़ा दाणा-पाण्याला लागले नाहीत, तर लेखकाचे आणि माझे बैल बचावले आहेत, सुखाच्या पांदणीत पोचले आहेत.
हा दुष्काळ तसा एकदम येत नाही. लपूनही किंवा दबे पाँवही येत नाही. उघड, जाहीरपणे, चांगली दाणदाण पावले टाकत येतो. जानेवारीपासूनच डोळे वटारतो, आरोळ्या ठोकतो, पण आम्ही सावध होत नाही. कारण झोपेचे सोंग घेतलेल्यांना कोण जागे करणार? मार्चमध्ये सरकारी बैठका सुरू होतात. निधी मंजुरीत एक-दोन महिने जाणार. मग घाईत खर्च होणार. जिथे पाणीच नाही लागणार तिथे चार हापशा ठोकून देणार. अनेक हापशा गोदामात जगणार. एकाच गोष्टीची सगळे जण वाट पाहतात. मे महिना संपण्याची आणि ७ जून येण्याची. चार थेंब पडले की दुष्काळाच्या नावाने आंघोळ करून सगळे जण नाचायला मोकळे!
पण ७ जून आला तरी ‘तो’ येत नाही. पाऊस त्याचे नाव! तो काळ्या ढगांना पाठवतो आणि घेऊन जातो. कुसुमाग्रजांच्या आर्त ओळी आठवतात..
थांब थांब परंतु नको रे घना कृपाळा
अजुन जाळतोचि जगा तीव्र हा उन्हाळा..
दिलासा इतकाच की, पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावली, पण माणसाच्या मनातील झरे सुकले नाहीत. माणूस हेच एक नातं मानून, दुष्काळात तापलेल्या जिवासाठी मदतीची, प्रेमाची हिरवी फांदी घेऊन कोणी ना कोणी येत राहतं. पुण्याच्या काही आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील लोकांना असं वाटलं की, आपण विदर्भात जाऊन दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी. त्यांनी त्यांच्या मित्रांना आवाहन केलं. चार दिवसांत हजारो रुपये गोळा झाले. Together, Can Do It हे त्या ग्रुपचे नाव. मधुमीता आणि वृंदा या दोघी जणी विदर्भात आल्या. त्यांना घेऊन रणरणत्या उन्हात सातपुडा पर्वतात निहाल या आदिवासी पाडय़ावर जाऊन त्यांच्या हातावर मदतीचे मूठभर दाणे ठेवले.. हे हृदयाचे हिरवेपण हेच तर जगण्याचे बळ आहे!
दुष्काळ आणि हिरवा कोंभ
हा दुष्काळ तसा एकदम येत नाही. लपूनही किंवा दबे पाँवही येत नाही. उघड, जाहीरपणे, चांगली दाणदाण पावले टाकत येतो. जानेवारीपासूनच डोळे वटारतो, आरोळ्या ठोकतो, पण आम्ही सावध होत नाही. कारण झोपेचे सोंग घेतलेल्यांना कोण जागे करणार?
आणखी वाचा
First published on: 02-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व ऱ्हस्व आणि दीर्घ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought