महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत असल्याच्या, अनेक ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्य़ातील कायमस्वरूपी दुष्काळी पट्टय़ात मोडणारे आटपाडी, म्हसवड, वाळकी, देऊळगावसिद्धी, बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, मोरगाव, लोणीभापकर, गोजुबावी अशी बरीच गावे अद्यापि तहानलेलीच आहेत. काही ठिकाणी थोडासा पाऊस झाला असला तरी गेली दोन वर्षे दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापि दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या नशिबी दुष्काळच लिहिलेला राहणार का?
मागचाच रविवार. बेंदराचा सण होता. बेंदूर म्हणजे बैलपोळा. पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्य़ातील दुष्काळी पट्टय़ात मोडणाऱ्या आटपाडीमध्ये होतो. त्यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांच्याकडून समजले की, पुण्यातील खडकवासला व पवना धरणे ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त भरली आहेत, त्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. सह्य़ाद्रीचा घाटमाथा, कोकण, विदर्भ, काही प्रमाणात मराठवाडय़ातसुद्धा पाऊस पडत होता. विदर्भ, कोकणात अनेक ठिकाणी पावसाने आणि पुराने थैमान घातले होते. त्याचवेळी आटपाडीवर काळे ढग नुसतेच जमा झाले होते, पण काही केल्या बरसत नव्हते. शेजारी माणदेशातील म्हसवडमध्येही हीच परिस्थिती. तिथल्या जनावरांच्या छावणीत सेवाभावी संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी धान्यवाटप सुरू होते : प्रत्येकी एक किलो मटकी, चार किलो तांदूळ आणि चार किलो ज्वारी!
महाराष्ट्र गेल्या दोन वर्षांत अपुऱ्या पावसामुळे हैराण आहे. त्यामुळे यावेळी तरी पावसाबद्दल सर्वानाच आस लागून राहिली होती. पावसाचा अंदाज चांगला वर्तवलेला होता. अर्थात त्याप्रमाणे पाऊस पडलाही. त्यामुळे राज्यातल्या धरणांतील पाणीसाठय़ाने आठवडय़ापूर्वीच निम्मी पातळी गाठलेली आहे. या पावसामुळे दुष्काळ संपल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकारनेही ठिकठिकाणच्या जनावरांच्या छावण्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसिद्धी माध्यमांनी आता आपला मोर्चा दुष्काळाकडून पुराकडे वळवला आहे. सर्वत्र उत्तम परिस्थिती असल्याचे चित्र रंगवले जात आहे. बऱ्याचशा भागात ते खरेही आहे. पण पर्जन्यछायेचा बहुतांश प्रदेश मात्र याला अपवाद आहे. तिथे आजही ‘दुष्काळात तेरावा’ अशीच परिस्थिती आहे. रोहिणी-मृग नक्षत्रे तर गेलीच. आता पुढे भाद्रपद आणि नवरात्रीच्या माळेकडे इथल्या शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. तेव्हाही पावसाने हुलकावणी दिली तर सलग तिसरे वर्ष दुष्काळाचा सामना त्यांना करावा लागेल. अहमदनगर, दौंड, बारामती हे तालुके, पुढे फलटण, दहिवडी, विटा-खानापूर, म्हसवड (माण), आटपाडी, जत हा राज्यातला अवर्षणग्रस्त पट्टा. कालव्यांमुळे बागायती बनलेले काही प्रदेश वगळता या तालुक्यांमध्ये पाऊसपाण्याची स्थिती नेहमीच हलाखीची. हा भाग गेली दोन वर्षे दुष्काळात होरपळतो आहे. या पावसाळ्यात तरी इथली परिस्थिती बदलली आहे का, हे पाहण्यासाठी फिरताना तिथे हिरवाई दिसली; पण बऱ्याच भागांत ती कुत्र्याच्या छत्र्यांसारखी क्षणिक होती. अनेक माणसं भेटली. त्यांना आता पावसाचा भरवसा उरला नव्हता. बोलण्यातून जाणवत होती ती अनिश्चितता.. पावसाची आणि जगण्याचीसुद्धा!
नगर तालुक्यात वाळकी, देऊळगावसिद्धी या गावांकडे जाताना दोन्ही बाजूंना बाजरी, मूग, मक्याचे पीक वाढले होते. गेली दोन वर्षे बाजरी, मूग झाला नाही. त्या पाश्र्वभूमीवर हे चित्र काहीसे आशादायी होते. वातावरण ढगाळ आणि पडणारे ‘रोगट’ थेंब. ‘रोगट’ अशासाठी, कारण असे वातावरण पिकावर रोग आणते. वाळकी परिसरात एक मोठा उन्हाळी पाऊस झाला. त्यामुळे एक तलाव भरला. पिण्यासाठी पाणी आले. टँकर गेले. गावात शाळेजवळच्या टपऱ्यांवर भाऊसाहेब बोठे भेटले. पांढरी दाढी. डोक्यावर गांधी टोपी. त्यावर गुंडाळलेला मळकट लाल टॉवेल. पायात विरलेला पायजमा. साठीतला जुना-जाणता माणूस. पावसाचं वातावरण पाहून म्हणाले, ‘सध्या तरी शेतकरी गोकुळाच्या दिशेने चाललाय. पण रोगराईमुळे सुस्थिती येईल याची खात्री नाही.’ इथे शेतात मूग चांगलाच वाढलाय, पण त्याला शेंगा लागण्यासाठी उघडीप हवी आहे. प्रत्यक्षात मात्र रोगट रिमझिम सुरू आहे. राज्यात दोन दुष्काळांच्या पाठीवर बहुधा चांगला पाऊस पडतो. पण इथे त्यावरचा भरवसा उडालाय. ‘माणसाप्रमाणे पावसानेही नियम मोडलाय. त्यामुळे तिसऱ्या वर्षी तरी चांगला पाऊस पडेल याची खात्री नाही..’ बोठे यांच्या बोलण्यात अनिश्चितता होती. सद्य:स्थितीत ती विचारात पाडणारी होती. इथं डाळिंब-संत्र्यांच्या बागा ज्यांनी जगवल्या, त्यांना यंदा बागा जगवण्यापुरते पाणी होते. पण उत्पन्नासाठी पुढच्या पावसाकडे त्यांचे डोळे लागले होते. देवीदास भालसिंग यांना ही चिंता होती. पण पुढे देऊळगावात घनश्याम गिरवले खूश होते. त्यांच्या सर्वच विंधन विहिरींना चांगले पाणी लागले होते. वाळकी-देऊळगावच्या परिसरात पाऊस झाला होता. पण १५-१८ कि. मी.वर असलेली रुई, मांडवगण इथे त्याने हुलकावणी दिली होती. तिथली गणिते बिघडलेली दिसत होती.
वाळकी-देऊळगावसिद्धीचा पाऊस बरा म्हणावा अशीच पुढे परिस्थिती. बारामती तालुक्यातील बागायती नसलेली गावेही तशीच. शिर्सुफळ, मोरगाव, लोणीभापकर अशी बरीच गावे. बारामतीच्या हवाई धावपट्टीला लागून असलेली गोजुबावीसुद्धा तशीच. गावचा शिवार २२०० हेक्टरचा. जलसंधारणाची कामे जागोजागी झालेली आहेत. ओघळ अन् ओघळ अडवलाय. बांध, बंधारे, चर, सीसीटी.. पाणी मुरवण्याचे सर्व मार्ग अवलंबले आहेत. गावात मातीचे ७२ तलाव आहेत. मोठय़ा तलावांतील गाळ काढून क्षमता वाढवली आहे. विहिरींचे पुनर्भरण केले आहे. नजरेत भरावीत इतक्या संख्येने झाडे आहेत. तरीही या वर्षी टँकर लावावे लागले. ‘आम्हाला ५०० मि. मीटर पाऊस पडला तर तीन वर्षे प्यायला पाणी मिळते,’ सरपंच कैलास आटोळे पाण्याचा हिशेब सांगतात. हिवरे-बाजार, राळेगणसिद्धी या गावांशी तुलना करतात. जलसंधारणाची सगळी कामे झाली आहेत, आता फक्त पावसाचीच प्रतीक्षा आहे. गोजुबावीप्रमाणेच दुष्काळी पट्टय़ात बहुतांश ठिकाणी ही कामे झाली आहेत. दहिवडी असो, वीटा-खानापूर, म्हसवड, नाहीतर आटपाडी. वेगवेगळ्या प्रकारचे चर, बांध, सिमेंटचे बंधारे, ओढय़ांची पात्रे खोल-रुंद करणे, अतिक्रमणे हटवून त्यांचे सरळीकरण करणे, तलावातील गाळ होता. त्याची मजुरी अजून मिळालेली नाही. गयाबाईला त्याबद्दल काही माहीत नाही. त्या म्हणतात, ‘जगायचे असेल तर काम करावेच लागेल. मजुरी मिळाली तरच पोटाला मिळेल.’ सध्या त्यांना काम आहे. कारण पाऊस झाला आहे. गयाबाई व्यवहारेंसारख्या अनेकींनी आता कामाला जुंपून घेतले आहे. त्यांना एकच माहीत आहे- आता दुष्काळ संपलाय.
‘दुष्काळ’ या शब्दाचे निकष तपासले गेलेले नाहीत. ज्या पसेवारीच्या आधारे दुष्काळ ठरवला जातो, त्यासाठी नेमलेल्या समितीची एक बठक झाली. पण तीत निकष काय असावेत, हे ठरलेच नाही. हे काम एवढे अवघड आहे का, की समस्या संपल्यावरही त्याबाबतचे धोरण ठरू नये?
दुकाळात शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची चर्चा रंगली. तुलनेने चच्रेतदेखील ग्रामीण भाग तसा मागेच होता. चाऱ्याचा प्रश्न एकाएकी मोठा कसा होतो? आता पाऊस आला आहे तर चारापिके किती घेतली जाणार? किती घेतली जावीत? सरकारी जमिनीवर त्याचे प्रयोग करावे का? पण धोरण  न ठरल्याने कुणीतरी ‘धस’मुसळेपणा करतो. त्याची ना दाद, ना फिर्याद!
या दुष्काळामुळे निर्माण झालेले पाणीवापराच्या अधिकाराचे टोकदार प्रश्नही अजून अनुत्तरीत आहेत. जायकवाडीसह खोरेनिहाय पाणीवाटप समन्यायी कसे असावे, याबद्दलचा निर्णय होण्याची गरज आहे. नेमलेल्या समित्यांचे अहवाल आणि न्यायालयातील लढे हे त्यावरचे उत्तर असू शकत नाही. पाणीप्रश्नाचे उत्तर ‘राजकीय’ असू शकत नाही. किंबहुना, ते तसे नसावेच. पण पुन्हा प्रश्न येतो की, मग याबाबतीत पुढाकार कोण घेणार? आज पाऊस झाल्याने विहिरींना पाणी आले आहे. हिरवळीवर जनावरं ताव मारताहेत. मजुरांच्या हाताला काम आहे. उधार-उसनवारीवर का असेना, पण कृषीगाडा हाकला जातो आहे. करपलेली मोसंबीची झाडे बाजूला काढून नव्याने रान सजवले गेले आहे. तथापि धोरणात्मक स्तरावर थोडा सर्वसमावेशक विचार झाला तर बरेच काही बदलू शकेल. पण एक मागणं मात्र कायम असेल : पाऊस हवाच.. भरभरून!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा